झांशीची राणी : (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८). इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या. मोरोपंत हे दुसरे चिमाजी आप्पा यांचे कारभारी होते. मनुबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव. आईच्या मृत्यूनंतर ती वडिलांबरोबर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे ब्रह्यावर्तास गेली. तेथील मुक्कामात तिचे झांशीच्या गंगाधरराव नेवाळकर या संस्थानिकाबरोबर १८४२ मध्ये लग्न झाले. गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, पण तो अल्पवयीन ठरला. तेव्हा मरणापूर्वी एक दिवस अगोदर गंगाधररावांनी पाच वर्षांचा आपल्या घराण्यातील आनंदराव हा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. १८५३ मध्ये गंगाधरराव मरण पावले. डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक पुत्र नामंजूर ठरवून झांशी संस्थान खालसा केले. या निर्णयाचा जाहीरनामा जेव्हा लक्ष्मीबाईस वाचून दाखविण्यात आला, तेव्हा तिने ‘मेरी झांशी देएंगा नही’ असे उद्‌गार काढले. दत्तक वारस नामंजूर केला, याबद्दलचे गाऱ्हाणे तिने अनेक खलित्यांद्वारे ब्रिटिश सरकारपुढे मांडले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर झांशी संस्थान खालसा करून लक्ष्मीबाईस दरमहा रु. ५,००० निवृत्तिवेतन व राजवाडा वगैरे खासगी मिळकत देण्यात आली. खजिन्यातील सु. सहा लाख रु. रक्कम दामोदर या अज्ञान दत्तक पुत्राच्या नावे ठेवण्यात येऊन झांशी संस्थानावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला.

झांशीची राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई या अवस्थेत आपले व्यथित जीवन दान-धर्मादी कार्य़ात व्यतीत करीत असता १८५७ मध्ये मुख्यतः उत्तर हिंदुस्थानात उठाव झाला. या वेळी काही निमित्ताने ब्रिटिश सैन्यात असलेले भारतीय सैनिक बिथरले आणि १८५७ चा उठाव हळूहळू देशभर प्रसृत झाला. यात आपण सामील नाही व उठावाविरुद्ध टिकाव धरण्यास आपल्याजवळ पुरेसा पैसा व सैन्य नाही, असे लक्ष्मीबाईने इंग्रजांस वारंवार कळविले आणि सुरुवातीस यात होरपळलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना आश्रयही दिला. उठावाच्या वेळी तिने इंग्रजांशी स्वामीनिष्ठ राहून झांशीचा राज्यकारभार चोख केला. उठाववाल्यांनी राणीकडे तीन लाख रु. मागितले. तिने आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणून सांगूनही ते गप्प बसेनात. अखेर किल्ला, वाडा वगैरे उद्‌ध्वस्त करू अशी पर्यायी धमकी त्यांनी दिली. तेव्हा तिने दागदागिने वगैरे एक लाख रुपयांचा ऐवज त्यांना दिला. या वेळी उठाववाल्यांनी तिच्या नावे ग्वाही फिरवून तिला झांशीच्या गादीवर बसविले तथापि ती इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली.

तिने स्वतःच्या अधिकारात राज्यकारभार सुरू करताच, झांशीच्या सरहद्दीवरील दतिया व ओर्छा या संस्थानांच्या संस्थानिकांनी झांशीला वेढा दिला. संरक्षणासाठी तिने इंग्रजांची मदत मागितली परंतु इंग्रजांनी मदत दिली नाही. तेव्हा तिने सशस्त्र प्रतिकार केला आणि या दोन संस्थानांना शांतता तह करावा लागला. राणीच उठावाची सूत्रधार असून इंग्रजांच्या झांशी संस्थानात झालेल्या कत्तलीत तिचा हात असल्याबद्दल गव्हर्नर कॅनिंगने राणीस दोषी ठरविले व राणीला पकडण्याच्या दृष्टीने २३ मार्च १८५८ रोजी सर ह्यू रोजला सैन्यानीशी झांशीवर धाडले. त्याने २५ मार्चला झांशीला वेढा दिला. राणीने तात्या टोपे, नानासाहेब पेशवे वगैरेंस मदतीस बोलाविले. अकरा दिवस ती किल्ला लढवीत होती. तात्या टोपे १५,००० सैन्यानीशी मदतीस आला, पण किल्ल्यातील दारूगोळा संपला व फितुरी वाढली. त्यामुळे पळून जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. अखेरीस ती दत्तक मुलाला पाठीशी घालून पुरुषी वेशात सु. ३०० निवडक लोकांनीशी झांशीतून निसटली आणि इंग्रजांची फळी मोडून प्रथम काल्पी येथे दाखल झाली. हे उठावाचे प्रमुख ठिकाण होते. तिथे तात्या टोपे व बांद्याचा नबाब तिला भेटले. उठावातील लोकांनी तिच्या नेतृत्वाखाली ग्वाल्हेर काबीज करून तेथील मराठा सैन्यास आपणाकडे वळविले आणि नानासाहेब पेशव्यास पेशवेपद दिले. काही काळ ऐषाराम निर्माण झाला. दरम्यान रोज आणि स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली फौज चालून आली. राणीने ग्वाल्हेरच्या लढाईत प्रामुख्याने भाग घेतला. लढता लढता तिला गोळी लागली आणि ती जखमी झाली. तेव्हा तिला बाबा गंगादासच्या झोपडीत नेण्यात आले. येथेच ती मरण पावली.

राणीच्या हुशारीबद्दल व शौर्याबद्दल अनेक लोकांनी व ग्रंथकारांनी प्रशंसोद्‌गार काढले आहेत.

संदर्भ : 1. Tanmankar, D. V. Ranee of Jhansi, London, 1958.

  २. पारसनीस, द.ब. झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र, मुंबई, १८९४.

देवधर, य. ना.