कार्थेज : आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील एक प्राचीन समृद्ध नगरसंस्कृती. ट्युनिशियाच्या ईशान्येस ट्यूनिस शहरानजीक इ.स.पू.११०० ते इ.स.६९८ च्या दरम्यान ती भरभराटीत होती. ह्या संस्कृतीच्या उद्गगमाविषयी अनेक मते प्रचलित आहेत. काहींच्या मते फिनिशियन लोकांनी व्यापरवृध्दीसाठी हे शहर वसविले असावे, तर अनेकांचे मत असे आहे, की फिनिशियन राजकन्या डिडो हिने इ.स.पू. ८१४ मध्ये हे शहर वसविले. फ्रेंच संशोधकांनीही येथे उत्खनन व संशोधन करून ह्या मतास दुजोरा दिला आहे. फिनिशियन भाषेत कार्थेज याचा अर्थ ‘नव-नगर’ असा होतो. या नगरीचा आणि तिच्या भोवताली वाढलेल्या राज्याचा इतिहास ग्रीक आणि रोमन इतिवृत्तांतून मिळतो. ह्याशिवाय उत्खननाव्दारे उपलब्ध झालेल्या अवशेषांवरूनही ह्याविषयी बरीच माहिती ज्ञात झाली आहे.

पॅलेस्टाइनच्या टायर आणि सायडन ह्या नगरांतील फिनिशियन व्यापाऱ्यांनी इ.स.पू.११०० वा त्या आधी भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील शहरांशी व्यापारी संबंध जोडलेले होते. व्यापार अधिक सोयीस्कर व किफायतशीर व्हावा, म्हणून त्यांनी लहानलहान वसाहतींस प्रारंभ केला होता. त्यास अनुसरुन इ. स. पू.१००० मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून त्यांनी नैर्ऋत्येकडील तार्शिश भागाशी व्यापारी संबंध जोडले व कादिझ या ठिकाणी एक नवीन वसाहत स्थापन केली. इ.स.पू. आठव्या-सातव्या शतकांत ॲसिरियन सम्राटांनी वरील वसाहती ताब्यात घेण्यास सुरुवात केली, तेव्हा फिनिशियन व्यापाऱ्यांनी कार्थेज येथे आपले लक्ष केंद्रीभूत केले.

भौगोलिक स्थान, नौकानयनातील प्रावीण्य व व्यापारातील धडाडी ह्यांमुळे इ.स.पू. सातव्या-सहाव्या शतकांपर्यंत भूमध्ये सागराचा पश्चिम भाग कार्थेजच्या प्रभुत्वाखाली आलेला होता. याशिवाय उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील बहुतेक भाग कार्थेजच्या आधिपत्याखाली होता.

वरील चित्रांच्या पहिल्या ओळीत कार्थेजियनांची मृत्पात्रे व मध्ये मुखवटा असून दुसऱ्या व तिसऱ्या ओळींत अनुक्रमे मृत्तिकादीप दर्शविले आहेत.

