भारतीय प्रबोधनकाल : मुळात एखाद्या दूर असलेल्या उच्च संस्कृतीचा अलग असलेल्या दुसऱ्या सुसंस्कृत समाजाशी वा राष्ट्राशी घनिष्ठ संपर्क निर्माण झाला, म्हणजे संपर्क झालेल्या सुसंस्कृत समाजात किंवा राष्ट्रात अधिक उच्च दर्जाचे सांस्कृतिक परिवर्तन घडू लागते, या परिवर्तनाला ‘प्रबोधन’ अशी संज्ञा प्राप्त होते. ही संज्ञा (रिनेसन्स) यूरोपमधील चौदाव्या ते सतराव्या शतकांपर्यंतच्या परिवर्तनाच्या आंदोलनकाळात दिली. यूरोपमध्ये इ. स. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतींशी जाणीवपूर्वक घनिष्ठ संपर्क घडू लागला आणि त्यामुळे नवे साहित्य, नवी कला, नवी राजनीती आणि विश्व व समाज यांबद्दलचे नवे धार्मिक, ऐहिक व वैचारिक मंथन सुरू झाले आणि ही प्रक्रिया सोळाव्या शतकाच्या अखेर परिपूर्ण अवस्थेला पोहचली आणि विज्ञानयुगाचा प्रारंभ झाला. या सु. तीन शतकांच्या कालखंडास ‘प्रबोधनकाल’ किंवा ‘प्रबोधनयुग’ म्हणतात. 

  भारताच्या ज्ञात इतिहासकालात सु. २४०० वर्षाच्या कालावधीत भारतावर अनेक बाह्य संस्कृतींच्या राजकीय शक्तींनी आक्रमण केले. त्यांतील अधिक स्थिरावलेली आक्रमणे म्हणजे मुसलमानी संस्कृती व त्यानंतरची पश्चिमी संस्कृती या दोन संस्कृतींची होत. मुसलमानी संस्कृतीचा व परंपरागत हिंदू संस्कृतीचा संघर्ष व संगम घडला, तरी सबंध सांस्कृतिक परिवर्तनाला मुसलमानी संस्कृती प्रेरक होऊ शकली नाही कारण भारतावर आक्रमण करणाऱ्या राज्यकर्त्यांना परिणामकारक सामर्थ्यशाली उच्च संस्कृती लाभली नव्हती. हिंदुस्थानात इस्लामपेक्षा अधिक प्रभावी व अत्यंत सामर्थ्यशाली अशी पाश्चात्य संस्कृती इ. स. सतराव्या शतकात आली परंतु तिचा खोल परिणाम येथील ब्रिटिशांच्या राज्यस्थापनेनंतरच होऊ लागला. गेल्या सु. पावणे दोनशे वर्षांच्या ब्रिटिश रियासतीच्या काळात हिंदी जीवनात ज्या प्रकारचे प्रगतिमय स्थित्यंतर घडून आले, त्या प्रकारचे स्थित्यंतर हिंदी इतिहासात इतक्या थोड्या कालावधीत पूर्वी कधी घडून आले नाही. या स्थित्यंतराने भारतीय संस्कृतीच्या प्रवाहाची दिशाच बदलून टाकली. ब्रिटिशपूर्व भारतीय ऐतिहासिक परिणतक्रम एक प्रकारे मंदावला होता. एवढेच नव्हे तर त्यात सहस्त्रावधी वर्षे एक प्रकारची अगतिकता उत्पन्न झाली होती. सर्वांगीण विकास आणि प्रगती याला प्रसवणारी मानवी शक्ती म्हणजे विवेकबुद्धी होय. ती अंधःश्रद्धेत येथे जखडली गेली होती.  

