बायंझटिन साम्राज्य : इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या शेवटी ‘रोमन’ नावाला अभिप्रेत ती वैशिष्ट्ये असणारे रोममधील साम्राज्य लयास गेले. शासकीय वालपकरी कारभाराला सुलभ व्हावे म्हणून एकाच सम्राटाच्या अधिपत्याखाली साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पूर्वीपासूनच करण्यात येत डायोक्लीशन (कार. २८४ – ३॰५) याने सहसम्राट नेमला. कॉन्स्टंटीन (कार. ३३॰ – ३३७) याने ही विभागणी कायम केली. इ.स.पू. सहाव्या शतकात मेगॅरियन व्यापाऱ्यांनी बास्पोरसच्या सामुद्रधुनीवर बिझँटिअम ही वसाहत स्थापलेली होती. कॉन्स्टंटीन याने तिला ‘प्रतिरोम’ बनविण्याचा निश्चय केला. केवळ सहा वर्षांच्या अवधीत प्रचंड राजप्रासाद, उद्याने, सभागृहे, बाजारपेठा, सार्वजनिक स्नानगृहे उठविण्यात आली. या कॉन्स्टँटिनोपल नगरीच्या अलंकरणासाठी ठिकठिकाणचे शिल्पकार बोलावण्यात आले. अनेक शिल्पे बाहेरून आणण्यात आली. रोमन सम्राट म्हणून तो इ.स.३३॰ साली येथे राहावयास आला. साम्राज्याच्या ऐक्याची परंपरा इतकी दृढ होती की, या विभागणीला सनदशीर रूप प्राप्त व्हावयास त्यानंतर पाऊण शतकाचा काळा लागला. पहिला थीओडोशिअस (कार.३७९ – ९५) नंतर त्याचे मुलगे होनोरियस (कार. ३९५ – ४२३) आणि आर्केडियस यांनी राज्य वाटून घेतले (३९५). आर्केडियस (३९५ – ४॰८) हा बायझंटिनचा सम्राट झाला. रोमन साम्राज्याची उघड आणि वैध विभागणी झाली. बायझंटिन राजवटीला पूर्व रोमन साम्राज्य किंवा उत्तर कालीन रोमन साम्राज्य याही नावांनी ओळखतात. राजकीय इतिहास : ग्रीक-रोमन राजकीय इतिहासात व बायझंटिनच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा फरक आढळतो. शासकीय संघटनेचे जे विविध प्रयोग ग्रीक-रोमनांनी केले, तसे ते बायझंटिन राजवटीत आढळून येत नाहीत. याची दोन कारणे सांगता येतील : एक, रोमन राजकीय प्रयोगांचा वारसा बायझंटिनला आयताच मिळाला व दोन, त्यामुळे उत्पन्न झालेली शासनसंघटना केवळ काही लहानसहान बदल करून येथील अर्थव्यवस्थेला पुरी पडत होती. बायझंटिन साम्राज्याच्या इ.स. ३३॰ ते १४५३ या हजार वर्षापेक्षा थोड्या जास्त काळाचे तीन विभाग पडतात : (१) आरंभापासून ते १२॰४ पर्यंत, (२) १२॰४ ते १२६१ व (३) १२६१ ते १४५३. यांतील दुसरा कालखंड साम्राज्याच्या ग्रहणाचा होय. या कालखंडात इटलीतील लॅटिन सत्तांशी संबंध असलेल्या राजांनी एक जित राष्ट्र म्हणून येथे राज्य केले. नंतरच्या कालखंडात एकूण बारा राजघराणी होऊन गेली. त्यांतील प्रत्येक राजा वंशपरंपरागत पद्धतीने गादीवर आलेला नसला, तरी त्या त्या राजघराण्याशी तो संबंधित असे. त्या घराण्याविषयी लोकांना वाटणाऱ्या निष्ठेचा फायदा करून घेण्यासाठी विवाहसंबंध जोडण्यात आले वा दत्तकविधाने पार पाडण्यात आली. दुसरे म्हणजे ही सगळी घराणी केवळ कॉन्स्टँटिनोपलची किंवा प्राचीन जहागीरदारांच्या खानदानीतील नव्हती. परंतु सम्राटपद मात्र लष्करी नेतृत्व व शासकीय कर्तृत्व या दोन गुणांच्या बळावर मिळत गेले. प्रत्येक घराण्यातील प्रत्येक सत्ताधारी निर्वेधपणे गादीवर आला किंवा एक घराणे जाऊन त्याजागी दुसरे घराणे शांततेने सत्ताधारी झाले, असे समजण्याचे कारण नाही. सम्राटांना पदभ्रष्ट करणे, त्यांचे व त्यांच्या वारसांचे खून करणे इ. प्रकार नेहमी चालत असत तथापि त्यांतून परकीयांना हस्तक्षेपाची संधी मिळाल्याची उदाहरणे थोडी आहेत. आर्केडिअस याच्या ताब्यात आलेल्या राज्याच्या चतु:सीमा ठोकळ मानाने पुढीलप्रमाणे सांगता येतील. समान्यपणे रोमन साम्राज्यात अंतर्भूत झालेला भूमध्य सागराच्या पूर्व भागाभोवतालचा (म्हणजेच एड्रिॲटिक समुद्राच्या पूर्वेचा) बहुतेक सर्व प्रदेश त्यात सामील झाला होता. पश्चिमेला एड्रिॲटिक समुद्रावरील ग्रीसचा किनारा, तेथपासून उत्तरेकडे सरळ रेषा ओढली असता डॅन्यूब नदीला मिळते ती रेषा, उत्तरेच्या बाजूला डॅन्यूब नदी हीच सीमा होती. पूर्वेकडे काळ्या समुद्राच्या पूर्व टोकापासून (कॉकेशस पर्वताच्या पायथ्यापासून) सरळ दक्षिणेकडे युफ्रेटीस नदी आणि तेथून सिरिया व पॅलेस्टाइन यांचा अंतर्भाव करून ईजिप्तपर्यंत पोहचणारी रेषा. दक्षिणेकडे ईजिप्त आणि आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यालगतचा सध्याचा लिबियापर्यंतचा प्रदेश. आपणच रोमन सम्राट आहोत आणि सोईसाठी राज्याची वाटणी केली असली, तरी इटलीसकट