कार्थेजच्या समोरचे सिसिली बेट व सार्डिनिया यांवर कार्थेजच्या वसाहती होत्याच. उत्तर स्पेन आणि कॉर्सिका हे प्रदेश खंडणीमुळेच केवळ आपले स्वातंत्र्य टिकवून होते. ह्या सुमारास कार्थेजने आसपासचा भाग जिंकून साम्राज्य निर्माण केले. कॉरिंथ व अथेन्स येथील ग्रीक व्यापाऱ्यांनी या प्रदेशांत वखारी स्थापाव्यात हे स्वाभाविक होते. त्यामुळे कार्थेजचे व्यापारी व ग्रीक व्यापारी ह्यात संघर्ष उद्‌भवला. त्यातून ग्रीकांशी कार्थेजचे इ.स.पू.५३५ मध्ये युद्ध झाले. त्यात ग्रीकांचा पराभव झाला. ह्या सुमारास कॉरिंथच्या व्यापाऱ्यांनी स्थापिलेली सिराक्यूस ही वसाहत बलिष्ठ होत होती. इ.स.पू.४८० मध्ये सिसिलीच्या उत्तर किनाऱ्यावरील हिमरा नगरापाशी कार्थेज आणि ग्रीक वसाहतवाले ह्यांच्यांत पुन्हा युद्ध होऊन कार्थेजचा पराभव झाला. इ.स.पू.३९६ मध्ये पुन्हा या युध्दाला तोंड लागले, परंतु अथेन्सबरोबरच्या युध्दात सिराक्यूसची शक्ती कमी झाली होती. त्याबरोबरच ग्रीक सत्ताही इ.स.पू.३३० च्या सुमारास मोडकळीस आलेली होती त्यामुळे कार्थेज यशस्वी झाले तथापि या भागात त्यावेळी रोमन वर्चस्व वाढू लागले. रोम व कार्थेज ह्या दोन प्रबळ सत्तांत साहजिकच व्यापार व समुद्रावरील वर्चस्व यांच्या स्वामित्वासाठी चढाओढ सुरू झाली आणि त्यातून पुढे युद्ध पेटले, ते सु.एकशे वीस वर्षे चालले आणि अखेर त्यात कार्थेजचा इ.स.पू.१४६ मध्ये शेवट झाला. इ.स.पू.२६४ मध्ये प्रथम रोमने कार्थेजच्या सिसिली बेटावरील मेसीना ह्या वसाहतीवर आक्रमण केले व ðप्यूनिक युध्दास सुरूवात झाली आणि तिसऱ्या प्यूनिक युध्दात रोमन सैनिकांनी कार्थेजचा नाश केला. कार्थेज शहर धुळीला मिळविले. इ.स.पू.२९ मध्ये ऑगस्टस ह्या रोमन सम्राटाने ते पुन्हा वसविले. त्यानंतर हळूहळू त्याचा व्यापार-उदीमही वाढला, परंतु ते रोमनांचेच अंकित शहर राहिले. पुढे ६९८ मध्ये अरबांनी या शहराची नासधूस व जाळपोळ केली. त्यानंतर येथे पुन्हा फारशी वस्ती झाली नाही.  

कार्थेजचे नैसर्गिक स्थान सागरी व्यापाराला अनुकूल होते. शहरात दोन बंदरे होती. त्यांतील एक लढाऊ जहाजांकरिता व दुसरे व्यापारी जहाजांकरिता होते आणि दोन्ही कालव्याने जोडली होती. बंदरे सुसज्ज व मोठी होती. हरप्रकारची जहाजे बांधणाऱ्या गोद्या व जहाजे चालविणारे कसबी नाविक तेथे होते. सु.२५० लढाऊ जहाजे नांगरून राहतील, एवढी मोठी गोदी तेथे होती, शहराच्या मध्यभागी असलेला बायर्सा हा बालेकिल्ला दगडी तटबंदीने मजबूत आणि शस्त्रास्त्रांनी व सैन्याने सुसज्ज असे. सबंध शहराची आखणी लंबचौरसाकृती होती. समांतर व रुंद रस्त्यांच्या दुतर्फा सहासहा मजली दगडी इमारती होत्या. क्वचित त्यांच्या माथ्यावर झुलते बगीचे तयार केले असावेत. मधूनच कोठे तरी संगमरवरी पाषाणांची उत्तुंग मंदिरेही दिसतात. यांच्या स्तंभांवर सोन्याचे अथवा रुप्याचे नक्षीकाम केलेले असावे किंवा ते सोन्यारुप्याच्या पत्र्याने मढविण्यात आलेले असावेत.

