चालुक्य घराणे : दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या. कोरीव लेखांत या घराण्याचे नाव चालिकी, साल्की, चलिक्य, चालुक्य, चलुकिक इ. विविध प्रकारांनी आढळते. हे घराणे मूळचे कर्नाटकातील पण दहाव्या शतकापासून दक्षिणेतील कल्याणीच्या राजवंशाने स्वतःस सोमवंशी कल्पून उत्तरेतील सुप्रसिद्ध पौराणिक सोमवंशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उलट बादामी चालुक्यांची एक शाखा वेमुलवाड्याचे चालुक्य स्वतःस सूर्यवंशी म्हणवीत. या घराण्याचा मूळ पुरुष उदयन व त्यानंतरचे अठ्ठावन राजे अयोध्येस राज्य करीत होते, त्यातील शेवटचा विजयादित्य दक्षिणेत आला. त्याने त्रिलोचननामक पल्लव राजाचा पराजय केला. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या विष्णुवर्धननामक पुत्राने चालुक्य पर्वतावर भगवती, नंदा गौरी, कार्तिकेय, नारायण, सप्तमातृका या देवतांची आराधना केली आणि कदंब, गंग इ. राजवंशांना जिंकून आपले राज्य स्थापिले इ. काल्पनिक कथा उत्तरकालीन लेखात दिली आहे. या राजवंशाच्या चालुक्य नावाची उपपत्ती तो ब्रह्मदेवाच्या किंवा हारिति–पंचशिख ऋषीच्या चुलुकातून (ओंजळीतील पाण्यापासून) निर्माण झाला, असे सांगून लावली आहे. 

बादामीचे चालुक्य : बादामीचे चालुक्य घराचे प्राचीन भारतीय इतिहासात सुप्रसिद्ध आहे. एके काळी यांची सत्ता दख्खनच्या बहुतेक भागावर पसरली होती. यांनी बांधलेल्या अनेक देवालयांत एका विशिष्ट स्थापत्य पद्धतीचा उपयोग केला असल्यामुळे ती चालुक्य स्थापत्य पद्धती म्हणून प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या काळी संस्कृत व कन्नड भाषांत अनेक उत्तम प्रकरणे, काव्ये रचली गेल्यामुळे त्यायोगेही यांचे नाव भारतीय वाङ्‌मयात सुविख्यात झाले आहे. हे स्वतःस मानव्य गोत्री, हारितीचे वंशज, सप्तमातांनी किंवा सप्तलोकमातांनी वाढविलेले, स्वामी महासेनाची भक्ती करणारे भगवान नारायणाकडून वराहलांछन मिळविलेले व पौंडरिक, अश्वमेध, बहुसुवर्ण, वाजपेय इ. यज्ञ केलेले असे म्हणजे क्षत्रिय म्हणवीत. 

या राजवंशाच्या इतिहासाची साधने मात्र थोडी आहेत. त्यात कोरीव लेख मुख्य आहेत. यावरच त्यांचा इतिहास प्रामुख्याने आधारित आहे. थोडी माहिती यूआन च्वांग या चिनी यात्रेकरूच्या प्रवासवर्णनावरून आणि चरित्रावरून मिळते. इराणचा राजा द्वितीय खुसरौ याचा या वंशातील ⇨दुसरा पुलकेशी  राजाशी पत्रव्यवहार व राजदूतांची देवघेव झाली होती, त्याविषयीचा एक उल्लेख एका फार्सी बखरीत आढळतो. अजिंठ्यातील एका चित्राकडे तो दूत व पुलकेशी यांच्या भेटीबाबत बोट दाखविले जाते पण ते अचूक नाही अशी आजची समजूत आहे. सामान्यतः यांची नाणी अद्यापि सापडली नाहीत. केवळ अलीकडे यांनी गुजरातेत स्थापलेल्या घराण्यातील जयाश्रय राजाचे नाणे सापडले आहे. त्यावरून बादामीच्या मुख्य घराण्याचीच नाणी पुढेमागे सापडतील, अशी आशा उत्पन्न झाली आहे. संस्कृत व कन्नड भाषांत तत्काली रचलेली बहुतेक प्रकरणे, काव्ये आता कोरीव लेखांतील व इतर उल्लेखांवरून ज्ञात झाली आहेत पण कन्नड ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. 

कोरीव लेखांत या घराण्यांचा मूळ पुरुष म्हणून जयसिंहाचा उल्लेख येतो, पण तो व त्याचा पुत्र रणराग यांच्याविषयी काही माहिती मिळत नाही. रणरागाचा पुत्र प्रथम पुलकेशी याचा ५४३-४४ चा लेख बादामीच्या किल्ल्यात सापडला आहे. त्याने वातापिपूर (बादामी) येथे आपली राजधानी स्थापिली. चालुक्य राजवंशाचा हा पहिला बलाढ्य राजा होय. याने अश्वमेघ, अग्निष्टोम, वाजपेय, बहुसुवर्ण, पौंडरिक यासारखे श्रौत याग केले होते व हिरण्यगर्भनामक महादान दिले होते. 

प्रथम पुलकेशीला प्रथम कीर्तिवर्मा व मंगलेश असे दोन पुत्र होते. पैकी कीर्तिवर्म्याने गादीवर आल्यावर कर्नाटकातील कदंब, कोकणातील मौर्य व मध्य प्रदेश-ओरिसातील नल राजांवर विजय मिळवून आपली साम्राज्यसत्ता पसरविली. हा निधन पावला तेव्हा त्याचा पुत्र द्वितीय पुलकेशी हा अल्पवयी असल्यामुळे ह्याचा धाकटा भाऊ मंगलेश हा ५९७-९८ मध्ये गादीवर आला. उत्तर भारतात स्वारी करून गंगातीरी आपला धर्मस्तंभ उभारण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. म्हणून त्याने आपल्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या कलचुरी नृपती बुद्ध (बुद्धरस) या राजावर स्वारी करून त्याचा पराजय केला. पण इतक्यात रेवतीद्वीप (वेंगुर्ल्याजवळचे रेडी बेट) येथे राज्य करणाऱ्या स्वामिराजनामक मांडलिकाने बंड केल्यामुळे त्याला त्याचे पारिपत्य करण्याकरिता तातडीने जावे लागले. त्यामुळे त्याचा उत्तर भारतातील संकल्पित दिग्विजय घडून आला नाही. 

