बांसवाडा संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थान राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४,१११.३६चौ. किमी. लोकसंख्या सु. ३लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न सु ६.२५लाख रुपये. उत्तरेस परताबगढ-उदयपूर पश्चिमेस डूंगरपूर-सुंथ दक्षिणेस झालोड-झाबुआ-इंदूर व पूर्वेस सैलाना-रतलाम-परताबगढ ह्या संस्थानांनी सीमित झाले होले. संस्थानात १,२८७खेडी असून भोंगरा वा कालिंजर हे दोन शासकीय विभाग होते.१५३॰च्या सुमारास डूंगरपूरच्या उदयसिंहाच्या राज्याच्या वाटण्या होऊन धाकटा जगमाल याला मही नदीच्या अलीकडचा प्रदेश मिळाला व बांसवाडा संस्थान वेगळे झाले. ‘बांस’ (बांबू) किंवा भिल्ल-प्रमुख बास्ता यापासून हे नाव पडले असावे. राजवंश सिसोदिया राजपुतांपैकी आहाडिया शाखेचा. खुशालसिंहाने आग्नेयीकडील भाग भिल्लांकडून जिंकून त्याचे खुशालगढ नाव ठेवले. पृथ्वीसिंह (कार. १७४७-८६) याने शेरगढ परगणा बळकावला. १८१८ पासून संस्थान इंग्रजांना ३५,॰॰॰ सलीमशाही रुपये व १९॰४ पासून १७,५॰॰ इंग्रजी रुपये खंडणी देत असे. महारावळ लक्ष्मणसिंह (कार. १८४४-१९॰५) याच्या वेळी माजलेल्या बेबंदशाहीमुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस काही काळ येथे ब्रिटिश शासन हाते व त्याबद्दल संस्थान सु. ५,॰॰॰ रुपये वेगळे देई. महारावळ एक कामदार (दिवाणजी) व एक ठाणेदार यांच्या साह्याने कारभार पाही पण त्याला पूर्ण फौजदारी अधिकार नव्हते. ६३% प्रजा भिल्ल असून त्यांच्या शिक्षणासाठी आर्यसमाज व ख्रिस्ती मिशनरी यांनी प्रयत्न केले तथापि शिक्षण, आरोग्य दळणवळण या सर्वच बाबतींत संस्थान मागासलेले होते परताबगढातील सलीमशाही रुपया प्रचारात होता. १९४८ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.