क्लाइव्ह, लॉर्ड रॉबर्ट : (२९ सप्टेंबर १७२५–२२ नोव्हेंबर १७७४). हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा एक संस्थापक, मुत्सद्दी व सेनापती. इंग्लंडमधील श्रॉपशर परगण्यात स्टाइक या ठिकाणी एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्म. त्याने शालेय शिक्षण असे फारसे घेतलेच नाही. म्हणून त्यास वडिलांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीस लावले. तो प्रथम १७४४ मध्ये मद्रास येथे वयाच्या अठराव्या वर्षी कारकून म्हणून आला.

लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्ह

ह्या सुमारास दक्षिण हिंदुस्थानात इंग्रज व फ्रेंच यांमध्ये स्पर्धा चालू होती. फ्रेंचांनी १७४६ मध्ये मद्रास घेतले. क्लाइव्ह शिताफीने सेंट डेव्हिड किल्ल्यात पळून गेला. १७४७ मध्ये तो पायदळात दाखल झाला व एनसाइन बनला. यूरोपमधील एक्स-ला-शपेल ह्या युद्धविराम संधीने फ्रेंच व इंग्रज यांमध्ये काही काळ शांतता प्रस्थापित झाली, तरी त्यांचे हिदुस्थानातील वैर संपुष्टात आले नाही. त्याचा क्लाइव्हने फयदा घेतला आणि फ्रेंचांविरुद्ध लढताना १७५१ मध्ये त्रिचनापल्ली व अर्काटच्या वेढ्यांत कर्नाटकच्या नबाबाच्या प्रकरणात त्याने आपले लष्करी ज्ञान, शौर्य व धैर्य दाखविले.  त्याबद्दल त्याला बराच मान मिळाला. १७५३ मध्ये तो इंग्लंडला गेला. तेथे मास्केलाइन ह्या मित्राच्या बहिणीशी त्याचे लग्न झाले. १७५५ मध्ये सेंट डेव्हिड येथे त्याची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. हिंदुस्थानात येताच त्याने बंगालचा नबाब सिराजुद्दौला याच्या सैन्यास कलकत्ता येथे हाकलून दिले आणि फ्रेंचांकडून चंद्रनगर घेऊन बंगालमधून त्यांचे कायमचे उच्चाटन केले. पुढे १७५६ मध्ये बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान मरण पावल्यावर त्याचा नातू सिराजुद्दौला हा गादीवरआला. या वेळी यूरोपात इंग्रज व फ्रेंच यांमध्ये पुन्हा युद्ध जंपले. त्यामुळे इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने सिराजुद्दौला याची परवानगी न घेता, कलकत्ता येथील फोर्ट विल्यमची तटबंदी सुरू केली. यावेळी डाक्क्याचा कारभारीही सिराजुद्दौलाविरुद्ध उठला.  सिराजुद्दौलाने  त्याचा बंदोबस्त केला, परंतु त्याचा मुलगा किसनदास सर्व संपत्तीनिशी इंग्रजांना मिळाला. सिराजुद्दौलाने तटबंदी बंद करण्याविषयी तसेच किसनदासास ताब्यात देण्याविषयी इंग्रजांस सांगितले. पण ही गोष्ट इंग्रजांनी ऐकली नाही, तेव्हा त्याने इंग्रजांवर चढाई केली. कलकत्त्यास वेढा घालून ते ठिकाण काबीज केले. या वेळी जनता सिराजुद्दौलाच्या कारभारास कंटाळली होती. तिने मीर जाफर ह्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली बंड केले. क्लाइव्हाने ह्या संधीचा फायदा घेऊन कट केला. त्यात मीर जाफर ह्यास हाताशी धरले आणि सिराजुद्दौलास पदच्युत करून मीर जाफर यास नबाब करण्याचे ठरविले. क्लाइव्हने नबाबावर चालून जावे व मीरजाफरने आयत्या वेळी त्यास मिळावे, असा उभयतांमध्ये बेत ठरला. हा बेत उमीचंद सावकारास कळला, त्याने क्लाइव्हकडून गुप्ततेसाठी बरीच रक्कम मागितली. क्लाइव्हने ते मान्य केले. पण दोन स्वतंत्र कागद करून रकमेचा आकडा घातलेल्या कागदावर गव्हर्नर वॉट्सनची खोटी सही केली. सिराजुद्दौलाचा १७५७ मध्ये ⇨प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.