मंगलेशाने आपल्या मागून आपल्या पुत्रास गादी मिळावी, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. राज्याचा खरा वारस द्वितीय पुलकेशी याला ते सहन न होऊन त्याने देशत्याग केला आणि इतर नृपतींचे साहाय्य मिळवून मंगलेशावर स्वारी केली. या कलहात मंगलेशाचा पराजय होऊन तो मारला गेला आणि द्वितीय पुलकेशी ६१०-११ च्या सुमारास गादीवर आला. द्वितीय पुलकेशी हा या घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने लाट (दक्षिण गुजरात), मालव व उत्तर गुजरातचे गुर्जर यांना आपले मांडलिक बनविले. उत्तर भारतातील हर्षाच्या आक्रमणास पायबंद घातला. उत्तर आणि दक्षिण भारताच्या या दोन बलाढ्य नृपतींचे नर्मदातीरी घनघोर युद्ध होऊन त्यात गजसैन्याचा नाश झाल्यामुळे हर्षाचा पराभव झाला. याचे वर्णन ऐहोळे शिलालेखात ‘युधि पतितगजेन्द्रानीकबीभत्सभूतो भयविगलितहर्षो येनचाकारि हर्षः ।’ अशा शब्दांत केले आहे. यानंतर पुलकेशीने परमेश्वर ही पदवी धारण केली. 

यानंतर ऐहोळे शिलालेखात पुलकेशीच्या नव्याण्णव हजार गावे (गव्यूति लांबरुंद) असलेल्या तीन महाराष्ट्रांवर सत्ता स्थापन केल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीने नर्मदा नदी ही त्याच्या राज्याची उत्तर सीमा झाली. 

यानंतर दक्षिण कोसल व कलिंग यांच्या राजांनी त्याचे स्वामित्व कबूल केले. पुढे त्याने पिष्टपुराच्या (पीठापुरम्‌च्या) राजाचा पाडाव केला. नंतर पुलकेशीने कुनाल तलावाजवळ वेंगीच्या विष्णुकुंडिन्‌ वंशी राजाचा घनघोर युद्धात पराजय करून कांची (सध्या कांजीवरम्‌) या पल्लव राजधानीला वेढा घातला, पण त्याला ते नगर काबीज करता आले नसावे. 

पुलकेशीने इराणचा राजा द्वितीय खुसरौ (खुस्रव) यास नजराणा व हत्ती पाठवून त्याच्याशी ६२५ च्या सुमारास राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, अशी समजूत आहे. उत्तरेस नर्मदेपर्यंत त्याचे राज्य पसरल्यामुळे त्याने नासिक येथे आपली दुसरी राजधानी केली असावी. ६४१-४२ मध्ये चिनी यात्रेकरू यूआन च्वांग त्याच्या दरबारी आला. तेव्हा त्याचा मुक्काम नासिकला असावा कारण यूआन च्वांग त्याला महाराष्ट्राचा अधिपती म्हणतो. 

पुलकेशीच्या कांचीनगरीवरील आक्रमणाने उत्पन्न झालेले चालुक्य पल्लवांचे वैर कित्येक पिढ्या चालले आणि त्यात या दोन्ही राजवंशांचे अपरिमित नुकसान झाले. ६४२ मध्ये पल्लव नृपती नरसिंहवर्मा याने चालुक्य राज्यावर आक्रमण करून वातापिपूर काबीज केली. तेथील युद्धात पुलकेशी ठार झाला असावा. नरसिंहवर्म्याने नंतर वातापिकोंड (वातापि घेणारा) ही पदवी धारण करुन चालुक्यांचे राज्य तात्पुरते खालसा केले. 


चालुक्यांच्या प्रदेशात पल्लवांचा अंमल बारा वर्षे टिकला. या अवधीत पुलकेशीचा पुत्र प्रथम ⇨ विक्रमादित्य  याने दीर्घ परिश्रमाने सैन्याची जमवाजमव करून पल्लवांच्या राज्यावर स्वारी केली आणि कांची हस्तगत करून पल्लव नृपती परमेश्वर वर्मा याचा पराजय केला. या युद्धात अनेक चकमकी घडून त्यात कधी पल्लवांचा, तरी कधी चालुक्यांचा जय होई. शेवटी विक्रमादित्याला काही प्रदेश न जिंकता परत फिरावे लागले. 

या युद्धात विक्रमादित्याला त्याचा पुत्र विनयादित्य याचे मोठे साहाय्य झाले. त्याने पल्लवांचे मांडलिक चोल, पांड्य व केरल राजांचा पाडाव केला. इकडे त्याचा पुत्र विजयादित्य याने आपल्या राज्यातील शत्रूंचा बीमोड करून सर्वत्र शांतता प्रस्थापित केली.  

विक्रमादित्याने आपला धाकटा भाऊ धराश्रय जयसिंह याची उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात व उत्तर कोकण या प्रदेशावर नेमणूक केली. जयसिंहाचा ताम्रपट नासिक येथे सापडला असून त्याचा एक पुत्र श्रयाश्रय शिलादित्य याचे ताम्रपट दक्षिण गुजरातेत व दुसरा मंगलरस याचे ताम्रपट कोकणात मिळाले आहेत. जयसिंहाने मही आणि नर्मदा या नद्यांमधील प्रदेशात वज्जडनामक बलाढ्य नृपतीचा पराभव केला. या विजयाचा उल्लेख पुलकेशीच्या हर्षावरील विजयाबरोबर ‘श्रीहर्षवज्रटविभेदविधानदक्षम्‌’ असा करण्यात येतो. हा वज्जड किंवा वज्रट कोण याची निश्चित माहिती नाही. तथापि उपलब्ध पुराव्यावरून तो काठेवाडात वलभी येथे राज्य करणारा तृतीय शिलादित्य असावा, असे दिसते. 

प्रथम विक्रमादित्याचा पुत्र विनयादित्य हा ६८१ मध्ये गादीवर आला असावा. याने उत्तर भारतावर स्वारी करून तेथील बलाढ्य नृपतीचा पराभव केला. या युद्धात विजयादित्य याने विशेष पराक्रम केला. त्याने शत्रूची गंगायमुनांकित राजचिन्हे व पालिध्वज काबीज करून ते आपल्या पित्याला नजर केले. शत्रूशी लढत असता तो पकडला गेला. पण वत्सराज उदयनाप्रमाणे त्याने युक्तीने आपली सुटका करून घेतली आणि स्वराज्यात परत येऊन सर्व बंडाळी मोडून काढली. 

