फिनिशिया : भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर साधारणपणे १६० किमी. लांब व ३५ किमी. रुंद असा दक्षिणोत्तर पट्टा (सध्याचा सिरिया, लेबानन आणि पॅलेस्टाइन यांचा बराचसा भाग) म्हणजे प्राचीन फिनिशिया. तो पूर्व भूमध्य सागराच्या तीरावर उत्तरेस ऊगारीट (रास शॅमरा) पासून दक्षिणेस आको (एकर) पर्यंत पसरला होता. पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेस लेबाननच्या पर्वतरांगा, उत्तरेकडे आरवाड व दक्षिणेकडे माउंट कार्मेल अशा या प्रदेशाच्या चतुःसीमा होत्या. या प्रदेशात इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. दुसरे शतक या दरम्यान फिनिशियन संस्कृती विकसित झाली. फिनिशियन लोक हे सेमिटिक वंशाच्या काननाइट उपशाखेचे होते. त्यांच्या मूळ स्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. परंपरेनुसार ते पूर्वेकडून म्हणजे बहुधा बॅबिलन किंवा इराणी आखाताचा प्रदेश येथून त्यांच्या नव्या भूमीत इ.स.पू. ३००० च्या सुमारास आले असावेत. ते स्वतःला काननाइट म्हणवीत व स्वतःच्या भूमीला-पॅलेस्टाइनला-कानन (कॅनन) असेच संबोधीत. आरंभीच्या ग्रीक लेखकांच्या ग्रंथांतून त्यांचे याच नावाने किंवा त्याच्या अपभ्रष्ट स्वरूपात उल्लेख आलेले आहेत. त्यांची नावे अमार्ना इष्टिका लेखांत ‘काइनी’ तर बिब्‍लसच्या पुराणात ‘काइन’अशी आढळतात. फिनिशियन हे नाव त्यांना ग्रीकांनी दिले. फीनिक्स या शब्दाचा अर्थ तांबूस-जांभळा वा एक प्रकारचे ताडाचे झाड (सीडार) असा होतो. तांबूस-जांभळ्या रंगाच्या रंगीत कापडाच्या व्यापाराची मक्तेदारी फिनिशियन लोकांकडे होती आणि या नावाचा ताड फिनिशियाच्या किनाऱ्यावर वाढत असे यांवरून त्यांना फिनिशियन हे नाव मिळाले असावे. यांखेरीज प्राचीन वाङ्‌मयात त्यांना ‘सिडॉनियन’ असेही म्हटले आहे.

इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. ५०० दरम्यानच्या काळात भूमध्यसमुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर बिब्‍लस, टायर (सुर), सायडन (साइड), बेरूत, ऊगारीट यांसारखी अनेक लहानमोठी बंदरे व नगरे होती. फिनिशियनांना आपल्या व्यापारासाठी ती फार उपयुक्त होती. लेबाननच्या पर्वतरांगांनी फिनिशियाची भूमी पश्चिम आशियापासून अलग केल्यामुळे त्या पर्वतांच्या पूर्वेकडे फारसे लक्ष न देता फिनिशियन लोकांनी नौकानयनावर लक्ष केंद्रित करून समुद्रावर वर्चस्व मिळविले. तीनचार शतके सागरी व्यापारावर त्यांचा पूर्ण मक्ता होता. या अरुंद पण लांबट प्रदेशात अनेक बंदरे उदयास आली. त्यांपैकी बिब्‍लस, सायडन व टायर ही महत्त्वाची होती. यांशिवाय आको, ॲक्झीब, काइन, झॅरफॅथ, बेरूत, सिमिरा ही नगरे वेगवेगळ्या काळात भरभराटीस आली. फिनिशियाचे वैभव भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील त्यांच्या वसाहती व व्यापारी ठाणी यांवर अधिष्ठित होते. 

