मुहम्मद तुघलक : (कार. १३२५–२० मार्च १३५१). तुघलक घराण्यातील एक लहरी व महत्त्वाकांक्षी दिल्लीचा सुलतान. त्याचे मूळ नाव उलुवूखान. वडिलांच्या मृत्यूनंतर मुहम्मद हे नाव धारण करून तो १३२५ मध्ये गादीवर बसला. वडिलांच्या कारकीर्दीत १३२१ व १३२३ मध्ये त्याने वरंगळवर स्वारी करून तेलंगण जिंकले.

राज्यावर येताच गुर्शास्पने बंड केले. त्याचा पाठलाग करताक्षणीच तो काम्पिल येथील हिंदू राजाच्या आश्रयास गेला. अखेरीस गुर्शास्पला पकडून क्रूरपणे मारण्यात आले. काम्पिलच्या राजाने गुर्शास्पला आश्रय दिल्याने मुहम्मदाने त्याच्याविरुद्ध चढाई केली व ते राज्य जिंकले. ह्यानंतर मुहम्मदाने कर्नाटकातील होयसळांचे राज्य जिंकून दक्षिणेतील हिंदूंची सत्ता नाहीशी केली व तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. 

राज्यावर येताच मुहम्मदाला मोगलांच्या स्वाऱ्यास तोंड द्यावे लागले. १३२७ मध्ये तर्माशीरीनच्या नेतृत्वाखाली मोगल लोक थेट दिल्लीपर्यंत चाल करून आले. मुहम्मदाने त्यांना भरपूर खंडणी देऊन परत पाठविले. ह्यानंतर इराण व चीनवर स्वाऱ्या करण्याचे ठरविले. खुसरौ मलिकच्या नेतृत्वाखाली चीनवर पाठविलेले सैन्य हिमालयाच्या खिंडीत गडप झाले. हा खर्च भरून काढण्यासाठी त्याने कारा व दुआबमधील शेतकऱ्यांच्या साऱ्यात वाढ केली. वसूल बरोबर होईना तेव्हा रयतेला छळले. हिंदू शेतकऱ्यांचे त्याने अतोनात हाल केले. त्यामुळे ठिकठिकाणी बंडे झाली.

सतत होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून दिल्लीला धोका असल्याने मुहम्मदाने आपली राजधानी महाराष्ट्रात देवगिरीला हलविली आणि तिचे नाव दौलताबाद ठेवले. ही योजना ठीक होती, परंतु नुसत्या महत्त्वाच्या कचेऱ्या न हलविता त्याने दिल्लीतील झाडून सर्व लोकांस देवगिरीस जाण्याचा हुकूम दिला. या त्याच्या हुकमाने लोकांचे फार हाल झाले. मुहम्मदाने चूक कळून येताच सर्व लोकांस दिल्लीला परत जाण्यास सांगितले. ह्यातच दुष्काळाची भर पडली. लोकांची उपासमार होऊ नये, म्हणून त्याने पुष्कळ पैसा खर्च केला. शेतकऱ्यांस तगाईही देण्यात आली. कराच्या वसुलापासून पुरेसे उत्पन्न येईना. म्हणून मुहम्मदाने तांब्याची नाणी सोन्याच्या नाण्यांच्या किंमतीने चलन म्हणून वापरली जातील व सरकारी खजिन्यातही ती त्याच दराने स्वीकारली जातील असे जाहीर केले. सरकारी टाकसाळ नसल्याने ठिकठिकाणी नाणी पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बराच गोंधळ मानला. शेवटी मुहम्मदाने या बाबतीतला हुकूम मागे घेतला. मुहम्मदाच्या अयशस्वी प्रयोगांनी साम्राज्यात बेबंदशाही व अराजकता माजली. सिंध, मुलतान वगैरे ठिकाणी बंडे झाली व दूरदूरचे प्रांत स्वतंत्र झाले. त्यांपैकी दक्षिणेतील विजयानगरचे राज्य (१३३६) व बहमनी सत्ता (१३४८) ही महत्त्वाची होत. पुढे १३५१ मध्ये बंगाल पूर्ण स्वतंत्र झाला. किरकोळ आजारानंतर तो गुजरातमधील टठ्ठा येथे मरण पावला.

मुहम्मद धर्मशील व विद्याव्यासंगी होता. त्याच्याविषयी दरबारातील जियाउद्दीन बरनी या इतिहासकाराने व इब्न बतूता या प्रवाशाने माहिती लिहून ठेवली आहे. विद्येने सुसंस्कृत असूनही हा प्रसंगी क्रूरपणे वागे. त्याच्या योजनांत कल्पकपणा होता परंतु तत्कालीन परिस्थितीत त्या व्यवहार्य नव्हत्या, म्हणून त्या फलदायी ठरल्या नाहीत. व्यवहारज्ञानाचा अभाव असल्याने अंगी कर्तबगारी असूनही मुहम्मदास राज्य नीट संभाळता आले नाही.

गोखले, कमल