विजयादित्यानंतर द्वितीय ⇨विक्रमादित्य  ७३३-३४ मध्ये गादीवर आला. त्याच्याही कारकीर्दीत पल्लवांशी युद्ध चालूच होते. विक्रमादित्याने पल्लव नृपती नन्दिपोतवर्म्याचा पराभव करुन त्याचा खट्‌वांगध्वज व हत्ती आणि सुवर्णरत्नांच्या राशी हस्तगत केल्या. त्याने तीन वेळा कांची जिंकून तेथील राजसिंहेश्वरादी देवतांना दाने दिली आणि नंतर पांड्य, चोल, केरल व कळभ्र राजांचा पराभव करून दक्षिण समुद्रतीरी आपला जयस्तंभ उभारला. 

या विक्रमादित्याच्या कारकीर्दीत अरबांनी गुजरातवर स्वारी केली. ७११ मध्ये अरबांनी सिंधमध्ये आपली सत्ता स्थापन केली व नंतर सैंधव, कच्छेल, चावोटक, सौराष्ट्र, मौर्य, गुर्जरादी नृपतींचा पराजय करुन ते दक्षिण भारत जिंकण्याच्या उद्देशाने नवसारीपर्यंत येऊन पोहोचले पण तेथे धराश्रय जयसिंहाचा पुत्र अवनिजनाश्रय पुलकेश याने प्राणपणाने लढून अरबांचा पुरता मोड केला आणि दक्षिण भारताला त्यांच्या टोळधाडीपासून वाचविले. विक्रमादित्याला या विजयाने निरतिशय आनंद होऊन त्याने अवनिजनाश्रय पुलकेशीला ‘अनिवर्तकनिवर्तयिता’ (दुर्जय शत्रूचा पाडाव करणारा) इ. उपाधींनी गौरविले. या विजयाचे रोमहर्षक वर्णन ७४० च्या नवसारी ताम्रपटात आले आहे. 

द्वितीय विक्रमादित्य ह्याचा पुत्र द्वितीय कीर्तिवर्मा ७४४-४५ च्या सुमारास गादीवर आला. त्यानेही युवराज असताना पल्लवांचा पराभव केला होता. बादामीच्या चालुक्य वंशातील हा शेवटचा राजा होय. ७५४ च्या पूर्वी राष्ट्रकूट नृपती दन्तिदुर्ग याने याचा पराभव करून याचा बराचसा प्रदेश बळकावला. तथापि यानंतर काही वर्षे कीर्तिवर्मा आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात राज्य करीत असावा. कारण त्याचे ७५४ व ७५७ चे ताम्रपट उपलब्ध आहेत, पण नंतर दन्तिदुर्गाचा चुलता आणि उत्तराधिकारी प्रथम कृष्ण याने त्याचा समूळ उच्छेद करून चालुक्यांची सत्ता नामशेष केली. आंध्र व गुजरात या प्रांतांवर त्यांनी नेमलेले नातेवाईक प्रबळ होऊन त्यांनी आपली सत्ता स्थापली. शेवटचा राजा तितकासा पराक्रमी नसल्यामुळे उदयोन्मुख राष्ट्रकूटांपुढे त्याला हार खावी लागली आणि त्यांच्या साम्राज्याचा अस्त झाला. तथापि तो वंश नष्ट झाला नाही. द्वितीय विक्रमादित्याचा भाऊ पहिला भीम याचा वंश : पहिला भीम, तिसरा कीर्तिवर्मन, पहिला तैलप, तिसराविक्रमादित्य, दुसरा भीम, पहिला अय्यण, चौथा विक्रमादित्य व दुसरा तैल हे राजपुरुष राष्ट्रकूट मध्यंतरात होऊन गेले आणि दुसऱ्या तैलपाने चालुक्य वंशाची पुन्हा स्थापना केली.

 

बादामीच्या चालुक्यांची वंशावळ 

जयसिंह 

 
 

|

 
 

रणराग 

 
 

|

 
 

प्रथम पुलकेशी (सु. ५३५ ते ५६३) 

 
 

|

 
 

|

 

|

 

प्रथम कीर्तिवर्मा (५६६-६७ ते ५९७-९८) 

 

मंगलेश (५९७ ते ६१०-११) 

 

|

 

|

 

द्वितीय पुलकेशी (६१०-११ ते ६४२) 

 

कृष्ज विष्णुवर्धन 

 

|

 

|

 

प्रथम विक्रमादित्य (६५५ ते ६८५) 

 

धराश्रय जयसिंह 

 

|

 

|

 

विनयादित्य (६८१ ते ६९६)

 

श्रयाश्रय शीलादित्य 

 

|

   

विजयादित्य (६९६ ते ७३३) 

   
 

|

   

द्वितीय विक्रमादित्य

 (७३३–३४४ ते ७४–४५)

   
 

|

   

द्वितीय कीर्तिवर्मा (७४४-४५ ते ७५७) 

   

कल्याण (णी)चे चालुक्य : हे आपणास बादामीच्या चालुक्यांचे वंशज समजत. बादामीच्या चालुक्य वंशातील शेवटचा राजा द्वितीय कीर्तिवर्मा हा शक ६७९ (७५७) मध्ये राज्य करीत होता. कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा मूळ पुरुष तैलप ह्याचा आरंभीचा लेख ९५७ चा आहे. या दोनशे वर्षांच्या काळात चालुक्यांच्या सहा पिढ्या झाल्या, असे मिरज ताम्रपटात म्हटले आहे. पण या दोन चालुक्य वंशांच्या वर्णनात व त्यांनी धारण केलेल्या बिरुदांत साम्य नाही. त्यामुळे तैलप बादामीच्या चालुक्यांचा वंशज होता काय, याविषयी संशय आहे तथापि सामान्यतः हे दोन राजवंश परस्परसंबंद्ध असल्याचे समजतात. 

या राजवंशाचाही इतिहास मुख्यत्वेकरून कोरीव लेखांवरच आधारित आहे. काही राजांची नाणी सापडली आहेत. बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात यातील काही राजांविषयी माहिती मिळते. तिचाही उपयोग तारतम्याने केला पाहिजे.

बादामीच्या चालुक्यानंतर मान्यखेटच्या राष्ट्रकूटांचे साम्राज्य महाराष्ट्र व कर्नाटक प्रदेशात स्थापन झाले. ते सु. दोनशे वर्षे टिकले. या काळात हे चालुक्य घराणे कोठे राज्य करीत होते, याची निश्चित माहिती नाही तथापि यांचे राष्ट्रकूटांशी मधूनमधून वैवाहिक संबंध झाल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आढळतात. तेव्हा दरम्यानच्या काळात हे राष्ट्रकूटांचे मांडलिक बनले असावे. 


