हो-चि-मिन्ह : (१९ मे १८९०–२ सप्टेंबर १९६९). व्हिएटनाम प्रजासत्ताकाचा संस्थापक व पहिला राष्ट्राध्यक्ष. त्याचा जन्म एन्घेॲन प्रोव्हिन्स हो-चि-मिन्ह(व्हिएटनाम) या खेड्यात एका गरीब पंडित घराण्यात झाला. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याला मूळचे एन्ग्वुएन तात तान्ह हे नाव अनेकदा बदलावे लागले. शिवाय त्याने अनेक टोपणनावे धारण केली होती. त्यांपैकी ग्वुएन ऐवकाक (लोकमित्र) व हो-चि--मिन्ह (बुद्धिमंत) ही नावे अधिक परिचित व प्रसिद्ध ठरली. त्याचे बालपण किम लिएन या खेड्यात गरिबीत गेले. पुढे त्याने ह्वे (ह्यूए) येथील ग्रामर स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि फान थिएट येथील शाळेत अध्यापक म्हणून नोकरी केली. तसेच सायगावच्या तंत्रविद्या संस्थेत त्याने प्रशिक्षण घेतले. एन्ग्वुएन हा १९११ मध्ये ‘बा’ या टोपणनावाने एका फ्रेंच गलबतावर स्वयंपाकी म्हणून काम करू लागला. तेथे त्याने तीन वर्षे काढली. या काळात त्याने आफ्रिकेतील काही बंदरे तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील बॉस्टन, न्यूयॉर्क आदी शहरांना भेटी दिल्या. नंतर तो काही काळ (१९१४–१६) लंडनमध्ये राहून पुढे पॅरिसला स्थायिक झाला (१९१६). तेथे त्यानेअनेक किरकोळ कामे केली. डाव्या विचारसरणीच्या लोकांत मिसळून राजकीय वार्तापत्रे लिहिली. फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनदिनी तो उपस्थित होता (१९२०). फ्रान्समधील अनेक कामगार नेत्यांशी त्याचे स्नेहसंबंध होते. ल पारिया या नियतकालिकातून ही कम्युनिस्ट मंडळीफ्रेंच व ब्रिटिश वसाहतवाद्यांवर घणाघाती टीका करीत. फ्रान्समधून तो १९२३ मध्ये मॉस्कोला गेला. पुढे तो १९२४ मध्ये पाचव्या इंटरनॅशनल कम्युनिस्ट काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाला. त्याच वर्षी लाय थूय हेनाव धारण करून तो कँटनला गेला आणि कॉमिन्टर्न सोव्हिएट कॉन्सल मायकेल बोरीडिनचा साहाय्यक म्हणून काम करू लागला (१९२५). या सुमारास चिनी शासनाने त्यास अटक केली व किरकोळ चौकशीनंतर सोडून दिले. 

 

