बॅबिलोनिया : प्राचीन मेसोपोटोतील (आधुनिक इराक) टायग्रिस व युफ्रेटीस यांच्या दुआबाचा दक्षिण भाग बॅबिलेनिया या नावाने ओळखला जातो. दक्षिणेस इराणचे आखात, पश्चिमेस युफ्रेटिसचे विस्तीर्ण पात्र व पूर्वेस टायग्रिसचे पात्र या तीन नैसर्गिक सीमा. उत्तरेकडे मात्र अशी निश्चित नैसर्गिक सीमा नाही परंतु सामान्यपणे दुआबाच्या मध्याला ही सीमा येते. टायग्रिस पश्चिमेला व युफ्रेटीस पूर्वेला वळून एका ठिकाणी फारच जवळ येतात आणि पुन्हा उलट दिशांना वाहू लागतात. येथे जमिनीची जी चिंचोळी पट्टी निर्माण होते, तिच्या मध्यावर उत्तरेस ॲसिरिया व दक्षिणेस बॅबिलोनिया अशी विभागणी होते. नैसर्गिक सीमारेषा असल्या, तरी त्यांमुळे बॅबिलोनिया परकीय आक्रमणांपासून बचावला नाही. बॅबिलोनियाच्या इतिहासामध्ये अनेक वेगवेगळ्या टोळ्या व जमाती येऊन स्थायिक झाल्याचा आणि आपापली सत्ता स्थापन करीत असल्याचा देखावा दिसतो. दरसाल या दोन नद्यांना येणाऱ्या पुराबरोबर वाहत आलेल्या गाळामुळे हा सर्व प्रदेश अत्यंत सुपीक झालेला होता. पुराचे पाणी सर्वत्र पोहोचविण्यासाठी प्राचीन काळी कालव्यांचे फार मोठे जाळे अस्तित्त्वात होते. या प्रदेशाचा दक्षिण भाग म्हणजे प्राचीन सुमेरियाची भूमी. ही बव्हंशी या नद्यांच्या गाळाने इराणी आखाताचा समुद्र मागे हटवून तयार झाली आहे, असा आतापर्यंत समज होता तथापि अलीकडे काही भूस्तरशास्त्रज्ञ असे सांगतात, की टायग्रिस-युफ्रेटीस खोरे हलकेहलके खचत असल्याचे दरसाल गाळाचे थर येऊन बसले, तरी जमिनीची उंची वाढून समुद्र मागे हटण्याची शक्यता नाही. हे कसेही असले, तरी सबंध प्रदेश सपाट व सखल असून कोठेही डोंगरदऱ्या नाहीत.

मानवी समाज : या भूप्रदेशात अश्मयुगीन माणसाचे अवशेष क्वचितच मिळतात परंतु साधारणपणे सहा ते सात हजार वर्षांपूर्वीपासूनच्या म्हणजे इ. स. पू. ४५०० च्या आसपासच्या मानवी वसाहतींचा पुरावा मिळतो. आरंभी केवळ शिकारीमागे धावणाऱ्या आणि सतत भ्रमंती करणाऱ्या टोळ्या त्या सुमारास अर्थोत्पादनाच्या नव्या विद्या शिकल्या आणि शेतकी व मेंढपाळी हे व्यवसाय पतकरून एका जागी स्थायिक झाल्या. या स्थिरपद समाजांनी भोवतालच्या परिस्थितीचा कमीजास्त प्रमाणात उपयोग करून जीवन जास्त सुरक्षित व सुखावह केले. एरिडू, ऊकरू, अर, बॅबिलन, निप्पुर इ. मोठी नगरे वसविली. त्यांनी अर्थोत्पादनाच्या साधनांत व संघटनेत प्रगती केली. या सांस्कृतिक संक्रमणाच्या अवस्थांना एकेका गावाचे नाव देण्यात आले. हे समाज नवाश्मयुगीन होते. धातूंचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात होता मात्र हा समाज सुसंघटित असून त्याची राज्यसत्ताही निर्माण झाली होती. व्यापार विस्तृत क्षेत्रात पसरला होता. या दोन्हीला आवश्यक अशी लेखनकला सिद्ध करण्यात आली होती. ही प्रचंड झेप घेणारा समाज सुमेरियन होता. इ. स. पू. ३५०० ते इ. स. पू. २००० या काळात बॅबिलोनिसाच्या नैर्ऋत्य भागात सुमेरियाची व अकेडियन संस्कृतीच्या संगमातून बॅबिलोनियन संस्कृती निर्माण झाली, असे सांगतात. इ. स. पू. २००० किंवा त्याच्या आगेमागे अरच्या तिसऱ्या राजघराण्याचा शेवट झाला व याच वेळी सुमेरियन संस्कृतीचाही निदान राजकीय क्षेत्रात तरी अस्त झाला.

कालक्रमपट

एरिडू, नवाश्मयुगीन समाज

इ. स. पू. ४००० च्या आधी

हाजी महंमद, ‘उबाइड’ काळ

’’ ४०००–३५००

‘उरूक’ काळ (लेखनकलेचा आरंभ) यालाच नवसाक्षर काळ असेही म्हणतात.

’’             ३५००–३०००

‘जमटेड नस्त्र’ किंवा ‘उत्तर साक्षर’ काळ

’’             ३०००–२८००

पूर्व राजवंश आरंभ काळ

’’             २८००–२४००

पूर्व राजवंश समाप्त काळ

’’             २४००–२३७०

सारगॉन

’’             २३७१–२३१६

‘अर’ च्या तिसऱ्या राजघराण्याच्या अस्तापर्यंतचा काळ

’’ २३१६–२०२०

इसिनचे पहिले राज्य

’’ २०२०–१८००

लार्साचे राज्य

’’ १८००–१७६०

दक्षिण बॅबिलोनियातील सागरी घराण्याची सत्ता, ॲमोराइट सत्तेचा अंत आणि कॅसाइट राजसत्तेची स्थापना