या काळात यांच्या ५ पिढ्या झाल्यावर या वंशातील चतुर्थ विक्रमादित्य याचा विवाह चेदी देशाचा कलचुरी नृपती लक्षणराज याच्या बोंथादेवीनामक कन्येशी झाला. त्याचा पुत्र द्वितीय तैलप ह्याने या राजवंशाला साम्राज्यपद मिळवून दिले. हा आरंभी राष्ट्रकूट सम्राट तृतीय कृष्ण याचा मांडलिक म्हणून विजापूर जिल्ह्यात राज्य करीत होता. याचे ९५७ व ९६५ चे दोन लेख सापडले आहेत. त्यांपैकी नंतरच्या लेखात त्याचा महासामंताधिपती म्हणून उल्लेख आला आहे. त्याला तृतीय कृष्णाकडून अणुगजीवित (सरंजाम) म्हणून तर्द्रवाडी १००० हा प्रदेश मिळाला होता. यानंतरच्या नऊ दहा वर्षांत राष्ट्रकूटांची सत्ता डळमळीत झाली. तृतीय कृष्णानंतर गादीवर आलेल्या खोट्टिगाचा पराभव करुन राष्ट्रकूटांचा पूर्वीचा मांडलिक परमार सीयक (श्रीहर्ष) याने मालखेड राजधानीवर चाल केली आणि ते नगर लुटले. त्यायोगे राष्ट्रकूटांच्या प्रतिष्ठेला मोठाच धक्का बसला. महत्त्वाकांक्षी तैलप याने या संधीचा पूर्ण फायदा घेऊन ९७३ मध्ये खोट्टिगाचा वारस द्वितीय कर्क यावर स्वारी केली. त्या युद्धात कर्क मारला जाऊन तैलपाला साम्राज्यश्रीने माळ घातली. 

यानंतर तैलपाने हळूहळू राष्ट्रकूटांच्या मांडलिकांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. याने प्रथम गंग नृपती पांचालदेव याचा युद्धात पराभव करून त्याला कंठस्नान घातले. यानंतर उत्तर कोकणचे शिलाहार व सेऊणदेश (खानदेश)चे यादव यांनी याचे स्वामित्व मान्य केले. नंतर त्याने दक्षिण गुजरात जिंकून तेथे आपल्या सेनापतीची स्थापना केली. परमार नृपती मुंज याच्याशी त्याचे युद्ध दीर्घकाल चालले. मेरुतुंगाच्या प्रबंध-चिंतामणीत म्हटले आहे की, मुंजाने तैलपाचा सहा वेळा पराभव केला पण सातव्या खेपेस त्याने आपला प्रधान मंत्री रुद्रादित्य याच्या सूचनेविरुद्ध गोदावरी पार करून तैलपाच्या प्रदेशावर स्वारी केली असता, त्याचा पराभव होऊन तो पकडला गेला. बंदीत असता त्याचे प्रेम तैलपाची विधवा भगिनी मृणालवती हिच्यावर बसले. मुंजाच्या अधिकाऱ्यांनी त्याची एका भुयारातून सुटका करण्याचा व्यूह रचला होता पण मृणालवतीने याची वार्ता तैलपास सांगताच त्याने मुंजास आपल्या राजधानीत भिक्षा मागावयास लावून त्याचा शिरच्छेद केला, अशी दंतकथा प्रचलित आहे. 

तैलपानंतर त्याचा पुत्र सत्याश्रय ९९७ मध्ये गादीवर आला. परमार सिंधुराज याने त्याच्याशी युद्ध करून गेलेला प्रदेश परत मिळविला पण सत्याश्रयाने कोकणच्या अपराजित शिलाहार नृपतीचा पुरा मोड करून त्याला आपले स्वामित्व मान्य करावयास लावले. राष्ट्रकूटांचे चोल राजांशी दीर्घकाल युद्ध चालले होते. राष्ट्रकूटांचे उत्तराधिकारी चालुक्य यांनी तो वारसा पुढे चालवून चोलांशी अनेक पिढ्या कलह चालू ठेवला. चोल नृपती राजराज याने नऊ लाख सैन्यानिशी चालुक्यांच्या राज्यावर स्वारी केली आणि बराचसा प्रदेश उद्‌ध्वस्त केला पण शेवटी त्याचा पराभव होऊन त्याला परत जावे लागले.

सत्याश्रयानंतर त्याचे तीन पुत्र पाचवा विक्रमादित्य, अय्यणा आणि द्वितीय जयसिंह हे एकामागून एक गादीवर आले. पहिल्या दोघांची कारकीर्द अल्पकाल टिकली पण जयसिंह याने मात्र सु. १०१५ पासून १०४२ पर्यंत दीर्घकाल राज्य केले. आतापर्यंत हे उत्तराकालीन चालुक्य पूर्वीच्या मान्यखेट राजधानीतून राज्य करीत होते पण जयसिंहाच्या कारकीर्दीत ती त्यांनी बीदर जिल्ह्यातील कल्याण (सध्याची कल्याणी) येथे नेली. 

जयसिंहाला परमार भोज, कलचुरी, गांगेयदेव आणि चोल राजेंद्र या तीन बलाढ्य राजांच्या संघाशी झगडावे लागले. या तिघांनीही भिन्न भिन्न दिशांकडून त्याच्या राज्यावर आक्रमण केले. त्यांना आरंभी काही विजय मिळाले पण शेवटी जयसिंहाने त्या सर्वांचा पुरा मोड केला. तसेच त्याने आपल्या मांडलिकांवरही जरब बसविली. 

जयसिंहानंतर त्याचा पुत्र प्रथम सोमेश्वर आहवमल्ल हा गादीवर आला. त्याचे लेख १०४२ ते १०६८ पर्यंतचे सापडले आहेत. त्यावरुन याने सु. वीस वर्षे राज्य केले असावे. याच्याही कारकीर्दीत चोलांशी युद्ध चालू राहिले. चोल नृपती राजाधिराज याने अनेकवार चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांची कल्याण राजधानी लुटून उद्‌ध्वस्त केली पण १०५३-५४ मध्ये कोप्पम्‌ येथे झालेल्या युद्धात तो मारला गेला. तथापि त्याचा भाऊ राजेंद्रदेव याने मोठ्या धैर्याने लढून सोमेश्वराचा पराभव केला आणि स्वतःला त्याच रणभूमीवर अभिषेक करवून घेतला. सोमेश्वरानेही अनेकवार चोलांच्या प्रदेशावर स्वारी करून यापराजयाचा वचपा काढला. हे युद्ध दीर्घकाल चालले. १०६२ मध्ये कुडलसंगम येथे घनघोर लढाई होऊन सोमेश्वराचा पराजय झाला आणि त्याला रणांगणातून पळ काढावा लागला. 

