अकबर : (१५ ऑक्टोबर १५४२-२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील ⇨हुमायून  व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत एकवाक्यता दिसून येत नाही.

अकबर

हिंदूस्थानला आपला देश मानणारा हा पहिला मुसलमान राजा होय. मोगल साम्राज्याचा पाया मजबूत करणाऱ्या या राजाचे व्यक्तिमत्त्व लहानपणीच अनेक आपत्तींतून तावूनसुलाखून निघालेले होते. राज्यारोहणप्रसंगी (१५५६) त्याच्या ताब्यात निश्चित असा कुठलाच प्रदेश नव्हता. विश्वासार्ह असे सैन्यही त्याच्या हुकमतीखाली नव्हते. तरीही त्याने आपला पालक बैरामखान याच्या मदतीने आपला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी मुहम्मदशाह आदिल सूर ह्याचा दिवाण हेमू याचा पानिपतच्या मैदानावर नि:पात केला (१५५६). नंतर सिकंदर सूरसारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांनाही शरणागती पतकरण्यास लावून दिल्लीचे आपले आसन त्याने स्थिर केले.

१५५६ पासून १५६० पर्यंत पालक म्हणून सर्व सत्ता बैरामखानाच्याच हातात होती. परंतु बैरामखानाच्या क्रूर व अन्यायी कारभारामुळे असंतोष पसरला, म्हणून अकबराने युक्तीने त्याच्या हातून सत्ता काढून घेतली. बैरामने बंड केले पण शेवटी त्यास अकबरास शरण जावे लागले. अकबराने त्यास सन्मानाने वागविले. पुढे बैरामखान मक्केस जात असताना त्याचा एका अफगाणाने खून केला.बैरामखानानंतर अकबराची प्रमुख दाई माहम अनघा हिच्या गटाचे काही दिवस दरबारात वर्चस्व राहिले. परंतु तिने बैरामखानापेक्षा चांगला राज्यकारभार केला, असे मात्र नाही. माहम अनघाच्या मृत्यूनंतर अकबराने सर्व सत्ता स्वतःच्या हाती घेतली.

राज्यकारभार हाती घेतल्यानंतर पहिल्या सात वर्षांत (१५६० ते १५६७) माहम अनघाचा मुलगा आदमखान, अब्दुल्लाहखान उझबक ह्या बंडखोरांची टोळी, रावळपिंडी जिल्ह्यातील गख्खर लोक व काबूल येथे असलेला त्याचा भाऊ मिर्झा हाकिम यांची बंडे त्याने मोडून काढली. गोंडवन, माळवा, रावणपिंडी जिल्ह्याचा ईशान्य भाग, चुनार, जौनपूर हे प्रदेश जिंकून घेतले. १५६८ मध्ये चितोड, १५६९ मध्ये जोधपूर व १५७० मध्ये बिकानेर, जैसलमीर, कालिंजर हेही प्रदेश त्याने जिंकले. १५७२ पर्यंत ⇨राणा प्रताप सोडून बहुतेक राजपूत राजांना त्याने शरण आणले. १५७३ मध्ये गुजरातमधील मुसलमान राजांना पराजित करून तेथे त्याने आपला अंमल बसविला. १५७६ मध्ये ⇨हळदीघाटाच्या लढाईत त्याने राणा प्रतापचा पराभव केला. त्याच साली त्याने बंगालही जिंकला. १५८० मध्ये बंगालमध्ये बंड झाले असताना ⇨तोरडमलला पाठवून ते मोडून काढले व बंगाल आपल्या राज्यास कायमचा जोडून घेतला. १५८४ त काबूलमध्ये राज्य करीत असलेला आपला सावत्र भाऊ मुहम्मद हाकिम वारल्यामुळे तो प्रांत अकबराने आपल्या ताब्यात घेतला. काश्मीरचा राजा युसुफशाह व त्याचा मुलगा याकुब यास त्याने कैदी म्हणून बिहारमध्ये पाठविले व काश्मीरचे राज्य आपल्या राज्यास जोडून घेतले (१५८६-१५८७). या काश्मीरच्या मोहिमेत त्याचा विश्वासू विद्वान मित्र ⇨बीरबल कामास आला. १५९१ ते १५९५ च्या दरम्यान अकबराने ओरिसा, सिंध, कंदाहार व बलुचिस्तान जिंकून घेतले. दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याच्या हेतूने त्याने खानदेशच्या राजास मांडलिकत्व कबूल करावयास लावून अहमदनगरवर स्वारी केली. पण ⇨चांदबिबीच्या बहादुरीमुळे त्यास पराभव पतकरावा लागला (१५९५). १६०० मध्ये मात्र त्याने अहमदनगर जिंकण्यात यश मिळविले व त्याच्या पुढल्या वर्षी त्याने असीरगढही जिंकला. अशा तऱ्हेने त्याने आपले राज्य पश्चिमेस काबूलपासून ते पूर्वेस बंगालपर्यंत व उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेस नर्मदा नदीच्या खाली अहमदनगरपर्यंत वाढविले.