फिनिशियन लोकांची अनेक नगरराज्ये होती तथापि राज्यविस्ताराची वा साम्राज्यस्थापनेची त्यांना आकांक्षा नव्हती. व्यापारावरच त्यांचा भर होता. जी सत्ता प्रबळ असेल, तिच्याशी सलोख्याने राहावयाचे व प्रसंगी खंडणी द्यावयाची पण व्यापाराला धोका पोहोचू द्यावयाचा नाही, हे त्यांचे सर्वसाधारण धोरण असे. ईजिप्तच्या वर्चस्वातून मुक्त झाल्यावर दुसऱ्या कोणाचीही प्रत्यक्ष सत्ता फिनिशियात शिरकाव करणार नाही, याची खबरदारी मात्र त्यांनी घेतली आणि यासाठी वेळप्रसंगी प्राणपणाने लढून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. ईजिप्तच्या सत्तेचा ऱ्हास व ॲसिरियाचा उदय यांच्या मधल्या कालखंडात टायर या नगरराज्याच्या नेतृत्वाखाली या लोकांचे राष्ट्र उदयास आले.  

पुरातत्वीय अवशेषांवरून असे आढळले की, इ.स.पू. १८०० मध्ये किंवा त्याहून काही वर्षे आधी फिनिशिया हा ईजिप्तच्या अधिसत्तेखाली होता. या पहिल्या कालखंडात या सबंध प्रदेशावर ईजिप्तचे अधिराज्य होते. इ. स. पू. सोळाव्या शतकात पहिला आमोस (कार. इ. स. पू. १५७०-१५४५) व पंधराव्या शतकात तिसरा थटमोझ (कार. इ. स. पू. १४९०-१४३६) यांनी पॅलेस्टाइनवर स्वाऱ्या करून तेथील ईजिप्तचा अंमल पक्का केला. तत्कालीन लेखांत या देशाला दाही असे नाव आहे  यापुढे टेल अमार्ना येथील इष्टिका लेखांतून फिनिशियाविषयी पुष्कळच माहिती मिळते. त्यात ईजिप्तचे राज्यपाल व फिनिशियन नगरराज्यांचे संबंध आणि नगरराज्यांचे आपापसांतील मतभेद यांचे उल्लेख आहेत. इ. स. पू. चौदाव्या शतकात उत्तरेकडून हिटाइट व ॲमोराइट लोकांची आक्रमणे फिनिशियाच्या किनाऱ्यावर झाली. तिला ईजिप्तकडून फारसा प्रतिकार  झाला नाही. तेव्हा ईजिप्तची सत्ता झुगारून देण्याचा यत्न आरवाड, सायडन. सिमिरा नगरांनी केला मात्र याला टायर व जुबेल यांनी काही काळ विरोध केला. पहिला सेती (कार. इ. स. पू. १३०३- १२९०) व धर्मवेडा आक्‍नातन (कार. इ. स. पू. १३७९-१३६२) यांच्या वेळी ईजिप्तची राजकीय सत्ता कमकुवत झाली. दुसरा रॅमसीझ (कार. इ. स. पू. १२९०-१२३३) याने चिकाटीने पुन्हा बेरूतपर्यंतचा फिनिशिया जिंकला परंतु हे वर्चस्व फार काळ टिकले नाही. इ. स. पू. ९०० च्या पूर्वीच ईजिप्शियन फेअरोंचे फिनिशियावर वर्चस्व टिकविण्याचे प्रयत्‍न अयशस्वी झाले आणि नंतर त्यांना कधीच फिनिशियावर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.