साधनसंपत्ती, व्यापार, भव्य वास्तू इत्यादींत कार्थेजने जरी प्रगती केली असली, तरी सांस्कृतिक क्षे़त्रात ते तत्कालीन शहरांपेक्षा प्रगत नव्हते. शहरात सर्वसत्ताक अशी नागरिकांची आमसभा होती, तरी प्रत्यक्षात सर्व सत्ता संपन्न नागरिकांच्या वरिष्ठ सभेच्याच हातात असे. रोजच्या कारभारासाठी दोन प्रशासक व तेही प्रतिवर्षी नव्याने निवडलेले असत. त्यांना मदत करण्यासाठी चार किंवा पाच सेनानी असत. येथील स्वतंत्र नागरिक व्यापारासाठी भटकत असल्याने शहरांत व वसाहतींत शेती व मोलमजुरी करण्यासाठी आफ्रिकेच्या अंतर्भागातून आणलेल्या गुलामांचाच प्रामुख्याने उपयोग होई. एकेका जहागीरदाराजवळ वीस-वीस हजार गुलाम असत, गुलामांना स्वातंष्य वा हक्क नसत. सैन्यसुध्दा केवळ फिनिशियन नागरिकांचे नव्हते, ते लिबियन, स्पॅनिश अशा लोकांचे मिळून झालेले असे, मात्र त्यातील अधिकारी फिनिशियन असत.

कार्थेजने भूदलापेक्षा आरमारावर अधिक लक्ष केंद्रित केले होते व तांत्रिक दृष्टया ते सुसज्ज व बलवत्तर होते. तत्कालीन सत्तांत कार्थेजचे आरमार बलाढ्य होते. इ.स.पू.१४६ मध्ये कार्थेजची लोकसंख्या सु.सात लाख होती.

कार्थेजच्या धर्माविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. त्यांचे बहुसंख्य देव फिनिशियन वा ईजिप्तमधून आले होते. मूळ देवदेवतांत मेलकार्ट हिला अधिक महत्त्व होते व नैवेद्यादाखल तिला मोठी खंडणी कार्थेजमधून पॅलेस्टाइनकडे जात असे. ह्याशिवाय टानिट, बाल-हेमॉन, इशामॉन अशांसारख्या स्थानिक देवतांचीही उपासना केली जात असे. शिवाय निसर्गपूजा प्रचारात होती. सर्व उपासनेतील मुख्य भाग म्हणजे यज्ञदान व बलिदान होय. काही प्रसंगी यजमान स्वतःची मुलेही बळी देत. सर्वत्र देवीचेच प्रमाण जास्त होते.

कार्थेजच्या उत्खननांत सापडलेल्या मृत्पात्रांत तसेच मृत्स्नाशिल्पांत आणि दागदागिन्यांत कलात्मक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही. कार्थेजियन लोकांची ग्रंथालये उपलब्ध झाली असून त्यांच्या साहित्यात शेती, प्रवासवर्णने आदींचे ग्रंथ मिळतात. इतर कलांत फिनिशिया, ग्रीस आणि रोम ह्यांचीच छाप मुख्यत्वे त्यांच्यावर आढळते. कार्थेज ही नगरसंस्कृतीच मुळी व्यापारी पार्श्वभूमीवर वृध्दिंगत झाली होती. आशियात निर्माण होणारे उत्तमोत्तम कापड, उत्कृष्ट भांडीकुंडी, निळीसारखे पदार्थ येथील व्यापारी विकत आणि त्या बदल्यात शिसे, तांबे, चांदी यांसारखे धातू मिळवीत. या व्यापारांच्या संरक्षणार्थ त्यांनी सैन्य व आरमार यांचे सामर्थ्य वाढविले.

पहा : प्यूनिक युध्दे फिनिशिया.  

संदर्भ : 1.Charles-Picard, Gilbert Charles-Picard, Collette Trans.Foster, A.E. Daily Life in Carthage, London, 1961.  

2.Picard, Gilbert: Trans. Kochan, Mirian Kochan, Lionel, Carthage, London, 1964.

 माटे, म.श्री.