पश्चिम साम्राज्याचे सर्व प्रदेश आपल्या ताब्यात यावयास पाहिजेत, अशी इर्षा कॉन्स्टंटीनपासून पुढील तीन शतकांतील सर्व सम्राटांत होती. कॉन्स्टंटीनने ‘मिल्व्हियन ब्रीज’ येथील लढाईत (३१२) पश्चिमेला अधिपती लिसिअस याच्यावर मात करून रोमन साम्राज्याचा एकमेव सम्राट म्हणून स्वत:ला तात्पुरती मान्यता मिळविली होती. पहिला जस्टिनिअन द ग्रेट (कार. ५२७-५६५) याने आपल्या उत्कृष्ट सैन्यबळाच्या व बेलिसेअरिअस व नार्सीझ यांसारख्या सेनापती – मुत्सद्यांच्या मदतीने पश्चिमेकडील भाग जिंकण्याचा प्रयत्न केला होता. व्हँडाल टोळीवाल्यांकडून आफ्रिकेचा (कार्थेज) कबजा घेऊन (५३६) पुढच्याच वर्षी इटली व दक्षिण स्पेन हे प्रदेशही त्याने जिंकले. पूर्व सीमेवर इराणी सम्राटांशी तहनामे करून (५३२) तेथे शांतता राखण्यात आली. त्यांचे हे विजय लष्करी दृष्ट्या नेत्रदीपक असले, तरी क्षणभंगूर ठरले. पुढे सिसिली, दक्षिण इटली आणि एड्रिॲटिकच्या काठावरील काही इटालियन नगरे बायझंटिन अंमलाखाली राहिली तरी साम्राज्याच्या अखंडत्वाचे स्वप्न विराम पावले. उत्तरेकडील सीमा जी डॅन्यूब नदी तिचे रक्षण करण्यासाठी पूर्वीपासून उभारण्यात आलेल्या किल्लेकोटांच्या फळीला जस्टिनिअनने आणखी कोट व ठाणी उभारून अधिकच मजबूती आणली. सामान्यत: रक्षणाच्या दृष्टीने ही व्यवस्था उपयुक्त ठरली परंतु रशियातून येणाऱ्या तसेच बाल्कन प्रदेशात स्थायिक झालेल्या अर्धरानटी जमातींनीही बायझंटिन राज्यकर्त्यांना कधीही स्वस्थता लाभू दिली नाही. इ.स. ५८२ पासून ते ६२७ पर्यंत आव्हार्झ टोळ्यांनी दक्षिणेकडे सरकण्याचा यत्न केला. ६२६ मध्ये आव्हार्झंच्या जोडीला बल्गर व स्लाव्ह हे लोक आहे व इराणी सम्राटांच्या सहाकार्याने त्यांनी कॉन्स्टँटिनोपलवरच हल्ला चढविला (६१७). हा हल्ला परतविण्यात आला पण सीमेवरची अशांतता कायमच राहिली. सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी आव्हार्झ टोळ्यांचे बळ कमी झाले पण बल्गर जमात मोठी बलदंड बनली. पुढे तीनचार शतके साम्राज्याला त्यांच्यापासून धोका होता. बल्गरांनी ८६४ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने तडजोड सोपी होईल, असे वाटू लागले होते पण तसे झाले नाही. शेवटी १॰१४ मध्ये दुसरा बॅझिल याने बल्गरांचा नुसता पराभवच केला नाही तर १५,॰॰॰युद्धकैद्यांचे डोळे काढून त्यांना परत पाठविले. या दारुण शिक्षेनंतर पुन्हा उठाव झाला नाही. इ.स. १॰५॰ ते १॰६॰ दरम्यान स्लाव्ह (क्रोएशिया, सर्बीया, डाल्मेशिया), बल्गर, हंगेरियन व रशियन टोळ्यांची आक्रमणे व छुपे हल्ले होतच राहिले. तिसरा मायकेल याच्या वेळी (कार. ८४२ – ६७ ) ते काही काळ थांबले परंतु या भागात शासनाची घडी बसविणे बायझंटिन सम्राटांना यापुढे कधीच शक्य झाले नाही. ही सीमा नेहमीच अस्थिर आणि धोक्याची राहिली. पूर्व सीमेवर इराणची पुनरुज्जीवित सत्ता विस्तार पावू लागली होती. दुसरा जस्टिन याने इराणचा पराभव करून आर्मेनियावर वर्चस्व स्थापले व तुर्कस्तानची पूर्व सीमा सुरक्षित केली. इ.स. ६१॰ नंतर बाजू उलटून सिरिया, पॅलेस्टाइन, ईजिप्त यांवर इराणचा अंमल आला. कार्थेजमधून बायझंटिनच्या विमोचनास आलेल्या हिरॅक्लिअस याने हा भाग पुन्हा जिंकला (६२९). इ.स. ६३२ नंतर मुहंमद पैगंबरांच्या अनुयायांनी धर्मविजयाची आकांक्षा धरून हातात तलवार घेतली. ६४॰ मध्ये इराण, सिरिया व पॅलेस्टाइन आणि ६४२ मध्ये ईजिप्त त्यांनी काबीज केला. इ.स.७॰॰च्या थोड्या आधी (६९८) कार्थेजचाही पाडाव झाला. याच काळात इस्लामी आरमाराने मोठया प्रमाणावर चाचेगिरी करून पूर्व भूमध्य सागरावरील व्यापार बुडविला. इ.स. ७१७ मध्ये खुद्द बिझँटिअमलाच वेढा घालण्यात आला. तिसरा लिओ याने तो एक वर्षाने उठविला. इ.स. ९६॰ नंतर ही लाट मागे लोटण्यात बायझंटिन सम्राटांना काही प्रमाणात यश आले. क्रीट, सायप्रस व सिरियाचा काही भाग दुसरा बॅझिल याच्या नेतृत्वाखाली परत पूर्व रोमन साम्राज्यात आला. ईजिप्शियन व बायझंटिन राज्यकर्त्यांत करार होऊन अँटिऑक ही दोहोंतील सरहद्द ठरविण्यात आली. बगदाद येथे सेल्जुक तुर्कांचा अंमल बसल्यावर त्यांच्या आक्रमणाला पायबंद घालणे कठीण झाले. आर्मेनिया व टॅरॉस ताब्यात ठेवून त्यांना तुर्की प्रदेशात येऊ द्यावयाचे नाही, ही निकडीची गोष्ट ठरली. इ.स. १॰९६ मध्ये सुरू झालेल्या धर्मयुद्धांनी हे काम सोपे केले.