ॲसिरियन सत्तेचा विस्तार होईपर्यंतच्या मधल्या काळात म्हणजे सु. दोनशे वर्षे फिनिशियाला स्वातंत्र्य उपभोगता आले. या सबंध कालखंडात फिनिशियन नगरांनी कोणाचेही मांडलिकत्व पतकरलेले नाही. आरंभी बिब्‍लसचा महिमा विशेष होता तरी थोड्याच अवधीत टायर या नगराचे नेतृत्व इतरांनी मान्य केल्याचे दिसते. इ. स. पू. ९७० ते ७७० या दोनशे वर्षांच्या काळात टायरचे वर्चस्व अबाधित राहिले. पहिल्या ह्यूरम (हिरॅम-कार. इ. स. पू. ९७०-९३६) राजाने भोवतालच्या राज्यांशी, विशेषतः  इझ्राएलशी खास मैत्रीचे संबंध प्रस्थापिले. त्याचा समकालीन इझ्राएली राजा सॉलोमन याच्या राजप्रासादासाठी व मंदिरासाठी इमारती लाकूड पाठविले व सॉलोमनने तेल आणि दारू यांच्या रूपाने त्याची परतफेड केली. तसेच गॅलिली हा प्रदेश सोने देऊन ह्यूरमने मिळविला, असे उल्लेख आहेत. फिनिशियाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आकाबाच्या आखातातून ओफर भागात अरबस्तानचा पूर्व किनारा वसाहती करण्यासाठी  काढलेली संयुक्त मोहीम होय. इथोबाल (कार. इ. स. पू. ८८७-८५५) हा या नंतरचा उल्लेखनीय राजा. त्याने ह्यूरमच्या शेवटच्या मुलाचा खून करून सत्ता काबीज केली. याच्या वेळी टायरची सत्ता सबंध फिनिशियावर होती व त्याला ‘सायडनचा राजा’ या नावानेही उल्लेखिलेले दिसते. याने आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर आवॅज नदीपर्यंत आपले ठाणे स्थापन केले. पुढे अंतःस्थ यादवी उद्‍भवून एका गटाने कार्थेज येथे वसाहत स्थापली (इ. स. पू. ८१४). या गटाचे नेतृत्व पिग्मेलयन राजाच्या बहिणीकडे होते, असे सांगतात.

इथोबालच्या कारकीर्दीपासूनच ॲसिरियाचा धोका वाढू लागला. दुसरा असुरनासिरपाल (कार. इ. स. पू. ८८३-८५९) याने इ. स. पू. ८६८ मध्ये टायर, सायडन, बिब्‍लस, आरवाड या शहरांकडून खंडणी वसूल करून समाधान मानले. चौथा शॅलमानीझर याने केलेला हल्ला त्यांनी परतविला. सारगॉन याने सायप्रस बेटाचा कबजा घेतला तरी खुद्द फिनिशिया अबाधितच राहिला. सेनॅकरिब याच्याविरूद्ध सायडनने बंड केले. यातून टायर व सायडन या दोन वरिष्ठ नगरराज्यांची मैत्री संपुष्टात आली आणि दुही उत्पन्न झाली. सायडनने पुन्हा बंड पुकारले आणि यावेळी मात्र एसार-हॅडन याने या नगरीचा पूर्ण नाश केला (इ. स. पू. ६७९). थोड्याच काळात नवीन नगरे वसविण्यात आली.  