अकबर एक उत्तम राज्यकर्ताही होता. त्याने आपली शासनव्यवस्था न्याय, सहिष्णुता व गुणवत्ता या तीन तत्त्वां‍वर आधारलेली होती. अकबराची राज्यपद्धती एक तंत्री होती. त्याचा अधिकार अनियंत्रित होता. शासनाच्या सोयीसाठी महसूल, न्याय, धर्म, लष्कर, गुप्तहेर, टाकसाळ इ. खाती त्याने निर्माण केली होती. संपूर्ण राज्याची विभागणी अठरा सुभ्यांनंतर करण्यात आली होती. सुभ्यानंतर सरकार व सरकारनंतर परगणा अशी प्रांतिक शासनाची उतरण होती. प्रांतिक शासनाचा सुभेदार हा प्रमुख असे व तो दिवाण, सदर, अमील, बितिक्ची, पोतदार, फौजदार, कोतवाल, वाकेनवीस व इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रांतिक कारभार चालवीत असे.

अकबराने सबंध लष्कराची पुनर्घटना करून मनसबदारी पद्धत सुरू केली. मनसबदार हा राज्याचा नोकर समजण्यात येत असे. मनसबदारी पद्धतीतील दोष काढून टाकण्याकरिता अकबराने घोड्यावर मुद्रा मारण्याची आणि माणसाचे व घोड्याचे सविस्तर वर्णन हजेरीपटावर लिहिण्याची पद्धत सुरू केली.

तोडरमलच्या साह्याने त्याने केलेल्या शेतसाऱ्याच्या पद्धतीतील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जमिनीची पाहणी व मोजणी करून वर्गवारी करण्यात आली व उत्पन्नाच्या एकतृतीयांश हिस्सा शेतसारा ठरविण्यात आला.

त्याची चलनपद्धतीही प्रशंसनीय होती. नाण्यांचे प्रकार, त्यांचे वजन, त्यांच्यातील शुद्ध धातू व त्यांचे कलाकृतिपूर्ण आकार अकबराच्या त्या क्षेत्रातील कामगिरीची साक्ष देतात.

