प्रतीहार घराणे : उत्तर भारतातील एक प्राचीन घराणे. प्रतीहार राजांना कोरीव लेखांत गुर्जर म्हटले आहे कारण ते गुर्जर वंशाचे होते. ते इ. स.च्या सहाव्या शतकाच्या मध्यास उदयास आले. त्यांचा मूळपुरुष हरिचन्द्रनामक ब्राह्मण होता. त्याला ब्राह्मण व क्षत्रिय ज्ञातींमधील दोन स्त्रिया होत्या. क्षत्रिय स्त्रीपासून त्याला भोगभट्ट, कक्‌क, रज्जिल आणि दद्द असे चार पुत्र झाले. यांपैकी पहिल्या दोघांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. रज्जिलाने मांडव्यपुर (जोधपूरजवळ मंदोर) येथून राज्य केले तर दद्द याने दक्षिणेस गुजरातमध्ये राज्य स्थापिले. त्याची राजधानी नान्दीपुरी (नांदोद) येथे होती.

रज्जिलाचे वंशज आपले कुल रघुकुलातील लक्ष्मणापासून उत्पन्न झाले असे मानीत. लक्ष्मण वनवासात रामाचा प्रतीहार (द्वारपाल) होता. म्हणून या शाखेला प्रतीहार (किंवा गुर्जर प्रतीहार) अशी संज्ञा आहे. दद्दाचे वंशज आपला संबंध कर्णाशी जोडीत असत.

सुरसुंदरी,प्रतीहार घराण्याच्या दोन शाखा होत्या : एक, मांडव्यपुराहून राज्य करणारी विशेष प्रसिद्ध नव्हती. हिच्यातील शेवटचा ज्ञात पुरुष कक्कुक हा ८६१ मध्ये राज्य करीत होता. दुसरी, जावालिपुर (भिल्लमालजवळचे जालोर) येथून आरंभी राज्य करीत होती, ही साम्राज्यपदास चढली. हिच्यातील पहिला प्रसिद्ध पुरुष पहिला नागभट्ट हा होय. याच्या काली अरबांनी सिंध प्रदेश जिंकून पूर्वेकडे धडक मारण्यास सुरुवात केली होती पण नागभट्टाने मोठ्या शौर्याने त्यांचा पराभव करून उत्तर भारताचे त्यांच्या टोळधाडीपासून संरक्षण केले. ही त्याची अत्यंत महनीय कामगिरी होय. या विजयाने त्याचे सामर्थ्य व प्रतिष्ठा वाढली. नंतर त्याने सभोवारचा बराच प्रदेश जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याचा नातू वत्सराज हा महाप्रतापी निघाला. त्याने उत्तर भारताचा बराच प्रदेश जिंकून बंगालचा प्रबळ पालराजा धर्मपाल याचाही पराभव केला. तितक्यात दक्षिणेचा राष्ट्रकूट नृपती ध्रुव याने उत्तर भारतात स्वारी करून वत्सराजास राजपुतान्याच्या वाळवंटात पळवून लावले आणि नंतर धर्मपालाचाही दुआबात पराभव केला

ध्रुव दक्षिणेत परत गेल्यावर धर्मपालाने कनौजवर आक्रमण करुन तेथे आपला हस्तक चक्रायुध याला बसविले पण वस्तराजाचा पुत्र दुसरा नागभट्ट याने त्याला पदच्युत केले. तेव्हा त्याला धर्मपालाशी सामना द्यावा लागला. मोंघीरजवळ झालेल्या घनघोर युद्धात नागभट्टाचा जय झाला. तरीही धर्मपाल राज्यविस्ताराचा प्रयत्‍न करीत होताच. तितक्यात ध्रुवाचा पुत्र राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद याने उत्तर भारतात स्वारी करुन त्याचा पराजय केला आणि हिमालयाच्या पायथ्यापर्यंत चाल केली तेव्हा धर्मपाल त्याला शरण आला. गोविंद परत गेल्यावर प्रतीहार व पाल राजांचे पुन्हा युद्ध झाले. धर्मपालाने बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा देवपाल हाही महापराक्रमी होता. त्याने गुर्जरांचाही पराभव केला होता.

