नाना फडणीस : (१२ फेब्रुवारी १७४२ – १३ मार्च १८००). याचे पूर्ण नाव बाळाजी जनार्दन भानू. उत्तर पेशवाईतील एक थोर मुत्सद्दी. रत्‍नागिरी जिल्ह्यातील बाणकोटच्या खाडीवरील दोन गावे तेथील इतिहासप्रसिद्ध घराण्यांमुळे पेशवाईत फार प्रसिद्धीस आली. उत्तरेकडील श्रीवर्धनास (कुलाबा जिल्हा) भट-देशमुख होते, तर दक्षिणेकडे वेळास येथे भानू-फडणीस वतनदार होते. दोन्ही घराण्यांत घरोबा होता. राजारामाच्या कारकीर्दीपासून बाळाजी विश्वनाथ देशावर मराठी राज्यात निरनिराळ्या अधिकाराच्या नोकऱ्या करीत होता. हबशांच्या छळामुळे भटांबरोबर भानूही देशावर आले आणि सेनापती धनाजी जाधवाकडे नोकरीस राहिले. मराठ्यांना मिळालेल्या चौथाई-सरदेशमुखीच्या सनदाबाबत दिल्लीत १७१९ मध्ये झालेल्या पंधराशे मराठ्यांच्या कत्तलीत नानाचे आजे बाळाजीपंत ठार झाले. हरिपंत फडक्याचा बाप बाळाजी हा नानाचे चुलते बाबूराव फडणीस यांचा उपाध्याय असल्यामुळे नानाची आणि हरिपंताची लहानपणापासून मैत्री होती.

नानाचा पिता जनार्दन बल्लाळ याला बळवंतराव मेहेंदळ्याची बहीण रखमाबाई दिलेली होती. नानाचा  जन्म साताऱ्यास झाला. नानासाहेब पेशव्यांबरोबर त्याचे बालपण गेले व कारभाराचे शिक्षणही त्यांच्या सहवासात मिळाले. ‘भाऊसाहेबी कृपा पुत्रवत केली’ असे नानाचे आत्मचरित्रात लिहिले आहे. पत्‍नी व माता यांना घेऊन यात्रेच्या उद्देशाने नाना १७६१ मध्ये तिसऱ्या पानिपतच्या स्वारीत सामील झाला. लढाईच्या धुमश्चक्रीत तो अखेरपर्यंत भाऊसाहेबांबरोबर होता. भाऊसाहेब गर्दीत नाहीसे झाल्यावर झालेल्या पळापळीत लंगोटी लावून, उपास करून, झाडपाला खाऊन व अनंत यातना सोसून नाना प्रथम रेवाडीस, तेथून जाटाच्या प्रदेशात व तेथून दक्षिणेत आला. या प्रवासात त्याची अनेक वेळा शत्रूशी गाठ पडली असता, त्यांच्या कत्तलीतूनही वाचून नाना परत आला. पत्‍नी मागून आली पण माता बेपत्ता झाली. थोरला माधवराव व रघुनाथराव यांच्या कुरबुरीत बापूने कारभार सोडताच माधवरावाने नानाला फडणीशी दिली. पण राक्षसभुवनाच्या लढाईपूर्वी १७६२ मध्ये रघुनाथरावाकडे कारभार असता, त्याने ती नानाकडून काढून चिंतो विठ्ठल रायरीकर यांच्याकडे दिली. लढाईनंतर ती पुन्हा नानाकडे आली. हैदरवरील स्वाऱ्यांचे वेळी नाना पुण्यास राज्यकारभार व हिशोब पाहात असे. तुकोजी होळकर आणि महादजी शिंदे यांना सरदारकी मिळवून देण्यात नानाने पुढाकार घेतला होता म्हणून ते नानाला अनुकूल असत. नारायणरावाचे वेळी नाना बापूला साहाय्य करीत होता. नारायणरावाने राघोबास कैद केले व तेढ वाढून नारायणरावाचा खून झाला. ब्रह्महत्या करणाऱ्या रघुनाथरावाविरुद्ध बारभाईचे कारस्थान नानाने बापूस वडिलकी देऊन घडवून आणले. १७७४ मध्ये सवाई माधवरावाचा जन्म झाला. १७७६ मध्ये रघुनाथराव इंग्रजांच्या मदतीने पेशवाईवर चाल करून आला. हैदर व कोल्हापूरकरही नानाविरुद्ध उठले व तोतयाचे बंडही याच वेळी झाले. नानाने इंग्रजांशी पुरंदरचा तह करून साष्टी, भडोच वगैरे सहा लक्षांचा मुलूख त्यांना देऊन राघोबादादाला ताब्यात घेतले. हरिपंत आणि महादजी यांस अनुक्रमे हैदर व कोल्हापूरकर यांवर पाठवून त्यांचा बंदोबस्त केला. राघोबाला पुन्हा पेशवेपदावर आणण्यासाठी नानाचा चुलत-चुलतभाऊ मोरोबा याने कारस्थान रचले. नानाने बापूच्या मध्यस्थीने प्रथम मोरोबाशी समेट केला, पुरंदर किल्ला आणि बाल पेशवा स्वतःच्या ताब्यात ठेवले व नऊ लाख रु. देऊन होळकरांस फोडले. पुढे मोरोबाचा कट मोडून त्याला कैद केले. तसेच संशयामुळे बापूस नजरकैदेत ठेवून इतरांस शिक्षा दिल्या. इंग्रज-मराठे युद्धामुळे महादजीचे वजन वाढलेले होते. राघोबादादा पुन्हा इंग्रजांना मिळाला. इंग्रजांशी मराठ्यांचे दुसरे युद्ध होऊन वडगावला इंग्रजांचा पराभव झाला. इंग्रजांचे पूर्णतः उच्चाटन करण्याची नागपूरकर भोसले व हैदर यांच्या मदतीने नानाने योजना आखली; पण भोसल्यांनी लाच घेतल्यामुळे ही योजना बारगळली. हरिपंत फडके व परशुरामभाऊ पटवर्धन यांनी नानाला सर्वतोपरी साहाय्य केले. दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धानंतर १७८२ मध्ये सालबाईच्या तहाने साष्टीखेरीज मराठ्यांचा मुलूख मराठ्यांना परत मिळाला. राघोबास तनखा घेऊन कोपरगाव येथे स्वस्थ बसणे भाग पडले. भाऊसाहेबांच्या तोतयाला पकडून चौकशीअंती देहान्त शासन झाले. इंग्रजांची फत्तेसिंग गायकवाडास अहमदाबाद देवविण्याची योजना नानाने रद्द करून पेशव्यांची मांडलिकी त्यास चालू ठेवण्यास भाग पाडले. 

