दुसरा कैसर विल्यमकैसर विल्यम, दुसरा : (२७ जानेवारी १८५९–४ जून १९४१). जर्मनीचा अखेरचा सम्राट व होहेंझॉलर्न घराण्यातील शेवटचा प्रशियाचा राजा. तिसरा फ्रीड्रिख व राणी व्हिक्टोरिया ह्यांचा मुलगा, पॉट्सडॅम येथे जन्मला. तो इंग्लंडच्या राणीचा आईकडून नातू होता. लहानपणी त्याचा अर्धांगाने डावा हात लुळा पडला होता तथापि त्याने लष्करी शिक्षण घेतले. तिसऱ्या फ्रीड्रिखच्या केवळ शंभर दिवसांच्या कारकीर्दीनंतर तो जर्मनीच्या गादीवर १५ जून १८८८ रोजी आला. बिस्मार्क ह्या पंतप्रधानाशी त्याचे पटेना, तेव्हा त्याने त्यास राजीनामा देण्यास भाग पाडले. विल्यमचे परराष्ट्रीय व अंतर्गत धोरण चमत्कारिक होते. जर्मनीस वसाहतीचे साम्राज्य पाहिजे आणि त्यासाठी प्रबल लष्करी सामर्थ्य व नाविक दलाची आवश्यकता आहे, असे तो प्रतिपादन करी. ह्यामुळे त्याचा इंग्लंडशी संघर्ष आला.ह्या संघर्षात त्याच्या वैयक्तिक द्वेषभावनेची भर पडली. पुढे १८९० मध्ये त्याने रशियाबरोबरचा मैत्रीचा तह मोडला. अशा काही कृत्यांमुळे जर्मनीला पहिल्या महायुद्घात पडावे लागले. अर्थात विल्यमच महायुद्धास कारणीभूत होता, असे तत्कालीन स्थितीवरून आढळत नाही. त्याने युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केले रशिया व फ्रान्स ह्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तथापि त्याच्या एकूण अतिरेकी परराष्ट्रीय धोरणामुळे जर्मनीचा पराभव झाला आणि त्यास राज्यत्याग करून हॉलंडमध्ये पळून जावे लागले. मात्र विल्यमने उत्पादन, कारखाने व व्यापारास उत्तेजन देऊन जर्मनी हे लष्करी तसेच आर्थिक दृष्ट्या एक बलवान राष्ट्र बनविले. त्याने उर्वरित आयुष्य दोर्न (नेदर्लंड्स) येथील इस्टेटीची देखभाल करण्यात घालविले. ह्या काळात त्याने आपल्या आठवणी लिहून काढल्या. तेथेच तो मरण पावला.

संदर्भ : 1. Balfour, Michael, The Kaiser and His Times, London, 1964.

      2. Ludwig, Emil Trans. Mayne, E. C. Kaiser Wilhelm II, New York, 1926.

 

देशपांडे, अरविंद