ॲसिरियाने इ. स. पू. ८४२ मध्ये महत्त्वाच्या फिनिशियन नगरांवर ताबा मिळविला. यानंतरची सु. २०० वर्षे फिनिशिया ॲसिरियाच्या आधिपत्याखाली होता. अधुनमधून काही नगरराज्यांतून या सत्तेस विरोध होई. इ. स. पू. ६१२ मध्ये ॲसिरियाची अवनती झाल्यानंतर नव-बॅबिलोनियन किंवा खाल्डियन अधिसत्तेखाली काही काळ फिनिशिया होता पण यासाठी दुसऱ्या नेबुकॅड्‍नेझरला फार मोठा लढा द्यावा लागला. त्याने टायर नगराला सु. १३ वर्षे वेढा दिला होता. अखेर इ. स. पू. ५७३ मध्ये त्याचा पराभव झाला व खाल्डियनांच्या ताब्यात फिनिशिया आला. यानंतर लवकरच सायरस द ग्रेटने बॅबिलोनियाचा पराभव करून ते सर्व राज्य इराणी साम्राज्यात एक स्वतंत्र प्रांत म्हणून समाविष्ट केले. यावेळी टायरचे महत्त्व कमी होऊन सायडनचे व्यापारी महत्त्व वाढले. फिनिशियनांच्या जहाजबांधणी उद्योगास चालना मिळून इतर नगरांचाही विकास व भरभराट झाली. ग्रीसबरोबरच्या इराणी युद्धांत (इ. स. पू. ४९८- इ. स. पू. ४७९) फिनिशियन आरमाराने प्रशंसनीय कामगिरी बजावली. तत्संबंधी हीरॉडोटस म्हणतो, ‘सायडनचा राजा इराणच्या झर्क्सीझनंतर दुसरा नेता म्हणून चमकत होता’ परंतु ग्रीकांनी या नौदलातील तुकडीचा सॅलमिसच्या लढाईत दारूण पराभव केला (इ.स.पू. ४८०). त्यानंतर साहजिकच फिनिशिया मॅसिडोनियाच्या अलेक्झांडर द ग्रेट (कार. इ.स.पू. ३३६-३२३) याच्या अंमलाखाली आला. अलेक्झांडरने इ.स.पू. ३३२ मध्ये अभेद्य अशी टायरची तटबंदी फोडून ते नगर काबीज केले आणि इराणी सम्राट तिसरा डरायस याचा पराभव केला. अर्थात त्याला फिनिशिया व सायप्रसच्या आरमाराची मदत मिळाली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यात सत्तेसाठी यादवी माजली आणि ईजिप्त व सिरिया यांत फिनिशियन नगरे, त्यांचा जहाजबांधणी उद्योग व इतर व्यापार-उदीम यांसाठी युद्ध झाले. काही वर्षे ईजिप्तच्या टॉलेमींनी फिनिशियावर सत्ता गाजविली. या सुमारास ग्रीकांश संस्कृतीच्या प्रसारामुळे फिनिशियात भाषा, चालीरिती या सर्वांवर ग्रीक छाप पडली होती. इ.स.पू. ६४ मध्ये रोमन सेनापती पॉम्पी द ग्रेट याने फिनिशिया हा रोमन साम्राज्यातील सिरिया प्रांताचा एक भाग केला. रोमनांनी फिनिशियातील सायडन, टायर, बेरूत आदी नगरांत विधिविद्यालये स्थापन केली. यामुळे सायडन व टायर ही व्यापाराबरोबरच विद्या केंद्रे बनली. पुढे इ.स. ६०० नंतर सिरियासह फिनिशिया मुस्लिम आक्रमणास बळी पडला.

फिनिशियन संस्कृतीच्या समृद्धीचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या वसाहती होत. वसाहतींकडून देवतेच्या नावाने राज्यास वार्षिक खंडणी येई. इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत कार्थेजसारखी प्रबळ वसाहतसुद्धा टायरच्या मेलकार्ट या देवतेला वार्षिक खंडणी पाठवीत असे. जसजशी फिनिशियन सत्ता कमकुवत होत गेली, तसतशा या वसाहती स्वतंत्र झाल्या. फिनिशियनांनी स्पेनचा दक्षिण किनारा, आफ्रिकेचा उत्तर किनारा आणि सिसिलीचा पश्चिम किनारा यांना लागून वसाहती स्थापन केल्या. ग्रीकांपूर्वी पश्चिमेकडील भूमध्य समुद्रास ‘फिनिशियन सरोवर’ म्हटले जाई. सागरतळाशी चाललेल्या आधुनिक संशोधनातून भूमध्य समुद्रात सर्वत्र फिनिशियन जहाजांचे अवशेष मिळाले आहेत. टायरने वसाहतींच्या स्थापनेत फार मोठा वाटा उचललेला दिसतो. इ.स.पू. १२०० च्याही आधीपासून ईजिप्तशी फिनिशियन खलाशी व्यापार करताना दिसतात. त्या वेळी त्यांची स्वतंत्र अशी वसाहत नव्हती पण मेंफिस नगरीत त्यांची एक स्वतंत्र पेठ होती. येथून पश्चिमेकडे सिसिलीच्या समोर ⇨ कार्थेज ही मात्र त्यांची मोठी वसाहत होती. तिच्यामुळे फिनिशियाचा प्रभाव पश्चिमेकडे वाढला. जिब्राल्टरजवळ किनाऱ्यावर तँजिअर येथे व उत्तरेकडे स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावरील कादिझ येथेही त्यांनी वसाहती स्थापन केल्या. इंग्‍लंडच्या नजीक असलेल्या सिली बेटावरील कथिलाच्या खाणींजवळ त्यांनी वस्ती केली व खुद्द इंग्‍लंडमध्येही फिनिशियन वसाहत असावी. स्पेनच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर तार्शिश किंवा तारतेशस येथे त्यांचे एक ठाणे होते. त्याच्या जवळच चांदीच्या मोठ्या खाणी होत्या. त्यांनी किती चांदी मिळवली याच्या अनेक मनोरंजन कथा प्रचलित आहेत. यूरोपच्या दक्षिण किनार्‍यावर मार्से, कॉर्सिका व सार्डिनिया बेटे तसेच मॉल्टा, सिसिली, मिलॉस व रोड्‌झ येथेही त्यांची ठाणी होती. सायप्रसवर सिशीयम येथे इमारती लाकूड व तांबे यांचे उत्पादन होई म्हणून तेथेही त्यांची वसाहत होती. याशिवाय इजीअन समुद्राच्या किनाऱ्यावर आणि आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अनेक फिनिशियन व्यापारी ठाणी व वखारी होत्या. या सर्व नगरांत राजसत्ता होती व राजसत्ता ईश्वरदत्त असल्याची समजूतही प्रचलित होती तथापि अभिजनवर्गाचे प्रशासनात प्राबल्य होते. इ.स.पू. आठव्या शतकात वडीलधाऱ्या व्यक्तींचे मंडळ राजाला सल्ला देई व त्यास प्रशासनास मदत करी. पुढे नगरांची शासनव्यवस्था शोफेट नावाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली. राज्यकारभारावर एकूण धनाढ्य श्रेष्ठींचे नियंत्रण असे. त्यांच्या खालोखाल प्रशासनात प्रमुख पुरोहिताचे स्थान असे.