’’             १७६०–१५९०

कॅसाइट राजसत्तेचा काळ

’’             १५९५–११७५

इसिनचे दुसरे राज्य

’’             ११७०–१०४०

मेरेडॉक बॅलडॅन

’’ ७२१–७१०

ॲसिरियन सत्तेची बॅबिलनमध्ये स्थापना

’’ ७११–६२६

नव-बॅबिलोनियन किंवा खाल्डियन राजसत्तेचा काळ

’’ ६२६–५३९


इतिहासाची साधने : लेखनविद्या सुमेरियाकडून आलेली असली, तरी  बॅबिलोनियन भाषा निराळी असल्याने तिला अनुसरून सुमेरियन लिपीत फेरफार करण्यात आले. लेखनपद्धती पूर्वीचीच म्हणजे मृण्वटिकांवर बोरूने लिहिण्याची चालू राहिली. ओल्या मातीच्या त्रिकोणाकृती, चौकोनी व शंक्वाकार वटिकांवर बोरूने टोचून लेख उमटविण्यात येत. एरवी बारक्या पातळ तुकड्यांवर लिहीत व मग हे तुकडे वा ठोकळे भाजून काढण्यात येत. अशा तऱ्हेने इष्टिकालेख पक्के होत. पातळ तुकड्यांना येथे मृण्पत्र असे नाव दिले आहे. अशा अनेक मृण्पत्रांची वा इष्टिकालेखांची ग्रंथालये बॅबिलोनियातील जवळजवळ प्रत्येक शहरात सापडली असून त्यांपैकी अर, ऊरूक, कीश व बॅबिलन येथे व्यापारी, शासनविषयक, वाङ्मयीन व शास्त्रीय पत्रेही सापडलेली आहेत. दगड उपलब्ध नसल्याने शिलालेखांची पद्धती नव्हती, तशी ईजिप्शियन पपायरसांची भेंडोळीही इकडे आली नाहीत. शेवटपर्यंत फक्त मृण्पत्रांचाच वापर झाला. खुद्द बॅबिलोनियाखेरीज त्याच्याशी संबंध असणाऱ्या ईजिप्त, ॲसिरिया, हिटाइट, मारी, इराण येथील प्राचीन लेखांतून बॅबिलोनियाविषयक माहिती मिळते. या परकी ठिकाणांपैकी चार शहरांचा उल्लेख करावयास पाहिजे :  ईजिप्तमधील टेल-एल् अमार्ना पत्रसंग्रह, बोगाझकाई येथील मृण्पत्रसंग्रह तसेच निनेव्ह आणि पॅलेसाटाइनमधील रास शॅमरा येथील मृण्पत्रसंग्रह व दप्तरे. या सर्वांतून तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चांगला प्रकाश पडतो. ही अस्सल साधने झाली. शिवाय ओल्डटेस्टामेंटबायबल या दोन ग्रंथातून बॅबिलोनियाविषयक माहिती मिळते. विशेषतः इ. स. पू. १००० नंतरच्या घटनांची व जेथे ज्यू लोकांचा संबंध आला त्या भागाविषयी ही महत्त्वाची ठरतात. इ. स. पू. तिसऱ्या शतकामध्ये प्रथम अँटायओकस याच्या आज्ञेने बेरॉसस नावाच्या बेल देवतेच्या पुजाऱ्याने बॅबिलोनियाची एक बखर लिहून ठेवली. ग्रीक भाषेतील या इतिहासात मुख्यत्वे नव-बॅबिलोनियन म्हणजे खाल्डियन सत्तेचीच अत्यंत तपशीलवार माहिती देण्यात असली, तरी त्यापूर्वीच्या काळाविषयी त्यात बराच मजकूर आढळतो. सध्या बेरॉससचा मूळ ग्रंथ उपलब्ध नाही. मात्र त्याच्यानंतर आलेल्या काही बखरकारांनी त्याच्या ग्रंथातील उतारे आपल्या पुस्तकांतून उद्‍घृत केले आहेत व हे दुय्यम ग्रंथ उपलब्ध आहेत. जोसेफस आणि युसीबिअस यांच्या पुस्तकांतून असे सविस्तर उतारे पहावयास सापडतात व त्यांवरून बेरॉससच्या मुख्य कल्पना समजू शकतात. इतर देशांतील म्हणजे सुमेरिया किंवा ईजिप्त येथील प्राचीन बखरींप्रमाणे येथेही कालगणना अत्यंत अवास्तव आहे परंतु बखरीत निर्देशिलेले अनेक राजे व राजघराणी यांना स्वतंत्र पुराव्याचा आधार मिळतो. ईजिप्तच्या इतिहासरचनेत जसे मॅनेथोच्या बखरीचे, तसे बॅबिलोनियाच्या इतिहासात बेरॉससच्या बखरीचे महत्त्व आहे.

राजकीय इतिहास : बॅबिलोनियन भूमीची राजकीय संघटना ही मुख्यत्वे नगरराज्यांभोवती गुंतलेली होती. ठिकठिकाणी शेतकरी समाज स्थायिक झाले. त्यांपैकी काही समाजांचा म्हणजे ठिकाणांचा विस्तार वाढत गेला. याला अनेक कारणे दाखविता येतात. भोवतालचा प्रदेश अधिक समृद्ध म्हणून, पाण्याला जवळ म्हणून, अधिक सुरक्षित म्हणून किंवा व्यापाराला जास्त सोयीस्कर म्हणून या सर्वच कारणांनी मूळच्या खेडेगावांचे रूप पालटले, त्यांची लोकसंख्या वाढली व मोठी शहरे अस्तित्वात आली. या शहरांच्या देवदेवतांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. देवस्थानांना जमीनजुमला आला व पुरोहितांची गर्दी झाली. त्यांनी देवस्थानांच्या वतीने व्यापारास आरंभ केला. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या बऱ्याच अंशी स्वायत्त व क्वचित स्वयंपूर्ण अशी मोठाली शहरे इ. स. पू. ३००० च्या आसपास भरभराटीस आली. त्यांपैकी एकाद्या शहराने वा त्या शहराच्या राजघराण्याने आर्थिक व सैनिकी सत्तेच्या जोरावर इतरांना नमविले, तरच ही नगरराज्ये एका छत्राखाली येण्याचा संभव होता. सुमेरियन व अकेडियन काळात असे साम्राज्य स्थापनेचे अनेक प्रयत्‍न झाले व त्यांत कधी एरिडू, तर कधी अक्कड, तर कधी अर येथील राजघराणी यशस्वी ठरली. अरचे तिसरे राजघराणे हे अशा यशस्वी घराण्यांतील शेवटचे सुमेरियन घराणे. त्यानंतर पुन्हा एकवार सत्तास्पर्धा सुरू झाली पण ती नगरराज्यांत नसून त्यांपेक्षा मोठ्या अशा राज्यांमध्ये होती.

या काळात उत्तरेस बॅबिलन, दक्षिणेस लार्सा व इसिन अशी तीन राज्ये महत्त्व पावू पाहत होती. त्यांपैकी बॅबिलनचे पहिले राजघराणे सुमू-अबूम या नावाच्या सेमिटिक वंशीय माणसाने स्थापन केले. त्याने बॅबिलनभोवती तटबंदी उभारली व जवळची कीश, सिप्पर यांसारखी ठिकाणे ताब्यात आणली. त्याच वेळी इसिन व लार्सा यांच्या स्पर्धेचा शेवट होऊन रिमसिन् (इ. स. पू. १८२२–१७६३) याने इसिनचा विनाश करून लार्साची सत्ता प्रबळ केली. दक्षिण व मध्य बॅबिलोनियाचा प्रदेश ताब्यात आणण्यातही त्याला यश आले. लार्साशिवाय मारी, एशनुन्ना अशी आणखी स्वतंत्र संस्थाने या भागात असली, तरी खरी स्पर्धा लार्सा व बॅबिलन यांतच होती. या स्पर्धेत बॅबिलन विजयी झाले. त्या विजयाचे श्रेय हामुराबीकडे जाते. स्वतःच्या सामर्थ्यात वाढ करून व भोवतालच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेऊन त्याने सबंध बॅबिलोनियावर आपले साम्राज्य स्थापले. या साम्राज्यात अर, निप्पूर, एरिडू, सिप्पर, लार्सा, इसिन, बॉर्सिपा, लेगॅशमारी अशा महत्त्वाच्या नगरांचा समावेश होता. ⇨ हामुराबी याने आपल्या राज्यास एक विधिसंहिताही दिली. सर्वत्र कालवे बांधून अर्थव्यवस्था सुधारली व शासकीय दृष्ट्या सुमेर व अक्कड यांचे पूर्ण एकीकरण घडवून आणले.