१०५५ च्या सुमारास धाराधिपती भोजाच्या राज्यावर पश्चिमेकडून गुजरातचा भीम आणि पूर्वेकडून कलचुरी कर्ण यांनी एकदम केले. याचवेळी अकस्मात भोजाचा मृत्यू झाल्यामुळे परमारांच्या राज्यावर भयंकर गंडांतर आले होते. भोजाचा नातेवाईक (पुत्र ?) जयसिंह याने या बिकट प्रसंगी सोमेश्वराकडे साहाय्याची याचना केली. त्यानेही पूर्वापार वैमनस्य लक्षात न घेता आपला पुत्र षष्ठ ⇨विक्रमादित्य  यास जयसिंहाच्या साहाय्यास पाठविले, विक्रमादित्याने आक्रमकांना पिटाळून जयसिंहाला पुन्हा गादी मिळवून दिली.

कुडलसंगम येथे झालेल्या आपल्या पराभवाचा कलंक धुवून काढण्याकरिता सोमेश्वराने चोल नृपती वीरराजेंद्र यास पुन्हा तेथेच युद्धाचे आव्हान दिले पण ऐन वेळी सोमेश्वर आजारी पडल्यामुळे त्याची खंत वाटून त्याने कुरुवति येथे तुंगभद्रेत १०६८ मध्ये परमयोगाकरिता जलसमाधी घेतली. 

 सोमेश्वर आहवमल्लाला द्वितीय सोमेश्वर, षष्ठ विक्रमादित्य आणि जयसिंह असे तीन पुत्र होते. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र द्वितीय सोमेश्वर हा १०६८ मध्ये गादीवर बसला. त्याचा धाकटा भाऊ विक्रमादित्य ह्याला चोल नृपती वीरराजेंद्र याची मुलगी दिली होती. वीरराजेंद्राने आपल्या जामाताला गादी मिळवून देण्याकरिता सोमेश्वरावर स्वारी केली, पण त्याचा पराभव होऊन त्याला परत जावे लागले.

परमार नृपती जयसिंह याचे विक्रमादित्याशी सख्य झाले होते. विक्रमादित्य हा मोठा महत्त्वाकांक्षी व पराक्रमी असल्यामुळे पुढे मागे तो परमारांच्या साहाय्याने आपला प्रबळ शत्रू होईल असे वाटून द्वितीय सोमेश्वराने कलचुरी कर्ण आणि गंग उदयादित्य यांशी संधान बांधून माळव्यावर स्वारी केली. त्या युद्धात जयसिंह मारला गेला आणि माळव्यावर चालुक्यांचा अमल बसला पण भोजाचा बंधू उदयादित्य याने मोठ्या पराक्रमाने शत्रूचा पाडाव करून मालव भूमीला मुक्त केले.

विक्रमादित्य हा आपल्या वडील भावाच्या वतीने दक्षिणेच्या प्रदेशावर राज्य करीत होता. त्या दोघांमध्ये वैमनस्य वाढून त्याचे पर्यवसान युद्धात झाले. १०७६ मध्ये विक्रमादित्याने सोमेश्वराचा पराभव करून गादी बळकाविली. त्याने त्रिभुवनमल्ल ही पदवी धारण करून आपल्या नावे विक्रम संवत्‌ स्थापला. तो सु. शंभर वर्षे दक्षिणेत चालू होता. 

राज्यारोहणानंतर काही काळ विक्रमादित्याचे जयसिंहनामक धाकट्या भावाशी सख्य होते. पण १०८३ मध्ये जयसिंहाने आपल्या भावाविरुद्ध बंड केले आणि कृष्णा नदीपर्यंत मोठ्या सैन्यासह चाल केली. तेव्हा विक्रमादित्याने त्याचा पाडाव करून त्याला कैद केले. 


विक्रमादित्याने होयसळ, कदंब, शिलाहार, यादव यांवर विजय मिळविले. चोलांशीही त्याचे युद्ध चालूच होते. त्यात त्याने एकदा कांचीपर्यंत विजययात्रा नेली होती. वेंगीच्या चालुक्यांच्या राज्याकरिता त्याच्या चोल नृपती कुलोत्तुंग याशी अनेक चकमकी झडल्या. त्यामुळे काही काळ त्या राज्याच्या काही भाग विक्रमादित्याच्या ताब्यात आला असावा कारण त्याच्या संवताचे काही लेख त्या राज्यात सापडले आहेत. 

षष्ठ विक्रमादित्याच्या मागून त्याचा पुत्र तृतीय सोमेश्वर गादीवर आला. याच्या कारकीर्दीत होयसळ विष्णुवर्धनाने राज्यावर स्वारी केली होती पण त्याने ती परतवून लावली. त्याने स्वत: आंध्र व तमिळ प्रदेशावर स्वाऱ्या केल्या पण त्यापासून त्याला काही फलप्राप्ती झाली नाही. 

त्यानंतर जगदेकमल्ल ११३८ मध्ये गादीवर आला. त्याने होयसळ व कदंब मांडलिकांची बंडे मोडून काढली. त्याने माळव्यावर स्वारी करून तेथे बल्लाळनामक अधिपतीची स्थापना केली पण लवकरच चालुक्य नृपती कुमारपाल याने त्याला पदच्युत केले. 

जगदेकमल्लानंतर त्याचा भाऊ तृतीय तैल गादीवर आला. चालुक्य कुमारपाल व द्वितीय कुलोत्तुंग चोल यांनी दोन्हीकडून याच्या प्रदेशावर स्वारी केली. ती तो परतवून लावतो तो त्याचा मांडलिक काकतीय प्रोल याने बंड केले. तैलाने त्याच्यावर स्वारी केली पण तो स्वत:च पकडला गेला. पुढे त्याची सुटका झाली पण या घटनेने त्याची प्रतिष्ठा कमी होऊन त्याचे मांडलिक चोहीकडून त्याच्यावर उठले. त्यातील एक कलचुरी बिज्जल याने कल्याण राजधानी काबीज करून चालुक्य साम्राज्याचा शेवट केला. पुढे तृतीय तैलाचा पुत्र चतुर्थ सोमेश्वर याने बिज्जलाच्या वंशजांकडून ११८१ मध्ये काही प्रदेश जिंकून घेतला पण त्याला आपले राज्य फार काळ टिकवता आले नाही. ११८९ च्या पूर्वी यादव नृपती सिंधण याने त्याला पदच्युत करून त्याचे राज्य खालसा केले. नंतर सोमेश्वर गोव्याच्या मांडलिकाच्या आश्रयास गेला. पण ११९८ नंतर त्याच्याविषयी काहीही माहिती मिळत नाही. 

