इट्रुस्कन संस्कृति : इ. स. पू. ११०० ते इ. स. पू. १०० च्या दरम्यान इटलीतील पो नदीच्या खोऱ्यात व इट्रुरिया (रोमच्या उत्तरेकडील प्रदेश) या भागात नांदलेली एक समृद्ध संस्कृती. ह्या लोकांचा स्वतंत्रपणे उल्लेख हीरॉडोटस (इ. स. पू. पाचवे शतक) याने केला असून त्यानुसार इ. स. पू. ११०० च्या आसपास आशिया मायनरमधील लिडिया बागात पडलेल्या दुष्काळामुळे हे लोक समुद्रकिनाऱ्याने भटकत इटलीत येऊन तेथे स्थायिक झाले. डायोनिशिअस (इ. स. पू. पहिले शतक) ह्याच्या मते इट्रुस्कन हे मूळचेच रहिवासी होत. काही आधुनिक इतिहासकारांच्या मते हे उत्तर यूरोपातून आले असावेत. काही तज्ञांच्या मते, इट्रुस्कन संस्कृतीची खास वैशिष्ट्ये एका वेळी एका समाजात उत्पन्न झालेली नाहीत, तर वेगवेगळ्या समाजांतील भिन्न वैशिष्ट्ये त्या त्या समाजांनी येथे आणली व त्या सर्वांतून इ. स. पू. ७०० ते ६०० च्या सुमारास एक पृथक संस्कृती व समाज निर्माण झाला. या अभ्यासकांच्या मते पूर्वीच्या इतिहासकारांनी उल्लेखिलेले लिडियन लोक, खुद्द येथील स्थानिक रहिवासी तसेच इजीअन किनाऱ्यावरील व्हिल्लॅनोव्ह यांचाही त्यात वाटा आहे.

वरील प्राचीन इतिहासकारांच्या उल्लेखांबरोबरच इट्रुस्कनांच्या कोरीव लेखांचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांचे सु. आठ हजार कोरीव लेख आतापर्यंक उपलब्ध झाले असून त्यांतील काही खापरांवर, तर काही धातूंच्या पत्र्यांवर कोरलेले आहेत. क्वचित कापडावरही लेखन केलेले आढळते. या सर्व लेखांत व्यापार किंवा व्यवसाय आणि धार्मिक कृत्ये यांचीच मुख्यत्वे नोंद केलेली दिसते. खरेदीखते, हुंड्या, जमाखर्च यांसारख्या नोंदींबरोबरच पंचांगे तसेच धार्मिक विधींचे नियम आढळतात. या लोकांच्या सामाजिक व राजकीय इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ह्यांचा सविस्तार इतिहास क्लॉडियस या रोमन सम्राटाने वीस खंडांत तयार केला होता पण तोही आता उपलब्ध नाही. त्यामुळे इट्रुस्कनांची माहिती प्रामुख्याने पुरातत्त्वीय संशोधनावरच आधारलेली आहे.