 फिनिशियन लोक हे काननच्या इतर रहिवांशाप्रमाणे निसर्गपूजक होते. सुरुवातीला पृथ्वी, शेते, तळी, पर्वत या निसर्गदेवतांची पूजा होई. याशिवाय वेगवेगळ्या नगरांच्या नगरदेवता असत. प्रत्येक शहराचा एक स्वतंत्र देव (बाल) असे. त्याची एक स्वतंत्र स्त्री देवता असे. तिला बेअलॅथ म्हणत. टायरच्या बालला मेलकार्ट म्हणत. हर्क्यूलीझप्रमाणे हा शक्तीचा देव मानण्यात येई. त्याशिवाय सिडॉनचा बाल, बिब्‍लसची ब्‍लाथ, कार्थेजचा टॅनिस ह्याही इतर नगरदेवता होत्या. फिनिशियन इश्तारला ग्रीक अश्तार्त म्हणत. सामर्थ्याचा अध्यक्ष एश्मुन, सायप्रसचा रीशेफ हा अग्‍नी किंवा विद्युलता यांचा देव यांखेरीज सूर्य, चंद्र, आकाश या निसर्गदेवतांची पूजा प्रचलित होती. प्रत्येक टेकडी वा झाड हे ईश्वराचा प्रतीक मानण्यात येई. शंकूच्या आकाराचे दगडही पूजामूर्ती म्हणून वापरले जात. देवालयासमोर बलिदानासाठी स्थंडिल व स्तंभ असत. यांच्या यज्ञांमध्ये मानवी बलिदान प्रचलित होते. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी देवतेस संतुष्ट करण्यासाठी मानवी बळी देण्याची पद्धत होती. विशेषतः मोलॅख देवतेसमोर लहान मुलांना बळी म्हणून जिवंत जाळण्यात येई. अश्तार्तच्या देवालयात स्त्रिया आपल्या कौमार्याची आहुती देत. यांतून देवदासींसारखा वर्ग निर्माण होई व स्वैराचारही माजे. देवालयांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती व त्यांवर पुरोहित, ज्योतिषी, व्यवस्थापक इ. लोकांचा निर्वाह होई.  

फिनिशियन पुराणग्रंथांत जग उत्पत्तीच्या कथा सापडतात. त्यांचे इतरही ग्रंथ आहेत. या सर्वांवर आरंभी बॅबिलोनियन व नंतरच्या काळात ग्रीक परंपरेची छाप स्पष्ट दिसते. मृतांना इतमामाने पुरण्यात येई. त्यासाठी सुशोभित व नक्षीदार शवपेटीका वापरीत. स्वतंत्र संस्कृतीचे निर्माते यापेक्षा अनेक संस्कृतींचा संगम घडवून आणणारे लोक, म्हणून फिनिशियन जास्त ख्यातनाम आहेत. 

