बाला दित्य : (इ. स. पाचवे शतक). भितरी येथील मुद्रेवरून तो पूरुगुप्ताचा पुत्र आणि दुसऱ्या कुमारगुप्ताचा पिता होता, असे कळते. त्याच्या कारकीर्दीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तो इ. स. ४७०-७३ दरम्यान गादीवर असावा. त्याचे मूळ नाव नरसिंहगुप्त. त्याच्या सोन्याच्या नाण्यांवर ‘नर’ असे आढळते. त्याच नाण्यांवर त्याचे ‘बालादित्य’ असे बिरुद आले आहे. नालंदा येथील नंतरच्या एका कोरीव लेखात त्याने तेथे बुद्धाचा प्रासाद (देवालय) बांधल्याचा निर्देश आहे. त्याच्या विषयी आणखी काहीही माहिती मिळत नाही.

याच्या काळाविषयी विविध मते आहेत. याने हूण नृपती मिहिरकुल याचा पराभव केला पण नंतर आपल्या मातेच्या सांगण्यावरून त्याला सोडून दिले, असे चिनी यात्रेकरू ह्यूएनत्संग सांगतो पण तो असेही सांगतो, की मिहिरकुल आपल्या काळापूर्वी कित्येक शतके होऊन गेला. या दोन विधानांत विसंगती आहे. त्यामुळे ह्यूएनत्संगचे वर्णन कपोलकल्पित दिसते. याउलट माळव्याच्या औलिकरवंशी यशोधर्मनविष्णुवर्धनने त्याचा पूर्ण पराभव करून त्याला आपणापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले, असे मंदसोर येथील दोन जयस्तंभांवरील लेखांत वर्णन आहे, तेच खरे मानले पाहिजे. याविषयी विद्वानांत मतभेद आहेत.

पहा : गुप्तकाल.

 

संदर्भ : मिराशी, वा. वि. संशोधन-मुक्तावलि : सर १०, नागपूर, १९८१.

 

मिराशी, वा. वि.