अठराशे सत्तावन्नचा उठाव : भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती. १८५७ पूर्वी ⇨ डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली त्याच मुद्द्यावर दुसऱ्‍या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्‍हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता. 

 

संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३ पासून १८५७ पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून वसूल केला होता. पाश्चात्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला देशी उद्योगधंदे बंद पडले. हिंदुस्थानचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार, वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्‍यांनी दुष्काळ, अवर्षण यांचा विचार न करता जमिनीची पहाणी करून जमीनमहसुलाचे कमाल आकार ठरवून दिले. जमिनीच्या मालकाकडे सरकारी देणे राहिल्यास कंपनीचे अधिकारी जमिनी जप्त करीत किंवा विकून टाकीत. यामुळे शेतकरी व जमीनदार यांचे हाल झाले. जमिनीच्या साऱ्‍यासंबंधीच्या नवीन नियमांनुसार सरकार व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ काढून टाकल्यामुळे तालुकदारांना काम उरले नाही. १८५२ मध्ये डलहौसीने सरदार, इनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोगाने बत्तीस हजार इनामांची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या एकवीस हजार वतनदारांची वतने जप्त केली. वारस नाही म्हणून आंग्रे यांचे संस्थान खालसा केले.

 

सामाजिक क्षेत्रात सतीची चाल बंद करून पुनर्विवाहाचा कायदा केल्याने सनातनी लोक असंतुष्ट झाले. अनेक जुन्या चालीरीती बंद केल्यामुळे तसेच पाश्चिमात्य सुधारणा आल्यामुळे सनातनी लोकांत आपला धर्म बुडेल, अशी भीती निर्माण झाली होती. कंपनी सरकारच्या पैशाने ख्रिश्चन मिशनऱ्‍यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून हिंदुधर्माची विटंबना सुरू केली. बेंटिंकने तर धर्मांतर केलेल्या लोकांना वारसा हक्कही दिला होता. इंग्रजी अधिकाऱ्‍यांनी सार्वजनिक दवाखान्यांतून स्त्रियांच्या पडदापद्धतीची उपेक्षा केल्यामुळे ते आपल्या चालीरीतींत ढवळाढवळ करीत आहेत, अशी लोकांची समजूत झाली. हिंदूंना उच्च पदाच्या जागा नाकरल्यामुळे सुशिक्षित वर्ग असंतुष्ट झाला.

 

कंपनी सरकार व हिंदी सैनिक यांत बरेच दिवस तेढ निर्माण झाली होती. या उठावापूर्वी हिंदी सैनिकांनी १८०६ पासून १८५० पर्यंत वेलोर, बरेली, बराकपूर, जबलपूर, फिरोझपूर इ. ठिकाणी बंडे केली होती. हिंदी सैन्याच्या बळावर इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करून साम्राज्यविस्तार केला होता. परंतु पदव्या व बक्षिसे मात्र इंग्रज अधिकाऱ्‍यांनाच दिली जात. हिंदी सैनिकांना दूरवरच्या आघाड्यांवर जाण्यासाठी दिलेला जादा भत्ता बंद केला होता. १८५७ च्या सुमारास ब्रिटिशांचे हात यूरोप, चीन आणि इराण येथील युद्धांत गुंतले असल्यामुळे कलकत्ता ते अलाहाबाद या प्रदेशात फक्त एकच यूरोपीय फलटण होती. मुख्य लष्करी ठाणी हिंदी सैन्याच्या हातात होती. कंपनी सरकारचे राज्य हिंदी सैन्यावर अवलंबून आहे, अशी समजूत लष्करात पसरली. यातच १८५६ मध्ये कॅनिंगने सैन्यातील शिपायांनी हिंदुस्थानच्या बाहेर गेले पाहिजे, असा हुकूम काढला. या असंतोषातच काडतूस-प्रकरणाने प्रक्षोभ निर्माण केला. हिंदूंना पवित्र असलेल्या गायीची किंवा मुसलमानांना निषिद्ध असलेल्या डुकराची चरबी काडतुसांना लावलेली असल्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

 

