लोदी घराणे : (१४५१-१५२७). मुसलमानी अंमलातील दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेले मोगलपूर्व काळातील शेवटचे प्रसिद्ध घराणे.फिरोझशाह तुघलकच्या काळात (१३०९?- १३८८) भारतात आलेल्या अफगाण घराण्यांपैकी लोदी घराणे हे एक होय.  मलिक बहराम लोदी हा प्रथम मुलतानच्या राज्यपालाच्या सेवेत रुजू झाला. त्याच्या पाच मुलांपैकी मलिक काला याचा बहलूल हा पुत्र. लहानपणीच आईवडिलांच्या छत्राला पारखा झालेल्या बहलूलचे पालनपोषण इस्लामखान नावाच्या अफगाणाने आपल्या मुलाप्रमाणे केले. बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगाणांचे नेतृत्व संपादन केले. पुढे, पंजाब, दिल्ली जिंकून त्याने १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली. या घराण्यात एकूण तीन सुलतान झाले : (१) बहलूल लोदी (कार. १४५१-८९), (२) शिकंदर लोदी (कार. १४८९-१५१७) आणि (३) इब्राहीम लोदी (कार. १५१७-२६).

बहलूल गादीवर आला, तेव्हा दिल्लीचे फारच थोडे राज्य शिल्लक होते. बहलूलने दिल्ली साम्राज्याची तुघलकानंतर गेलेली प्रतिष्ठा परत मिळविली. त्याने जोधपूर, मेवाड, रोहिलखंड व ग्वाल्हेर हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले आणि आपल्या  अफगाण अनुयायांना बरोबरीच्या नात्याने वागविले. आपल्या भावांना आणि इतर अफगाणांना ठिकठिकाणी सुभेदार नेमले. तो हुषार आणि व्यवहारी होता. त्याच्या दरबारात राजपूत राजे होते.

बहलूलच्या मृत्युनंतर गादीसंबंधी तंटे सुरू झाले. त्याचा तिसरा मुलगा निजामखान सुलतान शिकंदर हे नाव धारण करून गादीवर आला. प्रांतीय प्रमुखांच्या (राज्यपालांच्या ) वाढत्या सत्तेला त्याने आळा घातला. बिहार, मध्य भारत, नागौर हे भाग त्याने जिंकून घेतले. शिंकदरने जमीन महसूल, गुप्तहेर खाते, न्याय खाते ह्यांबाबतीत सुधारणा केल्या. शिकंदरशाह हा लोदी घराण्यातील श्रेष्ठ सुलतान मानला जातो. त्याने हिंदूंचा फार छळ केला. अनेक देवालये उद्ध्वस्त करून त्या जागी त्याने मशिदी बांधल्या. शिकंदरच्या मृत्युनंतर अफगाण सरदारांनी राज्या चे विभाजन करून जलालखान यास जौनपूरच्या तख्तावर बसविले व इब्राहीमला दिल्लीच्या राज्यावर बसविले. इब्राहीमने जलालखानाचा खून करून सर्व सत्ता बळकावली. त्याच्या कडक शासनाला कंटाळून दर्याखान लोहानी व दौलत लोदी हे स्वतंत्र झाले. दौलताखानाने काबूलचा मोगल सुलतान बाबर यास मदतीस बोलाविले. बाबरने हिंदुस्थानवर स्वारी करून पानिपत येथे इब्राहीमचा पराभव करून त्यास ठार मारले (१५२६). अशा रीतीने लोदी घराण्याचा शेवट होऊन भारतीय इतिहासातले सुलतानशाहीचे पर्व संपुष्टात आले. [⟶ पानिपतच्या लढाया बाबर].

लोदी राज्यकर्त्यांना दिल्लीचे राज्य संभाळता आले नाही. अराजकतेला आळा घालण्यात ते असफल ठरले. त्यांनी खल्‌ जी काळातील उत्कृष्ट स्थापत्य कलेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत. ह्या काळातील कबर बांधणीत फिरोझ तुघलकाचा प्रसिद्ध अधिकारी खान-इ-जहाँ तिलंगानी याच्या  कबरी बांधकामाचे अनुकरण केलेले आढळते. पूर्वीचा चौरसाकार बदलून अष्टकोनाकृती मृतस्मारकांचा या काळात मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाला. लोदी काळातील वास्तू आजही दिल्ली, आग्रा, धोलपूर येथे आढळतात. बहलूल लोदीने विद्वानांना आश्रय दिला, तर शिकंदरने काही संस्कृत ग्रंथांचे फार्सी अनुवार करवून घेतले. शिकंदराच्या दरबारात बरेच परकीय विद्वान येत असत. रफिउद्दीन शिराझी यांसारखे काही विद्वान तत्त्वज्ञानी याच्या आश्रयास होते.

पहा : मुसलमानी अंमल, भारतातील (मोगल पूर्वकाळ).

संदर्भ : 1. Majumdar R. C. Ed., Delhi Sultanate, Bombay, 1970.

           2. Prasad, Ishwari, Short History of Muslim Rule in India, Allahabad, 1945.

गोखले, कमल