फिनिशियन भाषा सध्या अस्तित्वात नाही आणि फिनिशियन असे साहित्यही फार थोडे उपलब्ध आहे. ही भाषा सेमिटिक भाषा कुटुंबातील काननाइट या प्रमुख उपविभागातील असून इसवी सनापूर्वी फिनिशियाच्या व्यापारी शहरांतून ती सु. १५०० वर्षे बोलली जात होती. एवढेच नव्हे तर फिनिशियाच्या कार्थेजसारख्या वसाहतींतूनही ती प्रचारात होती. फिनिशियन कोरीव लेख सायप्रस, ग्रीस, मॉल्टा, सिसिली, सार्डिनिया, मार्से, ॲव्हिन्यों, स्पेन इ. प्रदेशांत आढळले आहेत. फिनिशियन क्यूनिफॉर्म लिपीचा वापर करीत असावेत. त्यांचीसुद्धा स्वतःची लिपी असावी, असा तज्ञांचा कयास आहे. त्यांच्या वर्णक्रमात २२ अक्षरे होती व ती बिब्‍लसमध्ये इ.स.पू. १५०० मध्ये वापरात असलेली आढळली. [→ फिनिशियन लिपि]. 


 बिब्‍लस येथील उत्खननांत विविध प्रकारचे फिनिशियन अवशेष उपलब्ध झाले आहेत तथापि जडजवाहीर, मृत्पात्रे, काचकामाचे नमुने, मातीची खेळणी, हस्तिदंती मूर्ती, काष्ठकलेचे नमुने, धातूंच्या वस्तू इ. कलात्मक फिनिशियन वस्तू भूमध्य समुद्रकाठच्या विविध प्रदेशांत व आशिया मायनरमध्ये मिळतात. ही एक व्यापारी संस्कृती असल्यामुळे त्यांच्या कलेवर व्यापारानिमित्त झालेल्या देवाणघेवाणीची छटा स्पष्ट दिसते. फिनिशियन कलावस्तूंवर ईजिप्शियन, इजीअन व सिरियन उपमानकांचा ठसा आढळतो. फिनिशियन उत्थित शिल्पकला फारच थोडी अवशिष्ट आहे तथापि उठावाचे नक्षीकाम भरपूर प्रमाणात आढळते. बिब्‍लस येथे सापडलेली इ.स.पू. अकराव्या शतकातील चुनखडीच्या दगडातील ह्यूरम राजाची शवपेटीका या दृष्टीने उल्लेखनीय आहे. लाकूड आणि हस्तिदंत यांवरील कोरीव काम ही फिनिशियन लोकांची खास कला होय. याशिवाय फिनिशियन लोक धातूकामात विशेषतः ब्राँझचे व सोन्याचे अलंकार यांत कुशल होते. काचवस्तूंच्या निर्मितीचे श्रेय फिनिशियन लोकांकडेच जाते. त्यांनी धातूंच्या भांड्यांवर कृत्रिम वेलबुट्टी व फुले यांची नक्षी काढलेली आढळते. फिनिशियन लोक अनेक अनुप्रयुक्त कलांतही वाकबगार होते, असे परंपरा सांगते. जेरूसलेम येथे इ.स.पू. दहाव्या शतकात बांधलेले ब्रेझन स्तंभांचे व सीडार लाकडाचे मंदिर त्या वेळी प्रसिद्ध होते.

१. ब्राँझची लघुमूर्ती, रास शॅमरा, ख्रि.पू. दुसरे सहस्रक. २.पक्वमृदेची अलंकृत बाहुली, ईव्हीया, ख्रि. पू. ५ वे - ४ थे शतक. ३. टानिट देवतेचा प्रतीकात्मक चुनखडी स्तंभ, कार्थेज, ख्रि. पू. ५ वे शतक. ४. न्यूझी मृत्पात्र : एक वैशिष्ट्यपूर्ण पेला, अलालाख, ख्रि. पू. १५०० - १२०० . ५. ब्राँझच्या खोबणीची दगडी कुऱ्हाड, ऊगारीट, ख्रि.पू. १४२० - १३६५. ६. दंडगोल मुद्रा, ख्रि. पू. २ रे सहस्रक. ७. फिनिशिअन मृत्पात्राचा नमुना.