हिंदूंसंबंधीचे त्याचे धोरण त्याच्या उदारदृष्टीची व मुत्सद्देगिरीची साक्ष देते. पूर्वीच्या मुसलमान राजांनी हिंदूंवर जुलमाने राज्य केले. म्हणून त्यांना हिंदूंच्या कट्टर विरोधाला तोंड द्यावे लागले. अशी परिस्थिती मोगल वंशावर येऊ नये, म्हणून त्याने मुसलमानेतर लोकांच्या मनात राज्याबद्दल आपुलकी निर्माण करण्याचे ठरविले. त्यांना जाचक व राजकीय दृष्टया कमी लेखणारे ⇨जझिया  कर व यात्राकर रद्द केले. युद्धकैद्यांना गुलाम करणे किंवा त्यांना मुसलमान धर्म स्वीकारावयास लावणे बंद करून हिंदूंचे सामुदायिक धर्मांतरापासून रक्षण केले. हिंदूंमधील तंटे पूर्वी मुसलमान काजी निकालात काढत असत. अकबराने त्यांकरिता ब्राह्मणांची नेमणूक केली. हिंदूंना आपल्या दरबारी नोकऱ्या आणि मोठमोठ्या हुद्द्यांच्या व जबाबदारीच्या जागा दिल्या. इतकेच नव्हे, तर जैसलमीर, मारवाड व बिकानेर यांसारख्या राजपूत राजघराण्यांशी त्याने विवाहसंबंध जोडले. इतर मुसलमान राजांनी आपल्या हिंदू स्त्रियांस कधीच न दिलेले पूजार्चादींचे धार्मिक स्वातंत्र्य अकबराने दिले. इतकेच नव्हे, तर राजमहालातच त्याने त्यांच्याकरिता मंदिरे बांधली. त्यांच्या दिवाळीसारख्या सणातही तो सहभागी होत असे. परिणामतः राजपूत हे अकबराचे निष्ठावान सेवक व मोगल साम्राज्याचे संरक्षक पाईक बनले.

अकबराने उलेमा व मुल्ला लोकांच्या सत्तेविरूद्ध व धर्मवेडेपणाविरूद्ध जिद्दीने लढा दिला. प्रथम त्याने चर्चागृहात (इबादतखाना) मुसलमान पंडितांबरोबर हिंदू, जैन, ख्रिश्चन, जरथुश्त्री धर्मपंडितांच्या चर्चा घडवून आणल्या. अकबराने दोन दरबारी ⇨अबुल फज्ल व अबुल फैजी यांनाही मौलवी व उलेमा लोकांचे पितळ उघडे पाडण्यास मदत केली. उलेमा व मुल्लांची सत्ता नष्ट करण्याकरिता अकबराने राजकवी फैजीने तयार केलेल्या

अकबराचे साम्राज्य (इ.स.१६०५)

पद्यात खुत्बा वाचला. त्यानंतर एक जाहीरनामा तयार करण्यात आला. त्यानुसार मुसलमानांत जर धार्मिक किंवा दिवाणी बाबतीत मतभेद निर्माण झाले, तर त्यांच्याबद्दलचा शेवटचा निर्णय देण्याचा अधिकार अकबराला देण्यात आला. मात्र दिलेला निर्णय कुराणाशी सुसंगत, त्याचप्रमाणे राष्ट्रहिताला पोषक असण्याची गरज असे. या जाहीरनाम्यावर मुख्दुमुल्मुल्क व अब्दुन्नबीसह सर्व प्रमुख मौलवींनी सह्या केल्या. तरी पण या जाहीरनाम्यास त्यांनी कसून विरोध केला. तरी पण या जाहीरनाम्यास त्यांनी कसून विरोध केला. विरोध करणाऱ्या यझ्दी, अब्दुन्नबी व इतर मुल्लांना त्यांच्या पदांवरून काढून व काहींना मृत्युदंड देऊन हा विरोध अकबराने सर्व शक्तीनिशी निपटून काढला. यापुढे उलेमांची राज्यकारभारातील ढवळाढवळ व वर्चस्व नष्ट झाले व अकबराला उलेमांवर धार्मिक वर्चस्वही प्राप्त झाले.