हामुराबीनंतर थोड्याच दिवसांत दक्षिणेकडून कॅसाइट टोळ्यांचे बॅबिलोनियावर आक्रमण व्हावयास लागले. याच सुमारास बॅबिलोनियाच्या दक्षिण भागात बंड होऊन तो प्रदेश फुटून निघाला व तेथे सागरी सत्ता अधिकारपदावर आली. या घराण्याची सत्ता सु. दोनशे वर्षे टिकून होती. इ.स.पू. १५९५ मध्ये हिटाइट राजा मुरशिलिस याने वायव्येकडून स्वारी करून बॅबिलोनियन सैन्याचा पराभव केला व बॅबिलन शहरात जाळपोळ व लुटालूट केली. बॅबिलनचे पहिले राजघराणे म्हणजेच ॲमोराइट राजवंश. तो अशा रीतीने संपुष्टात आला परंतु मुरशिलिस तत्काळ आपल्या राजधानीकडे निघून गेला व सबंध बॅबिलोनियावर कॅसाइट टोळ्यांची सत्ता स्थापना झाली.

कॅसाइट कालखंड हा प्रदीर्घ म्हणजे जवळजवळ चार शतकांचा होता. या काळात साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने अथवा सांस्कृतिक दृष्ट्या बॅबिलोनियाची विशेष प्रगती झाला नाही, असे समजण्याची प्रथा आहे तथापि साहित्य, कला, शास्त्र, यांपैकी बऱ्याच गोष्टींच्या कॅसाइट अंमलाखाली चांगली प्रगती झालेली दिसते. कॅसाइट राज्यांच्या अंतर्गत धोरणापेक्षा त्यांचे बाह्य राजकारण जास्त महत्त्वाचे ठरते. शासनात अथवा कायदेकानूंत त्यांनी फारसे फेरबदल केले नाहीत. या काळातच पॅलेस्टाइनवर साम्राज्य स्थापन करण्यासाठी ईजिप्त व हिटाइट या दोन मोठ्या सत्तांची स्पर्धा चालू होती. मिटॅनी. ईलम, ॲसिरिया अशी राज्ये आपापल्या मगदुराप्रमाणे या अस्थिरतेत भर टाकीत होती. प्रारंभी कॅसाइट राजांनी ईजिप्तशी मैत्री राखून नंतर काही काळ ॲसिरियाला संतुष्ट ठेवून, तर त्यापुढील काही काळ ॲसिरियाविरूद्ध हिटाइट लोकांशी संधान बांधून बॅबिलोनियन साम्राज्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्‍न केला. इ. स. पू. तेराव्या-बाराव्या शतकांत पुष्कळदा बॅबिलोनियन राजांनी ॲसिरियाचे वर्चस्व पतकारलेले दिसते परंतु ही शरणागती तात्पुरती असे व संधी सापडताच बॅबिलोनिया स्वतंत्र होई. इ. स. पू. ११७५ च्या सुमारास ॲसिरियन आक्रमणांमुळे दुर्बल बनलेली बॅबिलनची राजसत्ता अंतर्गत यादवीने कोलमडली व कॅसाइट घराण्याचा शेवट होऊन तेथे इसिनचे दुसरे घराणे अधिकाररूढ झाले. [⟶ कॅसाइट].


इसिनच्या दुसऱ्या घरण्यातील सर्वांत प्रसिद्ध राजा म्हणजे पहिला नेबुकॅड्नेझर हा होय. हे घराणे खुद्द बॅबिलोनियातीलच होते. नेबुकॅड्नेझरच्या आधीच्या राजांनी अंतर्गत परिस्थिती काबूत आणून आपल्या राजसत्तेचे आसन भक्कम केले होते. इतके की आशुरदान याच्या मृत्यूनंतर ॲसिरियात काही काळ त्यांना अनुकूल असणाऱ्या निनुर्त-तुकुलती-अशुर यास गादीवर बसविण्यात त्यांना यश आलेले होते. आपल्या पूर्वजांच्या या कामगिरीचा पुरेपुर फायदा उठवून बाह्य शत्रूंचा मोड करण्याचे काम नेबुकॅड्नेझरने हाती घेतले. नेहमी उपद्रव देणाऱ्या ईलम राज्यावर प्रथम चाल करून ईलमच्या सैन्याचा पराभव केला आणि या विजयाचे निदर्शक म्हणून पूर्वी केव्हातरी ईलम येथील लोकांनी नेलेली मार्डुकची देवतामूर्ती त्याने परत आणली. एवढेच नव्हे तर त्यांच्या देवतांच्या मूर्तीही बॅबिलनला आणून त्या बंदिस्त ठेवल्या.यानंतर ईशान्येच्या बाजूस वळून लुलूबी टोळ्यांचा मोड केला व अशा रीतीने राज्याची पूर्व सरहद्द निर्धोक केली. नेबुकॅड्नेझरनंतर इसिनच्या राजघराण्यात कोणताही नाव घेण्यासारखा राजा झाला नाही. इ. स. पू. १०४० ते ९४० या दरम्यानच्या शंभर वर्षांतील राजकीय परिस्थितीची फारशी कल्पना येत नाही. इ. स. पू. ९९० च्या एका लेखात ‘‘मार्डुकची पूजा होत नाही, मिरवणुकीही कितीतरी वर्षे निघाल्या नाहीत, तसेच बॉर्सिपाच्या नबूची व मार्डुकची भेट व्हावयाचा समारंभही कित्येक वर्षांत झालेला नाही’’, असे म्हटले आहे. यावरून त्या वेळच्या अंदाधुंदीची चांगली कल्पना येते. या काळाच्या शेवटी शेवटी दक्षिण बॅबिलोनियावर खाल्डियन टोळ्यांचे आक्रमणास आरंभ झाला. मेरेडॉक बॅलडॅन (इ. स. पू. ७२१–७१०) याने आरंभिलेले हे आक्रमण नेबोपोलॉसर याने तडीस नेले आणि दुसऱ्या नेबुकॅड्नेझरने ॲसिरियन सत्तेचा पूर्ण विद्ध्वंस करून सर्वत्र बॅबिलोनियन साम्राज्याचा अंमल बसविला. या काळास ‘नव-बॅबिलोनियन साम्राज्यकाळ’ असेही नाव आहे. त्याच्यानंतरच्या तीसचाळीस वर्षांतच हे साम्राज्य मोडकळीस आले आणि सुमेरियन, अकेडियन, ॲसिरियन या प्राचीन संस्कृतींचा व साम्राज्यांचा वारसा चालविणारी बॅबिलोनियन सत्ता पूर्णपणे अस्तंगत झाली. त्या ठिकाणी वांशिक व सांस्कृतिक दृष्ट्या पूर्णपणे भिन्न असे इराणी साम्राज्य स्थापन झाले. [⟶ खाल्डिया ].