वंशावळ

राज्यव्यवस्था : चालुक्यांनी अनेक देश जिंकले आणि त्यावर आपल्या नातेवाईकांची किंवा मांडलिकांची नेमणूक केली पण सर्वत्र एकाच पद्धतीची राज्यव्यवस्था सुरू केली नाही. पूर्वीपासून आलेली पद्धतीच चालू ठेवली. कोरीव लेखांत सामान्यत: सामन्तविषयपती (जिल्हाधिकारी), ग्रामभोगिक (गावचा पाटील याला कानडी प्रदेशात ग्रामगंड – गावुंड म्हणत) इ. अधिकाऱ्यांचा उल्लेख येतो. ग्रामव्यवस्थेत महत्तर (गावातील अनुभवी प्रतिजातीय वयस्कर पुढारी) औद्योगिक व व्यापारी वर्गांचे (श्रेणींचे) प्रतिनिधी (त्यांना कानडी भाषेत नगर अशी संज्ञा असे) इत्यादिकांस महत्त्व असे. स्थानिक लोकांत तंटेबखेडे झाल्यास राजा आचारव्यवस्था ठरवून देई. त्याप्रमाणे राजपुरुष (अधिकारी) अंमलबजावणी करीत. प्रतिवर्षी देशाधिपतींना वैशाखात आणि श्रेणींना कार्तिकात कर द्यावे लागत. ब्राह्मणांना दिलेल्या अग्रहारांना सर्व करांची सूट असे. चोरी आणि राजद्रोह करणाऱ्यांस पकडण्याशिवाय अन्य कारणास्तव प्रवेश करण्यास चाट (पोलीस) सैनिक यांस प्रतिबंध असे. 

नगर व गाव यांनी विविध कर द्यावयाचे असत. जमिनीवरच्या साऱ्यास क्लप्त अशी संज्ञा असे. याशिवाय अनेक किरकोळ कर असत. त्यांना उपक्लप्त म्हणत. तेल, साखर, विड्याची पाने वगैरे जीवनोपयोगी वस्तू विकणाऱ्या दुकानांवर कर असत. एका लेखात राजाज्ञेने मिठावरच्या कराची सूट दिल्याचा उल्लेख आहे. अनेक ताम्रपटांत हे कर देवालयांस त्यांच्या खर्चासाठी लावून दिल्याचे उल्लेख आढळतात.

चालुक्यांनी सम्राटपदनिदर्शक समस्तभुवनाश्रय, श्रीपृथिवीवल्लभ, महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक अशा पदव्या धारण केल्या होत्या. त्यांना किसुवोळल् (सध्याचे पट्टदकल) येथे राज्याभिषेक होत असे. त्यांचे लांछन वराह होते. त्यांचे सामन्त साम्राज्याच्या विविध भागात राज्य करीत असत. सम्राटाला नियमितपणे खंडणी दिल्यास, त्यांना आपापल्या प्रदेशात स्वतंत्रपणे राज्य करण्यास मुभा असे. राज्यात अनेक मंत्री असत पण त्या सर्वांचे मिळून एक मंडल असे. राजा प्रत्येक महत्त्वाच्या बाबीत त्यांचा सल्ला घेई, असे दिसत नाही. 

कल्याणीच्या चालुक्यांचे वेळी राज्याचे शासनव्यवस्थेकरिता राष्ट्र, विषय, देश, नाडु, कंपण आणि ठाण असे विभाग केले होते. त्यावर राष्ट्रपती, विषयपती, नाडरस इ. अधिकारी नेमलेले असत. विषय म्हणजे सध्याचा जिल्हा विभाग. यालाच नाडु अशी कन्नड संज्ञा होती. नाडूच्या नावापुढे ३,००,८०० यासारख्या संख्या असत. त्यांचा अर्थ विवादास्पद आहे. नाडूच्या विभागास कंपण म्हणत. ठाण हा सर्वांत लहान प्रादेशिक विभाग होता.

नाडूत नाडरस व नाडगावुंड असे दोन अधिकारी असत. नाडगावुंडाकडे त्या त्या प्रदेशातील सारा वसूल करण्याचे काम असे, तर नाडरसाकडे हल्लीच्या कलेक्टरप्रमाणे सामान्य प्रशासनव्यवस्था असे. कंपणात नगर, पट्टण, पुर, ग्राम यांचा अंतर्भाव होत असे. नगरांत अनेक महाजनसंस्था असत. त्यांच्याकडे विविध प्रकारची कामे सोपविलेली होती. 


प्रत्येक गावात देवालय, ग्रामशिक्षक, त्याचे विद्यार्थी, कारकून, नाविक, तपस्वी लोकांसाठी घातलेली अन्नसत्रे इत्यादिकांकरिता जमिनी लावून दिलेल्या असत. गावातील व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना विकलेल्या मालावर विशिष्ट कर सार्वजनिक कार्याकरिता द्यावा लागे. 

गावाच्या संरक्षणाकरिता लहानशी आरक्षक (पोलीस) तुकडी असे. तिच्या मुख्याला तलारि म्हणत. त्यांना न आवरणारे संकट आल्यास, विषयाधिपतीकडून सैन्याची मदत मागवत. पण सामान्यत: गावाचे संरक्षण हे त्यात राहणाऱ्या लोकांचे कर्तव्य समजण्यात येई आणि तेही ते करण्यास सदैव सज्ज असत. 

सांस्कृतिक प्रगती : चालुक्यांच्या राज्यात विद्येला व कलांना उदार आश्रय होता. विजयादित्याच्या एका लेखात वातापिनगरी चौदा विद्यांत (चार वेद, सहा वेदांगे, पुराण, मीमांसा, न्याय आणि धर्मशास्त्र यांत) प्रवीण असलेल्या हजारो विद्वानांनी भूषित असल्याचे वर्णन आहे. जयसिंह धराश्रयाच्या नासिक येथील लेखात हरपार्वतीय  नाटकाच्या योगे विख्यात झालेल्या एका भिक्षू कवीचा उल्लेख आहे. द्वितीय पुलकेशीचा श्वशुर व मांडलिक गंग नृपती दुर्विनीत याने शब्दावतारनामक संस्कृत व्याकरण, भारवीच्या किरातार्जुनीय  काव्याच्या पंधराव्या सर्गावर टीका, बृहत्कथेचे संस्कृत रूपांतर वगैरे ग्रंथ रचले होते पण ते आता उपलब्ध नाहीत. ऐहोळे शिलालेखाचा कर्ता रविकीर्ती हा आपण आपल्या काव्याने कालिदास आणि भारवी यांसारखा कीर्तिमान झाल्याचे सांगतो. त्याने त्या लेखात अनेक ठिकाणी या प्राचीन कवींची बरोबरी केली आहे, यात संशय नाही. द्वितीय पुलकेशीचा पुत्र चन्द्रादित्य याची राणी विजयभट्टारिका ही राजशेखराने वर्णिलेली कर्णाटराजाप्रिया विजया असावी, असा तर्क आहे. तिची अनेक उत्कृष्ट सुभाषिते सुभाषित संग्रहात आढळतात. जैनेन्द्र  व्याकरण रचणाऱ्या पूज्यपाद या जैन आचार्याला विजयादित्य याने रक्तपुर (प्राचीन किसुवोळल्‌, आधुनिक पट्टदकल) येथील शिबिरातून ग्रामदान दिले होते.

