तुघलक घराणे : तुघलक किंवा तुघलुक. मध्ययुगीन हिंदुस्थानातील मुसलमान राजघराणे. १३२१ ते १३८८ या काळात ते दिल्लीच्या तख्तावर होते. तुघलक घराण्याचा मूळ पुरुष घियासुद्दीन तुघलक हा अलाउद्दीन खल्‌जीच्या काळात हिंदुस्तानात आला. सुरुवातीस तो अत्यंत गरीब होता. आपल्या पराक्रमाने तो लवकरच अमीर झाला. पुढे कुत्बुद्दीन मुबारकशाह याने घियासुद्दीन तुघलकास दीपालपूरचा सुभेदार नेमले. अलाउद्दीनाच्या मृत्युनंतर त्याने खुसरौखानाचा पराभव करून तुघलक घराण्याची स्थापना केली व इस्लाम धर्माला अनुसरून राज्य करण्यास सुरुवात केली. त्याने दिल्लीजवळ तुघलकाबाद नावाचा किल्ला बांधला व त्याच नावाची नवीन राजधानी वसविली. त्याने राज्याचा विस्तार करून अनेक प्रकारची लोकोपयोगी कामे केली राज्याचे उत्पन्न वाढविले दारूचे उत्पादन व विक्री यांना त्याने मनाई केली. त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाची योजना म्हणजे टपाल वाहतुकीची व्यवस्था होय. याबद्दल तत्कालीन प्रवासी इब्न बतूता याने त्याच्याविषयी प्रशंसोद्‌गार काढले आहेत. दक्षिणेकडील बहुतेक सत्ता त्याच्याशी एकनिष्ठ होत्या परंतु वरंगळच्या प्रतापरुद्राने बंड केले, तेव्हा त्याने ते आपल्या मुलाकरवी मोडून काढले. १३२३ मध्ये त्याने तेलंगणावर स्वारी केली आणि ते आपल्या राज्यास जोडले. याच काळात त्याने बंगालची मोहीम यशस्वी रीत्या हाताळली. या मोहिमेवरून परत येत असता तुघलकाबाद येथे तो मृत्यू पावला (१३२५). त्याच्यानंतर उलुघखान (१३२५–५१) हा गादीवर आला. हा इतिहासात ⇨ मुहम्मद तुघलक किंवा मुहम्मद बिन तुघलक म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत हुशार, बुद्धिमान पण तितकाच एककल्ली व क्रूर होता. गादीवर आल्यावर त्याने आपल्या मोठ्या भावास ठार केले, तर दुसऱ्या वर्षी दक्षिणेत बंड केलेल्या बहाउद्दीन गुर्शास्प यास त्याने जिवंत जाळले. तो धर्माचरणी होता तथापि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याची वर्तणूक व कार्य धर्मनिरपेक्ष होते. त्याने राज्यकारभारात अनेक सुधारणा करून महसूल वाढविला व शेतकीसंबंधी महत्त्वाची कार्यपद्धती घालून दिली. त्याच्या मोहिमांचे नियोजनही शिस्तबद्ध असे. तथापि त्याच्या अतिरेकी स्वभावामुळे त्याने केलेल्या सुधारणा वेडगळपणाच्या ठरल्या. तो अत्यंत गर्विष्ठ स्वभावाचा होता. आज्ञाभंग करणाऱ्यास तो बहुधा देहान्ताची सजा देई. त्यामुळे प्रजा अत्यंत असंतुष्ट होती व सर्वत्र बंडखोरी फैलावली. त्याला इस्लाम धर्म, इस्लाम विधी आणि इस्लाम न्याय यांबद्दल आदर होता. इब्न बतूताने त्याच्या काळात घडलेल्या अन्याय गोष्टींची मोठी यादी दिली आहे. दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी असे वाटले. म्हणून त्याने देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला. नंतर थोड्याच महिन्यांत परत दिल्लीस राजधानी नेली व आलेल्या लोकांना परतण्याची आज्ञा दिली. या हुकमाची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे व निर्दययेने करण्यात आली. त्यामुळे तर तो फारच अप्रिय झाला. १३२८ मध्ये सुलतानचा सुभेदार किश्लूखान याचे बंड त्याने मोडून काढले.

याच्या कारकीर्दीतील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे चांदीच्या व चांदी–तांबे अशा मिश्र धातूंच्या नाण्यांबरोबर अधिकृत रीत्या तांब्याची नाणी त्याने पाडली पण हा प्रयोग पुढे फसला आणि आर्थिक दृष्ट्या राज्याची फार हानी झाली. यास दुसरेही एक कारण होते ते म्हणजे सात वर्षांचा दुष्काळ. मुहम्मद २ मार्च १३५१ रोजी मरण पावला. त्याचे राज्य हिंदुस्थानभर होते, मात्र काश्मीर अंतर्भूत नव्हते.

त्याच्यानंतर फीरूझशाह तुघलक (१३५१–८८) गादीवर आला त्याने निराश्रित व गोरगरिबांना आश्रय देऊन शेतीसंबंधीच्या अनेक सुधारणा केल्या, तसेच दिल्लीच्या दक्षिणेस यमुनेच्या काठी फिरोझाबाद हे नवीन शहर बसविले. त्याच्या मृत्यूनंतर तुघलक घराण्याचा ऱ्हास फार झपाट्याने झाला. दुर्बळ व अकार्यक्षम वारसदार हेच त्याचे मुख्य कारण होय. त्याच्यानंतर घियासुद्दीन, दुसरा तुघलक, अबू बकर, दुसरा मुहम्मद, सिकंदर आणि नासीरुद्दीन मुहम्मद असे सहा सुलतान गादीवर आले. परंतु ते पराक्रमीही नव्हते आणि कार्यक्षमही नव्हते. अखेरचा सुलतान मुहम्मदशाहच्या (१३९४–१४१२) वेळी तैमूरलंगाने हिंदुस्थानवर स्वारी केली. खरी सत्ता दौलतखान लोदी याच्या हातात होती. परंतु खिज्रखान या सय्यद घराण्याच्या संस्थापकाने मुहम्मदशाहास १४१० मध्ये पकडले व त्याची राजधानी फिरोझाबाद हस्तगत केली. मुहम्मदशाह १४१२ मध्ये मरण पावला आणि त्याच्या दरबारातील दौलतखान लोदी गादीवर आला, पण त्याचा पराभव करून ख्रिजखानाने आपल्या सय्यद घराण्याची दिल्लीवर स्थापना केली.

संदर्भ : 1. Husain, Mahdi, The Rise and Fall of Muhammad Bin Tughluq, Calcutta, 1938.

   2. Husain, Mahdi, Tughluq Dynasty, Calcutta, 1963.

   3. Majumdar R. C. Ed. The Delhi Sultanate, Bombay, 1960.

कुलकर्णी, गो. त्र्यं.