पालवंश : बंगालमधील एक प्राचीन राजवंश. सातव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत बंगालचा राजा शशांक याच्या निधनानंतर कनौजचा हर्ष आणि आसामचा भास्करवर्मा यांनी बंगालची आपसांत वाटणी केली. आठव्या शतकाच्या आरंभी एका शैलवंशी राजाने गौड किंवा उत्तर बंगालमध्ये काही काळ आपला अंमल बसविला. नंतर कनौजचा यशोवर्मा आणि काश्मीरचा ललितादित्य मुक्तापीड यांच्या गौडावर स्वाऱ्या झाल्या आणि सर्वत्र अराजक माजले. बलवानाने दुर्बलाचा छळ करून आपली तुंबडी भरावी, असा मात्स्य न्याय सुरू झाला. तेव्हा आठव्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेतील सुबुद्ध लोकांनी गोपालनामक अधिपतीची राजा म्हणून निवड केली. भारताच्या प्राचीन इतिहासात हे समंजसपणाचे अद्वितीय उदाहरण आहे.

गोपालाने राज्यात शांतता प्रस्थापित करून आपले राज्य वाढविले. त्याच्या वंशाला पालवंश म्हणतात. गोपालनंतर त्याचा पुत्र धर्मपाल (७८० – ८१५) गादीवर आला. हा पालवंशातील बलाढ्य राजा होय. त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याने पश्चिमेस गंगायमुना दुआबापर्यंत आपला अंमल बसवला. त्याच सुमारास राजपुतान्यात भिन्माळ येथे राज्य करणारा गुर्जर प्रतीहार वत्सराज हाही उत्तरेस आपली सत्ता वाढवीत होता. त्याचा महीपालाशी दुआबात संघर्ष झाला. त्या वेळी दक्षिणेचा राष्ट्रकूट नृपती ध्रुव याने उत्तर हिंदुस्थानात स्वारी करून वत्सराजाला राजपुतान्याच्या वाळवंटात पळवून लावले आणि धर्मपालाचाही दुआबात पराभव केला. हा त्रिपक्षीय कलह पुढे दोन पिढ्या चालला. ध्रुव परत गेल्यावर धर्मपालाने कनौजवर स्वारी करून इंद्रायुधाला पदच्युत केले आणि आपला हस्तक चक्रायुध याला गादीवर बसविले. तसेच तेथे गंगेच्या जलाने स्वतःस अभिषेक करवून घेतला. त्या वेळी उपस्थित असलेल्या राजांच्या देशांची नावे कोरीव लेखात दिली आहेत. ते वर्णन खरे असल्यास धर्मपालाचे स्वामित्व उत्तर भारताच्या बहुतेक भागांत मान्य झाले होते, असे मानावे लागेल.

नंदीवर उभा असलेला वीणाधारी नटराज,नटघर,त्रिपुरा, १० वे शतक

धर्मपालाला हे साम्राज्य फार काळ अनुभविण्यास मिळाले नाही. वत्सराजाचा पुत्र द्वितीय नागभट याने आपले सामर्थ्य वाढवून चक्रायुधाला पदच्युत केले आणि धर्मपालावर चाल केली. दोघांची नागभटाने उत्तर भारतातील बरेच प्रदेश जिंकून घेतले. या सुमारास ध्रुव राजाचा पुत्र महाप्रतापी राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद याने उत्तरेस स्वारी केली. चक्रायुधाला घेऊन धर्मपाल राजा शरण आला. गोविंदाने नागभटाचा पुरा मोड करून हिमालयापर्यंत चाल केली. गोविंद परत गेल्यावर पुन्हा पाल व गुर्जर प्रतीहारांची लढाई जुंपली. तीत धर्मपाल विजयी झाल असावा कारण त्याचा पुत्र देवपाल (सु. ८१५-८५५) याने उत्तर भारताच्या बऱ्याच मोठ्या भागावर आपले स्वामित्व प्रस्थापित केलेले दिसते. देवपालाने ४० वर्षे राज्य केले. त्याच्या काळी सुवर्णद्वीपाचा (सुमात्राचा) शैलेंद्र राजा बालपुत्रदेव याने नालंदा येथे विहार बांधला. त्याच्या विनंतीवरून देवपालाने त्या विहाराच्या योगक्षेमाकरिता पाच गावे दान केली, असा कोरीव लेखात उल्लेख आहे.

देवपालानंतर पालांच्या सामर्थ्याला ओहोटी लागली. या काळात कनौजचे गुर्जर प्रतीहार प्रबळ होऊन त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार दक्षिणेस नर्मदा आणि पूर्वेस बंगालपर्यंत केला. विग्रहपालाच्या कारकीर्दीत कंबोजांचे बंड होऊन त्यांन उत्तर आणि पश्चिम बंगाल काबीज केला. विग्रहपालाचा पुत्र महीपाल (सु. ९८०-१०३०) याने त्यांचा मोड केला. या काळात राजेंद्र चोल याने बंगालवर स्वारी करून गंगातीरापर्यंत धडक मारली. कलचुरी आणि चालुक्य यांनीही आक्रमण केले. महीपालाने या स्वाऱ्यांना धैर्याने तोंड दिले, तरी त्याला बंगालच्या दक्षिणेचा आणि पश्चिमेचा भाग परत मिळवता आला नाही.