इट्रुस्कनांची मध्यवर्ती अशी सत्ता नव्हती परंतु त्यांची अनेक नगर राज्ये अस्तित्वात होती आणि ती धर्माने एकमेकांशी संलग्न झाली होती. त्यांपैकी तार्क्वीन्या, सीरी, कॉर्तोना, व्होल्तेरा, कोसा, पेरूजा ही काही महत्त्वाची असून रोमचा प्रदेशही त्यांच्या आधिपत्याखाली होता. रोम, तार्क्वीन्या इ. शहरांत सरंजामदार व व्यापारी यांचीच बहुतेक वस्ती असे. हा वर्ग इट्रुस्कन अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा समजला जाई. परंतु परंपरागत समाजरचनेत सरंजामदार, श्रमिक शेतकरी, कामगार व कारागीरवर्ग हे घटक होते. वरच्या वर्गात स्त्रीला मानाचे स्थान असावे, कदाचित मातृसत्ताक कुटुंबपद्धतीही येथे अस्तित्वात असावी. बहुतेक समाज खेडोपाडी विखुरलेला होता. इ. स. पू. सहाव्या शतकांत इट्रुस्कन लष्करी दृष्ट्या पुढारलेले असावेत. कारण ह्या सुमारास त्यांनी व्यापार वाढवून समुद्रावर आधिपत्य प्रस्थापिलेले होते. त्यांचे समुद्रावरील वर्चस्व त्यांच्या कॉर्सिका, एल्बा, सार्डिनिया, बाल्टिक बेटे आणि स्पेनचा किनारा येथील वसाहतींवरून दिसते. ह्याशिवाय रोम व लेशियमवरही त्यांचे आधिपत्य होते. इट्रुस्कनांचा पौर्वात्यांशीही व्यापार होता. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या अखेरीस इट्रुरिया व कार्थेज ह्यांमध्ये एक परस्परसंमतिदर्शक तह झाला होता. या तहानुसार इट्रुरिया ग्रीकांविरुद्धच्या इ. स. पू. ५३५ च्या लढाईत उतरले. पण त्यामुळे इट्रुस्कनांचा व्यापार तसेच त्यांची समुद्रावरील सत्ता कमी झाली. गेलिक आक्रमणे व रोमनांचे वाढते साम्राज्य ह्यांमुळे इट्रुस्कनांची संस्कृती संपुष्टात येऊन ती त्यांच्यातीलच यादवीनंतर (सुला व मॅरिअस युद्ध इ. स. पू. ९०–८८) पूर्णपणे धुळीस मिळाली.

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या धार्मिक बाबींच्या लिखाणात ‘झाग्रेब मृताच्छादन’ नावाचे कापड प्रसिद्ध आहे. तसेच मृत्पात्रांवर कोरलेल्या तीनशे शब्दांच्या पत्रात यज्ञसदृश धार्मिक विधीची माहिती दिलेली आहे तर ब्राँझच्या यकृताकृतीवर देवदेवतांची नावे सापडतात. त्यांतील टीनीआ, सेथलन्स, मारीस, उनी, मिनर्व्हा इ. देवतांची तसेच अनेक उपदेवतांची पूजा होत असावी. ह्यांच्याकरिता जवळजवळ प्रत्येक शहरात देवालये उभारण्यात आली असावीत आणि त्या गावातील रस्ता, चौक किंवा सर्व गाव एखाद्या तरी देवतेला वाहिलेले असे. तथापि देवदेवतांपेक्षा इट्रुस्कनांमध्ये मृत, त्यांची उत्तरक्रिया, त्यांचा परलोकप्रवास ह्यांविषयी जास्त विचार केलेला दिसून येतो. मृतांच्या सन्मानार्थ क्रीडास्पर्धा, नाट्य व नृत्यस्पर्धा आणि संगीताच्या मैफलीही करीत व नंतर त्याला थडग्यात पुरीत. सीरी व तार्क्वीन्या येथील स्मशानभूमींवरून असे दिसते, की मृतांची थडगी म्हणजे सुसज्ज घरेच होती. भुयारांतील या थडग्यांत रोजच्या जीवनाला लागणाऱ्या लहानमोठ्या वस्तू, रंगीबेरंगी भांडी, सोन्याचे दागदागिने आणि भिंतींवर चित्रकाम केलेले आढळले आहे. मृताला अग्नी देऊन, त्याच्या अस्थी एखाद्या कुंभात वा कापडात गुंडाळून ठेवीत शिवाय त्यासाठी शवपेटिकांचाही उपयोग करीत. इट्रुस्कन समाजात पुरोहित वर्गाचा पगडा जबर असे. मंत्रतंत्रविद्या आणि फलज्योतिष यांचा प्रसार होताच, पण याशिवाय मारलेल्या प्राण्याच्या यकृताच्या परीक्षेवरून शुभाशुभ वर्तविणे, हेही पुरोहिताचे कार्य असे. पुरोहितास इट्रुस्कन समाजात मानाचे स्थान होते. युद्धप्रसंगी सैन्याचे नेतृत्वही तो करीत असे. दोन्ही हातांत मशाली किंवा जिवंत सर्प घेऊन तो सैन्याच्या अग्रभागी उभा राही. जिवंतपणी व मेल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या जीवितावर पुरोहितवर्गाचा अंमल असतो अशी कल्पना तत्कालीन समाजात रूढ होती.

