प्रतापगड

प्रतापगड : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०८१ मी. असून दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे. शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यास १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात. दोन्ही भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इ. बुरूजांचे अवशेष टिकून आहेत.

खालच्या मुख्य किल्ल्यात शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापिलेले तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी (कार. १८१८-३९) तेथे लाकडी मंडप बांधला. हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व मंदिरातील दागिन्यांची चोरी झाली. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासही काही उपद्रव झाला.

प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व अफझलखान-शिवाजी भेट व त्या प्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (१६५९). छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आला. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्या वेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफझल बुरूजाच्या आग्नेयीस अफझलखानाची कबर आहे. तेथे दर वर्षी उरूस भरतो.

कुंभरोशी या महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ साली मोटार रस्ता करण्यात आला असून, तेथे एक धर्मशाळा आहे.

संदर्भ : ताडफळे, म. वि. प्रतापगड परिचय, मिरज, १९३९.

खरे, ग. ह.