देवपालानंतर पाल राजांच्या सामर्थ्याला उतरती कळा आली. दुसऱ्या नागभट्टाचा नातू पहिला भोज याने त्याचा फायदा घेऊन आपले साम्राज्य वाढविले. त्याने कनौज जिंकून तेथे आपली राजधानी नेली. त्याने पूर्वेस शरयूपार (गोरखपूर), दक्षिणेस माळवा व काठेवाड, उत्तरेस पंजाब व उत्तर प्रदेश हे प्रदेश जिंकून आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्याने सिंधवर स्वारी करुन मुलतानलाही वेढा दिला पण अरबांनी तेथील सूर्यमूर्ती भंग करण्याचा धाक घालताच तेथील लोकांच्या विनंतीवरून तो ते शहर न घेताच परत फिरला. मुसलामानांवरील विजयाचे निदर्शक म्हणून त्याने ‘आदिवराह’ ही पदवी धारण केली आणि ‘आदिवराह’ छापाची चांदीची द्रम्म नाणी पाडली.

भोजानंतर त्याचा पुत्र महेन्द्रपाल याने बंगालचा काही भाग जिंकून आपले साम्राज्य आणखी वाढविले पण त्याचा पुत्र महीपाल याच्या काळत त्याचा ऱ्हास होऊ लागला. इ.स. ९१५ च्या सुमारास राष्ट्रकूट नृपती तिसरा इंद्र याने कनौजवर स्वारी करून ते उद्ध्वस्त केले. तेव्हा महीपालाला आपला सामंत चंदेल्ल हर्ष याच्या आश्रयास जावे लागले. या पराजयाने प्रतीहारांची प्रतिष्ठा कमी होऊन त्यांचे सामंत स्वतंत्र होऊ लागले. राष्ट्रकूटांनी त्यांच्या राज्यातील कालंजर व चित्रकूट (चितोड) हे दोन अभेद्य किल्ले आपल्या ताब्यात ठेवले होते. महीपालानंतर गादीवर आलेल्या त्याच्या मुलांच्या कारकीर्दीत प्रतीहारांची सत्ता जास्तच दुर्बल झाली. शेवटचा प्रतीहार राजा हा महंमूद गझनीच्या कनौजवरील स्वारीच्या प्रसंगी कनौज सोडून पूर्वेस सु. ५० किमी. वर असलेल्या गंगातीरावरील गावी पळून गेला. त्याचा या भ्याडपणाचा संताप येऊन चंदेल्लनृपती विद्याधर आणि त्याचा सामंत कच्छवाह अर्जुन यांनी त्याचा पराभव करून त्याला ठार केले. त्याच्या नंतर इ. स. १०२७ मध्ये त्रिलोचनपाल गादीवर आला. याचे नाव प्रयागजवळ सापडलेल्या ताम्रपटावरुन ज्ञात झाले आहे पण त्याचे राज्य जवळच्या प्रदेशावरच मर्यादित होते. या वंशात यशपाल नावाचा आणखी एक पुरुष होऊन गेल्याचे दिसते.

प्रतीहारांच्या राज्यात धर्म, विद्या व कला यांची उन्नती झाली. प्रतीहार राजे शिव, विष्णू, आदित्य आणि भगवती अशा विविध देवतांचे उपासक होते. त्यांनी विध्वंसक मुसलमानांपासून आपल्या देशाचे व धर्माचे रक्षण केले. अरब यात्रेकरु अल् मसूदी याने म्हटले आहे की, ‘हिंदुस्थानात राष्ट्रकूट हे मुसलामानांशी मित्रत्वाने तर प्रतीहार शत्रुत्वाने वागतात.’ सिंधकडून मुसलमानांचे आक्रमण होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या राज्याच्या पश्चिम सीमेवर सात ते नऊ लाख सेना जय्यत तयार ठेवली होती त्यांच्या काळी कनौजचे वैभव वाढून तेथील स्त्रियांची वेशभूषा सर्व भारतात आदर्श मानली जात असे, असे राजशेखरच्या काव्यमीमांसेवरून दिसते. प्रतीहारांनी अनेक देवालये बांधून दानधर्म केला. त्यांची देवळे एका विशिष्ट स्थापत्य पद्धतीची आहेत. त्यांचा विद्वानांस आश्रय होता. राजशेखराची बाल-रामायणबालभारत ही संस्कृत नाटके आणि कर्पूरमंजरी हे प्राकृत, सट्टक, तसेच आर्य क्षेमीश्वराचे चण्डकौशिक हे संस्कृत नाटक, ही नाटके कनौज येथेच प्रथम रंगभूमीवर आली. धर्म, संस्कृती, विद्या आणि कला यांचे उदार पुरस्कर्ते म्हणून प्रतीहारांची किर्ती चिरंतन राहील.

संदर्भ : 1. Majumadar, R. C. Bd. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1964.

2. Mishra, V. B. The Gurjara-Prattharas and Their times, Bombay, 1966.

मिराशी, वा. वि.