अर्थव्यवस्था: सुमेरियन व नंतरची बॅबिलोनियन या दोन्ही संस्कृती फार मोठ्या प्रमाणावर शेतीवरच अवलंबून होत्या. शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा, म्हणून टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांचे पाणी योग्य प्रकारे खेळविण्यासाठी पाट काढले होते व त्यांची देवस्थानांमार्फत वा शासनामार्फत निगा करण्यात येई. प्रत्येक गाव व त्याभोवतालची शेतजमीन हा त्या गावाच्या देवतेच्या म्हणजे देवस्थानच्या मालकीची असे. देवस्थानच्या जमिनीचा कारभार पुरोहित-राजा ‘एन्सी’ हा पहात असे. शेतजमिनीचे तुकडे कराराने नागरिकांना वहिवाटीस दिलेले असत. तो तुकडा कसून त्यातील उत्पन्न त्यांनी देवस्थानात जमा करावयाचे व त्याबदल्यात धान्य, कपडालत्ता इ. आवश्यक वस्तू त्यांना देवस्थानाने पुरवावयाच्या, अशी पद्धत होती. जमा झालेल्या धान्याचे व मेंढ्यांच्या लोकरींचे साठे देवस्थानात ठेवीत व नागरिकांना त्यांचे वाटप करण्यात येई. नागरिकांना मिळणाऱ्या जमिनी लहानमोठ्या असत व त्यांतही संपन्न नागरिकांकडे असणारे तुकडे क्वचित चाळीस हेक्टरचे वा त्याहीपेक्षा मोठे असत. अर्थातच ही जमीन कसावयास ते गरीब व गरजू नागरिकांना चाकरीस ठेवीत. त्यातूनच गुलामगिरीची प्रथा पुढे सुरू झाली आणि गरीब व श्रीमंत यांतील भेद वाढू लागला. राहती घरे ज्याच्या त्याच्या मालकीची असली, तरी सुमेरियन काळात शेतजमिनी मात्र खाजगी मालकीच्या नसत. बॅबिलोनियन काळात शेतजमिनीवर खाजगी मालकी प्रस्थापित झाली. संपन्न जमीनदार व देवस्थाने यांनी सुमेरियन काळातच परप्रांतांशी व्यापारास आरंभ केला होता.

इ. स. पू. ५००० च्या सुमारास अस्तित्त्वात असलेल्या जार्मो या अश्मयुगीन वसाहतीपासून परदेशी व्यापाराचा आरंभ झालेला दिसतो. ही देवाणघेवाण वाढत जाऊन खुद्द बॅबिलोनियन साम्राज्याच्या काळात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या विस्तृत क्षेत्रात चाललेला दिसतो. मृण्वटिकापत्रांतील उल्लेखांवरून तिल्मून, मागान व लूह्हा म्हणजेच बेहरीन, ओमानचा किनारा व बलुचिस्तान किंवा सिंधू नदीचा प्रदेश इत्यादींशी व्यापार चालत असे. आयात मालात वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवान खड्यांचा तसेच तांब्यांचा व नंतरच्या काळात लोखंडांचा समावेश असे. यांशिवाय हस्तिदंत व शंख अशा वस्तूही येत. निर्यातीच्या मालांत धान्य, खजूर, लोकर वा लोकरी कापड, तेल हे पदार्थ असत. नंतरच्या काळात आयात केलेल्या मालांत धातूंचा, खड्यांचा वापर करून तयार केलेल्या दागदागिन्यांचा आणि लोखंडी हत्यारांचा मोठा वाटा होता. आरंभी सर्व व्यवहार प्रत्यक्ष मालाच्या देवघेवीच्या किंवा वस्तुविनिमयाच्या स्वरूपात असे. यानंतर चांदीचे ठराविक वजनांचे तुकडे व्यापारी माध्यम म्हणून वापरीत. या चांदीच्या माध्यमाने व्यापार केल्याची करारपत्रे उपलब्ध आहेत.

व्यापारासाठी मुख्यत्वे जलमार्गाचा वापर होत असे. नावा अगदी लहान आकाराच्या होत्या व वाऱ्यावर वा वल्ह्यांनी त्या चालवीत. खुष्कीच्या मार्गाने गाढवांवर गोण्या लावून व्यापारी तांडे जा-ये करीत. बऱ्‍याच नावा व व्यापारी तांडे देवस्थानांच्या मालकीचे असत तसेच ते खाजगी व्यापाऱ्‍यांच्याही मालकीचे असत. व्यापारी तांड्यांना ठिकठिकाणी जकात भरावी लागे. जकात भरल्यावर धर्मशाळांतून मुक्काम करण्याची. तसेच विहिरीचे पाणी वगैरे घेण्याची सोय करण्यात येई. त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी स्थानिक अधिकारी पतकरीत. व्यापारी मार्गांच्या आणि व्यापाऱ्‍यांच्या संरक्षणासाठी राजकीय सत्ता पुढे सरसावल्याचे दृश्य सध्यासारखेच प्राचीन काळातही पाहावयास सापडते. अक्कडच्या सारगॉनचा तसेच ॲसिरियाच्या साम्राज्याचा विस्तार याच उद्देशाने झाला. परप्रांतातील व्यापारास उपयुक्त अशी दुसरी एक संस्था म्हणजे वसाहती. त्याही या काळात दिसतात. बॅबिलोनियन व ॲसिरियन व्यापारी पश्चिम भागात वसाहती करून होते. तसेच परप्रांतीय व्यापारीही या प्रदेशात येऊन स्थायिक झाले होते. सिंधू संस्कृतीच्या रहिवाशांच्याही व्यापारी वसाहती बॅबिलोनियात अस्तित्वात होत्या.

आर्थिक जीवनाची विशेषतः व्यापाराची इतर अंगे म्हणजे उधारउसनवारी, कर्जे, व्याजबट्टा, दिवाळखोरी या सर्वांविषयीचे उल्लेख मृण्पत्रांत वा इष्टिकालेखांत सापडतात. त्यांवरून हे सर्व व्यवहार किती गुंतागुंतीचे होते व ते सुरळीत चालण्यासाठी लेखनाची किती जरूरी होती, याची कल्पना येते. या सर्व खटाटोपांचे प्रत्यक्ष फळ म्हणजे आज ज्यांचे अवशेष पहावयास सापडतात ती प्रचंड नगरे, त्यांच्या तटबंद्या, शेजारची भव्य मंदिरे व झिगुरात, मनोरे आणि लिखित व उत्खनित पुराव्यांवरून स्पष्ट होणारे अत्यंत संपन्न ऐहिक जीवन होय.

शिक्षण : आपल्या शासनात अर्थकारणात लेखनावर एवढ्या प्रमाणावर अवलंबून असणाऱ्या समाजात शिक्षणाची नियमित व्यवस्था असावी, हे उघडच आहे. बॅबिलोनियन समाजाने आपल्यामागे इतके विपुल लिखित साहित्य व शास्त्रग्रंथ ठेविले आहेत की, अशा व्यवस्थेच्या अस्तित्वाविषयी शंकेला जागाच राहत नाही. क्यूनिफॉर्म लिपीतील अक्षरवटिका व त्यांतील बारकावे इतके विविध आहेत, की केवळ ही लिपी लिहिता वाचता येण्यास काही वर्षे सक्त मेहनत घेणे आवश्यक होते. ही लिपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही पाट्या उत्खननांतून सापडलेल्या आहेत. यांवर अक्षर घोटण्यासाठी तोच तोच मजकूर पुनः पुन्हा लिहिलेला आहे, तर काहींवर एका बाजूस शुद्धलेखन व दुसऱ्या बाजूला आकडेमोड केलेली दिसते. लिपी आली म्हणजे भाषेचे, म्हणजेच व्याकरणाचे शिक्षणही आलेच. प्राचीन सुमेरियन भाषेचा अभ्यास त्या काळी प्रचलित असे. या दोन भाषांतील शब्दकोश उपलब्ध आहेत. उत्तम लेखनिक व्हावयास अगदी लहानपणापासून वयाच्या अठरा-वीस वर्षांपर्यंत शिक्षण घ्यावे लागे. लेखनाची मुख्य गरज शासन व व्यवहार यांना भासत असणे स्वाभाविक होते परंतु काही ठिकाणी खाजगी शाळाही असत. सर्वसामान्य माणसाला आयुष्यातील पहिली वीस वर्षे केवळ तयारीसच घालविणे तेव्हाही शक्य नव्हते, अशा संपन्न समाजांतून हे लेखनिक पुढे येणार, हे उघड होते. पुरोहित, सरदार, दरकदार व व्यापारी यांचीच मुले हे शिक्षण घेऊ शकत. शासनव्यवस्था, देवस्थानांचा कारभार आणि व्यापार या सगळ्यांनाच लेखनिकांची जरूरी असल्याने लिहिता-वाचता येणारा माणूस हा समाजात सत्ता व संपत्ती या दोन्ही दृष्टीने उत्तम स्थान राखून असे.


