हीरॉडोटस : (इ. स. पू. ४८५?– इ. स. पू. ४२५?). प्रसिद्धग्रीक इतिहासकार. जन्म आशिया मायनरमधील हॅलकॉर्नॅसस येथे. तेथील हुकूमशहाविरुद्ध झालेल्या बंडात सापडल्यामुळे त्याला जन्मभूमी सोडावी लागली. त्याने इराण, अरबस्तान, ईजिप्त, इटली वगैरे देशांतून परिभ्रमण केले. इटलीत थ्यूरीआ येथे ग्रीकांनी एक वसाहत स्थापन केली. तेथे काही दिवस तो राहिला. इतर अनेक ठिकाणी कमी-अधिक काळ वास्तव्य करून त्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचा व लोकजीवनाचा अभ्यास केला. त्या काळी ज्ञात असलेल्या बहुतेक सर्व देशांचा भूगोल आणि इतिहास त्याने लिहिला आहे.

 

हीरॉडोटस
 

इतिहास हा विषय पौराणिक कथा आणि काव्य ह्यांपासून वेगळा काढण्याचे काम प्रथमतः हीरॉडोटसनेच केले. इतिहास ही सत्यघटनांची प्रामाणिक अशी हकीकत आहे, हे स्पष्टपणे प्रतिपादन करणारा तो पहिला इतिहासकार होय. आकर्षक भाषा, रसभरित वर्णने, खटकेदार संभाषणे वगैरे घालून आपली इतिहासकथा तो रंगवून सांगायचा पणतरीही इतिहासनिवेदनातून सत्य कधीही सुटता कामा नये, असात्याचा आग्रह असे. त्याचे इतिहासाचे तत्त्वज्ञानही त्याच्या पूर्वीच्या इतिहासकारांहून अगदी वेगळे होते. इतिहास हा देवादिकांच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही, तो माणसांचे जीवन सांगण्यासाठी आहे, असेसांगून इतिहास हा माणसाचे माणसांसंबंधीचे ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने लिहावयाचा असतो, हेही त्याने स्पष्ट केले. इतिहासकथनात निःपक्ष-पातीपणा असावा, असे त्याचे मत होते. ग्रीस आणि इराण ह्यांमधील युद्धांतील जयपराजयांचे वर्णन करताना आणि त्यांची मीमांसा करतानातो स्वकीयांना दोष द्यायला कचरत नाही. 

 

हीरॉडोटसचे इतिहासभाष्य व इतिहासलेखनपद्धती संपूर्णपणे तर्कशुद्धव सुसंगत होती, असे मात्र म्हणता येत नाही. अद्भुततेवर आपणविश्वास ठेवीत नाही, असे जाहीर करूनही पुष्कळ ठिकाणी तो घटनांचीदैवी कारणमीमांसा देतो. कधीकधी घटनांचे भौतिक स्वरूपाचे व मानवी संबंधांवर आधारलेले विश्लेषण तो करतो पण शेवटी कुणी-एकन्यायदेवता आहे आणि तीच माणसांना त्यांच्या सत्कृत्यांच्या व दुष्कृत्यांच्या प्रमाणात फळे देणार आहे, असे आधिदैविक नीतिशास्त्र सांगतो. त्याचप्रमाणे पुष्कळदा लिहितोही पण तरीही कुठे कुठे अथेन्सनगर, तेथील गणराज्य-पद्धती व त्या नगरराज्याचा नेता पेरिक्लीझ ह्यांबद्दलचा त्याचा भक्तिभाव त्याच्या इतिहासलेखनावर परिणाम करतोच. त्याच्या युद्धवर्णनात सैन्यांच्या रचना आणि हालचाली वगैरेंसंबंधीचे तपशील अनेकदा चुकतात. 

 

ग्रीस व इराण ह्यांच्या युद्धांचा इतिहास लिहिणे, हे हीरॉडोटसच्या लेखनाचे मुख्य प्रयोजन. त्या युद्धांची पूर्वपीठिका सांगण्याच्या निमित्ताने तो सर्व जगाचा भूगोल आणि इतिहास सांगतो. ठिकठिकाणच्या समाजजीवनाचे दर्शन घडवितो. विषयांतरे करीत इतक्या गोष्टी सांगतो की, अनेकदा ह्यांत नेमका इतिहास किती, असा संभ्रम पडावा. त्याच्या निवेदनात काही-एक पातळी नेहमीच दिसेल असे नाही, म्हणूनच हीरॉडोटसच्या एकंदर लेखनाविषयी ‘तो कधी तत्त्वज्ञान लिहितो, तर कधी बालवाङ्मय लिहितो’, असे थोड्याशा कुचेष्टेचे उद्गार एडवर्ड गिबनने काढले आहेत. असे असले तरीही, हीरॉडोटसच्या इतिहासविद्येबाबतच्या कार्याचेमहत्त्व कायमच राहते. त्याने परिश्रमपूर्वक माहिती जमा केली. ज्या साधनांवरून माहिती जमवावयाची, त्यांचे मूल्यमापन कसे करावयाचेह्याची पद्धती ठरविली. इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास आणि तो माणसाला स्वतःसंबंधी अधिक ज्ञात होण्यासाठी लिहावयाचा असतो, ही दृष्टी हीरॉडोटसनेच दिली. ह्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाच्या सर्वांगीण स्थित्यंतराची दखल घेणारा एक प्रचंड ग्रंथ त्याने लिहून ठेवला, म्हणूनच त्याला सार्थपणे ‘इतिहासाचा जनक’ म्हणतात.

आठवले, सदाशिव