कला : इट्रुस्कन कलानिर्मितीवर इ. स. पू. सातव्या शतकाच्या अखेरीस ग्रीक कलेचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. तथापि त्यांची कला त्यांच्या खास सांस्कृतिक वैशिष्ट्यांची आणि पौर्वात्य प्रभावाचीही निर्दशक आहे. इट्रुस्कन नगरे बहुधा डोंगरांच्या उतारांवर बांधलेली असत व त्यांची रचना टप्प्याटप्प्याने केलेली असे. नगराभोवती कोट व मध्यभागी मंदिर अशी व्यवस्था असे. नदीकाठची वसाहत असल्यास एका काठावर वस्ती व दुसऱ्या काठावर स्मशानभूमी अशी विभागणी असे. लाकूड व वीट हीच मुख्य वास्तुमाध्यमे होती. आरंभीच्या काळातील इट्रुस्कन वास्तुकलेचे नमुने थडग्यांच्या स्वरूपातील आहेत. त्यांपैकी काही दगडांत खोदलेली आणि काही बांधलेली आढळतात. मोठमोठ्या भिंती व खोदलेली अरुंद अंतर्गृहे ही अशा वास्तूंची वैशिष्ट्ये होत. ग्रीक स्तंभरचनेचा आणि अलंकरणाचा प्रभाव इट्रुस्कनांच्या मंदिररचनेत दिसून येतो. तथापि आपल्या धार्मिक कल्पनांप्रमाणे वास्तुरचनेत त्यांनी फेरफार केले. त्यांच्या वास्तुकलेत भौमितिक आपल्या आकृतिबंधही जाणवतात. कमानी आणि अर्धवर्तुळाकारी घुमट यांचाही उपयोग त्यांनी केल्याचे दिसून येते. ६०० ते ४५० इ. स. पू. या काळात उभारलेली लाकडी देवळे व त्यांतील पक्वमृदेच्या मूर्ती आणि चित्रे, मर्तिकासाठी केलेल्या दगडी मूर्ती व अपोत्थित शिल्पाकृती इत्यादींचे अवशेष आजही आढळतात. त्यांपैकी अपोत्थित शिल्पाकृतींत व थडग्यांतील भडक रंगीत चित्रणात लढाई, मर्तिकाच्या वेळचे खेळ, मेजवान्या, धार्मिक समारंभ वगैरे विषयांचे चित्रण आढळते. इट्रुस्कनांच्या वास्तुचित्रशिल्पादी कलांत ग्रीक कलेतील तर्कशुद्ध संयोजन दिसत नाही. स्थूलमानाने सपाट रंगांत रंगविलेले मोठे आकार व प्राथमिक भावनांची अभिव्यक्ती त्यांच्या चित्रकलेत आढळते. इट्रुस्कन चित्राकृतींत माणसांची दाटी नाही. त्यातील व्यक्तिचित्रण रेखीव व भावदर्शक आहे. नृत्य, नाट्य यांसारखे लोकजीवनातील विषयही त्यांच्या चित्रकलेत आढळतात.

इट्रुस्कनांच्या चित्रकलेतील तांत्रिक कौशल्य, आलंकारिक आकारविवेक, भडक रंगयोजना, भव्यता, सर्वसामान्य जोम व भावाभिव्यक्ती आधुनिक कलारसिकांना कुतूहलजनक वाटतात. वास्तूंवरील त्यांच्या अपोत्थित शिल्पाकृतींत गतिमानता जाणवते. त्यांच्या प्रतिमामूर्तींत भावप्रकटनाचा प्रयत्‍न दिसतो. ब्राँझची एक बालकमूर्ती या दृष्टीने उल्लेखनीय आहे. ग्रीक कलेत वैशिष्ट्ये म्हणून आढळून येणारे शारीरविज्ञानाचे ज्ञान इट्रुस्कन मूर्तिकलेत दिसत असले, तरी ग्रीकांच्या सम्यक् दृष्टीचा मात्र तीत प्रत्यय येत नाही.