इ.स. बारावे शतक संपले, त्या वेळी पश्चिम यूरोपातील राजकीय सत्तांशी बायझंटिन संबंध वेळोवेळी येत गेला होता व तो उभयतांना सुखकारक ठरला नव्हता. यातही जास्त धोक्याची ठरली ती उत्तर इटालीतील व्यापारी नगरे –मुख्यत: व्हेनिस. इ.स. १२॰२ साली चौथे धर्मयुद्ध सुरू झाले. ही मोहीम ईजिप्तवर हल्ला करण्यासाठी होती परंतु व्हेनिसचे पुढारी व एक पदभ्रष्ट सम्राट यांच्या संगनमतामुळे प्रत्यक्ष हल्ला कॉन्स्टँटिनोपलवरच झाला. इ.स. १२॰३ मध्ये या शहराचा पाडाव झाला. हा दुसऱ्या कालखंडाचा आरंभ होय. या कालखंडात साम्राज्याचे अनेक तुकडे पडले. धर्मयुद्धात भाग घेणाऱ्या निरनिराळ्या राजांना व व्यापारी नगरांना वाटेल तशी छोटी छोटी संस्थाने विभागून देण्यात आली. खुद्द फ्लँडर्सचा बॉल्डविन याला कॉन्स्टँटिनोपलचे राजपद देण्यात आले. मोठाली बंदरे, व्हेनिस वा जेनोआ यांच्याकडे गेली. तुर्कस्तान (आशिया मायनर) येथे एक स्वतंत्र राज्य झाले. न्यायसीआ ही त्याची राजधानी. येथे व ईपायरस या वायव्य ग्रीसमधील राज्यात ग्रीक-बायझंटिन परंपरेचा अभिमान सतत ज्वलंत होता व ते वैभव प्राप्त करून घेण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. त्यांपैकी न्यायसीआचे राज्यकर्ते हे जास्त चांगल्या स्थितीत होते. तेथील आर्थिक स्थिती उत्तम होती. पूर्वी साम्राज्याचे आधारस्तंभ असणाऱ्या बडया जहागीरदार-सरदार वर्गांचे ऐक्य व संपत्ती टिकून होती. याचा उत्तम फायदा घेऊन या राज्यांनी यूरोपच्या भूमीवर प्रवेश केला आणि शेवटी इ.स. १२६१ मध्ये आठवा मायकेल याने कॉन्स्टँटिनोपल जिंकले. त्यानंतर या साम्राज्याचा जीवनातील तिसरा आणि शेवटचा कालखंड सुरू झाला. कॉन्स्टँटिनोपल पुन्हा हातात आल्यावर साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाची स्वप्ने तेथील राजांना पडू लागावीत यात नवल नव्हते. त्यानुसार भूमध्य सागरातील बेटे जिंकण्यात आली. बल्गर-स्लाव्ह इ. टोळ्या काबूत आणण्यात आल्या. इटालियन व पश्चिम यूरोपीय विरोधाचा नेता अँजूचा चार्ल्स याचा बेराटच्या रणांगणावर आठवा मायकेल याने पूर्णपणे मोड केला (१२७६). रोमन चर्च (पोप) व ग्रीक चर्च यांचे एकीकरण किंवा निदान समझोता साधण्याचा यत्न करण्यात आला. या सर्व कारवाईत आठवा मायकेल याची कारकीर्द (इ.स. १२५९ – ८२ ) सर्वात महत्त्वाची मानली जाते परंतु त्याचे आणि नंतरच्या सम्राटांचे सर्व लक्ष केवळ यूरोपवरच केंद्रित झाले होते. त्यांना तुर्कस्तानचा जवळपास सर्व भाग थोड्याच अवधीत गमवावा लागला. शिवाय शत्रुमित्र-विवेक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसते. यूरोपातील लढाईच्या साहाय्याच्या बदल्यात सहावा जॉन कँटक्यूझीनस (कार.१३४७ – १३५५) याने १३५४ मध्ये तुर्कांना गलिपली प्रांत दिला. १३५॰ मधील दंगलीत अनेक संपन्न व कर्तबगार कुळांचा व पुरुषांचा नाश झाला होता. साम्राज्याची धडाडी संपल्याची लक्षणे दिसू लागली होती. पहिला व दुसरा मुराद यांनी आपल्या प्रदेशावरील मंगोल आक्रमणे पचविली आणि यूरोपात राज्यविस्तार करण्याचे धोरण चालूच ठेवले.१३९१ व १४२२ मध्ये कॉन्स्टँटिनोपलवर झालेले हल्ले परतविण्यात आले परंतु भोवतालचा प्रदेश तुर्कांच्या ताब्यात जात होता व सगळीकडून फास आवळला जात होता. एप्रिल १४५३ मध्ये या राजधानीचा पाडाव झाला व तिचे रक्षण करताना शेवटचा बायझंटिन सम्राट अकरावा कॉन्स्टंटीन धारातीर्थी पडला. त्याच्या निधनाबरोबरच पूर्व रोमन साम्राज्य लयाला गेले.


