रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख, सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर.यादव घराणे : महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहास प्रसिद्ध राजघराणे. त्याची महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशावर पाचवा भिल्लम (कार. ११८५ – ९३) याच्या कारकीर्दीपासून यादव घराण्याच्या ऱ्हासापर्यंत (इ. स. १३१८) अधिसत्ता होती. या घराण्यातील राजे हे सुरुवातीस राष्ट्रकूटांचे मांडलिक असून पुढे दुसऱ्या भिल्लमाच्या कारकीर्दीत (इ.स. ९७५ –१००५) ते चालुक्यांचे (कल्याण) मांडलिक होते. या घराण्याची माहिती प्रामुख्याने त्यांच्या पुराभिलेखांतून (सु. पाचशे लेख) आणि हेमाद्रिलिखित चतुर्वर्ग चिंतामणि ग्रंथाच्या व्रतखंडातून मिळते. हे यादव आपणास श्रीकृष्णाचे वंशज म्हणवीत आणि ‘द्वारावतीपुरवराधीश्वर’) द्वारका या श्रेष्ठ नगरीचे अधिपती) असे बिरुद धारण करीत. या वंशातील पहिला ऐतिहासिक पुरुष दृढप्रहार (नवव्या शतकाचा प्रथमार्ध) हा होता. याची राजधानी चंद्रादित्यपुर (नासिक जिल्ह्यातील चांदोर) येथे होती तर इतर काहींच्या मते ती श्रीनगर (सिन्नर?) येथे होती दृढप्रहाराचा पुत्र पहिला सेऊणचंद्र हा बलाढ्य झाला. त्याने आपल्या नावे सेऊणपुरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. याच्या अंमलाखाली असलेल्या नासिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांच्या प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडले. यात मुख्यतःखानदेशचा भूप्रदेश होता.

 पुढे सेऊणचंद्राच्या वंशातील वद्दिग याने राष्ट्राकूट तिसरा कृष्ण याचे स्वामित्व स्वीकारले पण नंतर राष्ट्रकूट सत्तेचा ऱ्हास होत असताना या वंशातील दुसऱ्या भिल्लमाने उत्तरकालीन चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारून तैलपाला वाक्पती मुंजाबरोबरच्या युद्धात साहाय्य केले.

 यानंतर बाराव्या शतकाच्या अखेरीस या वंशात पाचवा भिल्लम (कार. सु. इ. स. ११८५–९३) हा बलाढ्य राजा उदयास आला. त्याने उत्तरकालीन चालुक्यांनंतर प्रबळ झालेल्या कलचुरींचा पराभव करून चालुक्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग काबीज केला आणि आपल्या राज्याची दक्षिण सीमा कृष्णा नदीपलीकडे नेली. नंतर त्याने आपली राजधानी देवगिरी (दौलताबाद) येथे नेली आणि तेथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला.

 पाचव्या भिल्लमाला होयसळांशी दीर्घकाळ झगडावे लागले. शेवटी लोक्किगुंडी येथील लढाईत त्याचा सेनापती जैत्रसिंह याचा पराभव होऊन विजयश्रीने होयसळास माळ घातली.

 भिल्लमानतंर त्याचा पुत्र जैत्रपाल किंवा जैतुगी गादीवर आला. त्याने काकतीय राजा महादेव याचा रणांगणांवर वध करून त्याचा मुलगा गणपती याला कैदेत टाकले, पण पुढे त्याला मुक्त करून त्याचे राज्य त्यास परत दिले.

 जैतुगीचा मुलगा दुसरा⇨ सिंधण (कार. १२१०-४६) गादीवर आला. हा महाप्रतापी निघाला. याने होयसळ नृपत्ती वीर बल्लाळाचा पराभव करुन कृष्णा अणि मलप्रभा नद्यांच्या दक्षिणेचा मुलूख परत मिळविला. काकतीय गणपतीला व खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरी (भामेर) च्या लक्ष्मीदेवाला जिंकले, कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी. वर असलेल्या पन्हाळा किल्ल्यात आश्रय घेतलेल्या शिलाहारवंशी ⇨ दुसरा भो याचा पराभव करून त्याला बंदीत टाकले, शिलाहारांचे राज्य खालसा केले आणि चांद्याच्या परमार भोजदेवाला शरण आणले. उत्तरेत माळव्याच्या अर्जुनवर्मदेवाचा पराभव करून त्याच्या खोलेश्वर सेनापतीने वाराणसीपर्यंत चढाई केली आणि तेथील रामपाल राजाला पळवून लावले. तसेच गुजरातच्या लवणप्रसाद वाघेल्याला शरण आणले आणि भृगुकच्छ (भडोच) च्या सिंधुराजाचा पाडाव केला.