अकबराने धर्माचा मूळ पाया मानवता मानून साम्राज्यातील सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगली. हिंदू, ख्रिस्ती, जैन व पारशी धर्मगुरूंकडून त्यांच्या धर्मांतील चांगल्या बाजू समजावून घेतल्या. सर्व जातिजमातींना एकाच मंदिरात एकाच पद्धतीने ईश्वराची आराधना करता यावी, म्हणून त्याने १५८१ साली ⇨दीन-ए-इलाही नावाचा धर्म स्थापन केला. हा धर्म सर्व धर्मातील चांगल्या निवडक तत्त्वांवर आधारित होता. मुख्य तत्त्व ‘सर्वांशी सहिष्णुता’ हे होते. या धर्माचे अनुनायी शक्यतो मांसाहार करीत नसत. त्यागाच्या प्रमाणावर अनुयायांचा दर्जा ठरविण्यात येत असे. या धर्माच्या अनुयायांची संख्या फार मोठी नव्हती. कारण अकबर कोणालाही जबरदस्तीने आपल्या नवीन धर्मात आणू इच्छित नव्हता इतकेच नव्हे, तर राजकारणाच्या आड हा धर्म येऊ न देण्याचे व्यवहारी धोरणही त्याने पाळले. अकबराच्या मृत्यूबरोबरच त्याचा नवीन धर्मही संपुष्टात आला.

दुसऱ्या जातिधर्मातील जे रितीरिवाज अकबरास हितावह वाटले, ते त्याने आचरणात आणले. पारशी व हिंदूंप्रमाणे तो सूर्याची व अग्नीची पूजा करी. त्याचप्रमाणे तो गळ्यात जानवे घाली. तो हिंदूप्रमाणे गंध लावी व सप्तग्रहांची पूजा करी. जीवात्म्याचा पुनर्जन्म होतो, या हिंदू कल्पनेवर त्याचा विश्वास होता. रक्षाबंधन, वसंतपंचमी, दिवाळी इ. हिंदूंचे सण व पारशांचा नवरोझचा सण तो साजरा करी. हिंदूंप्रमाणे तो आपल्या वाढदिवशी आपली तुला करीत असे. सूफी तत्त्वज्ञानामुळे त्याची दृष्टी उदार झाली, तर जैन धर्माच्या प्रभावामुळे त्याने शुक्रवारी व इतर काही विशिष्ट दिवशी शिकार करणे व मांस खाणे बंद केले. त्याचप्रमाणे छोट्या पक्ष्यांच्या शिकारीस त्याने मनाई केली.

अकबराने राजेशाही तत्त्वप्रणालीत आमूलाग्र बदल केला. इस्लाम धर्म हा सार्वभौमत्वाचा आधार आहे असे  न मानणारा, त्याचप्रमाणे जातिधर्मनिरपेक्ष सर्व प्रजेचा स्वतःस पालक समजणारा, अकबर हा मध्ययुगीन भारताचा पहिला मुसलमान राजा होय. त्याने प्रजा व राज्यकर्ते यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासमोर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते व ते साकार करण्याकरिता त्याने अतोनात कष्ट घेतले. नुसत्या राजकीय ऐक्यात त्यास समाधान नव्हते. त्याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक व शक्य झाल्यास धार्मिक ऐक्य घडवून आणण्याची त्याची इच्छा होती. ‘राजा हा ईश्वराचा अवतार आहे, त्याने जुलूम करू नये, सर्वांशी निःपक्षपातीपणाने वागावे’, अशी त्याची राजधर्मासंबंधीची कल्पना होती.

कालबाह्य रीतिरिवाज सोडून देऊन काळाला अनुरूप असा बदल लोकांनी करावा, अशी त्याची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने विधवाविवाहास प्रोत्साहन, लग्नाकरिता वधूवरांच्या संमतीची आवश्यकता, बालविवाहास बंदी, मुलींची जन्मतःच हत्या करण्यास बंदी, बारा वर्षांखालील मुलाची सुंता करण्यास मनाई व बारा वर्षांवरील मुलाची सुंता करण्यास त्याच्या संमतीची आवश्यकता, चुलत बहिणीशी किंवा जवळच्या आप्तेष्ट-संबंधातील मुलीशी लग्न करण्यास मनाई, परधर्मातील पुरूषाशी लग्न करणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्यास मनाई, गोमांस खाण्यास बंदी, व्यभिचार व अतिरेकी मद्यपानास शिक्षा, सोळा वर्षांखालील मुलास व चौदा वर्षांखालील मुलीस लग्नास बंदी, सती जाण्याची जबरदस्ती करण्यास मनाई, एकापेक्षा अधिक बायका करण्यास मनाई इ. सुधारणा त्याने केल्या. ‘इलाही’ नावाच्या सौर कालगणनेची त्याने सुरुवात केली. त्याचप्रमाणे खानेसुमारी व महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याची व वस्तूंच्या किंमती ठरवून देण्याची व्यवस्थाही त्याने केली.

