हेस्टिंग्ज, लॉर्ड फ्रान्सिस रॉडन : (९ डिसेंबर १७५४–२८ नोव्हेंबर १८२६). ब्रिटिश वासाहतिक हिंदुस्थानातील बंगाल प्रांताचा लॉर्ड फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्जगव्हर्नर जनरल, सेनापती व कुशल प्रशासक. त्याचा जन्म काउंटी डाउन येथे एका सरदार घराण्यात झाला. त्याचे वडील सर जॉन रॉडन हे मोइराचे सरदार होते. फ्रान्सिसचे शिक्षण हॅरो व ऑक्सफर्ड येथे झाले. त्यानंतर तो भूसेनेत ध्वजाधिकारी (एन्साइन) म्हणून रुजू झाला (१७७१). लष्करातील प्रशिक्षणा-नंतर त्याची अमेरिकेत नियुक्ती झाली. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात (१७७५–८१) त्याने स्पृहणीय कामगिरी केली. इंग्लंडला परत आल्यानंतर तेथील वास्तव्यात (१७८३–१८१३) त्याने अनेक उच्च पदांवर काम केले. तसेच हाउस ऑफ लॉर्ड्सच्या कामकाजात त्याने सहभाग घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचा चौथा जॉर्ज) याच्या वर्तुळाशी तो निकटवर्ती होता. अमेरिकेतीलत्याच्या लष्करातील कर्तृत्वाबद्दल त्याला सरदारकी देण्यात आली होती (१७८३). शिवाय वारसाहक्काने त्याच्याकडे ‘अर्ल ऑफ मोइरा ‘चे उमरावपद आले (१७९३). 

 

लॉर्ड हेस्टिंग्जला बंगालचा गव्हर्नर जनरल आणि हिंदुस्थानातील ब्रिटिश फौजेचा सरसेनापती म्हणून नेमण्यात आले (१८१३). तो ऑक्टोबर १८१३ मध्ये कलकत्त्यात कार्यरत झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत (१८१३–२३) हिंदुस्थानात स्थैर्य व एकसूत्रीपणा आणला. त्याला प्रथम नेपाळमधील गुरखा सैन्याशी मुकाबला करावा लागला. या युद्धात इंग्रजांचे बरेच लोक मारले गेले. नेपाळचा सेनापती अमरसिंह थापा हा शूर व बुद्धिमान होता. तेव्हा हेस्टिंग्जने तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून नेपाळशी तह केला. हा सगौळीचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. या तहानंतर गुरख्यांनी वादग्रस्त प्रदेशाचा ताबा सोडला. काही प्रदेश ब्रिटिशांना दिला आणि नेपाळमध्ये ‘ब्रिटिश रेसिडेन्ट’ ठेवण्याचे मान्य केले. या यशामुळे लॉर्ड हेस्टिंग्ज याला ‘मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज’ हे बिरुद प्राप्त झाले (१८१७). या सुमारास उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व होते. शिंदे-होळकर आदी सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आलेल्या पेंढाऱ्यांकडे त्याने लक्ष दिले. पेंढाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी त्याने मराठ्यांस सहकार्याची मागणी केली अन्यथा युद्धास सज्ज व्हावे, असा पर्याय ठेवला. पेंढाऱ्यांविरुद्धची मोहीम दोन वर्षे चालली (१८१६-१७). अखेर त्यांचा प्रमुख अमीरखान याचा पाडाव होऊन पेंढाऱ्यांचा नायनाट झाला. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग्ज, शिंदे, होळकर व नागपूरकर भोसले यांच्याकडे वळला. त्यातून इंग्रज-मराठे तिसरे युद्ध उद्भवले. इंग्रजांनी चढाईचे धोरण अंगीकारले. पुण्याजवळील खडकी येथे गोपाळराव पटवर्धनाचा पराभव झाला (१८१७). पुढे दुसऱ्या बाजीरावाचा अष्टीच्या लढाईत इंग्रजांनी पराभव झाला (१८१८). इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रह्मावर्त येथे निवृत्तिवेतन देऊन ठेवले. यानंतर इंग्रजांनी अनेक मराठा सरदारांशी स्वतंत्र रीत्या तह करून त्यांच्या दरबारांत इंग्रज रेसिडेन्ट नेमले. साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंहांस बसवून त्यांचा सर्व कारभार इंग्रज रेसिडेन्टतर्फे होऊ लागला. या सुमारास लॉर्ड हेस्टिंग्जच्या मुत्सद्दीपणामुळे राजपूत संस्थानांनी इंग्रजांची मांडलिकी पतकरली. परिणामतः मध्य व उत्तर हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली. त्यानंतर त्याने चाच्यांचा बंदोबस्त केला. सिंगापूर ह्या महत्त्वाच्या बेटाची खरेदी केली (१८१९). त्याने मोगलांनी बांधलेल्या देशांतर्गत कालव्यांची दुरुस्ती केली आणि यमुनेचे शुद्ध पाणी दिल्लीत आणले. बंगालमध्ये शिक्षणाला उत्तेजन दिले. भारतीय कनिष्ठ न्यायाधीशांचा दर्जा आणि अधिकार वाढविले आणि ईशान्येकडील पादाक्रांत केलेल्या प्रदेशांतून प्रथमच त्याने महसूल मिळविण्यासाठी पावले उचलली. 

 

लॉर्ड हेस्टिंग्ज शूर सेनापती आणि कार्यक्षम प्रशासक होता परंतु हिंदुस्थानातील अखेरच्या कारकिर्दीत पामर अँड पामर या कंपनीच्या व्यापारविषयक प्रकरणातील आर्थिक व्यवहारात तो अडकला. तेव्हा त्याने राजीनामा दिला आणि १८२३ मध्ये तो इंग्लंडला परत गेला. तेथे त्याची माल्टाच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली (१८२४). 

 

त्याचे अल्पशा आजाराने नेपल्स येथे निधन झाले. 

 

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.

           2. Mehta, M. S. Lord Hastings and the Indian States, 1930. 

गोखले, कमल