संपूर्ण बदललेला बाह्य जीवनक्रम आणि मानसिक मूल्यांतील क्रांती या दोन्ही गोष्टी सामाजिक सर्वांगीण स्थित्यंतरास समुच्चयाने कारणीभूत होतात. इंग्रजी राज्यानंतर या दोन्ही गोष्टींची प्रक्रिया सुरू झाली. मानसिक मूल्यांमध्ये अंधःश्रद्धेतून मुक्त होऊन रूढ परंपरेकडेसदसदविवेकाने वाहून त्याचे पुनर्मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती येथील काही सुशिक्षित प्रज्ञावंतांमध्ये निर्माण झाली. बाह्य जीवनक्रमात भौतिक – यांत्रिक सुधारणा आल्या. रेल्वे, तारायंत्रे, टेलिफोन, वाफेची आणि तेलाची यंत्रे आणि एंजिने, वेगाने छापणारा छापखाना इत्यादींचा प्रसार होऊ लागला. संघटित राज्ययंत्र ब्रिटिशांनी आसेतुहिमाचल उभारले व उदारमतवादी न्यायासन निर्माण केले. सतत बदलत्या घटनांची नित्य माहिती देऊन विचारविनिमय सतत चालविणारी वृत्तपत्रादी साधने निर्माण झाली. सर्व नागरिकांना समान दर्जा देणारी उदार शिक्षणपद्धती उपलब्ध झाली.  

आधुनिक विद्या आणि कला यांनी संपन्न पाश्चात्य संस्कृतीची मूल्ये यांची मौलिक तत्वेच अत्यंत भिन्न आहेत. आधुनिक विद्या, कला व पाश्चात्य वाङ्‌मय यांच्या शिक्षणाचा लाभ काही हिंदी लोकांना झाल्यामुळे येथील अनेक शिक्षितांची मने नवविचारांनी भारली गेली. जीवनाचा अर्थ करण्याची त्यांची रीतीच बदलून गेली. त्यामुळे सामाजिक व धार्मिक स्थित्यंतरास प्रारंभ झाला.

सतीची चाल बंद झाली (१८२९). त्यामुळे एका सामाजिक घोर कृत्याचे धार्मिकत्व नष्ट झाले. १८४३ साली गुलामांचा व्यापार करण्याची प्रथा कायद्याने नष्ट केली. १८३१ ते १८३७ च्या दरम्यान ठगांचा राक्षसी धंदा कायद्याने संपुष्टात आला. १८६० साली भारतीय दंडसंहितेला पक्क्या कायद्याचे व्यवस्थित स्वरूप देण्यात आले. त्यामुळे शेकडो जमातींच्या जाचातून व्यक्तीला मुक्त करण्याचे कार्य इंग्रजी कायद्याच्या आणि न्यायालयाच्या संस्थेने केले. हिंदु – मुसलमानातील निरनिराळ्या जमातींच्या ज्या धर्माधिकारी संस्था होत्या, त्यांच्या जुलमी – अव्यवस्थित – विसंगत न्यायनिवाड्यांच्या प्रकारांस कायमचा आळा बसण्यास सुरुवात झाली. भिन्नभिन्न जमातींच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींच्या जीवनपद्धतीवर दडपण आणण्याचे अपरंपार सामर्थ्य घटावयास लागले व ते आता नामशेष झाले.

आधुनिक इहवादी शिक्षण संस्थांनी हिंदूंच्या व मुसलमानांच्या धार्मिक शिक्षणसंस्थांना मागे रेटले. श्रुतिस्मृतिपुराणे, मुसलमानी धर्मग्रंथ यांचे अध्ययन करून विद्वान झालेल्या मंडळींपेक्षा आधुनिक विद्याविभूषितांना शासनात व समाजात आपोआप अधिक प्रतिष्ठेचे स्थान लाभू लागले. इतिहास, गणित, भूगोल, सृष्टीज्ञान इ. आदुनिक विज्ञानांनी धार्मिक विद्यांचे स्थान घेतले. नवशिक्षित तरुण पिढी जन्माला आली. त्याबरोबरच परंपरागत साक्षर प्रादेशिक लोकभाषांनी नव्या गद्याचे आणि पद्याचे रूप घेतले. इतिहास, भूगोल, सृष्टिज्ञान, कविता, नाटक, निबंध व अनेक प्रकारचे ललित आणि वैचारिक साहित्य सर्वच नवा आकृतिबंध व नवा आशय घेऊन निर्माण होऊ लागले. त्याची वैविध्यपूर्ण निर्मिती होऊ लागली. त्यात राजकीय बंडखोरीची विचारसरणी वगळल्यास, बाकी सगळ्या प्रकारचे विचार आविष्काराचे स्वातंत्र्य प्रकट झाले. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचाराने जुन्या समाजव्यवस्थेतील व्यक्तीच्या आत्मविकासावरील बंधनांचा उच्छेद करण्याची स्फूर्ती लाभली.