फिनिशियन लोक दर्यावर्दी असून विविध नगरांतून जहाजबांधणी कारखाने होते. फिनिशियन जहाजे अरुंद व साधारण अठरा ते चोवीस मीटर लांब पण तत्कालीन इतर जहाजांपेक्षा बळकट व वेगवान असत. पुढील बाजूला जहाजाचे निमुळते टोक असे. जहाजाच्या मध्यभागी एक चौकोनी शीड आणि वल्हविण्यासाठी दुतर्फा गुलामांचा मोठा ताफा असे. त्यांच्या वरच्या मजल्यावर खुद्द फिनिशियन लोक असत. जहाजे किनाऱ्याकिनाऱ्याने पुढे जात. फिनिशियन खलाशी हे महाधाडसी म्हणून प्रसिद्ध होते. धाडस व नौकानयनातील कौशल्य यांमुळे सागरी व्यापारातील आपली मक्तेदारी त्यांनी टिकविली. 

त्यांच्या व्यापारात अनेकविध वस्तूंचा समावेश होई : आशियातील देशांतून धान्य, कापड, हिरे-माणिकादी मूल्यवान जडजवाहीर यांसारख्या वस्तू ते भूमध्य समुद्रतीराच्या देशांना पोहोचवीत. उलट दिशेने येणाऱ्या मालात शिसे, चांदी व पुढे पुढे लोखंड यांचे प्रमाण मोठे असे. हा सगळा माल तुर्कस्तानचा उत्तर किनारा व काळा समुद्र या भागांतून येई. सायप्रसमधून तांबे, इमारती लाकूड व धान्य येई. आफ्रिकेतून हस्तिदंत, स्पेनमधून चांदी व इंग्‍लंडमधून वा आसपासच्या बेटांतून कथिल यांची आयात ईजिप्त व बॅबिलन या प्रदेशांत केली जाई. गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चाले. जिकडून कच्चा माल आणीत तिकडेच तयार मालही विक्रीला नेत. फिनिशियन भूमीवर हरतऱ्हेचे उद्योगधंदे भरभराटीस आले होते. त्यात लाल रंग तयार करण्याचा सर्वांत महत्त्वाचा उद्योग होता. ईजिप्तमधून त्यांनी बहुरंगी काचकामाची विद्या आत्मसात केली होती. त्यामुळे हरतऱ्हेच्या काचेच्या वस्तू तसेच एनॅमलच्या वस्तू ते तयार करीत. तांब्याचे दागदागिने आणि तांब्याची व लोखंडाची हत्यारेही ते तयार करीत. खुद्द टायर नगरीतील आल्हाददायक रंगांतील भरतकाम व विणकाम हे व्यवसाय प्रसिद्ध होते. स्त्रियाच हे व्यवसाय करीत.

आंतराष्ट्रीय व्यापारातून फिनिशियन लोक जसे वस्तूंची देवाणघेवाण करीत, त्याचप्रमाणे या निरनिराळ्या देशांच्या सांस्कृतिक कल्पना व ज्ञान त्यांनी परस्परांकडे पोहोचविले. ग्रीकांनी त्यांची वर्णमाला व लिपी आत्मसात केली. ॲसिरियन व बॅबिलोनियन कथापुराणे फिनिशियाद्वारेच ग्रीसपर्यंत पोहोचली. अशा प्रकारे प्राचीन जगतातील आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रांत परस्पर संबंध वाढविण्यात व दृढ करण्यात फिनिशियनांचा वाटा मोठा होता. 

पहा : कार्थेज प्यूनिक युद्धे.

संदर्भ : 1. Bury, J. B. Cook, S. A. Adcock, F. E. Ed. The Cambridge Ancient History, Vol. III, Cambridge, 1960.                                                               

  2. Hill, Christopher, Ed. History and Culture, Vol. I, London, 1977.

  3. Moscati, Sabatino, Trans. The World of the Phoenicians, London, 1968.

  4. Rawilson, George, Phoenicia, New York, 1972.

माटे, म. श्री.