सर जदुनाथ सरकार

सरकार, सर जदुनाथ : (१० डिसेंबर १८७०-१९ मे १९५८). भारतातील प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व संशोधक. त्यांचा जन्म बांगला देशातील राजशाही जिल्ह्यातील करचमारिया या गावी सधन कुटुंबात झाला. वडील राजकुमार व आई हरिसुंदरी. राजकुमार जमीनदार असून बाह्मो समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते. त्यांचा इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता. जदुनाथांवर त्यांच्या या व्यासंगाचे संस्कार आपातत: झाले. त्यांचे शिक्षण अनुक्रमे जन्मगावी आणि राजशाही व कलकत्ता (कोलकाता) येथे झाले. ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विदयापीठातून एम्. ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले (१८९२). कलकत्त्यातील रिपन कॉलेजात ते प्राध्यापक झाले (१८९३-९६). विदयार्थिदशेत त्यांनी ह्यूम, कार्लाइल, फॉइड, रांके, मॉमसेन, लॉर्ड ॲक्टन, मेटलॅड, गिबन, लेकी इ. विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले. त्यांच्यावर ईश्वरचंद्र विदयासागर, चंडिचरण बंदोपाध्याय, देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव होता. कदंबिनी देवी या दहा वर्षांच्या मुलीशी ते विवाहबद्ध झाले (१८९३).

कलकत्ता विदयापीठाने त्यांना प्रेमचंद रॉयचंद ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती दिली (१८९७). जदुनाथांनी इंडिया ऑफ औरंगजेब : स्टॅटिस्टिकस,टोपोगाफी अँड रोड्स हा संशोधनात्मक प्रबंध लिहिला (१९०१). तत्पूर्वी ते मेट्रो-पोलिटन (विद्यमान विदयासागर) महाविदयालयात प्राध्यापक झाले होते (१८९६-९८). नंतर त्यांनी कोलकाता प्रेसिडेन्सी कॉलेज (१८९८- १९०१), पाटणा (१९०१-१७), बनारस (१९१७-१९) कटक (१९१९-२३) व पुन्हा पाटणा (१९२३-२६) येथे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय शिकविले. अखेर ते पाटणा महाविदयालयातून इतिहास प्रमुख म्हणून निवृत्त झाले (१९२६). यानंतरचे उर्वरित जीवन त्यांनी वाचन-इतिहासलेखन व संशोधन यांत व्यतीत केले आणि वास्तव्य दार्जिलिंग व कलकत्ता अशा दोन ठिकाणी ठेवले. इंग्रजी, बंगाली, संस्कृत व फार्सी या भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. त्यांना फ्रेंच व जर्मन, पोर्तुगीज, हिंदी व मराठी याही भाषांची ओळख होती, जुजबी ज्ञान होते.

जदुनाथांनी विदयार्थिदशेतच इतिहासलेखनास प्रारंभ केला आणि १८९१ साली ‘फॉल ऑफ टिपू सुलतान’ हा विचारप्रवर्तक लेख लिहिला. भारतभर त्यांनी प्रवास केला आणि किल्ले, युद्घक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी देऊन तेथील माहिती मिळविली. पाटण्याला असताना त्यांची गो. स. सरदेसाई यांबरोबर ओळख झाली. ही मैत्री अखेरपर्यंत टिकली. सरदेसाईं-मुळे त्यांना महाराष्ट्रनातील ऐतिहासिक साधने, विशेषत: बखर वाङ्मय हाताळता आले. परिणामतः जदुनाथांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रात रस घेतला. जदुनाथांनी हिस्टरी ऑफ औरंगजेब ( पाच खंड, १९१२-२४) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. दरम्यान त्यांनी आयर्विनस लेटर मुघल्स या दोन खंडांचे संपादन केले (१९२२) आणि नादीरशाह इन इंडिया (१९२२) हे पुस्तक लिहिले. यानंतर त्यांनी मुघल ॲड्मिनिस्ट्रेशन (१९२०-२४) आणि द फॉल ऑफ द मुघल एम्पायर ( चार खंड, १९३२-५०) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मोगलकालासंबंधी तपशीलवार व मुद्देसूद माहिती प्रथमच उजेडात आणली. मोगलकालाविषयीचे त्यांचे संशोधन-लेखन आणि त्यांनी काढलेले अभ्यासपूर्ण निष्कर्ष बऱ्याच प्रमाणात मान्य झाले आहेत.

