अश्मयुग : मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास

 ⇨ प्रागितिहास  म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.

अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.

अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत. 

अश्मयुगीन कालखंड

 पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले. 

मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.

उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.

आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.

नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर,  मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन  हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.


मानवी जीवन

 अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

 शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.

समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी. 


  गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत  वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.


  शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.

वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये  ⇨ बुर्झाहोम  येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी  निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.


 जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको  (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-

रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम  येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ


 दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा.,  पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले.  त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी  उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत. 

उपकरणे, भांडे इ. : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व


 भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग  यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते. 

धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.

जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.

नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.


  या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.

अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

 पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला]. 

अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या  वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.


  भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील. 

पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.

कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत. 

मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज  या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत. 

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी,  पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.

पहा : प्रागितिहास मृत्पात्रे मानववंश पुरावत्त्वीय उत्खनने.

संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958.

           2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961.

           3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965.

           4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965.

           5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of  Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963.

           6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960.                                                   

           7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965.

           8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961.

           9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963.

         10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964.

         11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964.

         12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954.

         13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.