हैहय वंश : भारतातील एक पौराणिक प्राचीन राजवंश. त्याच्याविषयीची माहिती प्रामुख्याने पुराणे, महाभारत आणि काही प्रमाणात रामायणातून मिळते. ययातीचा ज्येष्ठ मुलगा यदू. त्याला कोष्ट आणि सहस्रजित असे दोन मुलगे होते. पुढे कोष्टापासून झालेल्या वंशाला यादव आणि सहस्रजितापासून झालेल्या वंशाला हैहय अशी नावे रूढ झाली. त्यामुळे यादवांचीच एक चांद्रवंशीय शाखा म्हणून हा वंश विस्तारला. त्यांच्या महिष्मत राजाने नर्मदेकाठी माळव्यातील माहिष्मती (प्राचीन मांधाता, आधुनिक महेश्वर) येथे आपली राजधानी स्थापिली. त्याच्यानंतर भद्रश्रेण्य हा आक्रमक राजा हैहयांच्या गादीवर आला. त्याने पौरवांचे राज्य जिंकले आणि पूर्वेकडे काशीपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत करून बनारस हस्तगत केले. बनारसच्या हर्यश्व राजाने ते मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु हैहयांनी त्यास ठार मारले आणि त्याचा मुलगा सुदेव यावरही वर्चस्व प्रस्थापिले. पुढे बनारस क्षेमक राक्षसाच्या ताब्यात गेले. ते दुर्दम हैहय राजाने पुन्हा जिंकून घेतले. 

परशुरामाचा भृगुवंश (भार्गव) हा गुजरातमधील आनर्त येथे वास्तव्यास होता. शार्यातंच्या नाशानंतर पश्चिम भारतात हैहयांचे वर्चस्व वाढले. भृगू हे हैहयांचे सहाधिकारी होते. हैहय राजा कृतवीर्य याने भार्गवांना विपुल संपत्ती व धन दिले; कारण ते त्यांचे पुरोहित होते. पुढे भार्गवांनी त्यांपैकी काहीच कृतवीर्याच्या मुलांना दिले नाही, तेव्हा त्यांनी भार्गवांचा छळ केला. त्यामुळे सुरक्षिततेसाठी ते मध्यदेशातील कान्यकुब्ज येथे गेले. भार्गवांनी हैहयांचा सूड घेण्यासाठी शस्त्रसंभार वाढविला. त्यांचा ऋषितुल्य वंशज जमदग्नी हा धनुर्विद्या आणि युद्धशास्त्रात निष्णात होता. त्याने अयोध्येचा राजा रेणू याच्या रेणुका या कन्येशी विवाह करून मैत्री केली. हैहय राजा कार्तवीर्य त्यांच्या आश्रमात ससैन्य आला. जमदग्नीने दैवी कामधेनूच्या सहकार्याने त्याचे यथास्थित स्वागत केले. कार्तवीर्याने त्या कामधेनूची मागणी केली. ती जमदग्नीने अमान्य करताच कार्तवीर्याने जमदग्नींचा आश्रम उद्ध्वस्त करून बळजबरीने तिला नेले. त्यामुळे भृगु-हैहय संघर्षाला प्रारंभ झाला. परशुरामाने कार्तवीर्याच्या अर्जुननामक मुलाला ठार मारले. तेव्हा अर्जुनाच्या मुलांनी जमदग्नीचा खून केला. परशुरामाने वैशाली, विदेह, काशी, कान्यकुब्ज व अयोध्या यांचा संघ स्थापन करून हैहयांविरुद्ध आघाडी उघडली. हैहयांची पीछेहाट झाली. अखेर पापक्षालनार्थ परशुराम अरण्यात गेला. अयोध्येचा राजा पुरुकुत्स याच्या मृत्यूनंतर हैहयांनी पुन्हा राज्यविस्ताराकडे लक्ष केंद्रित केले. कार्तवीर्याचा मुलगा अर्जुन हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने सम्राट व चक्रवर्तीन ही बिरुदे धारण केली होती. त्याने हैहयांची सत्ता पूर्वेला व उत्तरेला विस्तारली. अर्जुन त्याच्या कार्तवीर्य या पितृनामाने परिचित असून त्यास सहस्रार्जुनही म्हणत. सहस्र युद्धनौकांचा अधिपती, असा त्याचा मतितार्थ असावा. नारायणाचा अवतार दत्तात्रेयाचा तो भक्त होता. त्याने अनुप ही नर्मदेच्या मुखाजवळची कर्कोटक नागांची भूमी जिंकून घेतली माहिष्मती हस्तगत करून तिथे राजधानी केली. रावणाचा पराभव केला. त्याने बराच प्रदेश जिंकून यज्ञयाग केले. आदर्श राजा म्हणून त्याची ख्याती झाली. त्याच्या सहस्रार्जुन नावाच्या अर्थबोधनाचा चिकित्सक ऊहापोह करंदीकर नावाच्या विद्वानांनी केला आहे. अर्जुनाला अनेक पुत्र होते. त्यांपैकी प्रमुख जयध्वज अवंतीवर राज्य करीत होता; शूरसेन हा दुसरा मुलगा हा मथुरेच्या गादीवर स्थानापन्न होता; तर शूर सुराष्ट्राशी संबंधित होता. जयध्वजाचा मुलगा तालजंघ यालाही अनेक मुले झाली होती. त्यांपैकी वीटिहोत्रा हा मुख्य असून हैहयांनी पाच राजसमूह स्थापिल्याचा उल्लेख पुराणे करतात. ते म्हणजे वीटिहोत्र, शौर्यात, भोज, अवंती आणि कुण्डिकर होत. त्यांना सामूहिक तालजंघ अशी संज्ञा होती. या पाचही समूहांनी राज्यविस्ताराचा प्रयत्न केला; पण कान्यकुब्ज, कोसल-काशी यांजकडून त्यांना पराजय पतकरावा लागला; तथापि त्यांची आक्रमक प्रवृत्ती कमी झाली नव्हती. अखेर रानटी टोळ्यांकडून त्यांचे राज्य नष्ट झाले. पुराणांनी त्यांची वंशावळ पुढीलप्रमाणे दिली आहे : भद्रश्रेण्यदुर्दम > कनक > कार्तवीर्य > अर्जुनकार्तविर्य > जयध्वज > तालजंघ > वीटिहोत्र > अनंत > दुर्दय > सुप्रतीक. 

पहा : कलचुरी वंश.

संदर्भ : 1. Pargiter, F. E. Ancient Indian Historical Tradition, Delhi, 1962.

           2. Majumdar, R. C. Ed. The Vedic Age, Bombay, 1972. 

देशपांडे, सु. र.