वाङ्‌मय: बॅबिलनच्या प्राचीन वाङ्मयापैकी बऱ्याच मोठ्या भागाचा आरंभ सुमेरियन काळात झालेला असला, तरी त्या त्या कथानकांना आणि साहित्यप्रकारांना प्रौढ रूप प्राप्त झाले ते कॅसाइट अंमलाखाली. बरेचसे कथाविषयक निराळया स्वरूपात अथवा कथानकाचे नायक-नायिका बदलून ॲसिरियन वाङ्मयातही आढळतात, मुख्य वाङ्मय प्रकार तीन होते: महाकाव्ये, पुराणे आणि सर्वसामान्यपणे ज्याला नीतिवाङ्मय म्हणता येईल असे साहित्य. या शेवटच्या प्रकारात व्यावहारिक शहाणपणाच्या कथा, त्यांचे तात्पर्य, तसेच म्हणी, वाक्संप्रदाय, संवाद अशांचा समावेश होई. कथा, नाट्य, इतिहास यांद्वारे जगात चांगल्या प्रकारे कसे वागावे, हे सांगणारे हे साहित्य. हा वाङ्मयप्रकार सर्व प्राचीन समाजात आढळून येतो. याला ‘चातुर्य वाङ्मय’ असे नाव दिले जाते. पुराणामध्ये एका मुख्य व त्या अनुषंगाने छोट्या छोट्या इतर आख्यानांचा प्रपंच केलेला आहे. या कथानकाचे देवदेवता हेच नायक-नायिका असत आणि आख्यानात हमखास आढळून येण्यासारखे विषय म्हणजे विश्वाची उत्पत्ती, मानवाची निर्मिती, परलोक, देव व दानव यांतील म्हणजे सुष्ट व दुष्ट शक्तींचा संघर्ष इ. असत. प्राचीन बॅबिलोनियन पुराणांत मार्डुकचे पुराण हे सर्वांत प्रसिद्ध होय. अप्सू किंवा वातावरण देव हा पुरुष आणि तैमात किंवा सागर ही प्रकृती. या दोघांनी अनेक देवदेवतांना जन्म दिला. या आपल्या प्रजेची वर्दळ असह्य झाल्याने या सर्व अपत्यांचा नाश करण्याचे अप्सूने ठरविले. ही गोष्ट ईआ या देवतेला कळून, मोठ्या चातुर्याने त्याने अप्सूला गुंगीचे औषध पाजून मारून टाकले आणि तो पुन्हा उठू नये, म्हणून आपण स्वतः त्याच्या मृत शरीरावर वस्ती केली. तेथे त्याने आपल्या डमकिन या पत्‍नीपासून मार्डुक हा पुत्र उत्पन्न केला. हा महाबलाढ्य असून त्याला जन्मतःच अनाकलीय अशा तऱ्हेच्या शक्ती व सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्या व्रात्यपणामुळे तैमात संतप्त झाली आणि त्याला मारण्यासाठी तिने अकरा राक्षसांना उत्पन्न केले. या राक्षस सेनेवर किंगू या आपल्या ज्येष्ठ पुत्रास सेनापती नेमले. या तयारीची वार्ता कळल्यावर अनशर, अनू अशांसारखे महापराक्रमी देवही गर्भगळित झाले आणि देवसेनेचा पराजय व विनाश होणार हे स्पष्ट झाले. यावेळी मार्डुक याने देवसेनेचे आधिपत्य पतकरून तैमातवर स्वारी करून तिचा वध केला. त्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे केले. एका तुकड्यापासून आकाश उत्पन्न केले तर दुसऱ्या तुकड्यापासून पृथ्वी निर्माण केली. यांनतर ईआ या आपल्या पित्याच्या आज्ञेने, तैमातचा प्रमुख सेनापती किंगू याला ठार करून त्याच्यापासून देवांची सेवाचाकरी करण्यासाठी मानव हा प्राणी उत्पन्न केला. तेव्हापासून सर्व देवगण आनंदात आणि समाधानात राहू लागले. त्यांनी बॅबिलन या शहरात मार्डुकचे एक प्रचंड मंदिर उभारून तेथे त्याची स्थापना केली. जग आणि मानवप्राणी यांच्या उत्पत्तीविषयीच्या अशा प्रकारच्या आणखीही बऱ्याच कथा बॅबिलोनियन साहित्यात आढळतात. इतर पुराणकथांमध्ये इश्तार देवतेचा पाताळ लोकात प्रदेश व प्रत्यागमन, नर्गल आणि एरिश-कगह्‍ल या दंपतीची पाताळावरील राजवट, तसेच एटनाचा महाप्रवास इत्यादींचा समावेश होतो.

माटे, म. श्री.

गिलगामेश : गिलगामेश हे जगप्रसिद्ध बॅबिलोनियन महाकाव्य अकेडियन भाषेत रचिलेले आहे. ह्या महाकाव्याची आज उपलब्ध असलेली, जास्तीत जास्त परिपूर्ण अशी संहिता बारा इष्टिकाग्रंथांची मिळून बनलेली आहे. ॲसिरियाचा राजा ⇨ असुरबनिपाल (कार. इ. स. पू. ६६९–६३०) ह्याच्या निनेव्ह येथील ग्रंथालयात हे इष्टिकाग्रंथ मिळाले. ह्या महाकाव्याचा नायक गिलगामेश ह्याची कथा सुमेरियन भाषेतील पाच कवितांतही सांगितलेली असून ह्या कविता इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकाच्या पूर्वार्धात रचिल्या गेलेल्या आहेत. बॅबिलोनियातील सिपार ह्या प्राचीन शहरात इ.स.पू. सु. १८०० मधील एक इष्टिकाग्रंथ मिळालेला असून त्यातही गिलगामेशचा कथाभाग आहे. गिलगामेशच्या कथेची हिटाइट आणि हुरियन रूपेही त्रुटित स्वरूपात आढळतात. असे प्राचीन पारंपरिक आधार घेऊन इ. स. पू. सु. १२०० मध्ये अरुक (ईरेक) ह्या सुमेरियन शहरातील सिन-लेक-युन्नायनी-नामक कवीने एक महाकाव्य तयार केले. निनेव्ह येथील संहिता म्हणजे ह्याच महाकाव्याची एक प्रत असण्याची शक्यता आहे.

