मैत्रक घराणे : प्राचीन भारतातील एक गुप्तकालीन प्रसिद्ध राजघराणे. या वंशाचे अनेक कोरीव लेख सापडले आहेत. त्यांपैकी फारच थोडे शिलालेख असून उर्वरित ताम्रपट आहेत. त्यांमध्ये त्यांची राजधानी वलभी (पूर्वीच्या भावनगर संस्थांनातील वला) येथील बौद्ध विहारांना व भिक्षूंना अनेक दाने दिल्याचे, तसेच काही दाने हिंदू देवतांना व बाह्मणांनाही दिल्याचे उल्लेख आहेत. या लेखांवरून इ.स.सु.४७५–७७५ दरम्यान मैत्रक घराण्यातील राजांची सत्ता वलभी येथे असावी, असे तज्ञांचे मत आहे.

गुप्त साम्राज्याचा सौराष्ट्र प्रांत पाटलिपुत्रापासून दूर नैर्ऋत्येस असल्यामुळे तेथील शांतता व सुव्यवस्था यांबद्दल गुप्त सम्राटांनाचिंता वाटे, असे स्कन्दगुप्ताच्या गिरनार प्रस्तर लेखावरून दिसते (४७५). ४७५ च्या सुमारास गुप्त सम्राटाने सेनापती भटार्क यास त्या प्रांतावर नेमले. हा मैत्रक घराण्याचा मूळ पुरुष होय. याच्या नंतर याचे चार पुत्र पहिला धरसेन, द्रोणसिंह, पहिला ध्रुवसेन आणि धरपट्ट असे एकामागून एक गादीवर आले. धरसेनाला सेनापती अशीच पदवी होती पण त्याच्या नंतरच्या द्रोणसिंहाच्या कारकीर्दीपर्यंत या घराण्याची सत्ता वाढून, गुप्त सम्राटाला त्या मैत्रक वंशीयाला महाराज पदवी देऊन स्वतः अभिषेक करणे भाग पडले. पुढे चौथ्या धरसेनाने सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या.

चिनी यात्रेकरू ह्यूएनत्संगने आपल्या प्रवासवृत्तात सातवा राजा पहिला धर्मादित्य-शिलादित्य याची पुष्कळ प्रशंसा केली आहे. तो त्याला मो-ला-पोचा राजा म्हणतो. मो-ला-पो म्हणजे माळवा नसून त्यात मही नदीचे खोरे, साबरमतीच्या पूर्वेकडील काही भाग आणि दक्षिण राजपुतान्याचा डोंगराळ भाग या प्रदेशांचा अंतर्भाव होत होता, असे ब्रिटिश इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथने दाखविले आहे. हा शिलादित्य प्रतिवर्षी धर्मसंमेलन भरवून मोठा दानधर्म करीत असे.

सातव्या शतकाच्या पहिल्या पादात वलभी येथे दुसरा ध्रुवसेन उर्फ बालदित्य हा राज्य करीत होता. हर्षाने आपल्या दिग्विजयात याच्यावर स्वारी केली, तेव्हा याने जवळच्या नांदीपुरीच्या गुर्जरनृपती दुसऱ्या दद्दाचे साहाय्य मागितले. दद्द  हा बादामीच्या चालुक्यांचा मांडलिक असल्यामुळे यातून पुढे हर्ष-पुलकेशी (दुसरा) युद्ध उद्‌भवले. पुढे हर्षाने याच्याशी सख्य करून त्याला आपली कन्या दिली, असे ह्यूएनत्संग सांगतो. तो या राजाचे नाव ध्रुवभट असे देतो.

या घराण्यात एकूण सतरा राजे झाले. त्यांनी सु. ७७५ पर्यंत राज्य केले. या घराण्यात सात राजांनी शिलादित्य हेच नाव धारण केले होते. त्यांपैकी शेवटच्या पाचांनी ६६० ते ७७५ या कालात राज्य केले. सुप्रसिद्ध ट्टिकाव्याचा कर्ता आपण धरसेन पालित वलभीमध्ये राहतो असे सांगतो, पण वलभी येथे अनेक धरसेन नावाचे राजे झाले असल्यामुळे त्याचा काल निश्चितपणे ठरविता येत नाही. अन्य प्रमाणांवरून तो सहाव्या-सातव्या शतकांत होऊन गेला असावा, असे अनुमान होते.

पाचव्या शिलादित्याच्या कारकीर्दीत सु. ७२५ च्या सुमारास अरबांनी वलभीवर स्वारी केली. त्यापूर्वी त्यांनी सिंध जिकला होता. शिलादित्याने शेजारच्या गुर्जरनृपती चौथ्या जयभटाचे साहाय्य  मागितले. त्यानेही ते तत्परतेने देऊन अरबांचा पुरा मोड केला पण पुढे अरबांनी जयभटाच्याच राज्यावर आक्रमण करून नवसारीपर्यंत धडक मारली पण दक्षिण गुजरातच्या अवनिजनाश्रय-पुलकेशी या तरुण चालुक्याने त्यांचा धुव्वा उडवला. त्याचे रोमहर्षक वर्णन त्याच्या ७४० च्या नवसारी ताम्रपटात येते.

अरबांनी आपल्या ७२५–३५ दरम्यानच्या एका स्वारीत वलभी उद्‌ध्वस्त केली असावी. कारण नंतरचे मैत्रकांचे ताम्रपट वलभीहून दिले नसून खेटक (खैडा) व इतर ठिकाणांहून दिलेले आढळतात. या स्वारीनंतरही मैत्रकांचे राज्य सु.पन्नास वर्षे टिकून होते. त्याचा अंत कसा झाला, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

धर्म, विद्या व कला यांचा मैत्रकांचा चांगला आश्रय होता. मैत्रक घराण्यातील राजे सामान्यतः शैव होते, पण त्यांपैकी काही विष्णू व आदित्य यांचे उपासक होते. उदा., पहिला ध्रुवसेन व गुहसेन यांना त्यांच्या ताम्रपटांत परमभागवत म्हटले आहे. जैनांचे दुसरे धर्मसंमेलन वलभी येथे पहिल्या ध्रुवसेनाच्या कारकीर्दीत ५१२ (किंवा ५२५) मध्ये भरले होते. तो राजा जैनधर्मी झाला होता, अशी जैनांची परंपरागत समजूत आहे. वलभी येथे नालंदासारखेच विख्यात विद्यापीठ होते. त्याला मैत्रकांचा उदार आश्रय होता. तेथे दूरदूरच्या प्रदेशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत. मैत्रकांनी अनेक बौद्ध विहार बांधून त्यांना उदार देणग्या दिल्या. भटार्कपुत्र ध्रुवसेनाची भाची दुद्दा हिने बांधवलेला बौद्ध महाविहार सुप्रसिद्ध होता. अनेक ताम्रपटांत त्याला देणग्या दिलेल्या आढळतात. श्लेषप्रचुर शैली बाणाच्या कालाच्याही अगोदर मैत्रकांच्या ताम्रपटांत आढळते. ट्टिकाव्यात पाणिनीच्या सूत्रांची तसेच विविध अलंकाराची उदाहरणे असलेले श्लोक रामकथेच्या वर्णनाच्या ओघात आले आहेत.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed., Classical Age, Bombay, 1972.

मिराशी, वा. वि.