सखारामबापू बोकील : (?- ? १७८१). उत्तर पेशवाईतील एक प्रसिद्ध मुत्सद्दी. त्याचे पूर्ण नाव सखाराम भगवंत बोकील. त्याच्या पूर्वजीवनाविषयी माहिती ज्ञात नाही. त्याचे पूर्वज पणतोजी (पंताजी) गोपीनाथ हे अफझलखानाकडे छ. शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन गेलेले वकील होते (१६५९). सखारामबापूचा चुलतभाऊ महादजी यमाजी छ. संभाजी महाराजांच्या सेवेत होता. रायगडच्या पाडावानंतर तो छ. शाहूंबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होता. पुढे शाहूंनी त्यास हिंवरे गाव व कुलकर्णी वतन करून दिले. त्यास पुत्रसंतती नव्हती म्हणून बापूचा जेष्ठ भाऊ निंबाजीस ते वतन वारसाहक्काने मिळाले. बापूचा उल्लेख शनिवारवाडयाच्या बांधकामप्रसंगी (१७३२) मिळतो. सुरूवातीस सखारामबापू महादजीपंत पुरंदरे याच्याकडे कारकून व शिलेदार होता. बाळाजी बाजीरावाने त्यास १७४६ मध्ये सदाशिवरावभाऊंबरोबर कर्नाटकच्या स्वारीवर पाठविले. या स्वारीत त्याने भरपूर धनदौलत जमवून छ. शाहूंचे कर्ज फेडले. पुढे रघुनाथरावांबरोबर गुजरात (१७५४) व उत्तर हिंदुस्थान (१७५८) अशा दोन स्वाऱ्यांत त्याने भाग घेतला. पेशव्यांनी रघुनाथरावांचा कारभारी म्हणून त्याची नियुक्ती केली. राघोबा बापूच्या तंत्राने वागत असे. थोरल्या माधवरावांच्या वेळी (१७६१-७२) सुरूवातीस राघोबा बापूच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार पाहत असे. माधवरावांनी त्यात हस्तक्षेप करताच बापूने कारभारीपद सोडले. तत्पूर्वी रघुनाथरावांनी (१७६२) निजामाचा पराभव केला पण सखारामबापूच्या सांगण्यावरून त्याचा पुरता मोड केला नाही. उलट निजामअली व जानोजी भोसले यांची मदत घेऊन पेशव्यांचा पराभव केला, तेव्हा चुलता-पुतण्यात समझोता होऊन पुन्हा राघोबा वरचढ झाला. त्याने बापूस कारभारी नेमून पेशव्यांचे समर्थक गोपाळराव पटवर्धन यांची जहागीर जप्त केली आणि सखारामबापूस नऊ लाखांची जहागीर दिली.

कर्नाटकात हैदर अलीवरील १७६४ च्या लढाईचे सर्व अधिकार माधवरावांनी घ्यावेत, असा बापूने आगह धरला. माधवरावांनी या युद्घप्रसंगी बापूस बरोबर घेतले. माधवराव युद्धाच्या हालचालींत बापूचा सल्ला घेत मात्र यानंतर बापूची लाच घेण्याची सवय आणि वाढलेला प्रभाव, त्यांना जाचक वाटू लागला. त्यांनी राघोबास १७६८ मध्ये नजरकैदेत ठेवल्यानंतर बापूची कारभारी पदावरून उचलबांगडी केली पण त्याची जहागीर पूर्ववत त्याच्याकडेच ठेवली. मरणापूर्वी माधवरावांनी बापूची योग्यता लक्षात घेऊन त्यास पुन्हा कारभारी नेमले आणि त्याच्या समक्ष राघोबास भावाचा (नारायणराव) सांभाळ करण्यास सांगितले (१७७२). नारायणरावांच्या कारकीर्दीत (१७७२-७३) बापूच राज्यकारभार पाहत असे. नारायणरावांच्या खुनानंतर निजामावरील स्वारीत बापू होता (१७७४) परंतु काहीतरी निमित्त साधून तो माघारी आला व बारभाईंच्या कारस्थानात सामील झाला. नाना फडणीस व मंडळींनी त्याच्याकडेच राज्यकारभाराचे सर्वाधिकार दिले.

बारभाईंच्या कारभारात नारायणरावांची पत्नी गंगाबाईच्या निधनानंतर बापू व नाना यांत मतभेद झाले. शिवाय नारायणरावांच्या खुनात बापूचा प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी कारस्थानात त्याचा हात होता. पुढे मोरोबादादा फडणीसाने इंगजास राघोबाला घेऊन येण्याविषयी विनंती केली. तिला बापूची अंतस्थ संमती होती. पुढे इंग्रज व रघुनाथराव यांजबरोबर बारभाईंच्या वडगाव तहप्रसंगी (जानेवारी १७७९) बापूचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला, तेव्हा नानांनी त्यास कैद केले (१७७९) आणि प्रथम सिंहगडावर आणि नंतर प्रतापगड व रायगड येथे ठेवले. तिथेच त्याचे देहावसान झाले. मृत्यूसमयी त्याच्याजवळ आठ लाखांची मिळकत होती.

बापू चाणाक्ष, प्रसंगानुसार वर्तन करणारा, अत्यंत व्यवहारी व लोभी होता. तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्याने हितसंबंध जपले होते. तो स्वत: लढवय्या नसला, तरी फौज बाळगून होता. त्याचे सालिना उत्पन्न पाच लाख होते. कर्तृत्व, मुत्सद्दीपणा आणि नैसर्गिक बुद्धीमत्ता यांच्या जोरावर त्याने पानिपतपासून (१७६१) वडगावच्या तहापर्यंत मराठयांच्या राजकारणावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला. त्यामुळे त्याची साडेतीन शहाण्यांतील एक पूर्ण शहाणा, अशी ख्याती झाली.

पहा : बारभाई कारस्थान.

देशपांडे, सु. र.