त्यानंतर त्याने मीर जाफरला मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून त्याच्याकडून २३,४०,००० रु. रक्कम, २५ लाखांचा मुलूख व कंपनीस बिहारमधील सोन्याचा मक्ता मिळविला. साहजिकच त्यामुळे फ्रेंच व डच ह्यांचा बंदोबस्त झाला. परंतु १७५९ मध्ये दिल्लीच्या बादशाहचा मुलगा शाह आलमने अलाहाबाद आणि अयोध्या येथील सरदारांशी संगनमत करून मीर जाफरवर स्वारी केली. दरम्यान क्लाइव्हने त्यास मीर जाफरकडून नजराणा देऊन ते प्रकरण मिटविले. याकरिता चोवीस परगण्याच्या मालकी हक्काबद्दल कंपनीकडून येणारा वसूल क्लाइव्हला लावून दिला. १७६० मध्ये तो इंग्लंडला परतला. तेथे प्लासीचा लॉर्ड हा किताब देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर म्हणून १७६५ मध्ये पुन्हा हिंदुस्थानात आला. त्यावेळी नबाबांची भांडणे चालू होतीच. मीर जाफर व इंग्रज यांनी मीर कासीम, अयोध्येचा वजीर व दिल्लीचा शाह आलम यांचा बक्सर येथे १७६४ मध्ये पराभव केला. क्लाइव्हने तत्काल बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रातांची दिवाणी सनद शाह आलमपासून मिळविली. कंपनीकरिता दिवाणी आणि स्वतःकरिता जहागीर, असा ठराव झाला. लष्कर व वसूल इंग्रजांकडे आणि न्यायनिवाड्याचे काम नबाबाकडे गेले. यालाच बंगालची दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात.

यानंतर क्लाइव्हने कंपनीचा अंतर्गत कारभार व लष्कर यांत अनेक सुधारणा केल्या. या वेळी सैनिकांना बाहेरील कामगिरीसाठी स्वतंत्र भत्ता मिळत असे. इंग्लंडमधील हुकमान्वये हा भत्ता बंद झाला, तेव्हा लष्कराने बंड केले, पण त्याने ते मोडले. शिवाय त्याने काही नवीन नियम केले. कंपनीच्या नोकरांना लाचलुचपत व खाजगी व्यापार यांत पैसे मिळविण्याची सवय जडली होती. क्लाइव्हने पगार वाढवून ही पद्धत बंद केली आणि व्यापारात भाग घेण्यावर बंदी घातली. राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रज अधिकाऱ्यांकडे दिली. एकंदरीत राज्यकारभारास एक नवीन दिशा लावली. १७६७ मध्ये तो पुन्हा इंग्लंडला परत गेला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी त्याचा सत्कार केला. त्यास ‘नाइटहूड’ देण्यात आले.

क्लाइव्हने आपल्या कारकीर्दीत खूप पैसा खाल्ला आणि खाजगी संपत्ती मिळविली. सरकारी कृत्यांबद्दल बक्षिसे घेणे, फसवाफसवी करणे, हिंदुस्थानात उमीचंदासारख्या व्यापाऱ्यांस फसविणे वगैरे कृत्यांमुळे त्याची पार्लमेंटपुढे चौकशी सुरू झाली. पुष्कळ चर्चेनंतर स्वदेशाची मोठी कामगिरी केली, म्हणून त्यास निर्दोष ठरविण्यात आले. तथापि वरील कटकटीमुळे त्यास मानसिक क्लेश झाले. त्यास कंटाळून त्याने लंडन येथे आपल्या घरी आत्महत्या केली.

संदर्भ : Davies, A. M. Clive of Plassey, London, 1939.

गोखले, कमल