तीस वर्षांचे युद्ध : (१६१८–१६४८). सोळाव्या शतकात उत्तर व पश्चिम यूरोपात प्रबोधन व धर्मसुधारणा या दोन गोष्टींनी जी खळबळ माजली, तीमधून या युद्धाचा उगम झाला. या युद्धाला जरी तीस वर्षांचे युद्ध म्हटले असले, तरी ते सु. ४० ते ५० वर्षे चालले. याची सुरुवात प्रथम जर्मन संस्थानांतील प्रॉटेस्टंट व रोमन कॅथलिक यांच्या भांडणाने झाली आणि त्यातूनच यूरोपातील बहुतेक सर्व देशांत युद्ध सुरू होऊन त्याचा उद्देश राजकीय सत्ता व प्रदेशव्याप्ती असा ठरला. या युद्धाचे चार कालखंड पडतात : (१) पहिल्या कालखंडाची सुरुवात प्रागच्या आर्चबिशपच्या प्रॉटेस्टंट चर्च उद्ध्वस्त करण्याच्या हुकमाने झाली. प्रॉटेस्टंटांनी याविरुद्ध सम्राटाकडे तक्रार केली. यात त्याने तिजकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रॉटेस्टंटांनी बंडाचा उठाव केला. प्रॉटेस्टंटानी दोघा मंत्र्यांना खिडकीतून फेकून दिले. नंतर त्यांनी कॅथलिक सम्राट फर्डिनांट यास पदच्युत करून फ्रीड्रिखला गादीवर बसविले पण १६२० मध्ये फर्डिनांटच्या सेनापतीने ‘व्हॉइट मौंटन’ लढाईत प्रॉटेस्टंटांचा पूर्ण पराभव केला. (२) नंतर काही वर्षांनी डेन्मार्कचा प्रॉटेस्टंट राजा चौथा ख्रिश्चन याने फर्डिनांटच्या सैन्याला विरोध केला. एवढ्यात फर्डिनांटच्या सैन्यात सेनापती योहान टिली याने प्रॉटेस्टंट सैन्याचा पुनःपुन्हा पराभव केला. तेव्हा राजा ख्रिश्चनने फर्डिनांटशी तह केला व त्यातील अटीप्रमाणे कॅथलिक चर्चची जी मिळकत प्रॉटेस्टंटांनी ताब्यात घेतली होती, ती कॅथलिकांना परत करण्याचा प्रसंग आला. (३) एवढ्यात स्वीडनचा प्रॉटेस्टंट राजा गुस्टाव्ह आडॉल्फ हा युद्धात पडला. त्याला प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार करावयाचा होता आणि शिवाय फर्डिनांट बलिष्ट होण्याची भीती वाटत होती. याने १६३१-३२ मध्ये टिलीचा पराभव केला तीत तो मारला गेला. पुढे त्याच वर्षी झालेल्या व्हॅलन्टाइनबरोबरच्या लढाईत स्वीडनच्या सैन्याला जय मिळाला, परंतु गुस्टाव्ह मारला गेला व व्हॅलन्टाइनचा खून झाला. (४) हे युद्ध पुढे फ्रान्सचा कार्दीनाल रीशल्य याने चालविले. फ्रेंच व स्वीडिश सैन्याने अनेक जय मिळविले. यामुळे प्रॉटेस्टंटांना हुरूप चढला. आता जर्मन लोकांना (प्रॉटेस्टंटांना) आणि बहुधा कॅथलिकांनाही युद्धाचा विविध कारणांनी कंटाळा आला होता. तेव्हा सु. चार वर्षांच्या चर्चेनंतर वेस्टफेलिया येथे १६४८ मध्ये तह झाला. या तहात फ्रान्स व स्वीडन यांना काही प्रदेश मिळाला आणि कॅल्व्हिनच्या पंथाला कॅथलिक व प्रॉटेस्टंट यांच्या बरोबरीची मान्यता मिळाली. या युद्धामुळे जर्मन संस्थानांचे फारच नुकसान झाले. त्यांमधील अर्धेअधिक लोक युद्धात मारले गेले. शहरे, खेडी व शेती यांमध्ये आबादीचे नाव राहिले नव्हते. दोनतृतीयांश मिळकतीचा नाश झाला होता. ज्ञान, विज्ञान, व्यापार व उद्योग हे सर्व कळाहीन बनले होते. यातून वर येण्याला जर्मनीस सु. २०० वर्षे लागली. हजारो जर्मनांनी अमेरिकेस प्रयाण केले.

देशपांडे, अरविंद