तेमूरलंग

तैमूरलंग : (९ एप्रिल १३३६–१९ जानेवारी १४०५). तैमूरलंग हा आशिया खंडातील मध्ययुगीन जेता. त्याचा जन्म कीश (आधु. शख्रीश्याप्स) येथे झाला. तो आईकडून चंगीझखानाच्या वंशातील होता. त्याच्या वडिलांचे नाव अमीर तरगाई. वयाच्या बाराव्या वर्षापासून तैमूरलंगाच्या धाडसी जीवनास सुरुवात झाली. आयुष्याची पहिली सु. तीस वर्षे त्यास अतिशय हालात, रानोमाळ पायी किंवा घोड्यावरून, एकाकी वा अनुयायांसह भटकण्यात काढावी लागली. पण विलक्षण साहस, कावेबाजपणा इत्यादींच्या जोरावर त्याने आपल्या सर्व शत्रूंवर मात करून समरकंद येथे आपली गादी स्थापन केली. या काळात चंगीझखानाच्या वंशजाकडे नोकरी करीत असता पंचविसाव्या वर्षी तैमूरलंग काही प्रांतांचा अधिकारी झाला. त्याने १३६९ मध्ये चगताई मंगोल वंशाची समाप्ती करून समरकंदचे राज्य मिळविले. तसेच इराण, तार्तर, हिंदुस्थान व ऑटोमन राज्यांत ३५ स्वाऱ्या करून सत्तावीस राज्यांचा पाडाव केला.

जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने तैमूरलंगने १३७०–९० मध्ये पूर्व तुर्कस्तान आणि इराणमध्ये आक्रमक धोरण स्वीकारले. १३८० मध्ये ख्वारिज्‌म, कॅश्गार व १३८१ मध्ये हेरात जिंकले. १३८२–८५ मध्ये त्याने पूर्व तुर्कस्तान आणि खोरासान जिंकून १३८६–८७ मध्ये फार्स, इराक, आझरबैजान आणि आर्मेनिया येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. १३९३-९४ मध्ये मेसोपोटेमिया आणि १३९४ मध्ये जॉर्जिया हस्तगत केले. हे देश जिंकत असता किपचाक तुर्कांच्या तोख्तमिश ह्याने खूप विरोध केला. म्हणून १३९५ मध्ये तैमूरलंगने त्याचा पराभव करून किपचाकचे राज्य खालसा केले. ह्याच वेळी इराणमध्ये झालेल्या बंडाचा त्याने बंदोबस्त केला.

ह्यानंतर तैमूरलंग जवळजवळ एक लाख सैन्यानिशी एप्रिल १३९८ मध्ये हिंदुस्थानच्या स्वारीवर निघाला आणि २४ सप्टेंबर रोजी त्याने अटकजवळ सिंधू नदी ओलांडली. तसेच पूर्वेकडे जाऊन दीपालपूर, भटनेर हे किल्ले घेऊन पानिपतवरून दिल्ली येथे तो पोहोचला. त्या वेळी दिल्ली येथे राज्य करणाऱ्या मुहम्मदशाह तुघलकाने तैमूरला म्हणण्यासारखा प्रतिकार केला नाही. त्याने दिल्ली शहरात अमानुष कत्तल करून तेथील अमाप संपत्ती समरकंदला नेली.

जॉर्जिया, बगदाद, ॲनातोलिया व बेयझीदच्या बंडामुळे तैमूरलंगला तिकडे जावे लागले. वयाच्या ६३ व्या वर्षी या सर्वांचा बंदोबस्त करून तो पुन्हा पश्चिमेकडे म्हणजे सिरिया, बगदाद, ईजिप्त व ऑटोमन तुर्क इकडे वळला. त्याने आशिया मायनरमधील लहान राजांची बाजू घेऊन ऑटोमन तुर्कांविरुद्ध लढून त्यांचा पराभव केला. बगदाद व स्मर्ना येथील सर्व माणसांची कत्तल करून ती शहरे जाळली. १४०० मध्ये दमास्कस येथे ईजिप्तच्या सुलतानाचा पराभव करून १४०२ मध्ये त्याने बेयझीदशी लढाई केली. वयाच्या ६९ व्या वर्षी वीस लाख सैन्यानिशी तो चीनच्या स्वारीवर निघाला परंतू १४०५ मध्ये ओत्रार येथील मुक्कामात ताप येऊन तेथेच मरण पावला.

एका पायाने लंगडा असल्याने त्याला तैमूरलंग हे नाव पडले. तसाच तो एका हाताने पंगू असल्याचेही नमूद आहे. तो धाडसी व कावेबाज होता. त्याला धर्मशास्र, साहित्य यांत रस असून युद्धकलेत त्याने विलक्षण प्रावीण्य मिळविले होते. त्याची शिस्त फारच कडक होती. मंगोल भाषेतील त्याच्या आठवणींचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याला विद्वान लोकांबरोबर इतिहास, धर्मशास्र इ. विषयांवर चर्चा करणे आवडे. बगदाद आणि दमास्कस येथील विद्यापीठांचा त्याने विध्वंस केला पण त्याच तोडीची नवीन विद्यापीठे त्याने समरकंद येथे उभारली. ईजिप्त, अरबस्तान, हिंदुस्तान, तार्तर, रशिया व स्पेन येथील वकील त्याच्या दरबाराला भेट देत. जिंकलेल्या प्रदेशांतील लाखो लोकांची त्याने कत्तल केली पण कलावंत व कारागीर ह्यांना त्याने समरकंदला नेले.

तो विविध कलांचा भोक्ता असल्याने मध्य आशियात १४०० च्या सुमारास त्याने अनेक वास्तू आणि मशिदी बांधल्या. तेव्हा समरकंद हे कलेचे प्रमुख केंद्र बनले. समरकंद येथील गुर-इ-अमीर ही त्याची कबर १४३४ मध्ये पूर्ण झाली. दर्शनी भागावरील रंगीत कौलकाम व विशिष्ट प्रकारचे खोदकाम (कंदाकारी) केलेले घुमट ह्यांमुळे त्याच्या काळातील मशिदी प्रसिद्ध आहेत. ह्या कामासाठी निरनिराळ्या देशांतील कलावंतांची मदत त्याने घेतली होती. ह्या काळात वस्त्रकलेतही बरीच प्रगती झाली होती. काचेची व मातीची कलात्मक भांडीही तयार करण्यात आली. ह्या काळातील सूक्ष्माकारी चित्रे, रेखन–सौष्ठव व सतेज रंगपद्धती यांमुळे उत्कृष्ट वाटतात. स्पेनच्या वकिलाने १४०४ मध्ये समरकंदला भेट दिली होती. ह्या वकिलाने तैमूरच्या दरबारातील थाट, टापटीप, व्यवस्था इत्यादींचे वर्णन केलेले आहे. मोठमोठी राज्ये पादाक्रांत केल्याने तैमूरलंग मोठा विजेता म्हणून परिचित असला, तरी तो चंगीझखानाखालोखालचाच नेता मानला जातो.

त्याला दोन मुलगे होते. त्यांपैकी शहरूख या धाकट्या मुलाने तैमूरच्या मृत्यूनंतर एकसंध राज्य राहावे असा प्रयत्न केला. तैमूरने आपल्या मृत्यूपूर्वी राज्याची विभागणी दोन मुलगे व नातू यांमध्ये केली होती. तथापि तैमूरचा वंश कसाबसा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तग धरून होता. पुढे त्याची राजधानी हेरात येथे होती.

संदर्भ :Hookham, Hilda, Tamburlains the Conqueror, London,1964.

गोखले, कमल