 सिंघणाचे दक्षिणेतील विजय, सेनापती बीचण आणि उत्तरेतील सेनापती खोलेश्वर याने मिळविले होते. खोलेश्वर मूळचा विदर्भातील होता. त्याने विदर्भात अनेक देवालये बांधली व अग्रहार स्थापन केले. त्यापैकी एक अग्रहार सध्या अमरावती जिल्ह्यात खोलापूर गावच्या रूपाने विद्यमान आहे.

 सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण (कार. १२४६ – ६१) गादीवर आला कारण सिंघणाचा पुत्र जैतुगी त्याच्या हयातीतच निधन पावला होता. कृष्ण हाही शूर होता. त्याने गर्जर नृपती चौलुक्यवंशी वाघेला वीसलदेव, मालवराजा जैतुगिदेव, चोल नृपती राजेंद्र (तिसरा) व कोसल देशांच्या राजांवर विजय मिळविले. यातील कोसल नृपती छत्तीसगढातील तिसऱ्या जाजल्लदेवाचा उत्तराधिकारी असावा, पण त्याचे नाव माहीत नाही. कृष्णराजाने अमरावतीजवळ खंडेश्वर येथे एक देऊळ बांधले. त्यात त्याच्या काळचा १२५४-५५ चा एक शिलालेख आहे.

 कृष्णानंतर त्याचा मुलगा रामदेव याला गादी मिळावयास पाहिजे होती, पण तो अल्पवयी असल्याने कृष्णाचा धाकटा भाऊ महादेव (कार. १२६१ – १२७०) राज्य करू लागला. त्याच्या काळची मुख्य महत्त्वाची घटना म्हणजे उत्तर कोकणचा शिलाहार राजा सोमेश्वर याचा त्याने केलेला पराभव. त्याने त्याचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला. सोमेश्वराचा जमिनीवर पराभव झाल्यावर तो आपल्या जहाजात बसून समुद्रात गेला, पण तेथेही महादेवाच्या आरमाराने त्याला जलसमाधी दिली. या युद्धाचे वर्णन करताना हेमाद्रीने म्हटले आहे की, ‘महादेवाच्या प्रतापापेक्षा वडवानलाला तोंड देणे सोमेश्वरला जास्त पसंत पडले’. महादेवाच्या पूर्वीच्या यादवांनी माळवा व तेलंगण या प्रदेशांवर आक्रमण केले होते. पण महादेवाने तसे केले नाही. याचे कारण माळव्याच्या राजाने आपल्या लहान मुलाला गादी देऊन तो स्वतः तपश्चर्येला निघून गेला. तेलंग्यांनी तर एका स्त्रीला (रुद्रम्माला) गादीवर बसविले, असे हेमाद्रीने म्हटले आहे.


महादेवाने आपला पुतण्या रामदेव याचा हक्क बाजूला सारुन आपल्या आमण नामक मुलाला गादी दिली. रामदेवाला ते सहन झाले नाही. त्याने आपल्या सैनिकांचे एक नृत्यपथक तयार केले आणि नृत्याचा कार्यक्रम दाखविण्याच्या मिषाने देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला. लोक नाच पाहण्यात गर्क आहेत असे पाहिल्यावर त्याच्या काही सैनिकांनी नाच्यांचा वेष टाकून कत्तलीस सुरुवात केली, आमणला पकडून त्याचे डोळे काढले आणि देवगिरी किल्ला ताब्यात घेतला. हे वर्णन रामदेवाच्या पुरुषोत्तमपुरी ताम्रपटात आले आहे.

 रामदेवानेही (कार. १२७१ – १३११) काही उल्लेखनीय विजय मिळविले. त्याने डाहल (चेदी) देशाचा राजा, भांडागाराचा (विदर्भातील भंडारा जिल्ह्याचा) अधिपती आणि वज्राकरचा (वैरागडचा) शासनकर्ता यांचा पराभव केला. त्यामुळे पूर्व विदर्भ त्याच्या राज्यात आला. त्याने काकतीय प्रतापरुद्रा च्या पूर्वेकडील आक्रमणाला पायबंद घातला. खोलेश्वराने उत्तरेत वाराणसीपर्यंत स्वारी करून तेथून मुसलमानांना हाकलून लावले आणि तेथे शार्ङ्गधराचे (विष्णूचे) देवालय बांधले. त्याच्या सेनापतींनी होयसळांच्या प्रदेशावर आक्रमण करुन द्वारसमुद्र राजधानीपर्यंत धडक मारली पण तेथे त्यांना माघार घ्यावी लागली.

