मॅल्कम, सर जॉन : (२ मे १७६९–३० जुलै १८३३). ब्रिटिश हिंदुस्थानातील लष्करी-मुत्सद्दी, प्रशासक, इतिहासकार व मुंबईचा गव्हर्नर (१ नोव्हेंबर १८२७–५ डिसेंबर १८३०). स्कॉटलंडमधील डम्फ्रीस येथे सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. मार्गारेट व जॉर्ज मॅल्कम हे त्याचे आई-वडील. वस्टरकिर्क येथे त्याचे जुजबी शिक्षण झाले. वयाच्या तेराव्या वर्षीच तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात भरती झाला. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूरकर युद्धात त्याने मर्दुमकी गाजवली (१७९०–९२). भारतीय सत्ताविषयक ब्रिटिश-धोरण, फार्सी व एतद्देशीय भाषा यांचा त्याने अभ्यास केला. लॉर्ड वेलस्लीने १७९८ मध्ये त्याला प्रथम हैदराबाद येथे सहाय्यक वकील म्हणून नेमले. तो म्हैसूरलाही अल्पकाळ ब्रिटिशांचा वकील होता. इ. स. १८०० मध्ये मॅल्कम इराणच्या शाहाशी मैत्रीचा तह करण्यासाठी इराणला गेला व त्यात त्याला अपूर्व यश मिळाले. त्यानंतर तहाच्या वाटाघाटीसाठी पुन्हा तो एकदा इराणला गेला होता (१८०७). शेवटच्या दोन इंग्रज-मराठे युद्धांत तसेच अंजनगाव-सुर्जीच्या तहात (१८०३) मॅल्कमने आपली मुत्सद्देगिरी व युद्धकौशल्य दाखविले. यामुळे शिंद्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. पुढे १८०४–०५ मध्ये शिंदे, होळकर इ. मातब्बर मराठे सरदारांशी इंग्रजांनी केलेल्या युद्ध किंवा मैत्री तहांची योजना त्याचीच होती. तिसऱ्या इंग्रज-मराठे युद्धाच्या वेळी (१८१७–१८) मॅल्कम गव्हर्नर जनरलचा दख्खनमधील विशेष प्रतिनिधी होता. त्यानेच दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांपुढे शरणागती पतकरावयास लावली. मराठ्यांच्या राजकारणाबाबत मॅल्कम कंपनीच्या अधिकाऱ्यांत तज्ञ मानला जात असे. माळव्यातील अंदाधुंदी संपवून तेथे सुव्यवस्था प्रस्थापण्याचे व त्यासाठी तेथील भिल्ल टोळ्यांना काबूत आणण्याचे बिकट कार्य त्याने केले. या त्याच्या कार्याचा उचित गौरव त्यास मुंबईचे गव्हर्नरपद देऊन कंपनीने केला. या पदावरून १८३० मध्ये निवृत्त झाल्यावर तो इंग्लंडला गेला. ब्रिटिश पार्लमेंटचा तो काही वर्षे सभासद होता. लंडन येथे त्याचे पक्षाघाताने निधन झाले.

मुंबईचा गव्हर्नर असताना त्याने अनेक सुधारणा केल्या. त्याच्या स्मरणार्थ जुन्या क्षेत्र महाबळेश्वरजवळ मॅल्कम पेठ ही नवीन वसाहत वसविण्यात आली. त्याने आपल्या प्रदीर्घ वास्तव्यात जे एतद्देशियांचे निरीक्षण केले आणि साधनसामग्री जमविली, तिचा योग्य वापर करून द पोलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया फ्रॉम १९८४ (१८११), मेम्वॉर्स ऑफ द सेंट्रल इंडिया (१८३२), हिस्टरी ऑफ पर्शिया, दोन खंड (१८१५), द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया (१८३३), द लाइफ ऑफ क्लाइव्ह (१८३६) इ. महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही ग्रंथांच्या एकाहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांमुळे त्याला इतिहासकार म्हणून मान्यता लाभली.

संदर्भ : Panikkar, K. M. Ed. John Malcom : The Political History of India, New Delhi, 1970.

भोसले, अरुण