फिरोजशाह तुघलक : (? १३०९ ? – २० सप्टेंबर १३८८). फिरोझशाह (फीरूझशाह) हा तुघलक घराण्यातील दिल्लीच्या तख्तावर बसणारा तिसरा सुलतान. या घराण्यातील पहिला सुलतान घियासुद्दीन (कार. १३२०-१३२५) याचा भाऊ सिपेहसालार रजब याचा हा मुलगा. याच्या आईचे नाव बीबी कदबानो (नाईला). ती दीपालपूरच्या राणामल भट्टी याची मुलगी होती. बरनीची तारीख-इ- फिरोझशाही, अफीफची तारीख-इ- फिरोझशाही, फिरोझशाहची फुतूहात्‌-इ-फिरोझशाही इ. ग्रंथांतून त्याच्यासंबंधी माहिती मिळते. महंमद तुघलकाने त्यास १२,००० घोडेस्वारांची मनसबदारी दिली. सिंधवरील मोहिमेत ठट्ठा येथे महंमद आजारी पडून अचानक मरण पावला. त्याने फिरोझशाहला आपला वारसदार नेमले होते, या समजुतीने सरदारांनी २३ मार्च १३५१ रोची ठठ्ठा येथेच फिरोझशाहची सुलतान म्हणून निवड जाहीर केली. त्याचा रीतसर राज्याभिषेक पुढे दिल्ली येथे त्याच वर्षी ऑगस्टमध्ये झाला.

फिरोझशाह तुघलकमहंमद तुघलकाप्रमाणे फिरोझमध्ये शौर्य व साहस नव्हते. महंमदाच्या अखेरच्या दिवसांत राज्यात अव्यवस्था माजून बंगाल, गुजरात, सिंध वगैरे दूरचे प्रांत स्वतंत्र होऊ लागले होते. फिरोझने त्या प्रांतांवर स्वाऱ्या केल्या परंतु त्यात यश आले नाही. मात्र १३६० मध्ये त्याने बिहार, ओरिसा आणि जगन्नाथपुरी येथे स्वाऱ्या करून, पुरीच्या मूर्ती सागरात फेकून तेथील अमाप लूट नेली. त्यानंतर तो नगरकोटकडे वळला. सहा महिने नगरकोटचा किल्ला लढविल्यानंतर तेथील राजा फिरोझला शरण आला. या किल्ल्याजवळच्या ज्वालामुखी देवालयातील अनेक संस्कृत पुस्तकांचे फिरोझने फार्सीत भाषांतर करून घेतले.

फिरोझने मलिक-इ-मक्बूल याची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली. नवीन प्रांत जिंकण्याची महत्वाकांक्षा न धरता फिरोझने राज्यात अनेक सुधारणा केल्या. कुराणाने मान्य केलेले करच त्याने लागू केले. बाकीचे कर रद्द केले. पडिक जमिनी लागवडीस आणून त्यांचे उत्पन्न धार्मिक बाबींकडे लावले. त्याने अनेक कालवे खोदविले. त्यांपैकी यमुना व सतलज नद्यांचे कालवे बरेच लांब होते. कालव्यांच्या पाण्यावरही त्याने कर बसवून राज्याचे उत्पन्न वाढविले आणि बेकार लोकांसाठी एक सेवायोजन कार्यालयस स्थापन केले. त्याने सरकार पुरस्कृत असे धर्मार्थ दवाखाने सुरू करून गोरगरिबांना मोफत औषध देण्याची व्यवस्था केली. या सर्व गोष्टी लोकांच्या हिताच्या केलेल्या असल्या, तरी तीन कारणांमुळे त्याच्या राज्यात दोष उत्पन्न झाले होते. फिरोझने गुलाम पाळण्याची पद्धती पुन्हा सुरू केली. सर्व राज्यपालांनी दिल्लीला गुलाम पाठवावेत, असा त्याने हुकूम काढल्याने गुलामाचे एक खातेच उत्पन्न झाले. त्याने सरकारी कामगारांस कामाबद्दल पगार देण्याऐवजी जहागिरी दिल्या परंतु हेच जहागीरदार पुढे डोईजड झाले. हिंदू आईच्या पोटी जन्माला येऊन हिंदूंवर त्याची इतर सुलतांनाइतकीच वक्रदृष्टी होती. हिंदूंच्या बाबतीत त्याने जाचक कायदे केले. जझिया कर वाढविण्यात आला. याचा अर्थ त्याच्या सुधारणांचा फायदा प्रजेपैकी मुस्लिम समाजासच मिळाला. फिरोझ ईजिप्तच्या खलीफाला खूप मान देई. तो स्वतःला खलीफाचा प्रतिनिधी समजे. त्याला इमारती बांधण्याचा मोठा शौक होता. त्याने ⇨फिरोझपूर, फतेहाबाद, हिस्सार, फिरोझाबाद, जौनपूर इ. शहरे वसविली. त्याने खुद्द दिल्ली शहरात अनेक इमारती बांधल्या. याशिवाय राजवाडे, किल्ले, धर्मशाळा व पूल बांधले. १३७४ मध्ये दोन मुलगे वारल्यामुळे फिरोझची शेवटची वर्षे अतिशय दुःखात गेली. एकंदर त्याची कारकीर्द मुस्लिम प्रजेच्या दृष्टीने सुखसमाधानकारक होती.

फिरोझशाह याने पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने एक उपकारक गोष्ट केली. त्याला जेव्हा समजले की दिल्लीच्या परिसरात तवेरा (तोप्रा) आणि मेरठ या दोन गावांजवळ दोन प्राचीन अशोक स्तंभ आहेत, तेव्हा ते त्याने मोठ्या परिश्रमाने हजारो लोकांच्या साह्याने दिल्लीस सुस्थितीत आणले आणि त्यांपैकी एक स्तंभ फिरोझाबादमधील जामा मशिदीजवळ आणि दुसरा पूर्वीच्या शिकारखान्याजवळ उभा केला. ते दोन्ही स्तंभ आजही अवशिष्ट आहेत.

पहा : तुघलक घराणे.

संदर्भ : 1. Husain (Agha) Mahdi, Tughluq Dynasty, Calcutta, 1963.

2. Majumdar, R. C. Ed. Delhi Sultanate, Bombay, 1971.

३. रिजवी, सैयिद अतहर अब्बास, तुगलुक कालीन भारत, भाग २, अलिगढ, १९५७.

गोखले, कमल