एलिझाबेथ, पहिली : (७ सप्टेंबर १५३३­­­—२४ मार्च १६०३). एलिझाबेथ ही १५५८­­­—१६०३ या काळातील ट्यूडर घराण्यातील इंग्‍लंडची राणी. ही आठव्या हेन्रीच्या ॲन बुलीन ह्या दुसऱ्या राणी पासून झालेली मुलगी. हिचा जन्म ग्रिनिच येथे झाला. हिची वडीलबहीण मेरी १७ नोव्हेंबर १५५८ मध्ये मृत्यू पावल्यावर ती गादीवर आली. ही प्रॉटेस्टंट पंथाची होती. मेरीच्या कारकीर्दीत झालेल्या कॅथलिक पंथाच्या प्रसाराला तिने आळा घातला. ॲक्ट ऑफ सुप्रीमसी (१५५९) आणि ॲक्ट ऑफ युनिफॉर्मिटी (१५८८) ह्या दोन कायद्यांनी तिने इंग्‍लंडमध्ये प्रॉटेस्टंट पंथ दृढ केला. तिच्या कारकीर्दीत हॉकिंझ, ड्रेक, रॅली यांनी मोठमोठ्या आरमारी सफरी करून इंग्‍लंडचा नावलौकिक वाढविला. स्पेनबरोबर धार्मिक आणि राजकीय बाबतींत वितुष्ट आल्यामुळे स्पेनने आपले आजिंक्य आरमार – आर्माडा – पाठवून इंग्‍लंडवर स्वारी करण्याचा प्रयत्‍न केला पण ड्रेक, हॉकिंझ यांसारख्यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्रज आरमाराने त्याचा पूर्ण धुव्वा उडविला.

पहिली एलिझाबेथ

एलिझाबेथच्या कारकीर्दीमध्ये शेक्सपिअर, फ्रान्सिस बेकन, एडमंड स्पेन्सर, वॉल्टर रॅली, मार्टिन फ्रॉबिशर वगैरे थोर विद्वानांनी इंग्रजी सहित्यात मोलाची भर घातली. एलिझाबेथने हिंदुस्थान व इतर पूर्वेकडील देश, तसेच अमेरिका, रशिया इ. देशांशी व्यापार करण्याकरिता व्यापारी कंपन्या स्थापण्यास प्रोत्साहन दिले. हिंदुस्थानचे राज्य कमाविणारी प्रख्यात ईस्ट इंडिया कंपनी तिच्याच कारकीर्दीत, म्हणजे १६०० मध्ये स्थापन झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांची भरभराट झाली. अशा रीतीने एलिझाबेथच्या कारकीर्दीत अनेक क्षेत्रांत इंग्‍लंडची अभिवृद्धी झाली. म्हणून या काळास इंग्‍लंडच्या इतिहासातील सुवर्णयुग म्हणतात. ती आमरण अविवाहित राहिली.

संदर्भ : Neale, J. E. Queen Elizabeth I, London, 1952.

राव, व. दी.