संस्कृतप्रमाणे कन्नड भाषेतही त्या काळी बरीच ग्रंथरचना झाली होती. पूज्यपाद, समंतभद्र आणि कविपरमेष्ठि हे बादामी चालुक्यांच्या काळातील प्रख्यात कानडी कवी होते. पण त्यांचे ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. उपर्युक्त दुर्विनीत याने उत्कृष्ट कन्नड गद्यकाव्य रचल्याचा उत्तरकालीन कविराजमार्ग  या कन्नड अलंकार ग्रंथात उल्लेख आहे. श्रीवर्धदेव याने तत्त्वार्थ महाशास्त्रावर चूडामणि  नावाची ९६,००० श्लोकांची उत्कृष्ट टीका लिहिली होती. ती सतराव्या शतकापर्यंत उपलब्ध होती. त्याचाच समकालीन श्यामकुन्दाचार्य याने प्राकृत, संस्कृत आणि कन्नड या तीन भाषांत ग्रंथरचना केल्याचा उल्लेख आहे. 

चालुक्यांच्या वेळी पूर्वापार चालत आलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रचलित होती. श्रुतिस्मृतींना अनुसरून धार्मिक जीवन व्यतीत करणे, हे आदर्श समजले जाई. यज्ञयाग, विविध प्रकारची दाने, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, देवालयनिर्मिती ही पुण्यप्राप्तीची साधने मानीत. जीविताला कंटाळल्यामुळे जलसमाधी घेऊन किंवा जैन धर्मात सांगितल्याप्रमाणे सल्लेखना विधीने (आमरणान्त उपोषणाने) किंवा हल्लीप्रमाणे सत्याग्रह करून प्राणत्याग करण्याचा प्रघात होता. त्याची काही उदाहरणे कोरीव लेखांत येतात. पतिव्रता स्त्रिया सती गेल्याचीही उदाहरणे आहेत. 

काही स्त्रिया राज्यशासनात तर इतर काही प्रत्यक्ष युद्धात भाग घेताना आढळतात. षष्ठ विक्रमादित्याची राणी लक्ष्मीदेवी ही आपल्या पतीप्रमाणे राज्यकारभारात निपुण होती. त्याची दुसरी राणी केतलदेवी हिने आपल्या विद्वत्तेने आणि संगीतनैपुण्याने कीर्ती मिळविली होती. देवालयांत स्थापत्य, शिल्प, गीत, नृत्य इ. कलांना आश्रय मिळे. काही देवालयांना दिलेल्या दानांचे तीन भाग करून त्यातील एक देवतेच्या पूजेअर्चेकरिता, दुसरा तपस्वी-यती वगैरेंच्या अन्नसत्राकरिता आणि तिसरा विद्यादानाकरिता लावून दिलेले आढळतात. 

उद्योगधंदे आणि व्यापार श्रेणींच्या हाती होते. व्यापारी स्थल व जलमार्गाने दूरदूरच्या देशांशी व्यापार करून अमाप संपत्ती मिळवीत. त्यात अय्यवोळेपुरांतील पाचशे वीरबणंजूंची श्रेणी मुख्य होती. तिच्या शाखा द्वारवतीपुर (हळेबीड), बेल्लारी जिल्ह्यातील कुरुगोडू वगैरे ठिकाणी होत्या. 

पूर्वीच्या सांगली संस्थानातील तेरदाळ येथील ११२३ च्या कोरीव लेखांत नागरी जीवनाचे रम्य चित्र रेखाटले आहे. तेरदाळच्या संरक्षणार्थ बारा गावुंड नेमले होते. सभोवार तट असून पलीकडे खंदक होता. नगरात अनेक उद्याने व तलाव होते. बुद्ध, माधव, आदित्य, शंकर व जिन यांची देवालये होती. नगरात सर्व वर्गांच्या लोकांची शेकडो सुंदर घरे होती. त्यात शूर तसेच विद्वान व सुसंस्कृत लोकांची वसती होती. गावुंडांच्या शासनात विद्वत्तेला, तत्त्वज्ञानाला तसेच कलाकुसरीला भरपूर आश्रय मिळे. त्या नगराचा व्यापार अनेक प्रदेशांशी भरभराटीत असल्यामुळे ते जणू काय धनपती कुबेराला हसत होते. 

कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात अनेक संस्कृत ग्रंथ निर्माण झाले. जैन कवी वादिराज याने पार्श्वनाथ चरित्र  आणि यशोधन चरित्र  ही सुंदर काव्ये रचली. धनंजय कवीने एक द्विसंधान काव्य रचले होते. ते राघवपाण्डवीय  असावे. यात रामायण महाभारत  यातील राम व पांडव यांची कथा श्लेषअलंकार करुन त्याच त्या श्लोकांनी वर्णिली आहे. शिलाहार नृपती मुम्मुणिराज याचा आश्रित सोड्‌ढल कवी याने बाणाच्या कादंबरीशी स्पर्धा करणारी उदयसुन्दरी  कथा रचली होती. ती प्रकाशित झाली आहे. काश्मीरी कवी बिल्हण याला षष्ठ विक्रमादित्याने आपल्या दरबारात विद्यापती नेमून नीलच्छत्राचा मान दिला होता आणि त्याच्या दारी मात्र हत्ती झुलत ठेवला होता. त्याने लिहिलेले विक्रमांकदेवचरित काव्यगुणांत उत्कृष्ट असून तत्कालीन इतिहासासही उपयुक्त आहे. विक्रमादित्याच्या सभेतील दुसरा पंडित विज्ञानेश्वर याची याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका मिताक्षरा  ही भारतातील अनेक प्रांतात हिंदू कायद्यांकरिता प्रमाणभूत मानली जाते. त्याच स्मृतीवरची कोंकणचा शिलाहार नृपती अपरार्क याची अपरार्कटीका  हीही सुप्रसिद्ध आहे. तिचा प्रसार दूरच्या काश्मीर प्रदेशात झाला होता. भासर्वज्ञाच्या न्यायसारावर अपरार्काची टीका न्यायमुक्तावलि  हीही सुप्रसिद्ध आहे. 