अठराशे सत्तावनच्या जानेवारी—फेब्रुवारी महिन्यांत डमडम व बराकपूर येथे काडतूस-प्रकरणावरून गडबड झाली. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे नाकारल्यामुळे त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरवात केली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी ह्यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आले. येथूनच उठावास सुरवात झाली. हा उठाव सप्टेंबर १८५८ पर्यंत चालू राहिला. या काळात बराकपूर, लखनौ, मीरत, दिल्ली, लाहोर, फिरोझपूर, अलीगढ, पेशावर, मथुरा, झाशी, आग्रा, बेरली, कानपूर, अलाहाबाद इ. ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्या. या उठावाचे महाराष्ट्रातही पडसाद उठले. इंग्रजी सत्ता खिळखिळी करण्यासाठी व सातारच्या गादीचे पुनरुत्थान करण्यासाठी सातरकरांचा वकील ⇨रंगो बापूजी याने सातारा, पुणे, कोल्हापूर येथे गुप्त कारस्थाने सुरू केली. नानासाहेब पेशव्याचे दूत ग्वाल्हेरचे ज्योतिराव घाटगे व निंबाळकर यांनी कोल्हापूरात उठाव केला. इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. उत्तरेत उठावातील लोकांनी प्रथम दि. ११-५-१८५७ रोजी दिल्ली ताब्यात घेतली. बहादुरशाहाला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून जाहीर केले. परंतु थोडक्यात दिवसांत लॉरेन्सने दिल्ली पुन्हा सोडवून घेतली. ऊट्रम व हॅवलॉक यांनी लखनौ येथील उठाव मोडले. ड्यूरंडने माळव्यातील उठावाचा बंदोबस्त केला. मार्च १८५८ मध्ये इंग्रजांनी झाशीला वेढा दिला. ह्यू रोझ व⇨झांशीची राणी  लक्ष्मीबाई यांच्यात लढाई होऊन इंग्रजांनी झाशीचा कबजा घेतला. पुढे राणी लक्ष्मीबाई व⇨तात्या टोपे दोघे ग्वाल्हेर येथे इंग्रजांविरूद्ध लढले.

 

लढाईत लक्ष्मीबाई मरण पावली. दि. २१-१-१८५९ रोजी राजपुतान्यात सीकार येथे तात्या टोपे व इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत तात्या टोपेचा पराभव होऊन, तो पकडला गेला. दि. १८-४-५९ ला त्यास इंग्रजांनी फाशी दिले. नानासाहेब व इंग्रज यांच्यात कानपूर येथे लढाई झाली. नानासाहेब रोहिलखंडाच्या बाजूस गेला असता इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला. कँबेल याने रोहिलखंडातील उठाव मोडला. नानासाहेबास पकडण्यासाठी इंग्रजांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले. नानासाहेब व हजरत बेगम हे नेपाळात निघून गेले असावेत. बहादुरशाहास इंग्रजांनी कैद करून रंगूनला पाठविले. या उठावात शिंदे, निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचा राणा जंग बहादूर यांनी इंग्रजांना मदत केली. पंजाबमधील शीख, काश्मीरचा राजा व कित्येक जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.

 

हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही कारण उठावातील लोकांच्या पुढे निश्चित ध्येय नव्हते. त्यांच्यात एकजूट नव्हती. बरेचसे भारतीय इंग्रजांना फितूर झाले होते. सर्व संस्थानिक उठावात सामील झाले नव्हते.

 

या उठावाने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली. हिंदुस्थानचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. इंग्लंडचा राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ रद्द करून ‘इंडिया कौन्सिल’ नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. संस्थानिक व सरकार ह्यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. उठाव शमल्यानंतर कॅनिंगने शांतता प्रस्थापित केली. गव्हर्नर जनरल कॅनिंग हा पहिला व्हाइसरॉय झाला.

 

पुढील काळातील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात या उठावाची पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून स्मृती जागी ठेवण्यात आली. १९५७ मध्ये भारतभर १८५७ च्या उठावाचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला.

 

संदर्भ : 1. Chattopadhyaya, Haraprasad, The Sepoy Mutiny, 1857, Calcutta, 1957.

          2. Government of Bombay, Source Material for a History of the Freedom Movement in India, Vol. I, 1818-1885,Bombay.        

          1957.

          3. Majumdar, R. C. The Sepoy Mutiny and the revolt of 1857, Calcutta, 1963. 4. Savarkar, V. D. The Indian War of

          Indepandence, 1857, Bombay 1947. 5. Sen, S. N. Eighteen Fiftyseven, Calcutta, 1958.

   ६. फाटक, न. र. अठराशें सत्तावनची शिपाई गर्दी, पुणे, १९५८.

          ७. बेहेरे ना. के. सन १८५७, मुंबई, १९२७.

देवधर, य.ना.