या सर्व यशस्वी घटनांनंतर पुढील १७९० ते १८०० ही दहा वर्षे नानाला अत्यंत आणीबाणीची गेली. लालसोटला प्रति-पनिपत झाले व महादजीला राजपूत-मुसलमान यांचा कटू अनुभव आला; तथापि उत्तरेत शांतता व सुव्यवस्था स्थापून तो दक्षिणेत आला. त्याला पेशवे दरबारात अधिक महत्त्वाचे स्थान हवे होते. नाना काशीला जाण्याचा विचार बोलून दाखवीत होता. महादजीने बादशाहाकडून पेशव्यांसाठी वकील-इ मुलकी हे सर्वाधिकारी पद मिळविल्यामुळे त्याचे पारडे जड झाले होते. दोघांमध्ये काही काळ निर्माण झालेले गैरसमज पेशव्यांच्या व हरिपंताच्या प्रयत्‍नाने मिटले. हरिपंत व महादजी मरण पावल्यावर १७९५ मध्ये मराठ्यांचे निजामशाही युद्ध झाले व खर्डा येथे निजामाचा पराभव झाला. नानाच्या प्रयत्‍नाने सर्व मराठे सरदार या लढाईत एकत्र आले होते. नानाच्या कर्तृत्वाचाही लढाई हा अत्युच्च बिंदू होता. या लढाईतील विजय महत्त्वाचा होता, तरी मराठी राज्याच्या फायद्याच्या दृष्टीने तो लाभदायक ठरला नाही. निजामाचा दुष्ट सल्लागार मुशीरुमुल्क याला कैदेतसुद्धा सन्मानाने वागविण्यात आले, तरीही मराठ्यांविरुद्ध तो कारस्थाने करी.

खर्ड्याच्या लढाईनंतर ऑक्टोबर १७९५ मध्ये माधवराव पेशव्यांचे अपघाती निधन झाले व नानाची लोकप्रियता घटू लागली. बाजीरावाबद्दल त्याचे मत चांगले नव्हते. म्हणून चिमाजी व अमृतराव यांना गादीवर बसविण्याचे प्रयत्‍न झाले पण ते फसले. नानाचा सहकारी परशुरामभाऊही त्याच्याविरुद्ध गेला. १७९६ मध्ये नानाने महाडचे कारस्थान उभारले. दौलतरावास १० लाख रु.कबूल केले. निजामाचा वजीर मुशीरुमुल्क व निजाम यांना अनुकूल केले. कोल्हापूरकरांस परशुरामभाऊविरुद्ध उठविले. एकमेकांविरुद्ध काहीही न करण्याच्या आणाशपथा होऊन रावबाजीस गादीवर बसवून स्वतः नाना कारभारी झाला. पण दौलतरावाने विश्वासघात करून ३१ डिसेंबर १७९७ मध्ये नानाला पकडले व नगरच्या किल्ल्यात ठेवले. जुलै १७९८ मध्ये त्यास सोडल्यावरही पुन्हा दोनदा पकडण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. पुढे नाना आजारी पडून त्याचे देहावसान झाले. 