शिक्षणासंबंधी त्याची दृष्टी पुष्कळच प्रगत होती. इस्लामी धर्माचा शिक्षणावर असलेला पगडा नाहीसा करण्याकरिता त्याने अभ्यासक्रमात नीतिशास्त्र, गणित, शेती, भूमिती, ज्योतिषशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृत इ. नवीन विषयांचा समावेश केला व हिंदू आणि मुसलमानांना एकाच शाळेत शिकण्याची व्यवस्था केली.

अकबराच्या दरबारी विद्वानांची प्रभावळ होती. अबुल फज्ल, अबुल फैजी, बीरबल हे त्याच्या दरबारातील काही प्रसिद्ध विद्वान होत. त्याच्या सहिष्णुतेच्या दृष्टीकोनामुळे हिंदूंच्या प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासास उत्तेजन मिळाले. त्याने महाभारत, रामायण, अथर्ववेद, लीलावती, पंचतंत्र इ. संस्कृत ग्रंथांची फार्सी भाषांतरे करविली. तुलशीदास, सूरदास व भक्तिपंथाचा महान नेता विठ्ठलनाथ याच काळात होऊन गेले. निजामुद्दीन ⇨ बदाऊनी वगैरे इतिहासकारानी फार्सीमध्ये इतिहास लिहिले. अबुल फज्लचा

अकबरनामा  तर प्रसिद्धच आहे. अकबराचे स्वतःचे असे २४,००० ग्रंथाचे उत्तम ग्रंथालय होते.

वास्तुकलेला उत्तेजन देण्याकरिता त्याने एक निराळे खाते उघडले होते. त्याच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तूंत हिंदू व इराणी पद्धतीचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. जोधाबाईचा महाल, सती बुरूज, जहांगीर महाल इ. वास्तू आजही त्याच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देतात. त्याच्या दरबारी इराणी चित्रशैली व हिंदू चित्रशैलींचा मिलाफ होऊन मोगल शैली निर्माण झाली. त्याला गायनाची विशेष आवड असल्यामुळे त्याचे दरबारी ⇨तानसेन, बाबा, रामदास, बैजू बावरा यांसारखे उत्तम गवई होते. चित्रकला व गायनकला हिंदू-मुसलमान दोघांनीही सहकाऱ्याने संपन्न केल्या. हिंदू आणि मुसलमानी संगीत पद्धतींच्या मिलाफातून जी हिंदुस्थानी संगीत पद्धती निर्माण होत होती. तिला अकबराने उत्तेजन दिले.

अकबराने ⇨सुलेखनकलेसही उत्तेजन दिले. त्या काळी प्रचारात असलेल्या सुलेखनकलेच्या आठ प्रकारांत‘नस्तअलीक’ प्रकार अकबराचा आवडता होता.

अकबराचे भारताच्या इतिहासातील स्थान फार मोठे आहे. त्या काळात त्याने मुसलमान अल्पसंख्यांकाच्या धार्मिक गुलामगिरीतून हिंदुस्थानला मुक्त करून विशिष्ट लोकांची राज्य करण्याची मिरासदारी नष्ट केली. देश एकछत्री अंमलाखाली आणला. भारताच्या इतिहासात ही त्याची कामगिरी अत्यंत भरीव, संस्मरणीय व मोलाची अशी आहे.

संदर्भ : 1. Krishjnamurti, R. AkbarThe Religious Aspect, 1961.

2. Shelat, J. M. Akbar, Bombay, 1964.

3. Smith, V .A. Akbar, The Great, Mogul 1542-1605, New Delhi, 1966.

4. Srivastav, A. L. The Great, Vol. I, Agra, 1962.

खोडवे, अच्युत