सरकारांनी मराठी बखर वाङ्मयाबरोबरच तत्कालीन पाश्चात्त्य लेखकांचे वृतांत अणि फार्सी ऐतिहासिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास करून शिवा अँड हिज टाइम्स (१९१९) हा छ. शिवाजी महाराजांविषयीचा मौलिक ग्रंथ प्रसिद्ध केला. एका महाराष्ट्रेतर इतिहासकाराने नि:पक्षपाती दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या कार्याचे व चरित्राचे केलेले मूल्यमापन त्यांत आढळते. याशिवाय हाउस ऑफ शिवाजी (१९४०) हा ग्रंथ आणि शिवाजी ए स्टडी इन लिडरशिप (१९४९) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. सरकारांचे हे शिवचरित्र उपलब्ध शिवचरित्रांत एक साक्षेपी व वस्तुनिष्ठ चरित्र ठरले आहे. इंग्रजीत हे चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्रेतर शिक्षितवर्गाला महाराजांचे चरित्र ज्ञात झाले आणि त्यांची संघराज्य कल्पना, स्वतंत्र हिंदवी राज्याची कल्पना आणि लष्करी डावपेच यांची माहिती झाली. या ग्रंथाशिवाय त्यांनी बिहार अँड ओरिसा डयुरिंग द कॉल ऑफ द मुघल एम्पायर (१९३१), ॲनेक- डोट्स ऑफ औरंगजेब अँड हिस्टॉरिकल एसेज (१९१३), स्टडीज इन औरंगजेब्झ रेन (१९२३), इंडिया थू द एजिस (१९२८) इ. अन्य गंथ लिहिले. मुघल कालासंबंधीच्या त्यांच्या ग्रंथांतून राजकीय घटना आणि प्रसंग यांबरोबरच मध्ययुगीन प्रशासनव्यवस्था, राज्यकारभार, आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, टपालव्यवस्था इत्यादींचे सूक्ष्म तपशील व परामर्श आढळतो. शिवाय सरकार यांनी काही फार्सी साधनग्रंथांचे संपादन-भाषांतर केले. अखम-इ-अलमगिरी (१९१२), मआसिर-इ-अलमगिरी (१९४७) या मूळ ग्रंथांचे सटीप भाषांतर केले आणि जारेटचे आईन-इ-अकबरी या ग्रंथाचे भाषांतर सुधारून दोन खंडांत प्रसिद्ध केले (१९४९). त्यांनी रेसिडेन्सी रेकॉर्ड्स चे एक, आठ व चौदा खंड संपादून प्रसिद्ध केले. त्यांचे अनेक स्फुटलेख मॉडर्न रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी इतिहासाशिवाय शिक्षण, मातृभाषा, शक्तिपूजा, बंगीय नाटय, कुंभमेळा इ. विविध विषयांवर लेखन केले आहे.

जदुनाथांनी आपले बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतून केले. त्यांची शैली डौलदार, ओघवती आहे भाषा थोडी अवजड असली तरी मांडणी विश्लेषणात्मक, विवेचनात्मक व शास्त्रशुद्ध आहे. सत्य ऐतिहासिक घटना निवेदन करताना ते कोणतीही भीडभाड बाळगत नसत. मोगल इतिहासावर मौलिक संशोधन करणारा पहिला इतिहासकार म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रनीय वर्तुळात मान्यता मिळाली आणि मानसन्मान लाभले. कलकत्ता विदयापीठाचे ते उप-कुलगुरू होते (१९२६-२८), रॉयल एशिॲटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्मान्य सभासद होते. तसेच अमेरिका हिस्टॉरिकल सोसाटीचे ते सभासद होते. डाक्का आणि पाटणा विदयापीठांनी त्यांना सन्मान्य डी.लिट्. पदवी प्रदान केली. कॅम्बेल गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते आणि बिटिश शासनातर्फे सी.आय.ई. (१९२६) आणि सर (नाईट) हे किताबही त्यांना मिळाले (१९२९) रेकॉर्ड कमिशन, बंगीय साहित्य परिषद, अखिल भारतीय इतिहास परिषद (१९५२) इत्यादींचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. उतारवयात त्यांच्यावर अनेक कौटुंबिक आपत्ती कोसळल्या. दोन कर्ते मुलगे कालवश झाले आणि एक मुलगी लंडनला शिकत असताना निवर्तली. उरलेल्या तीन मुलींपैकी दोघी पतिनिधनामुळे माहेरी परतल्या आणि पत्नी अपघातामुळे अंथरूणाला खिळली. त्यामुळे ते अखेरच्या दिवसांत खचले. त्यांचा मौलिक ग्रंथसंग्रह कलकत्ता राष्ट्रनीय ग्रंथालयास दिला. हस्तलिखितांचा संग्रह त्यांनी अगोदरच एशिॲटिक सोसायटीच्या हवाली केला होता. कलकत्त्यात त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ : 1. Gupta, H. R. Ed. Sir Jadunath Sarkar Commemoration, Vols. I &amp II, Hoshiarpur, 1957. २. टिकेकर, श्री. रा. जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई, मुंबई,१९६१

३. ताटके, अरविंद, संशोधक सप्तर्षि, पुणे, १९६२.

४. देशपांडे, सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, पुणे, २००६.

देशपांडे, सु. र.