नवीन मूल्यांचा प्रत्यय घेऊन हिंदू धर्मसंस्थेचे मूलगामी परिशीलन पहिल्या नवशिक्षितांनी सुरू केले. त्यांना असे दिसले, की शब्द प्रामाण्यावर आधारलेला कोणतीही जुनी धर्मसंस्था समाजाच्या आधुनिक विकासास खुंटविणारी आहे. विवेकबुद्धीवर अधिष्ठित असलेल्या कोणत्याही धर्मग्रंथाच्या किंवा कोणत्याही ऋषीच्या अथवा प्रेषिताच्या शब्दावर अधिष्ठित नसलेला विवेकबुद्धीच्या प्रकाशावर चालणारा सर्व मानवांचा धर्म स्थापन व्हावयास पाहिजे, अशा विचारसरणीपर्यंत येथील सामाजिक व धार्मिक विचारवंतांनी मजल गाठली. त्यांच्यातला पहिला महान पुरुष म्हणजे ⇨राजा राममोहन रॉय होय. त्यांनी १८२८ साली ⇨ब्राह्मो समाजाची बंगालमध्ये स्थापना केली. अशा तऱ्हेने मूलगामी विचार करणारे अनेक प्रबोधनाचे नेते गेल्या पावणे दोनशे वर्षांच्या भारताच्या इतिहासात चमकून गेले. ब्राह्मो समाजात केशवचंद्र सेन, विश्वकवी रवींद्रनाथ टागोर इत्यादींचे प्रभाव मोठा होता. हिंदू समाजातील जातिभेदाचे आणि मूर्तिपूजक पौराणिक धर्माचे खंडन करणारे आणि वेदांतील धार्मिक परंपरेला आणि विचारांना नवे भाष्य लिहून उजाळा देणारे ⇨स्वामी दयानंद सरस्वती हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये उत्तर हिंदुस्थानात विशेषतः पंजाबमध्ये धार्मिक सुधारणांचे धुरिण बनले. त्यांनी ⇨आर्यसमाजाची स्थापना १८७५ मध्ये केली. ब्राह्मो समाजाने बंगालमध्ये फार मोठमोठ्या प्रतिभाशाली विचारवंत व्यक्ती निर्माण केल्या. बंगाली वाङ्‌मय, विद्या व कला यांना या व्यक्तींच्या प्रतिभेने मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. हिंदू समाजातील कुटुंबसंस्था बदलावी, स्त्री स्वतंत्र व्हावी, जातिभेद नष्ट व्हावा, मूर्तिपूजेच्या कर्मकांडाचे बंड मोडावे, सर्वधर्मीयांमध्ये भ्रातृभाव यावा, अशा प्रकारची प्रवृत्ती ब्राह्मो समाजाच्या नेत्यांनी निर्माण केली.


ब्राह्मो समाज, ⇨प्रार्थनासमाज, आर्यसमाज इ. संस्थांच्या रूपाने भारतीय प्रबोधनाचे आंदोलन दृढमूल होऊ लागले. या आंदोलनातच विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, जगन्नाथ शंकरशेट, बेहरामजी मलबारी, वि. ना. मंडलिक, भाऊ दाजी लाड, भगवानदास पुरुषोत्तमदास, कावसजी जहांगीर, महादेव गोविंद रानडे, रा. गो. भांडारकर, गो. ग. आगरकर इ. मोठमोठ्या सुधारक व्यक्ती लाभल्या, म्हणून महाराष्ट्रामध्ये समाजसुधारणेचे आंदोलन दृढमूल झाले.

