फिलिस्टाइन : (लोक). पॅलेस्टाइनच्या नैर्ऋत्येस म्हणजे विद्यमान इझ्राएल देशाच्या किनाऱ्यावर ८० किमी. लांबीच्या पट्‌ट्यात इ.स.पू. १२०० ते इ.स.पू. ५०० या काळात सत्ताधारी असलेली एक प्रबळ जमात. हिब्रू लोकांपूर्वीच हे लोक या प्रदेशात इजीअन बेटांतून विशेषतः क्रीटमधून येऊन स्थायिक झाले असावेत तथापि त्यांच्या मूलस्थानाविषयी तसेच ते सेमिटिक वंशाचे होते किंवा काय, यांबद्दल तज्ञांत मतभेद आहेत. काही तज्ञांच्या मते ते ईजिप्तमधील गाझाच्या आग्‍नेयीस असलेल्या गिरार प्रदेशातून आले असावेत. दर्यावर्दी जीवन व चाचेगिरी ही फिलिस्टाइन लोकांची वैशिष्ट्ये होती. ॲशदॉद, गाझा, ॲश्केलॉन यांसारखी भूमध्य समुद्रावरील बंदरे व गॅथ, एक्रान ही अंतर्भागातील नगरे त्यांच्या आधिपत्याखाली होती. उत्तरेकडील विद्यमान जाफा बंदरापासून दक्षिणेस ईजिप्तच्या उत्तर सीमेपर्यंतचा किनारी प्रदेश त्या वेळी फिलिस्टिया म्हणूनच ओळखला जाई. ईजिप्त-सिरिया व्यापारी मार्गावरील मोक्याची सर्व बंदरे त्यांच्या ताब्यात होती. फिलिस्टाइन लोकांनी हिटाइटांपासून लोखडांची अवजारे बनविण्याची कला आत्मसात केली. लोखंडाची चिलखते व हत्यारे ते बनवीत. ईजिप्तच्या तिसऱ्या रॅमसीझने (कार. इ.स. पू. ११९८-११६७) त्यांचा पराभव केला होता तथापि फिलिस्टाइन जमातीची राजकीय संघटना जबरदस्त होती. त्यामुळे ईजिप्तचे वर्चस्व फार काळ टिकले नाही. हिब्रू व फिलिस्टाइन यांचा सत्तासंघर्ष मात्र दीर्घकाल चालू होता. फिलिस्टाइनांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी हिब्रू लोकांनी जोरदार प्रयत्‍न केले. सॉल राजाचे कार्य पुढे डेव्हीड व त्याचा मुलगा सॉलोमन यांनी चिकाटीने चालवून इ.स.पू. दहाव्या शतकाच्या शेवटी शेवटी फिलिस्टाइन लोकांचा पुरा मोड केला. पुढे फिलिस्टियाला ज्यू राज्याचे मांडलिकत्व पतकरावे लागले तथापि या संघर्षाचा शेवट मॅकबीझच्या (इ.स.पू. पहिले शतक) काळात झाला. या ज्यू राजाने फिलिस्टाइन लोकांचे वर्चस्व कायमचे नष्ट केले. पॉम्पी (इ.स.पू. १०६-४८) याच्या काळात फिलिस्टिन रोमन साम्राज्याचा एक भाग बनला. हिब्रू लोकांनी फिलिस्टाइन लोकांचा समाज, संस्कृती यांची नावनिशाणीही पुसून टाकली. ‘पॅलेस्टाइन’ हे नाव ‘फिलिस्टाइन’ या शब्दावरून रूढ झाले असावे. आधुनिक काळात विशेषतः एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून फिलिस्टाइन वा ‘फिलिस्टिनिझम ’ या संज्ञा निंदाव्यंजक मानल्या जातात व त्यांचा अर्थ स्थूलमानाने असंस्कृत, अडाणी, हीन अभिरुचीचा, सामान्य प्रतीचा, केवळ व्यावहारिक वा भैतिक दृष्टीकोनाचा अशा विविध प्रकारे केला जातो. जर्मन विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘फिलिस्टर ’ हा शब्द प्रथम विद्यापीठीय शिक्षण न घेतलेल्या असंस्कृत लोकांना उद्देशून वापरला. इंग्‍लिश लेखक मॅथ्यू आर्नल्ड (१८२२- १८८८) याने ‘फिलिस्टाइन’ संज्ञा आपल्या कल्चर अँड अनार्की (१८६९) या ग्रंथात अशाच निंदाव्यंजक अर्थाने वापरली. कलेतील नावीन्याला विरोध करणाऱ्यांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाते.

संदर्भ : 1. Burn A. R. Minoans, Philistines and Greeks, London, 1968.

2. Macalister, Robert, The Philistines, Chicago, 1965.

माटे, म. श्री.