रोहिले : अयोध्या प्रांताच्या उत्तर-पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश अठराव्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे. हा प्रदेश अत्यंत सुपीक असून त्याचा विस्तार ३३,१४८ चौ. किमी. होता. या प्रदेशातील बव्हंशी प्रजा हिंदू असून राज्यकर्ते हे रोहिले म्हणजे पठाण, अफगाण इ. हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील लोक होते. अली मुहम्मद खान रोहिल्याने रोहिलखंडात रोहिल्यांची सत्ता स्थापन केली (१७४०). येथे निरनिराळ्या छोट्या छोट्या सरदारांच्या सल्ल्याने कारभार चाले. रोहिल्यांचा निकटचा शेजारी म्हणजे अयोध्या प्रांताचा नवाब सफदरजंग व शुजाउदौला हे होत. त्यांचे आणि रोहिल्यांचे सख्य कधीच नव्हते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात व त्या अगोदरही रोहिल्यांनी अब्दालीस मदत केली होती. अली मुहम्मद खानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फैझुल्लाखान हा अज्ञान असल्याने हाफिज रहमत खान रोहिल्याने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली पण खरा पुढारी नजीबखान होता. इ.स. १७५१ व १७७२ मध्ये मराठी फौजांनी रोहिलखंडात घुसून तो उदध्वस्त केला आणि दुसऱ्या वेळी मुलूख सोडण्यासाठी पन्नास लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा रोहिल्यांनी शुजाउदौल्याकडे मदतीची याचना केली. शुजाच्या मनात पूर्वीपासूनच रोहिलखंड आपल्या अयोध्या प्रांतास जोडण्याचे होते. तेव्हा रोहिले व शुजा यांमध्ये जून १७७२ मध्ये तह ठरला की शुजाने मराठ्यांस रोहिलखंडातून घालवून द्यावे व त्याबद्दल रोहिल्यांनी शुजास ४० लक्ष रुपये द्यावेत. यानंतर मराठे रोहिलखंड सोडून गेले. पुढील वर्षी म्हणजे १७७३ मध्ये मराठे पुन्हा गंगा ओलांडून रामघाटापर्यंत आले. तेव्हा सर रॉबर्ट बार्कर यासह ब्रिटिशांचे लष्कर बरोबर घेऊन शुजा रोहिल्यांच्या मदतीस गेला. तोपर्यंत मराठे परत फिरलेले होते परंतु झालेल्या पूर्वीच्या करारान्वये शुजाने रोहिल्यांकडे ठरलेली रक्कम मागितली. ती रोहिल्यांनी नाकारल्यावरून इंग्रज आणि शुजा यांनी संयुक्तपणे रोहिल्यांवर स्वारी केली. २३ एप्रिल १७७४ रोजी मीरानपुरकम (शाहजहानपुर) येथे रोहिल्यांचा पराभव झाला. या लढायांत बरेच रोहिले मारले गेले व वीस हजार रोहिल्यांना रोहिलखंड सोडावा लागला. रोहिल्यांचा पराजय झाल्यानंतर शुजाने तो प्रांत आपल्या राज्यास जोडला परंतु इंग्रजांनी (लॉर्ड हेस्टिंग्ज) रोहिला फैझल्लाखान याशी फैजाबाद येथे ऑक्टोबर १७७४ मध्ये तह करून रामपूरच्या छोट्या संस्थानावर त्याची योजना केली. हाफिज रहमतखान मारला गेला आणि त्याच्या कुटुंबाची अत्यंत दुर्दशा झाली. त्यानंतर रोहिलखंडातून रोहिल्यांच्या सत्तेचे कायमचे उच्चाटन झाले.

कुलकर्णी, गो. त्र्यं.