ब्राह्मण जातीच्या हिंदू धर्मातील वैचारिक व धार्मिक नेतृत्वास आव्हान देणारा आणि परंपरागत कोणत्याही धर्मग्रंथाला, अवताराला किंवा प्रेषिताला प्रमाण न मानणारा, सामाजिक समतावादी विचार मांडणारा व त्या विचारास प्रत्यक्ष कार्यक्रमाची जोड देणारा ⇨ सत्यशोधक समाज १८७३ साली जोतीराव फुले यांनी पुणे शहरी स्थापन केला. एकेश्वरवाद, विवेकबुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितवर्गाचा निषेध, मूर्तिपूजाविरोध, तीर्थयात्राविरोध, अद्भुत चमत्कारांवरील अविश्वास, परलोकाची व स्वर्ग नरकाची दखल न घेणे, सर्व मानवजातीची समता व बंधुत्व आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही तत्वे ब्राह्मो समाजाप्रमाणेच सत्यशोधक समाजानेही मान्य केली. या समाजाची वैशिष्ट्ये म्हणजेच ब्राह्मणी वर्चस्व आणि ब्राह्मणी नेतृत्व या गोष्टींच्या विरुद्ध एक प्रकारचा वर्गविग्रहच या चळवळीने निर्माण केला. ग्रामीण भागातील शेतकरी व कारागीरवर्ग यांच्या दैन्याची व शोषणाची मीमांसा करून या दैन्याची आणि शोषणाची कारणे ब्राह्मणी वर्चस्वात व नेतृत्वात आहेत, अशा तऱ्हेचा विचार या सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या मुळाशी होता. याच चळवळीने विसाव्य शतकाच्या प्रारंभी ब्राह्मणेतर चळवळीचे रूप धारण केले. ही चळवळ महाराष्ट्राबाहेर आंध्र, तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या द. भारतातील इतर प्रदेशांतही फोफावली. हिंदू समाजातील खालच्या आणि मागासलेल्या सामाजिक थरांच्या प्रगतीची आशा प्रबळ रूप धारण करून स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाही राजकारणात उभी राहिलेली दिसते. अस्पृश्यांच्या आत्मोद्धाराच्या चळवळीला द. हिंदुस्तानातील ⇨ ब्राह्मणेतर चळवळी मुळे प्रथम काही कालपर्यंत बळ मिळाले. नंतर ती स्वतःच्या बळावर प्रगत होऊ लागली. तिचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ही चळवळ आता प्रबल वर्गविग्रहाच्या रूपाने वाढत आहे. भारतीय मुसलमान समाजामध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार होऊन नवा सुशिक्षित वर्ग उदयास आला परंतु यांच्यामध्ये परंपरागत धार्मिक रूढी आणि धार्मिक कायदे यांना बदलून इहवादावर आधारलेली समाजसुधारणेची चळवळ उभी राहू शकली नाही. त्यामुळे अखिल भारतीय नागरिकांचा स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेला कुटुंबविषयक कायदा विधानमंडळातून पारित होऊ शकला नाही. तो केवळ मुसलमानेतर-विशेषतः हिंदू समाजालाच व्यापणारा मर्यादित स्वरूपात १९५२ साली संसदेने संमत केला. महाराष्ट्रात हमीद दलवाई यांच्या प्रयत्नाने स्त्री पुरुष समानतेच्या आंदोलनाला प्रारंभ झाला आणि ⇨मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. 

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीपासून दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत हिंदी इतिहास हा प्रामुख्याने ‘गांधी युग’ या संज्ञेने संबोधिता येतो. सर्वसामान्य भारतीय जनतेला ती जनता मोठ्या प्रमाणात निरक्षर असूनही तिला राजकीय जाणीव देण्याचे कार्य महात्मा गांधींच्या राजकीय नेतृत्वाने केले. अगोदरच्या समाजसुधारकांनी स्त्री पुरुषसमानतेचे तत्व पुरस्कारिले. बालविवाहनिषेध, स्त्रियांना पुनर्विवाहाचा आणि घटस्फोटाचा अधिकार प्राप्त करून देणे, स्त्री पुरुषांच्या विवाहाच्या मर्यादा कायद्याने वाढविणे, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार आणि हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक नष्ट करणे, या कार्यक्रमाला महत्व दिले. गांधींनी भारतीय स्त्रियांना राजकारणात भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे स्त्रियांचे व पुरुषांचे समानतेचे नाते स्पष्टपणे स्थापित झाले. अशा रीतीने राजा राममोहन रॉयपासून तो म. गांधींपर्यंत सामाजिक व धार्मिक सुधारणेचा इतिहास उत्कर्षाचा मार्ग आक्रमून स्वराज्याच्या कालखंडात प्रविष्ट झाला. या प्रबोधनाने भारतीय लोकशाहीचा सांस्कृतिक पायाही रचण्यास प्रारंभ केला आहे.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. British Paramountcy and Indian Renaissance, Part I and II, Bombay, 1963 &amp 1965.

           २. जावडेकर, शं. द. आधुनिक भारत, पुणे, १९७९.

           ३.  बेडेकर, दि. के. भणगे, भा. शं. संपा. भारतीय प्रबोधन (समीक्षण व चिकित्सा) : शंकरराव देव गौरव ग्रंथ, पुणे, १९७३.

जोशी, लक्ष्मणशास्त्री