ह्या महाकाव्याचा नायक म्हणजे इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेला अरुकचा राजा गिलगामेश असावा तथापि त्यात वर्णिलेल्या गिलगामेशच्या विविध पराक्रमांच्या वृत्तांताला ऐतिहासिक आधार मिळत नाही. गिलगामेशची कथा थोडक्यात अशी : एरेकचा राजा गिलगामेश ह्याची जुलुमी कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी अनू हा देव एन्किडू नावाच्या एका भयंकर मानवाची निर्मिती अरुरू ह्या देवतेकडून करवितो. यथावकाश गिलगामेश आणि एनकिडू ह्यांचे युद्ध होते तथापि त्यानंतर ते मित्र बनतात परस्परांच्या साहाय्याने अनेक साहसे पार पाडतात. गिलगामेशच्या पराक्रमावर मोहित होऊन ⇨ इश्तार ही देवता त्याचे प्रणयाराधन करते परंतु गिलगामेश तिचा अव्हेर करतो. त्यामुळे संतापलेली इश्तार अनू ह्या देवाकडे तक्रार करते. परिणामतः एक स्वर्गीय बैल गिलगामेशवर सोडण्यात येतो तथापि गिलगामेश आणि एनकिडू हे त्या बैलाला ठार करतात. त्यानंतर अनू आणि अन्य काही देव एनकिडूचा मृत्यू घडवून आणण्याचा निर्णय घेतात. आपल्या मृत्यूची सूचना एनकिडूला स्वप्नात मिळते. तो आजारी पडून मरतो. ह्या घटनेमुळे गिलगामेशच्या मनात मृत्यूची भीती निर्माण होते. मृत्यू कसा टाळता येईल ह्याचा तो विचार करू लागतो. अमर कसे व्हावे, हे जाणून घेण्यासाठी तो उतनपिष्टिम ह्याच्याकडे जातो. उतनपिष्टिमला देवांकडून अमरत्व प्राप्त झालेले असते. मृत्यू ही एक अटळ अशी आवश्यकता आहे असे सांगून उतरपिष्टिम गिलगामेशला एक प्रयोग करावयास सागंतो : निद्रा हा एक छोटासा मृत्यूच. मृत्यू टाळू पाहणाऱ्याने झोप टाळून पाहावी. सहा दिवस आणि सात रात्री गिलगामेशने झोपू नये. गिलगामेश निद्रेचा प्रतिकार करू शकत नाही निद्रेप्रमाणे मृत्यूही आवश्यकच हे सिद्ध होते. तथापि आपल्या पत्‍नीच्या विनंतीवरून उतनपिष्टित गिलगामेशला समुद्रतळी असलेल्या एका काटेरी वनस्पतीची माहिती देतो. वृद्धांना यौवन प्राप्त करून देण्याचे अद्‍भुत सामर्थ्य ह्या वनस्पतीत असते. गिलगामेश ही वनस्पती मिळवतो परंतु वाटेत एक सर्प ती पळवून नेतो. निराश झालेला गिलगामेश अखेरीस एनकिडूच्या आत्म्याला आवाहन करतो. एनकिडू त्याच्या समोर प्रकट होऊन मृतांच्या दुनियेत चिरंतन कैद होऊन पडलेल्या जीवांची दुःखे त्याला सांगतो.

गिलगामेशची कथा हिटाइट आणि हुरियन भाषांतून आशिया मायनरमध्ये प्रचलित झालेली होती. ग्रीक महाकवी होमर ह्याच्या ⇨ ओडिसीवर गिलगामेशचा काही प्रभाव पडला असण्याची शक्यता सूचित केली जाते. ह्या दोन महाकाव्यांतील काही साम्यस्थळेही काही अभ्याकांनी दाखविलेली आहेत.

कुलकर्णी, अ. र.

शास्त्र : उपलब्ध वाङ्मय व इतर अवशेष यांवरून विज्ञानांपैकी गणित, वैद्यक, रसायन, खगोल यांतील प्रगतीची पुष्कळच कल्पना येते. गणितांपैकी अंकगणित, बीजगणित व भूमिती हे विषय निदान प्राथमिक अवस्थेत तरी निश्चितच ज्ञात होते. आकडेमोड करून सोडविलेल्या अंकगणिताची अनेक मृण्पत्रे सापडतात. यांबरोबरच गणिताची पुस्तकेच असलेली मृण्पत्रे सापडली आहेत. गणनासाठी दोन पद्धती वापरलेल्या आहेत : (१) दशमान पद्धती व (२) साठ व त्याचे अंश आणि त्यांच्या पटी. गणिताच्या या पुस्तकांवरून चार आकड्यांपर्यंत वर्ग काढता येत असे दिसते.


ज्योतिषशास्त्राची प्रगती जास्त झालेली होती. इ.स.पू. १००० च्या आसपास व नंतर खगोलशास्त्राचा अभ्यास बऱ्याच पद्धतशीरपणे केलेला आढळतो. त्यामध्ये चंद्राच्या हालचालींची नोंद विशेष महत्त्वाची मानली जाते कारण बॅबिलोनियन पंचांग चांद्रमासी होते. ग्रहांची भ्रमणे व त्यांच्या उदयास्तांच्या वेळांची नोंद मृण्पत्रांवर केलेली असली तरी दुर्बिणीसारखी साधने त्या काळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे नोंदी अचूक असण्याचा संभव नाही परंतु वर्षानुवर्षे निरीक्षण करीत राहिल्याने व सर्व परिभ्रमणांच्या सतत नोंदी केलेल्या असल्याने कित्येक वर्षांची अशी माहिती ताडून पहाणे शक्य होते व त्यामुळेच या भ्रमणांमागचे नियम व गणित इ. स. पू. ५०० च्या सुमारास उत्तम प्रकारे समजू लागले होते, असे दिसते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे अधिकमासाची व्यवस्था होय. ॲसिरियात खगोलाच्या निरीक्षणासाठी स्वतंत्र अधिकारी वर्ग नेमलेला असे तसा तो बॅबिलोनियात नसावा असे दिसते. देवस्थानाशी संबंधित असे खगोलज्ञ निरीक्षण व नोंदी करीत असावेत. इ. स. पू. १००० च्या सुमाराला सुरू झालेल्या या अभ्यासास खाल्डियन खगोलज्ञांनी पूर्णावस्थेत पोचविले.

वैद्यकशास्त्राविषयीची अनेक मृण्पत्रे सापडली आहेत. या साहित्याचे दोन भाग आहेत : एकात रोग लक्षणे आहेत व दुसऱ्यात त्यांवरील उपचार दिलेले आहेत. काही ग्रंथांत ही दोन्ही एकाच ठिकाणी सापडतात. तंत्रमंत्र, गंडेदोरे यांवर भर असला, तरी अनेक ठिकाणी वनस्पतिजन्य व खनिज औषधांची माहिती दिलेली आहे. बॅबिलोनियन समाजात मृताचे शरीर फाडण्याची (ममी तयार करण्यासाठी) प्रथा नसल्याने या लोकांना शारीराचे फारसे ज्ञान झालेले नव्हते. बऱ्याच रोगांच्या बाबतीत बाह्य लक्षणांचाच निर्देश आहे व त्यांवर बाह्य उपचारच सुचविलेले आहेत. शारीरिक व्याधी वा आजार हे भूतबाधा, करणी इत्यादींमुळे उद्‍भवतात, असा समज असल्याने स्वाभाविकच रोगाला उतार पडण्यासाठी त्याच दिशेने प्रयत्‍न करण्यास येत आणि रोगनिवारणात वैद्यापेक्षा मांत्रिकांनाच जास्त महत्त्व असे. शल्यक्रियेसंबंधी मृण्पत्रे आढळत नाहीत मात्र तद्विषयक उल्लेख निरनिराळ्या मृण्पत्रांत आहेत. ही प्रत्यक्ष व्यवहारात शिकण्याची वा आचरण्याची विद्या असल्याने त्यावर ग्रंथ असण्याची जरूरी नव्हती, असे आधुनिक अभ्यासक सांगतात. अर्थात ही एक शक्यता आहे एवढेच.