बायझंटिनच्या अंतर्गत राजकारणात व्यापारी व उत्पादक, लहानमोठे शेतकरी व जमीनदार, सेना व नोकरवर्ग तसेच धर्मसंघटना म्हणजे चर्चसंस्था यांनी वेळोवेळी भाग घेतला. व्यापारी-उत्पादकांनी राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतल्याची उदाहरणे नसली, तरी त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यात बायझंटिन सम्राट नेहमीच तत्पर असत. साम्राज्य रक्षणाच्या कामात गुंतलेल्या सेनेने नालायक सम्राटांना बाजूला सारून वा ठार करून कार्यक्षम सेनानींवर गादीवर बसविल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत. खडी सैन्ये खर्चाची असत व कित्येकदा त्यांची निष्ठाही संशयास्पद असे. मोठ्या जहागिरी नष्ट करून राजाशी एकनिष्ठ असणारा छोटा शेतकरी व सैनिकी वर्ग निर्माण करणे जरूर होते. या दृष्टीने सातव्या शतकात साम्राज्यांतर्गत तुर्कस्तानात छोट्या शेतकरी-सैनिकांची मोठ्या प्रमाणात वसाहत करण्यात आली. मॅसिडोनियन सम्राट तिसरा रोमेनस, दुसरा बॅझिल इ. सम्राटांनी मात्र लष्कराकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या काळात या छोट्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याच जणांच्या जमिनी मोठ्या जहागिरींत जमा झाल्या होत्या. अनेकदा लष्कराच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन नागरी शासकांनी सत्ता ताब्यात घेतली व लष्कराचे आणखीनच खच्चीकरण केले. परिणामी तुर्कांची धडक थेट कॉन्स्टँटिनोपलच्या भिंतीपर्यंत येऊन धडकली (१४५१). याचा फायदा घेऊन बड्या जहागीरदारांनी आपल्यापैकीच एकाला सम्राट बनविले. पुढे राज्यरक्षण आणि ‘लॅटिन’ सम्राटांचा नाश करून बायझंटिन सत्ता स्थापन करण्याच्या कामात याच वर्गाचे संघटनात्मक व लष्करी नेतृत्व उपयुक्त ठरले. कॉन्स्टँटीन याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि थीओडोशियस (कार. ४॰८ – ४५॰) याने याला अधिकृत राज्यधर्म म्हणून मान्यता दिली. पुढील सम्राटांनी ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान, संघटना व व्यवस्था या सगळ्या क्षेत्रांत प्रत्यक्ष भाग घेतला. आरंभीच्या काळात एरिअन, मोनो फिजाईट्स, नेस्टोरियन किंवा डॉनटिझम वा मॉन्टनिझम अशांसारख्या मतपंथांच्या व विचारप्रणालींच्या संघर्षात सम्राटांना भाग घ्यावा लागला. आठव्या शतकात उद्भवलेल्या मूर्तिपूजक व मूर्तिभंजक यांच्यातील वादही असाच होता. यात तर सम्राटांनी पदोपदी विरोधी बाजू घेतल्यामुळे हा एक राजकीय प्रश्न बनला. वरीलपैकी काही मतपंथ आशियात, काही आफ्रिकेत, तर काही ग्रीसमध्ये होते आणि प्रत्येकजण दुसऱ्याला ‘पाखंडी’ समजत असे. प्रजेत असे गट असणे साम्राज्याला बाधक ठरेल, म्हणून कॉन्स्टँटीनपासून सर्व सम्राटांनी वेळोवेळी ‘धर्मनिर्णयपरिषदा’ बोलविल्या व त्यांद्वारे धार्मिक मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला. रोम व बायझंटिन धर्मसंघटनांतील परस्परसंबंधाचा प्रश्न महत्त्वाचा होता. सेंट पीटर याने रोममधील पोप शासन निर्माण केलेले असल्याने सर्व ख्रिस्ती जगतात तेच श्रेष्ठ मानण्यात यावे, ही पोपची अपेक्षा होती तर आपण प्रत्यक्ष सम्राटाचे पुरोहित असल्यामुळे आपला शब्द अखेरचा ही भूमिका कॉन्स्टँटिनोपलच्या प्रमुख धर्मगुरूची होती. बायझंटिन सम्राटांनी या बाबतीत स्वत:च्या सोयीप्रमाणे कधी आपल्या धर्मगुरूला तर कधी पोपला सर्वश्रेष्ठत्व दिले. प्रसंगी कॅथलिक पंथाची दीक्षा घेऊनही त्यांनी रोमच्या पोपला आपल्या बाजूला वळवून घेतले. जरूर पडली त्या वेळी धर्मपरिषदा भरवून ऐक्याचा घोष केला परंतु हे सर्व वरवरचे होते. लॅटिन व ग्रीक विचारसरणींतील भेद अशा मार्गांनी मिटणारे नव्हते. बायझंटिन चर्चच्या आचारविचारांवर ग्रीक विचारसणीची छाप होती आणि ती तशीच टिकण्याला साम्राज्यातील मठसंस्था कारणीभूत झाली. हे मठ संख्येने, संपत्तीने व प्रभावाने इतके समर्थ होते, की सम्राटांनी कशाही घोषणा केल्या वा भूमिका बदलल्या तरी ते बिझँटिअमच्या धर्मगुरूच्या आज्ञेतच राहिले. त्यांना रोमचे वर्चस्व मानवण्यासारखे नव्हते. त्यांनी ‘ग्रीक’ किंवा ‘आर्थोडक्स’ चर्चची जोपासना करून ते वाढविले. तात्त्विक मतभेद, पोपशी संबंध आणि प्रमुख मठपतींचे धोरण यांमुळे बायझंटिन सम्राटांच्या राजकीय धोरणाला वेळोवेळी कलाटणी मिळत गेली. ती दरवेळी साम्राज्याच्या दृष्टीने उपकारकच ठरली, असे म्हणता येत नाही. बाल्कन प्रदेशात आणि त्यानंतर रशियात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे काम बायझंटिन चर्चनेच केले. आजही बहुतेक स्लाव्ह वंशीय लोक ग्रीक चर्चचे अनुयायी आहेत. धर्माधिष्ठित राजसत्तेचे सर्व गुणावगुण बायझंटिन साम्राज्याइतके तीव्रतेने इतरत्र क्वचितच पहावयास सापडतील.