संकटकाळात मराठ्यांची एकी टिकविणे व इंग्रजांपासून स्वातंत्र्यरक्षण करणे, ही नानाची महत्त्वाची कामगिरी होय. फ्रेंच राज्यक्रांती, इंग्रज-फ्रेंचयुद्धे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध इ. घटना नानाला माहीत असणे संभवते. इंग्रजांनाही तो चांगला जाणत होता. ‘इंग्रजांशी तहनामा करणे, तो फार विचार करून करावा लागतो. त्यांचे बोलण्यात व लिहिण्यात एकेक अक्षरात फार पेच असतात’, असे नाना म्हणे. टोपीकरांचा प्रवेश खुष्कीत होऊ देऊ नका; बादशाहीत इंग्रजांचा पाय न शिरावा. बादशाहीत इंग्रज शिरल्यास झाडून खुष्कीत पेच पडेल असा जरी इशारा नानाने दिला होता, तरी मराठे ते धोरण राखू शकले नाहीत. इंग्रजांविरुद्ध मराठ्यांनी यशस्वी व्हावयाचे तर पाश्चात्त्य राजनीती व सैनिकीपद्धत यांचा अवलंब करणे आवश्यक होते. आपल्या घोडदळापुढे इंग्रज पावप्यादे किती दिवस टिकणार, असे विचारणाऱ्या नानाला पाश्चात्त्य यंत्रचलित व शिस्तबद्ध सैनिकीपद्धतीची खरी ओळख झाली नव्हती. स्वार्थी, तत्त्वशून्य आणि सत्ताभिलाषी मराठामंडळास निःस्वार्थी नेता हवा होता, तसा नाना होऊ शकला नाही. टिपूला पुरते मोडू नये, असे नानाचे धोरण होते; पण पुढे ते कायम राहिले नाही.

नानाच्या धोरणात फार लांबच्या दूरदर्शित्वाचा अभाव दिसतो. महादजी शिंदे आदी उत्तरेकडील सरदारांतील गैरसमज पेशव्याला उत्तरेत नेले असते, तर कदाचित दूर होण्याची शक्यता होती. दुसऱ्या बाजीरावाविषयी कमालीची नाराजी, सवाई माधवरावावर करडी देखरेख, सचिवाचा छळ, घाशीरामाची पुण्यातील जुलमी कारकीर्द, सखाराम बापू आणि सखाराम हरी यांची कैद, छत्रपती सातारा येथील दुसऱ्या शाहूची हेळसांड इ. प्रकरणांत नानाला सारासार विचार करून समतोल ठेवता आला नाही. नानाजवळ खूप मोठी संपत्ती होती. नानाचे हेरखाते उत्तम होते. पेशवाईचे उत्पन्न त्याच्या कारकीर्दीत दहा कोटींचे झाले. पुण्याच्या वैभवात नानाने बरीच भर घातली. स्वतःच्या वाड्यासह दहा–बारा वाडे आणि बेलबागेसारखी मंदिरे बांधून त्याने शनिवारवाड्यातही बरीच बांधकामे केली. पुण्यात अनेक पेठा वसविल्या व सदाशिव पेठेचा हौद व त्याचे उछ्‍वास बांधून पुण्यात पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था केली. याशिवाय वेळासला मंदिर, कायगाव येथे गोदावरीस घाट, भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे मंदिर, काशीस दुर्गाघाटावर वाडा व कर्मनाशेवर पूल, सिंहासनासमोर नगारखाना, खोपोलीस तलाव व मंदिर आणि मेणवलीस वाडा, मंदिर व घाट नानाने बांधले.

नाना फडणीसाबद्दल इंग्रज व मराठी इतिहासकार यांनी प्रशंसोद्‍गार काढले आहेत. काहींनी त्याचा मुत्सद्दीपणा व बुद्धिमत्ता यांची स्तुती केली आहे. नानाच्या बरोबर मराठी राज्याचा शहाणपणा व नेमस्तपणा लयास गेला असेही म्हटले आहे. तो महत्त्वाकांक्षीही होता. आत्मचरित्रात नानाने स्वतःच्या कामुकतेची कबुली दिली आहे. आठ पत्‍न्या करूनही त्याला एक पुत्र झाला; पण तोही अल्पवयातच मेला. याशिवाय नानाच्या दोन रखेल्याही होत्या. नानाचा प्रसिद्ध व अप्रसिद्ध पत्रव्यवहार वाचल्यावर तो सामान्यांच्या कल्पने एवढा मोठा वाटत नाही. अठराव्या शतकाच्या अंतिम व एकोणिसाव्या शतकाच्या आदिम पावक्यात इंग्रजांनी जी विलक्षण कर्तबगारी  दाखविली, तिचा विचार करता नानाने व महादजीने मराठी सत्तेवरील इंग्रजी आक्रमणाची लाट २५ वर्षे थोपवून धरली, यात त्यांची खरी कर्तबगारी स्पष्ट होते. नानावरील लढाईतील भित्रेपणाचा आरोप मात्र काहींच्या मते अवास्तव आहे.

संदर्भ : 1. Deodhar, Y. N. Nana Phadnis, Bombay, 1962.

2. Majumdar, R. C. Dighe, V. G. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.

३. खरे, वासुदेवशास्त्री, नाना फडणविसाचे चरित्र, कोल्हापूर, १९२७.

सासवडकर, प्र. ल.