इट्रुस्कनांना ब्राँझ, लोखंड या धातूंबरोबरच सोन्याचाही वापर कसा करावा हे ठाऊक होते. विविध कलाकुसरींचे आणि आकृतिबंधांचे त्यांचे दागदागिने प्रसिद्ध आहेत. तेजस्वी व मंदतेज अशा रत्‍नांना एकाआड एक जडवून त्यांनी अलंकारनिर्मितीत वैशिष्ट्य दाखविले आहे.मृत्पात्रनिर्मितीतही त्यांनी खूप प्रगती केली होती. त्यांची काळी, करडी व तांबडी ‘बुकरो’ मृत्पात्रे प्रसिद्ध असून ती बहुधा चाकावर घडविलेली असावीत. त्यांनर अपोत्थित नक्षीकाम केलेलेही आढळते त्यांतील बरीचशी मृत्पाचे इट्रुरिया येथील मूळ रहिवाशांनी तयार केली असावीत, असा तज्ञांचा कयास आहे. इट्रुस्कनांनी रथाचा उपयोग प्रथमच इटलीमध्ये रूढ केला असे म्हटले जाते.

रोमला पूर्वेकडून जी काही विद्या मिळाली, तरी मुख्यत्वे इट्रुस्कन लोकांद्वारे यात शंका नाही. कारण इट्रुस्कनांचे पौर्वात्यांशी मोठ्या प्रमाणावर दळणवळण व व्यापार होता आणि कलेतील अनेक ज्ञापके त्यांनी पौर्वात्यांकडून घेतली असावीत. नगररचना, शिल्पांतील वास्तवचित्रण ह्याशिवाय फलज्योतिषातील यकृतावरून भविष्यकथन करणे ह्या गोष्टी रोमनांनी इट्रुस्कनांकडून घेतल्या. याउलट पौर्वात्य विद्येला ग्रीक लिपी, कल्पना, कला यांची जोड देऊन इट्रुस्कन लोकांनी आपली संस्कृती अधिक समृद्ध केली. (चित्रपत्र ४४).

संदर्भ : 1. Pallottino, M. The Etruscans, Aylesbury, 1955.

2. Richardson, Emeline, The Etruscans, Chicago, 1964.

माटे, म. श्री.; गोंधळेकर, ज. द.

सीरी (चेर्व्हेअतेरी) येथे सापडलेली मृताची मातीची मूर्ती, इ.स.पू.सु. ७ वे शतक.
पेरूजा-पोर्ट मोर्झ्बी येथील कलात्मक कमानरचना
सीरी येथील मद्यपात्राची शिल्पाकृती, इ.स.पू. ७ वे शतक.
एक ब्राँझ शिल्प, इ.स.पू.५ वे शतक.
व्होल्तेरा येथील कमानयुक्त प्रवेशद्वार
पेरूजा येथील पुजारिणीची ब्राँझ प्रतिमा, इ.स.पू. ५ वे शतक.
तार्क्वीन्या येथील भौमितिक नक्षीचे एक भांडे, इ.स.पू. ७ वे शतक.
सिंहासारखे तोंड, बोकडासारखे धड व सर्पासारखे शेपूट असलेल्या काल्पनिक राक्षसाची ब्राँझ मूर्ती, इ.स.पू. ६ वे-५ वे शतक.
तार्क्वीन्या येथील एक पात्र.
मातीचे शिंगाकृती पेयपात्र, इ.स.पू. ६ वे शतक.
बेर्नाडिनीच्या थडग्यातील काहिलीच्या कडीवर कोरलेले मुखशिल्प
बेर्नाडिनीच्या थडग्यातील ब्राँझचा पंखहीन स्फिंक्स