बायझंटिन सम्राटांच्या कारकीर्दीचा तक्ता

पहिला कॉन्स्टंटीन (द ग्रेट)

:

इ. स.

३३० – ३३७

सातवा कॉन्स्टंटीन

:

इ. स.

९१३ – ९१९

कॉन्स्टॅशिअस

:

,,

३३७ – ३६१

पहिला रोमेनस

:

,,

९१९ – ९४४

जूल्यन

:

,,

३६१ – ३६३

सातवा कॉन्स्टंटीन (पुन्हा)

:

,,

९४४ – ९५९

जोव्हिअन

:

,,

३६३ – ३६४

दुसरा रोमेनस

:

,,

९५९ – ९६३

व्हेलेन्झ

:

,,

३६४ – ३७८

दुसरा बॅझिल

:

,,

९६३

पहिला थीओडोशियस

:

,,

३७९ – ३९५

दुसरा नायसेफोरस

:

,,

९६३ – ९६९

आर्केडिअस

:

,,

३९५ – ४०८

पहिला जॉन

:

,,

९६९ – ९७६

दुसरा थीओडोशियस

:

,,

४०८ – ४५०

दुसरा बॅझिल (पुन्हा)

:

,,

९७६ – १०२५

मार्शन

:

,,

४५० – ४५७

आठवा कॉन्स्टंटीन

:

,,

१०२५ – १०२८

पहिला लीओ (द ग्रेट)

:

,,

४५७ – ४७४

झॉई आणि तिसरा रोमेनस

:

,,

१०२८ – १०३४

दुसरा लीओ

:

,,

४७४

झॉई आणि चौथा मायकेल

:

,,

१०३४ – १०४१

झीनो

:

,,

४७४ – ४७५

झॉई आणि पाचवा मायकेल

:

,,

१०४१ – १०४२

बॅसिलिस्कस

:

,,

४७५ – ४७६

झॉई आणि थीओदोरा

:

,,

१०४२

झीनो (पुन्हा)

:

,,

४७६ – ४९१

झाई, थीओदोरा आणि नववा कॉन्स्टंटीन

:

,,

१०४२ – १०५०

पहिला ॲनस्टेशियस

:

,,

४९१ – ५१८

थीओदोरा व नववा कॉन्स्टंटीन

:

,,

१०५० – १०५५

पहिला जस्टिन

:

,,

५१८ – ५२७

थीओदोरा

:

,,

१०५५ – १०५६

पहिला जस्टिनिअन (द ग्रेट)

:

,,

५२७ – ५६५

सहावा मायकेल

:

,,

१०५६ – १०५७

दुसरा जस्टिन

:

,,

५६५ – ५७८

पहिला आइझाक कॉननीनस

:

,,

१०५७ – १०५९

दुसरा टायबीअरियस

:

,,

५७८ – ५८२

दहावा कॉन्स्टंटीन

:

,,

१०५९ – १०६७

मॉरिस

:

,,

५८२ – ६०२

सातवा मायकेल

:

,,

१०६७ – १०६८

फोकस

:

,,

६०२ – ६१०

चौथा रोमेनस

:

,,

१०६८ – १०७१

हिरॅक्लिअस

:

,,

६१० – ६४१

सातवा मायकेल (पुन्हा)

:

,,

१०७१ – १०७८

तिसरा कॉन्स्टंटीन आणि हिरॅक्लिओनॅस

:

,,

६४१

तिसरा नायसेफोरस

:

,,

१०७८ – १०८१

हिरॅक्लिओनॅस

:

,,

६४१

पहिला ॲलेक्सिअस कॉमनीनस

:

,,

१०८१ – १११८

कॉन्स्टँशिअस

:

,,

६४१ – ६६८

दुसरा जॉन कॉमनीनस

:

,,

१११८ – ११४३

चौथा कॉन्स्टंटीन

:

,,

६६८ – ६८५

पहिला मॅन्यूअल कॉमनीनस

:

,,

११४३ – ११८०

दुसरा जस्टिनिअन

:

,,

६८५ – ६९५

दुसरा अलेक्सिअस कॉमनीनस

:

,,

११८० – ११८३

लिऑनशिअस

:

,,

६९५ – ६९८

पहिला अँद्रोनाइकस कॉमनीनस

:

,,

११८३ – ११८५

तिसरा टायबिअरीस

:

,,

६९८ – ७०५

दुसरा आइझाक

:

,,

११८५ – ११९५

दुसरा जस्टिनिअन(पुन्हा)

:

,,

७०५ – ७११

तिसरा अलेक्सिअस

:

,,

११९५ – १२०३

फिलीपिकस बार्डोनीझ

:

,,

७११ – ७१३

दुसरा आइझाक (पुन्हा) व चौथा अलेक्सिअस

:

,,

१२०३ – १२०४

दुसरा ॲनस्टेशियस

:

,,

७१३ – ७१५

पाचवा अलेक्सिअस

:

,,

१२०४

तिसरा थीओडोशियस

:

,,

७१६ – ७१७

पहिला थीओदोर लॅस्करिस

:

,,

१२०४ – १२२२

तिसरा लीओ

:

,,

७१७ – ७४१

तिसरा जॉन

:

,,

१२२२ – १२५४

पाचवा कॉन्स्टंटीन

:

,,

७४१ – ७७५

दुसरा थीओदोर लॅस्करिस

:

,,

१२५४ – १२५८

चौथा लीओ

:

,,

७७५ – ७८०

चौथा जॉन

:

,,

१२५८ – १२६१

सहावा कॉन्स्टॅटीन

:

,,

७८० – ७९७

आठवा मायकेल

:

,,

१२६१ – १२८२

आयरीन

:

,,

७९७ – ८०२

दुसरा अँद्रोनाइकस

:

,,

१२८२ – १३२८

पहिला नायसेफोरस

:

,,

८०२ – ८११

तिसरा अँद्रोनाइकस

:

,,

१३२८ – १३४१

स्टॉरेशिअस

:

,,

८११

पाचवा जॉन

:

,,

१३४१ – १३७६

पहिला मायकेल

:

,,

८११ – ८१३

सहावा जॉन (अनधिकृत राज्यापहार)

:

,,

१३४७ – १३५५

पाचवा लीओ

:

,,

८१३ – ८२०

चौथा अँद्रोनाइकस

:

,,

१३७६ – १३७९

दुसरा मायकेल

:

,,

८२० – ८२९

पाचवा जॉन (पुन्हा)

:

,,

१३७९ – १३९१

थिऑफिलस

:

,,

८२९ – ८४२

सातवा जॉन

:

,,

१३९० –

तिसरा मायकेल

:

,,

८४२ – ८६७

दुसरा मॅन्यूअल

:

,,

१३९१ -१४२५

पहिला बॅझिल

:

,,

८६७ – ८८६

सातवा जॉन (पुन्हा)

:

,,

१३९९ – १४१२

सहावा लीओ

:

,,

८८६ – ९१२

आठवा जॉन

:

,,

१४२५ – १४४८

अलेक्झांडर

:

,,

९१२ – ९१३

अकरावा कॉन्स्टंटीन

:

