नादिरशाह

नादिरशाह : (१२ ऑक्टोबर १६८८ – ९ मे १७४७). इराणचा एक बादशहा. तहमास्प कूलीखान किंवा नादीर कुलीबेग यानावांनीही तो इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म खोरासान येथे अफ्शार या उपजमातीत सामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील बकरीच्या कातडीचे कोट तयार करीत आणि विकीत असत. त्याला लहानपणी कोणतेच पारंपरिक शिक्षण मिळाले नाही पण त्यात संघटनाचातुर्य व धाडस हे गुण मात्र होते. या गुणांवर तो अहमद लूअफ्शारकडे नोकरीस लागला. त्यास अबिवर्द या प्रांताचे राज्यपालपदही मिळाले पण काही निमित्ताने तो अहमद लूंच्या मर्जीतून उतरला व काही दिवस उझबेक येथे राहिला. पुढे त्याने सुमारे ५,००० सैनिक जमा केले. या वेळी सफाविद वंशाची सत्ता कमकुवत झाली होती आणि ऑटोमन तुर्क व अफगाण यांची इराणवर वारंवारआक्रमणे होत. त्याने सफाविद वंशातील दुसरा तहमास्प यास गादीवर बसवून अनेक लढाया करून प्रदेश जिंकले व इराणचे राज्य वाढविले. तुर्कांपासून इराणचे प्रांत परत मिळविले पण तहमास्प हा दुबळा होता. म्हणून त्याने त्यास पदच्युत करून अब्बास या लहान मुलास गादीवर बसविले (१७३२) पण तो चार वर्षातच मरण पावला. तेव्हा सर्व सत्ता त्याने आपल्या हाती घेऊन शाह ही उपाधी धारण केली (१७३६).त्याने आपले राज्य कॅस्पियन समुद्रापर्यंत वाढविले आणि राज्य विस्ताराकरिता १७३७ मध्ये काबूलमार्गे त्याने हिंदुस्थानावर स्वारी केली. कर्नाळ येथे १७३८ मध्ये मोगल सैन्याचा पराभव केला. त्याने दिल्ली घेऊन पुन्हा मोगल बादशाहाची त्यावर स्थापना केली आणि अमाप लूट घेऊन इराणला परतला (१७३९). या लुटीत रत्‍नजडित मयूर सिंहासन व कोहिनूर हिरा या मूल्यवान वस्तू होत्या. या स्वारीनंतर तो अधिक जुलमी व क्रूर बनला. त्याची उर्वरित कारकीर्द लूट, जाळपोळ व रक्तपात ह्यांनी भरलेली होती. त्याने सुन्नी पंथ स्वीकारून इराणमधील सर्व शिया पंथीयांस सुन्नी पंथ स्वीकारण्यास सक्ती केली. पुढे रेझा कूली मिर्झा हा आपला कर्तबगार मुलगा गादी बळकावेल म्हणून त्यास त्याने आंधळे केले. तसेच अफगाणांचा त्याने उत्तरोत्तर अधिक छळ केला. या त्याच्या बहुविध क्रूर कृत्यांमुळे ज्या इराणने त्यास राष्ट्रीय नेता म्हणून डोक्यावर घेतले होते, त्याच इराणमधील लोकांनी त्याचा झांड जमातीच्या साहाय्याने मेशेद या गावी खून केला.

 

संदर्भ : Lockhart, Laurence, Nadir Shah :A Critical Study Based Mainly uponContemporary Sources, New York, 1938.

देशपांडे, सु. र.