छत्तरपूर संस्थान मध्य प्रदेश राज्यातील एक जुने संस्थान. क्षेत्रफळ २,७९७ चौ.किमी. लोकसंख्या सु. पावणेदोन लाख (१९४१). उत्पन्न सु. साडेसात लाख रुपये. उत्तरेस हमीरपूर जिल्हा व चरखरी संस्थान, पूर्वेस केन नदी, पश्चिमेस बिजावर-चरखरी संस्थाने, दक्षिणेस बिजावर-पन्ना संस्थाने व दमोह जिल्हा यांनी ते सीमित झाले होते. छत्तरपूर, राजनगर, लौरी, देवरा असे चार तहसील व ४२१ खेडी त्यात समाविष्ट होती. पन्नाचा राजा सर्नतसिंह याने १७८४ च्या सुमारास मूळच्या ग्वाल्हेर रियासतीतील सोनेशाह पवार (पमार) या आपल्या सेनापतीला दिलेल्या जहागिरीतून या संस्थानाचा जन्म झाला. मस्तानीचा नातू अलीबहादुर याने बुंदेलखंडावर १७९० च्या सुमारास सत्ता स्थापिली. तेव्हा छत्तरपूर त्यांचे मांडलिक झाले. अठराव्या शतकाच्या अखेरीस सोनेशाह अलीबहादुराचा नाममात्र मांडलिक होता. त्याने १८०६ मध्ये इंग्रजांची मांडलिकी पतकरून त्यांना छत्तरपूर, मऊ वगैरे भाग दिला. तो दोन वर्षांनी त्यास परत मिळाला. तो अलीबहादुरला देत असलेली सु. १८,००० रु. खंडणी मात्र माफ झाली. सोनेशाहाच्या मृत्यूनंतर (१८१६) त्याच्या इतर मुलांना जहागिरी देऊन बाकीचे राज्य इंग्रजांनी प्रतापसिंह या मुख्य वारसाला दिले. भावांच्या मृत्यूनंतर त्या जहागिरीही संस्थानात समाविष्ट झाल्या. प्रतापसिंहाने पुतण्या जगतराज याला दत्तक घेतले. त्याला १८५४ मध्ये मान्यता मिळाली. अल्पवयीन राजे आणि विधवा राणी यांनी १८५७ च्या काही बंडखोरांना आश्रय दिला. त्यामुळे १८८७ पर्यंत इंग्रज प्रशासकच कारभार पहात होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पक्क्या सडका, डाक, तार, सरकारी शिक्षण अशा थोड्याफार सुधारणा झाल्या. छत्तरपूर हीच राजधानी होती. ती अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात छत्रसालाने वसविली. संस्थानातील खजुराहोची मंदिरे कामशिल्पांकरिता जगप्रसिद्ध आहेत. १९४८ मध्ये विंध्य प्रदेश व १ नोव्हेंबर १९५६ पासून मध्य प्रदेश या राज्यात संस्थानचा प्रदेश समाविष्ट झाला.

कुलकर्णी,ना. ह.