,,

१४४९ – १४५३


सामाजिक स्थिती : पहिला जस्टिनिअन याने बायझंटिनची पहिली विधिसंहिता तयार केली. तोपर्यंत चालत आलेल्या सर्व विधिनियमांचे तीत संकलन करण्यात आले. सम्राट हा परमेश्वराचा पृथ्वीवरील साक्षात प्रतिनिधी हे रोमला फारसे न पटणारे तत्त्व म्हणजे बायझंटिन संहितेचा पायाच होता. तरीही रोमन कायद्याची तत्त्वे या संहितेत अबाधित राखण्यात आली होती. पुढे पाचवा कॉन्सटंटीन (कार. ७४१ – ७७५) याने विधिसंहितेची नवी आवृत्ती प्रसिद्ध केली (७४६). तीत रोमन न्यायतत्त्वांवर ख्रिस्ती धर्मतत्त्वांचे व काही प्रमाणात ‘मूर्तिभंजक’ विचारसरणीच्या आधारे संस्करण करण्यात आले. पुढे इ.स. ८६॰ मध्ये पहिला बॅझिल याच्या पुढाकाराने बॅझिलिका या नावानेच ओळखली जाणारी स्मृती तयार झाली. तिच्यात ख्रिस्ती तत्तवांना काही प्रमाणात बाजूला सारून मूळ रोमन विधीतली तत्तवे कायम करण्यात आली. बायझंटिन समाजाच्या जीवनातील एक वैशिष्टयपूर्ण प्रवाह म्हणून या सर्वच विधिसंहिता अभ्यासनीय आहेत. एरवी ग्रीक परंपरेला चिकटून राहणाऱ्या या समाजाने ज्या काही रोमन गोष्टी स्वीकारल्या व टिकविल्या यांत रोमन विधिसंहितेचा प्रामुख्याने उल्लेख करावयास हवा.अनेक शतके अखंडपणे संपन्न राहणाऱ्या प्राचीन काळातील मोजक्याच समाजांपैकी बायझंटिन हा एक आहे. याचे एक गमक म्हणजे सहा शतकांच्या प्रदीर्घ काळात बायझंटिन सुवर्णचलन जगभर प्रमाण मानण्यात येई. या सुबत्तेचा पाया म्हणजे शेती. आरंभीच्या काळात कार्थेज आणि नंतर तुर्कस्तान येथी शेती अत्यंत समृद्ध होती. तुर्कस्तान हातचा गेल्यावर काही प्रमाणात बल्गेरियाने ही तूट भरून काढली तर तोही फार काळ ताब्यात राहिला नाही. बाराव्या शतकानंतर शेतीत उत्पन्न होणारी संपत्ती कमी होऊ लागली तेराव्या-चौदाव्या शतकांत हा स्त्रोतच आटला. चैनीच्या वस्तूंची निर्मिती करण्याबद्दल खुद्द कॉन्स्टँटिनोपल आणि त्याबरोबर साम्राज्यातील सॅलोनिका, थीब्ज, कॉरिंथ ही नगरेही प्रसिद्ध होती. तेथे उत्तमोत्तम जरतारी व रेशमी कापड, काचेची भांडीकुंडी, सोन्याचांदीचे दागदागिने, उत्कृष्ट काचसामान व हस्तिदंती कोरीव काम इ. उद्योग विकसित झाले होते. यांतील बराच माल राजदरबारात किंवा निरनिराळ्या मठांतून खपत असे. पूजाविधी व मठपतींचा डामडौल यांसाठी मठांची गरज असे. या वस्तूंना स्वदेशात व परदेशात उत्तम भाव मिळे. त्या त्या क्षेत्रातील कारागीर व उत्पादक यांचे संघ असत आणि सभासदांच्या पगारापासून तो फायद्याच्या प्रमाणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर शासकीय नियंत्रण असे. यूरोपातून आग्नेयीकडे, आशियातून वायव्येकडे जाणारे, तसेच काळ्या समुद्राभोवतालच्या प्रदेशाला भूमध्य सागराशी जोडणारे व्यापारी व सागरी मार्ग कॉन्स्टँटिनोपल येथे येऊन मिळत. त्यामुळे या शहरात बाजारपेठा निर्माण करण्यात आल्या, गुदामे तयार करण्यात आली. केवळ बायझंटिनमधीलच नव्हे, तर इतर देशांतील व्यापारी येथे व्यापार