एन्ग्वुएन याने हद्दपारीतील व्हिएटनामी तरुणांची एक क्रांतिकारक संघटना बांधली आणि तीद्वारे व्हिएटनाममध्ये मार्क्सवादाचा प्रसार सुरू केला. त्याचे कॉमिन्टर्नचे काम आग्नेय आशियात, विशेषतः थायलंडमध्ये चालू होते आणि फ्रेंच इंडोचायनातील उठावास तो प्रोत्साहित करीत होता. टोंगकिंगमधील दंगल शमविण्यासाठी फ्रेंच शासनाने त्याच्या व्हिएटनाम वर्कर्स पार्टीवर (दाव लाओ डाँग व्हिएटनाम) बंदी घातली (१९३१). तेव्हा तो हाँगकाँगला गेला व तेथून टोेंगकिंग व थायलंडमधील कम्यु-निस्टांच्या हालचालींना मदत करू लागला. हाँगकाँगमध्ये इंडोचायनीज कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि पक्षस्थापनेचे अध्यक्षपद त्याने ३ फेब्रुवारी १९३० रोजीच स्वीकारले होते. सुरुवातीस त्या पक्षाचे नाव व्हिएटनामीज कम्युनिस्ट पार्टी असे होते. हो कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत (सातवी काँग्रेस) मॉस्को येथे उपस्थित होता (१९३५). त्यानंतर त्याने माओ-त्से-तुंग याच्यासमवेत चीनमध्ये काही महिने व्यतीत केले (१९३८). दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला (१९४४), तेव्हा एन्ग्वुएन आणि त्याचे सहकारी वो नमुयेन गिआप व फाम व्हान डॉग यांनी या परिस्थितीचा आपल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेतला. तत्पूर्वी एन्ग्वुएन याने हो-चि-मिन्ह हे नाव धारण केले आणि जानेवारी १९४१ मध्ये व्हिएटनाममध्ये प्रवेश केला व व्हिएटनामच्या स्वातंत्र्यासाठी व्हिएटनाम लीग (व्हिएटमिन्ह) स्थापन केली. यासाठीचँग-कै-शेक याचा पाठिंबा आवश्यक होता. कम्युनिस्ट चँग-कै-शेक याला हो-चि-मिन्ह याच्या कम्युनिस्ट तत्त्वप्रणालीविषयी शंका आल्याने त्यास त्याने अटक केली. सुमारे दीड वर्ष तो तुरुंगात होता. कैदेत असताना त्याने नोटबुक फ्रॉम प्रिझन हा काव्यसंग्रह चिनी भाषेत सिद्ध केला. काही मित्रांच्या मदतीने तो सुटला. या सुमारास (१९४५) हो-चि-मिन्ह याला साहाय्यक अशा पुढील दोन घटना घडल्या : जपानने इंडोचायना पूर्णतः पादाक्रांत केला व फ्रेंच अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबले वा मारले. त्यानंतर १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर अणुबाँब टाकून ती शहरे उद्वस्त केली. तेव्हा जपान शरण आला. हे दोन शत्रू नेस्तनाबूत झाल्यामुळे हो-चि-मिन्ह याच्या गनिमी तुकड्यांनी दक्षिण चीनमधील शत्रूंवर हल्ला केला. त्याच वेळी त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कमांडोजनी हानोईकडे (राजधानी) कूच केले. हो-चि-मिन्ह याने २ सप्टेंबर १९४५ रोजी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि तो स्वतः व्हिएटनामचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला. त्याला पॅरिसला चर्चेसाठी फ्रेंच शासनाद्वारे पाचारण करण्यात आले. उभयतांत फौंटन ब्ल्यू करारनामा झाला (सप्टेंबर १९४६). त्यानुसार इंडोचायनाच्या संघराज्यात स्वतंत्र देश म्हणून व्हिएटनामला मान्यता देण्यात आली तथापि त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात फ्रेंच सैन्याबरोबर संघर्षास सुरुवात झाली. त्याने उत्तर व्हिएटनाममध्ये आश्रय घेतला. हे युद्ध पुढे १९५४ पर्यंत चालले. जुलै १९५४ मध्ये जिनीव्हा युद्धविराम कराराने ते संपुष्टात येऊन व्हिएटनामचे विभाजन होऊन उत्तर व दक्षिण व्हिएटनाम अशी दोन स्वतंत्र राज्ये झाली आणि उत्तर व्हिएटनामचा हो-चि-मिन्ह हा राष्ट्राध्यक्ष झाला. साधी राहणी व निर्मळ चारित्र्य यांबद्दल त्याची ख्याती होती. सर्व लोक त्याला प्रेमाने ‘होकाका’ म्हणूनच ओळखत. परराष्ट्रीय धोरणात त्याने रशियाची मैत्री साधून चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. तो १९५५ मध्ये मॉस्को व पीकिंगला गेला आणि १९५८ मध्ये त्याने जाकार्ता व नवी दिल्लीला भेट दिली. उत्तर आणि दक्षिण व्हिएटनाममधील संघर्ष त्याच्या मृत्यूपर्यंत चालू होता. फ्रेंच वसाहतवादाविरुद्ध त्याने दीर्घकाळ लढा दिला. त्याची तुलना माओ-त्से-तुंग या महान नेत्याशी केली जाते. त्याचे बहुतेक लेखन सिलेक्टेड वर्क्स या दोन खंडांत (१९६०) आढळते. 

 

अल्पशा आजाराने त्याचे हानोई येथे निधन झाले. 

 

संदर्भ :Warbey, William, Ho Chi Minh and the Struggle for Independent Vietnam, London, 1972. 

शहाणे, मो. ज्ञा.