चालुक्य वंशातील राजा तृतीय सोमेश्वर याच्या नावावर मानसोल्लास  अथवा अमिलषितार्थचिंतामणि  हा विश्वकोशाच्या धर्तीवर रचलेला बृहद्‌ग्रंथ आहे. त्यात राजकीय विषयांबरोबरच क्रीडा, रत्नपरीक्षा, वैद्यक पशुचिकित्सा, पूजन, गायन, नर्तन, भोजन, जादूटोणे इ. विविध विषयांचे विवेचन आहे.

संस्कृत ग्रंथांप्रमाणे अनेक कन्नड ग्रंथही या काळात रचले गेले होते. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की, त्यापैकी काही चालुक्यांच्या सांधिविग्रहिक, अर्थाधिकारी यांसारख्या अधिकाऱ्यांनी रचले होते. वनवासीचा अर्थाधिकारी शांतिनाथाचे सुकुमार चरित्र  हे चंपूकाव्य सध्या अपूर्णावस्थेत उपलब्ध आहे. सांधिविग्रहिक नागवर्माचार्य याचे चन्द्रचूडामणिशल्क  हेही काव्यगुणांमध्ये सरस आहे.

कावेरी आणि गोदावरी या नद्यांमधील प्रदेशात कन्नड भाषेपैकी पुलिगेरे (लक्ष्मेश्वर), कोपणपुर (कोप्पळ), किसुवोळल्‌ (पट्टदकल), पोन्कूंद (हुनगुंद) व मुदुवोळल (मुधोळ) या प्रदेशातील कन्नड भाषा उच्च प्रतीची समजत. या प्रदेशात अनेक उत्कृष्ट कन्नड ग्रंथकार होऊन गेले. तैलपाच्या दरबारातील रन्न याला कविचक्रवर्ती पदवी होती. त्याचे अजितपुराण गदायुद्ध  ही चंपूकाव्ये सुप्रसिद्ध आहेत. श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा प्रचंड पुतळा उभारणारा गंग सेनापती चामुंडराय याच्या आश्रयास असलेल्या नागवर्म कवीने बाणाच्या कादंबरीवर आधारलेली चंपूपद्धतीची कर्नाटक कादंबरी रचली होती. याशिवाय अभिनव पंपाचे पंप रामायण, नागचन्द्राचे पम्पुपुराण, नयसेनाचे धर्मामृत, कर्णपार्याचे द्विसंधान पद्धतीचे नेमिनाथ पुराण  इ. कन्नड काव्ये सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अलंकार, व्याकरण व कोश इ. विषयांवरही ग्रंथरचना झाली होती. 


धार्मिक जीवन : चालुक्यांच्या राज्यात वैदिक धर्माप्रमाणे बौद्ध व जैन धर्मही भरभराटीत होते. यूआन च्वांगने बहुधा नासिक येथे असलेल्या अशोकनिर्मित पाच स्तूंपाचा उल्लेख केला आहे. त्याने पर्वतात खोदलेल्या विहारांचेही वर्णन कले आहे. ते अजंठ्यास अनुलक्षून असावे असा तर्क आहे. चालुक्य नृपती आणि त्यांच्या राण्या या हिंदुधर्मी असल्याने, त्यांनी अनेक श्रोतयाग केले. देवतांची बादामी येथे उत्कृष्ट लेणी कोरविली आणि पट्टदकल वगैरे ठिकाणी सुंदर देवालये बांधली. ती अद्यापि सुस्थितीत असून तत्कालीन कलानैपुण्याची साक्ष देतात. चालुक्यांच्या राज्यात बौद्ध व हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्माचाही बराच प्रसार होता. द्वितीय पुलकेशीचा आश्रित रविकीर्ती याने ⇨एहोळे  येथे जिनाचे देवालय बांधले होते. गुडिगेरे येथे राणी कुंकुमदेवीने असेच देवालय बांधले होते. द्वितीय कीर्तिवर्म्याचा कारकीर्दीत जैन गामुंड कलियम्म याने अग्निगेरे येथे जैन चेदिय निर्माण केले होते. चालुक्य राजांपैकी कोणीही जैनधर्मी नव्हता. तथापि त्यांचा जैन धर्मास व विद्वानांस उदार आश्रय असे. 

शिव, विष्णू, कोल्हापूरची महालक्ष्मी, कार्तिकेय ही प्रमुख उपास्य दैवते होती. बौद्धांचे उल्लेख क्वचित आढळतात. पण कल्याणीच्या चालुक्यांच्या वेळी जैन धर्म मात्र भरभराटीत होता.  

अनेक उत्कृष्ट देवालये कल्याणीच्या चालुक्यांनी बांधल्याचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. नागडू येथे १०६२ मध्ये सेनापती मधुसूदन याने भगवान विष्णूचे देवालय बांधले होते. त्यात नाटकादिकरिता नाट्यशाला, यतिमुनींच्या ध्यानधारणेकरिता अनुष्ठानभवन, वेद-वेदांगाच्या पठनपाठनाकरिता मठ इत्यादींचा अंतर्भाव होता. त्याशिवाय त्याची अनेक तोरणे व प्रासाद असून त्यांना सुंदर मूर्तींनी अलंकृत केले होते. समोर गरूडस्तंभ आणि सभोवार प्राकार (तट) होता. यांसारखी अनेक देवालये इतरत्र बांधल्याचे उल्लेख कोरीव लेखांत येतात.

चालुक्यकाळांच्या अखेरीस लिंगायत किंवा वीरशैव पंथाचा उदय झाला. त्या पंथाच्या अनके आचार्यांनी लिंगायत धर्माच्या प्रसारार्थ कन्नड भाषेत ग्रंथरचना केली. 

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.

           2. Yazdani, G. Ed. The Early History of the Deccan, 2. Vol. parts I – XI, London. 1960. 

मिराशी, वा. वि.


अपस्माराधिष्ठित शिवमूर्ती, विरूपाक्ष मंदिर, पट्टदकल. दुर्गा मंदिराचा वायव्य भाग, ऐहोळे दोड्डाबसप्पा मंदिराचे शिल्पसुंदर तोरण अलंकृत स्तंभ, विरूपाक्ष मंदिर, ऐहोळे. बादामी येथील मंदिरलेण्यातील नृसिंहमूर्ती. मंदिरछतावरील ब्रह्मदेवमूर्ती, ऐहोळे.