महीपालाच्या ताब्यात उत्तर बंगाल होता. तेथून त्याने पश्चिमेवर आक्रमण करून काशीपर्यंत आपला अंमल बसविला. १०२६ मध्ये त्याच्या मंत्र्यांनी सारनाथ येथे बांधकाम केल्याचा उल्लेख आहे. पण नंतर कलचुरी गांगेयदेवाने काशी घेतली. १०३४ मध्ये ती त्याच्या ताब्यात असताना मुसलमानांचे तिजवर एकाएकी आक्रमण झाल्याचा उल्लेख मुसलमानी तवारिखेत आहे.

गांगेयदेवाचा पुत्र कर्ण याने नयपालाच्या कारकीर्दीत गयेपर्यंत स्वारी केली. पण सुप्रसिद्ध बौद्धभिक्षू अतिश दीपंकर याच्या मध्यस्थीने कर्णाने पुन्हा बंगालवर स्वारी करून वीरभूम जिल्ह्यातील पाइकोडे (प्राचिकोट) पर्यंत आक्रमण केले व तेथे स्तंभ उभारला. पण पुढे तह होऊन कर्णाने आपली कन्या यौवनश्री हिचा विवाह विग्रहपालाशी करून त्याच्याशी कायमचे सख्य केले.

तिसऱ्या विग्रहपालाचा पुत्र दुसरा महीपाल याच्या कारकीर्दीत कैवर्त दिव्य (किंवा दिव्वोक) याने बंड करून उत्तर बंगाल घेतला व पूर्व बंगालात वर्मवंशी राजांचे स्वामित्व प्रस्थापित झाले. इतरत्रही लहान लहान संस्थानिकांनी स्वातंत्र्य जाहीर केले.

अशा परिस्थितीत रामपाल गादीवर आला. त्याच्या मंत्र्याचा पुत्र संध्याकरनंदी याने रामपालचरितात  त्याच्या कारकीर्दीविषयी पुष्कळ माहिती दिली आहे. त्याने पूर्व बंगालच्या वर्मवंशी राजांचा पराभव केला. पश्चिमेतील गाहडवालांच्या आक्रमणास पायबंद घातला. उत्कलचे (ओरिसाचे) राज्य आपल्या हस्तकास मिळवून दिले व अशा रीतीने पालवंशास पुन्हा उर्जितावस्था आणली. पण त्याचा पुत्र मदनपाल याच्या कारकीर्दीत उत्तरेस मिथिलेत कर्णाटांचे राज्य स्थापन झाले. राढ किंवा पश्चिम बंगालमध्ये सेन राजांनी आपले राज्य स्थापले आणि पाल वंशाचा अंत केला.

पाल राजे बौद्ध धर्मी होते. त्यांच्या चार शतकांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माला उदार राजाश्रय मिळाला. बौद्ध गया, नालंदा, ओदंतपुरी आणि विक्रमशिला येथे बौद्ध विद्यापीठे स्थापन झाली किंवा भरभराटीस आली. त्यांतील बौद्ध भिक्षूंनी तिबेटात जाऊन तेथे बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्यांमध्ये अतिश दीपंकर विख्यात आहे. पालांच्या पतनानंतर बौद्ध धर्म बंगालात नामशेष झाला.

पालांच्या काळात अनेक बौद्ध स्तूप व विहार उभे राहिले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. पण त्यांपैकी फारच थोडे अस्तित्वात आहेत. बौद्ध स्तूपांचे अवशेष राजशाही जिल्ह्यातील पहाडपूर येथे आणि बांकुरा जिल्ह्यातील बहुलाडा येथे सापडले आहेत. धर्मपालाने सोमपुर (ओंपुर) येथे मोठा विहार बांधला होता. धर्मपालाच्या कारकीर्दीत पहाडपूर येथे एक उत्तुंग देवालय बांधण्यात आले होते. त्याचे अवशेष आता उत्खननाने बाहेर काढले आहेत. त्या तऱ्हेचे देवालय भारतात इतरत्र दिसत नाही. प्राचीन शिल्पशास्त्रात त्या प्रकाराला सर्वतोभद्र असे नाव दिले आहे.

पाल राजांचा विद्येलाही उदार आश्रय होता. रामपालाचा सांधिविग्रहिक, प्रजापति नंदी याचा पुत्र संध्याकरनंदी याने रचलेले रामचरित  द्वयाश्रय प्रकारचे आहे. म्हणजे त्यांत रामायणाची कथा आणि रामपालाचे ऐतिहासिक चरित्र त्याच श्लोकांत श्लेषांच्या साहाय्याने वर्णिले आहे.    

पाल काळात श्रीधरभट्टाची न्यायकन्दली  प्रशस्तपादाच्या वैशेषिक ग्रंथावरची टीका बंगालात दहाव्या शतकात लिहिली गेली. याच काळात काही बौद्ध संस्कृत ग्रंथही निर्माण झाले पण ते तिबेट अनुवादावरूनच ज्ञात आहेत. तसेच त्या काळात तंत्रशास्त्रावरील ग्रंथाचीही विपुल निर्मिती झाली. तारानाथाने तंत्रविद्येच्या साहाय्याने सिद्धी प्राप्त करून घेतलेल्यास मंत्रवज्राचार्य असे नाव दिले आहे.

मिराशी, दा.वि.