जींद संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पंजाबमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,४५० चौ. किमी. लोकसंख्या ३,६१,८१२  (१९४१). उत्पन्न सु. पंचवीस लाख रुपये. संस्थानचा प्रदेश सलग नव्हता. सपाट भूप्रदेश, ७ शहरे व ४३९ खेडी यांचा प्रशासकीय सोयीसाठी दोन निझामत व तीन तहसील यांत संस्थानची विभागणी केलेली होती. पंजाबच्या ले. गव्हर्नरचा एजंट हा पोलिटिकल एजंट म्हणून काम पाही. परराष्ट्रव्यवहार आणि शिक्षण यांसाठी एक मंत्री होता, तर महसूल व अर्थखाते दिवाण सांभाळी. सैन्य आणि पोलीस ही खाती बक्षीखान या सैन्याच्या प्रमुखाकडे होती व अदालती हा न्यायनिवाडा हे खाते पाही. या चौघांचे एक मंडळ होते. त्याला सद्र अला म्हणत. या सद्र अलाचा प्रमुख राजा असे.

मोगलांपासून जिंकलेल्या जींद आणि सफीदोन परगण्यांत संस्थानचा प्रथम उगम झाला (१७५५). फूल्कियान या शीख कुटुंबातील फूलचा नातू सुखचेन यापासून जींदच्या राजघराण्यास सुरुवात झाली. सुखचेन १७५१ मध्ये मरण पावला. त्याला अलमसिंग, बद्रुखान व गजपतसिंग असे तीन मुलगे होते. गजपतसिंग हा सर्वात शूर व धाडसी असल्यामुळे त्याने १७५५ मध्ये जींद व सफीदोन हे परगणे जिंकले. १७६६ मध्ये त्याने जींद राजधानी केली तथापि तो दिल्लीपतीचा मांडलिक होता. आणि शाहास खंडणी देई. १७७२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाने त्यास फर्मान देऊन राजा हा किताब दिला. गजपतसिंगने १७७५ मध्ये जींद येथे एक किल्ला बांधला. यावेळेपासून जींदचे राजे स्वतंत्रपणे वागू लागले. संग्रूर संस्थानाला जोडण्यात आले. गजपतसिंगनंतर गादीवर आलेल्या भागसिंगाने (१७८९) ब्रिटिशांशी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मैत्री संपादली (१८०४). १८३७ मध्ये कंपनीने काही प्रदेश बळकाविला, तरी कुलारान, दाद्री इ. परगण्यांनी भरपाई केली व खंडणी माफ केली. महादजी शिंदेकडून गोहान परगणा व रणजितसिंगाकडून लुधियानाचा काही भाग त्यांना मिळाला. १८४७ मध्ये संस्थानने सती, गुलामगिरी, भ्रूणहत्या इ. गोष्टी कायद्याने बंद केल्या. १८६४ मध्ये संस्थानला दाद्रीच्या शेतकऱ्यांचे बंड मोडावे लागले. राजा रघुबीरसिंगाने (१८६४–८७) संस्थानात अनेक सुधारणा करून संग्रूरला राजधानी कायम केली. १८५७ च्या उठावात, अफगाण युद्धात तसेच पहिल्या महायुद्धात संस्थानने ब्रिटिशांना सर्वतोपरी सहकार्य दिले. संस्थानच्या राजास राजा-राजगान ही सन्मानार्थ पदवी व १५ तोफांची सलामी होती. राजे जरी शीख असले, तरी बहुसंख्य प्रजा हिंदू होती. संस्थानने स्वतःची टाकसाळ चालविली होती. विद्यमान राजे राजबीरसिंग १९४८ मध्ये गादीवर आले. त्याच वर्षी संस्थान विलीन होऊन प्रथम पेप्सू संघात आणि १ नोव्हेंबर १९५६ पासून पंजाब राज्यात समाविष्ट करण्यात आले.

कुलकर्णी, ना. ह.