करीत. काहीजण तर तेथे स्थायिक झाले होते. ही तत्कालीन जगातील अग्रगण्य बाजारपेठांपैकी एक होती. व्यापारावर शासनाची बंधने असूनही तो अत्यंत किफायतशीर ठरे परंतु शासकीय नियंत्रणामुळे उत्पादनातील नावीन्य नष्ट होत गेले व दहाव्या अकराव्या शतकांत ठराविक साच्याच्या वस्तू निर्माण होत राहिल्या. दुसरे असे की कित्येक शतके परकीय व्यापारी आपल्या दारात येऊन माल उचलतात, याची सवय झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची धडाडी नष्ट होत गेली. जहाजात माल भरून गावोगाव फिरणाऱ्या इटालियन व्यापाऱ्यांच्या चढाओढीमुळे बायझंटिन व्यापाराला साहित्याच्या इतिहासाचे तीन खंड कल्पिण्यात येतात : पहिल्यात ग्रीक साहित्य परंपरांच जतन करण्यात आले दुसऱ्यात जबर तडाखा बसला. त्यामुळे त्याचा आर्थिक ऱ्हास झपाट्याने होत गेला.साहित्य : बायझंटिन ख्रिस्तपूर्व पाखंडी साहित्य बाजूस सारून केवळ ख्रिस्ती धर्माविषयीचे साहित्य उत्पन्न झाले तिसऱ्यात ख्रिस्ती धर्माचा सर्वंकष प्रभाव दूर होऊन पुन्हा सर्व तऱ्हेच्या वाङ्मयाची निर्मिती होऊ लागली. हा काळ (१॰२९-१२॰४) मॅसिडोनियन घराण्याचा. सामान्यपणे बायझंटिन साहित्याचे तीन विशेष सांगतात. ते ग्रीक परंपरेतील होते, ख्रिस्ती धर्मकल्पना व कथानके यांची त्यावर जबर पकड होती, तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पांडित्यपूर्ण, संकलनात्मक लेखनविवेचन यांवर त्यांचा जास्त भर असे.बायझंटिन कला संप्रदायाचे मुख्य केंद्र स्वाभाविकपणेच कॉन्स्टँटिनोपल येथे होते. या ठिकाणी ग्रीक, रोमन आणि पौर्वात्य (आशियातील) कलाशैली येऊन पोहचलेल्या होत्या. या सर्वांचे एकीकरण करून त्यात ख्रिस्ती धर्मकल्पना गुंफणे, हे या कलासंप्रदायाचे मुख्य कार्य. वास्तुशिल्पाच्या क्षेत्रात बायझंटिनचे कार्य अविस्मरणीय समजतात. कमानी आणि घुमट यांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर या वास्तूंत करण्यात आलेला असून त्यांवर हरतऱ्हेची शिल्पे, मूर्ती, पुतळे, चित्रकाम यांचा साज चढविलेला होता. ५३२ मध्ये जस्टिनिअन याने आरंभ केलेले सेंट सोफिया हे चर्च हा बायझंटिन कलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना समजण्यात येतो. निरनिराळ्या पुस्तकांत काढलेली, तसेच चर्चमध्ये कु्ट्टिमचित्र-तंत्र पद्धतीने काढण्यात आलेली चित्रे, मूर्ती व पुतळे आणि हस्तिदंती कोरीव काम, ही बायझंटिन कलेची आणखी काही वैशिष्ट्ये होत (चित्रपत्र ५२).

संदर्भ : 1. Haussing, H.W. Trans. Hussey, J. M. Hisotry of Byzantine Civilization, New York, 1971

2. Hussey, J. M. Ed. The Cambridge Medieval Hisotry, Vol. 4, Part I &amp II, Cambridge, 1966-67.

माटे, म.श्री.

अथेन्सच्या वास्तूचा दर्शनी भाग

मेरी माता व बाल येशू यांते शिल्पांकन केलेले सुवर्णपदक, कॉन्स्टँटिनोपल

द एम्परर जस्टिनिअन अँड हिज स्वीट’ कुट्टिमचित्रण, सान व्हायतल चर्च, ५४६-५४८