काही मृण्पत्रांत रासायनिक प्रक्रियांचा उल्लेख आहे. यांतील बहुतेक मृण्पत्रे सांकेतिक भाषेत लिहिलेली आहेत. ही विद्या काही ठराविक माणसांपुरतीच मर्यादित ठेवण्यासाठी हा मार्ग अनुसरण्यात आला होता, यात शंका नाही. तशा अर्थाची वचने मृण्पत्रांत सापडतात. सी. जे. गॅड व आर्. सी टॉमसन यांनी अशा काही गूढ मृण्पत्रांचे वाचन केलेले आहे. त्यांपैकी एकात भांड्यांना काचेची झिलई देण्याची कृती दिलेली आहे. याशिवाय इतर अनेक कृतींत मार्टिन लेव्ही याच्या केमिस्ट्री अँड केमिकल टेक्नॉलॉजी इन एन्शंट मेसोपोटेमिया (१९५९) या ग्रंथात स्पष्ट केलेल्या आहेत. रसायनशास्त्राचा उपयोग मुख्यत्वे उद्योगधंद्यांसाठी केलेला  आढळतो. यात भांडी व त्यांची झिलई, नक्षीकाम, रंगीत काचकाम, कापड रंगविणे, तेल व साबण तयार करणे या व्यवसायांचा मुख्यत्वे समावेश होतो. यांशिवाय धातुकाम, दागदागिन्यांची बनावट व मीनाकाम यांत रसायनाचा वापर होतच असे.

कला : बॅबिलोनियन संस्कृतीचे जे अवशेष उपलब्ध आहेत, त्यांमध्ये कलात्मक म्हणता येईल असे फारच थोडे आहेत. बॅबिलोनियातील कला ही मुख्यत्वे अनुप्रयुक्त स्वरूपाची होती. वास्तुशिल्पाचे नमुने फारच थोडे उपलब्ध आहेत. उत्खननांतून ⇨ झिगुरात आणि मंदिरे तसेच, नगरभोवतालच्या तटांचे व बुरूजांचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व बांधकाम विटांचे केलेले असे व त्यांत उठावाच्या कलाकृतीला वाव नसे. स्वाभविकच वास्तुशोभनात रंगच महत्त्वाचा ठरला. निव्वळ रंगकामाबरोबर काचेची झिलई लावलेली रंगीत कौले मोठ्या प्रमाणावर वापरीत. वास्तुशिल्पात आकार हाच महत्त्वाचा घटक असून प्रचंड आकार व भव्यता यांवर भर दिलेला दिसतो. शिल्पकलेचे अत्यंत थोडे नमुने उपलब्ध आहेत व त्यांत फक्त प्राण्यांचीच शिल्पे कलात्मक वाटतात. बाकीच्या शिल्पांत ईजिप्शियन शैलीची स्वाभाविकताही नाही किंवा ॲसिरियन शिल्पांतील कृत्रिम आकृतिबंधांतून निर्माण होणारा रुबाब व जोमही नाही. चित्रकलेचे फारच थोडे नमुने उपलब्ध आहेत. मारीच्या राजवाड्यातील भिंतीवर शिकारीचे, युद्धाचे आणि काही पौरणिक देखावे चितारलेले आहेत. (इ. स. पू. सु. १९००). कॅसाइट काळातील इ. स. पू. १४०० च्या सुमाराचे चित्रकाम अकरकुफ येथे मिळाले आहे. या दोन्ही चित्रणांत वास्तवतेपेक्षा योजनाबद्धतेकडे कल दिसून येतो. रंगसंगती मात्र आकर्षक आहे. या तीन मुख्य कलांखेरीज कारागिरीच्या अनेक लहानलहान वस्तू सापडलेल्या आहेत. सोने व जडावाचे हरतऱ्हेचे दागिने, ब्राँझच्या लहान वस्तू, लाकडाचे मंचक, लोखंडी व तांब्याची हत्यारे इत्यादीत दिसून येणारे कसब अत्यंत प्रशंसनीय आहे तथापि त्यांतून उच्च अभिरुची मात्र क्वचितच प्रतीत होते. दृश्यकलांबरोबर संगीतकलेचाही विकास बॅबिलोनियात झालेला होता. त्याविषयी मुख्य पुरावा म्हणजे उत्खननांतून अथवा शिल्पांतून ज्ञात झालेली विविध प्रकारची वाद्ये होत. त्यांत बासऱ्या, शिंगे, तबले व चौघडे तसेच अनेक तऱ्हेची तंतुवाद्ये व टाळ किंवा झांजा यांचा समावेश होतो. देवालयांच्या दैनंदिन कर्मकांडांत नृत्य व गायन या दोहोंचा समावेश असे.

धर्म : राजकीय इतिहासाप्रमाणे धर्माच्या बाबतीतही बॅबिलोनियन समाजाने सुमेरियन कल्पनांचे व रूढींचे सातत्य कायम राखले. हे सातत्य इतके तपशीलवार व खोलवर रुजलेले आहे की सुमेरिया, अक्कड व मारी येथील देवदेवता व धर्मकल्पना यांची माहिती असल्याखेरीज बॅबिलोनियन धर्माची कल्पना येणार नाही. बॅबिलोनियन समाजात जुन्या देवदेवतांची पूजा असे. जुनी कथापुराणे व जुन्याच पूजापद्धती चालू राहिल्या. इ. स. पू. १९०० नंतर देवतांच्या स्वरूपांत आणि परस्परसंबंधांत बरेच बदल करण्यात आले.

सुमेरियन धर्मात अनू हा राजसत्तेचा देव, त्याच्यानंतर एन्लिल हा वायुदेव, त्याची निन्लि ही देवी. याशिवाय ईआ (विद्यापती), शमस (सूर्य), सिन (चंद्र), इश्तार (शुक्र), नर्गल (यम) अशा अनेक देवदेवता होत्या. खुद्द बॅबिलोनियन काळात ईआचा पुत्र मार्डुक हा सर्वश्रेष्ठ ठरला. या देवसेनेचा अधिपती अगम्य व अतर्क्य अशा शक्तींनी युक्त असे. त्यालाच बेल म्हणजे सुरश्रेष्ठ हे नावही होते व त्याचे मुख्य क्षेत्र बॅबिलन हेच होते. त्यांच्या खालोखाल इश्तार ही युद्ध व काम यांची देवता येते. बेलची पत्‍नी व तिचे नाव बलित. तिसरा महत्त्वाचा देव म्हणजे नबू, हा विद्येचा देव. या देवदेवतांच्या जडावाच्या लाकडी मूर्ती करीत असत. या मूर्तीची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात येई व त्या विधीला ‘तोंड उघडणे’ म्हणत. मंदिरात मूर्ती किंवा त्या देवाची निशाणी ठेवीत आणि देवतेच्या सेवेला राजाचे तसेच इतर भक्तांचे पुतळे ठेवलेले असत.

