मायलीटस : प्राचीन ग्रीक संस्कृतीतील बारा आयोनीय शहरांपैकी एक प्रसिद्ध समृद्ध नगरी. पश्चिम आशिया मायनरमधील एक प्राचीन बंदर म्हणून त्याची ख्याती होती. ते मीअँडर नदीच्या मुखापाशी आधुनिक तुर्कस्थानात सॅमोसच्या आग्नेयीस वसले होते. इ. स. पू. १००० मध्ये इथे प्रथम आयोनीय लोकांनी प्रवेश केला. तेथे मिनोअन काळापासून केरिअन लोक राहत होते. आयोनीय लोकांनी तेथील पुरुषांची कत्तल करून त्यांच्या विधवा स्त्रियांबरोबर लग्ने केली. त्यामुळे संकर संततीला प्रारंभ झाला आणि ग्रीक संस्कृती मायलीटसमध्ये भिन्न स्वरुपात दृढावली. इ. स. पू. सातव्या शतकात येथील रहिवाश्यांनी-व्यापाऱ्यांनी भूमध्य सागराच्या पूर्व भागात आणि विशेषतः काळ्या समुद्राच्या काठी अनेक व्यापारी वसाहती स्थापन केल्या. या कामात आयोनीयाचे नेतृत्व मायलीटस नगरीने केले आणि खुद्द मायलीटसच्या नागरीकांनी ऐंशी वसाहती स्थापन केल्या. त्यांतील साठ वसाहती उत्तरेला होत्या आणि शिवाय ईजिप्त, इटली, प्रोपोन्टिस, यूक्सीन आदी प्रदेशांतही स्थापन केल्या. त्यात नाईलच्या मुखावरील नॉक्रेटिस या प्रमुख व्यापारी केंद्राचीही गणना होते. मायलीटसचे नागरिक हे उत्कृष्ट दर्यावर्दी आणि व्यापारी वृत्तीचे होते. आबायडॉस, सिझिकस, सिनॉप, आल्बिया, ट्रपेझस व डायोस्कृरिअस यांच्याकडून मायलीटस क्षौम, लाकूड, फळे, धातू इ. वस्तूंची आयात करी आणि त्याबदल्यात हस्तव्यवसायाद्वारे केलेल्या अनेक वस्तू निर्यात करी. या देवाणघेवाणीमुळे भिन्न प्रदेशांच्या संस्कृतीशी मायलीटसचा परिचय झाला परिणामतः व्यापारापाठोपाठ त्यांनी ज्योतिष, भूगोल, तत्त्वज्ञान, काव्य, भूमिती इ. भिन्न विषय आत्मसात केले आणि तत्त्वज्ञानाची देणगी जगाला दिली. थेल्स, अनॉक्सिमँडर, झेनोफेन, प्रोटॅगोरस, हिपॉक्राटीझ, डीमॉक्रिटस वगैरे तत्त्वज्ञ-विद्वान मंडळी मायलीटसमध्ये निर्माण झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांबरोबर याही क्षेत्रात प्रगती झाली. साहजिकच सुबत्तेमुळे हे आयोनियाचे सांस्कृतिक केंद्र झाले व तंत्रज्ञानाबरोबरच येथे साहित्य-कला यांचीही प्रगती झाली या सधन आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या नगराला पुढे स्वातंत्र राखणे अशक्य झाले. इ. स. पू. ६०० मध्ये थ्रॅसब्यूलस व हिस्टिएअस हे हुकूमशाह जन्माला आले. याशिवाय लिडियापासून रोमपर्यंत सर्व साम्राज्यांनी मायलीटसवर ताबा मिळविण्याचा यत्न केला आणि परस्परातील हेव्यादाव्यातून उद्‌भवणाऱ्या युद्धात मायलीटसची वेळोवेळी खूप हानीही झाली परंतु अन्तर्गत शासन (एकतंत्री किंवा श्रेष्ठीसत्ताक) हे काही काळ व्यापार-उत्पादन या व्यवसायास पोषक असल्याने कोणतीही परकीय सत्ता फार काळ स्थिरावली नाही.

त्यानंतर मात्र हळूहळू इराणी वर्चस्व मायलीटसमध्ये वाढू लागले. येथील आयोनीय ग्रीकांनी इराणविरुद्ध बंड केले. (इ. स. पू. ४९९). पुढे इराणने इ. स. पू. ४९४ मध्ये हे शहर उद्‌ध्वस्त केले. त्यानंतर ग्रीकांनी इराण्यांचा इ. स. पू. ४७९ मध्ये पराभव केला. तेव्हा मायलीटस डेलियन संघात सामील झाले. यानंतरचा मायलीटसचा इतिहास ग्रीक नगरराज्यांच्या संघर्षातील एक दुर्बल नगर असाच राहिला. पुढे इ. स. पू. १७० मध्ये रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली त्याची पुन्हा भरभराट झाली परंतु हे वैभव त्यास फार काळ लाभले नाही व हळूहळू त्याचा ऱ्हास झाला. इ. स. सहाव्या शतकात ते पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले होते. त्याचे अवशेष अद्यापि विपुल प्रमाणात आढळतात. (चित्रपत्र २२).

माटे, म. श्री.

पौराणिकबाजारपेठेचा परिसर, चीचेन ईत्सा.अलंकृत सुवर्णचषक, थोलेसचे थडगे, व्हापीओ (स्पार्टा).राज्यपालाचा राजवाडा, अक्समल, युक्रातेन राज्य, माया संस्कृति, इ. स. १० ते १५ वे शतक.पक्वमृदामुर्ती, जैनावेट.मायोसीनीच्या बालेकिल्याचे सिंहद्वार, मायसीनी.क्लायट्‌नेस्ट्राचे थडगे, मायसानी