मंदिरात गाभारा सोडून इतर अनेक इमारती असत व मोठ्या मंदिराचे क्षेत्र कित्येक हेक्टर पसरलेले असे. या इमारतींत झिगुरातला महत्त्व असे. त्याच्या पायथ्याशी एक व माथ्याशी एक, अशी दोन मंदिरे असत. देव नेहमी पायथ्याशी असलेल्या मंदिरात राहत असे व वर्षातील काही दिवस किंवा काही उत्सवप्रसंगी तो माथ्यावरच्या मंदिरात जाऊन राहत असे, असा समज असावा. पायथ्याशी गाभाऱ्याची किंवा मुख्य मंदिराची इमारत लंबचौकोनी असे व त्याच्या आसपास पुजारी मंडळींचे निवास, गुदामे व नबूचे मंदिर असल्यास ग्रंथालयेही असत. धार्मिक कर्मकांडांत यज्ञ व बळी यांनाही महत्त्व असे. यांसाठी मंदिरात स्थंडिले असत. धनधान्याचा किंवा बोकडाचा व क्वचित मनुष्यप्राण्याचाही नैवद्य दाखविला जाई. खाटकाचे काम करणारे व बलिदानाच्या वेळी मंत्रपठण करणारे पुरोहित निराळे असत. वेगवेगळ्या माणसांनी उदा., राजे, प्रधान व व्यापारी यांनी कोणकोणत्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत, हे सांगणारे तत्कालीन लेख उपलब्ध आहेत.


बॅबिलनचा राजा हाच शेवटपर्यंत देवाचा प्रमुख पुजारी समजला जाई. मात्र रोजच्या पूजाअर्चेला व व्यवस्थेला स्वतंत्र पुजारी असत. जसजसा पूजाविधीचा तपशील वाढत गेला तसतसे वेगवेगळी कामे पार पाडणारे पुरोहितांचे वर्ग अस्तित्वात आले. या सर्वांचा मुख्य एक पुरोहित सूत्रधार असे. त्याच्याकडून नववर्षाच्या आरंभी राजाला राजदंडादी वस्तू मिळत. याशिवाय खगोल व फल ज्योतिष पाहणाऱ्या शुभशकून व मुहूर्त सांगणाऱ्या पुरोहितांचा एक स्वतंत्र वर्ग होता.

पुरोहितांमध्ये स्त्री पुरोहिताचा एक स्वतंत्र वर्ग असे. त्यांच्यात एन्टू ही सर्वोच्च पुरोहिता. हिला परमेश्वराची पृथ्वीवरील पत्‍नी किंवा प्रतिनिधी समजण्यात येई. सामान्यपणे तिने अविवाहितच रहावे अशी अपेक्षा असे आणि लग्न केलेच, तर तिला अपत्यप्राप्ती होऊ नये असा दंडक होता. म्हणजेच वयात आल्यावर तिला हे काम सोडावे लागे किंवा आमरण अविवाहितच रहावे लागे. तिचा दर्जा मोठा असे व हाताखाली अनेक स्त्रीपुरुष असत. यांची जीवनचर्या ही अनेक निर्बधांनी बांधलेली असे. यांशिवाय देवदासींचा एक वर्गही होता देवालयात राहणाऱ्या परंतु वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना कदिश्तू म्हणत. देवालयाची काही कामे त्यांच्याकडे सोपविलेली असत. हीरॉडोटसने इश्तारच्या देवालयात प्रत्येक बॅबिलोनियन स्त्रीला आपल्या कौमार्याचे दान करावे लागत असे, असा जो मजकूर लिहून ठेविला आहे, तो गैरसमजुतीवर आधारलेला असून देवदासींपुरतीच ती पद्धत रूढ असावी, असे आधुनिक अभ्यासक मानतात.

बॅबिलोनियाच्या पुरातत्त्वीय अवशेषांवर दृष्टिक्षेप टाकला असता, तेथे एकेकाळी समृद्ध संस्कृती नांदत होती, याची आधुनिक मानवाला कल्पना येणार नाही पण बॅबिलोनियन लोकांनी ज्योतिष, वैद्यक, भाषाशास्त्र, वास्तुशास्त्र, तत्त्वज्ञान, कोशरचना, गणित, व्याकरण इत्यादींची मूलतत्त्वे आत्मसात केली तसेच त्यांची नगरराज्याची कल्पनाही उचलली. ज्यूंनी त्यांच्या पुराणकथांचे अनुकरण केले आणि पुढे त्या ओल्डटेस्टामेंटच्या द्वारे जगाला दिला. वास्तुशास्त्रातील विशेषतः झिगुरातच्या बांधकामाचे ज्ञान अरबांनी बॅबिलोनियाकडून घेतले आणि मशिदींच्या उत्तुंग मीनारांच्या रचनेत त्यांच्या उपयोग करून घेतला. ग्रीकांच्या भाषेतील वजन-मापे, वाद्ये, नक्षत्रपुंज इत्यादीची नावे ही मूळ बॅबिलोनियन शब्दांची भाषांतरे वा लिप्यंतरे आहेत. हामुराबीने जगाला पहिली लिखित विधिसंहिता दिली. आयोनिया, ग्रीस व आशिया मायनर यांद्वारे बॅबिलोनियन संस्कृतीचा वारसा आधुनिक काळापर्यंत येऊन पोहोचला आहे.

संदर्भ:1. Durant, Will, Our Oriental Heritage, New York, 1954.

         2. Edwards, I.E.S. &amp Others, Ed. Cambridge Ancient History, Vols., I &amp II, Cambridge, 1977.

         3. Oppenheim, A. L. Ancient Mesopotamia: Portrait of a Dead Civilization, New York, 1965.

         4. Saggs, H. W. F. The Greatness that Was Babylon, London, 1962.

माटे, म. श्री.

जगाचा नकाशा दाखविणारा क्यूनिफॉर्म लिपीतील इष्टिका ग्रंथ, इ.स.पू. ६००.

इश्तारद्वारमार्गावरील १२० सिंहांच्या शिल्पपट्टांतील एक शिल्प, बॅबिलन, इ.स.पू. ६०४-५६२.

प्राचीन मंदिराचे अवशेष, खुर्सांगकलम, इ.स.पू. ६०४-५६२.

बॅबिलोनियन राक्षसमुख

गिलगामेश : बॅबिलोनियन महाकाव्याच्या नायकाचे दंडगोल मुद्रेवरील शिल्पांकन, इ.स.पू. २०००.     प्राचीन राजवाड्याचे अवशेष, बॅबिलन, इ.स.पू. ६०४-५६२.

इश्तारद्वार. बॅबिलन, इ.स.पू. ६०४-५६२. बॅबिलोनियातील सरहद्दनिदर्शक दगड, इ.स.पू. दुसरे सहस्त्रक. बॅबिलनच्या राजवाड्यातील दरबाराचा दर्शनी भाग, इ.स.पू. ६०४-५६२.