 इसवी सन १२९४ मध्ये अलाउद्दीन खल्‌जीने दक्षिणेत स्वारी करून अचलपूर ताब्यात घेतले आणि तो आठ हजार सैन्यासह अचानक देवगिरीपुढे दाखल झाला. रामदेवाचे सैन्य दूरच्या स्वारीत गुंतले होते. शिवाय त्यात त्याच्या गाफिलपणाची आणि लोकांच्या फितुरीची भर पडली. बाहेर पराभव झाल्यावर त्याने किल्ल्यात आश्रय घेतला पण त्याला फार काळ टिकाव धरता आला नाही. त्याला अलाउद्दीनला जबर खंडणी देणे भाग पडले.

यादवांची सोन्याची नाणीपुढे रामदेवाने कबूल केलेली खंडणी न दिल्यामुळे १३०७ मध्ये अलाउद्दीनाने मलिक काफूर याला देवगिरीवर पाठविले. त्याने पुन्हा रामदेवाचा पराभव करून त्याला दिल्लीस नेले. तेथे सहा महिन्यानंतर अलाउद्दीनाने त्याला सन्मानाने परत पाठवून आपला मांडलिक म्हणून राज्य करण्याची परवानगी दिली. पुढे १३०८ मध्ये मलिक काफूर काकतीय व होयसळ राज्यांवर स्वारी करण्याकरिता देवगिरास आला, तेव्हा रामदेवाला त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे भाग पडले. रामदेवाचा पुरुषोत्तमपुरी ताम्रपट १५ सप्टेंबर १३१० मध्ये दिला होता. त्यानंतर लौकरच रामदेव निधन पावला असावा. त्यानंतर यादवांच्या गादीवर आलेला रामदेवाचा पुत्र शंकरदेव याने मुसलमानांचे स्वामित्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मलिक काफूरने १३१३ मध्ये पुन्हा स्वारी करुन शंकरदेवाला ठार मारले.

 नंतर रामदेवाचा जामात हरपालदेव याने बंड करून देवगिरीचा किल्ला काबीज केला पण हाही प्रयत्न सफळ झाला नाही. अलाउद्दीनचा मुलगा मुबारक याने १३१८ मध्ये पुन्हा देवगिरीवर स्वारी केली आणि यादवांचे राज्य पूर्णपणे नष्ट केले.

यादवकालीन महादेव मंदिराचे शिखर, झोडगे, नासिक जिल्हा.

यादव काळात महाराष्ट्रात सांस्कृतिक दृष्ट्या विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाली. यादव राजांनी हिंदू धर्माला राजाश्रय दिला तरी त्यांचे एकूण धोरण सहिष्णू होत. नारसिंही ही यादवांची कुलदेवता पण या काळात शैवपंथाचा जोर वाढून अनेक शैव मंदिरे बांधण्यात आली. या काळात अनेक धर्मपंथांचा उद्‌भव झाला. त्यांची दाने ब्राह्‌मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्टानाकरिता दिली होती. वैदिक यज्ञयागांचा लोप झाला होता. धार्मिक वृत्तीचे दानशूर लोक अग्रहार देत व अन्नसत्रे स्थापीत असत. बौद्ध धर्म बहुतेक नामशेष झाला होता, पण उल्लेखनीय गोष्ट ही की यादवांचा मांडलिक शिलाहार गंडरादित्य याने इरुकुडी गावाजवळ केलेल्या गंडसमुद्र तलावाच्या काठी हिंदू व जैन देवालयांप्रमाणे बौद्ध देवालयही बांधले होते. यादवांनी जैन धर्माला अनेक दाने दिली. त्यांच्या काळी वीरशैव किंवा लिंगायत, नाथ, महानुभाव व वारकरी पंथ उत्पन्न झाले किंवा भरभराटीस आले. पंढरपूरच्या विठ्ठलाला यादवांनी दिलेल्या देणग्या तेथील कोरीव लेखांत आढळतात. यांतील बहुतेकांना राजाश्रय होता.

यादव काळात विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनास उत्तेजन मिळाले. खानदेशात पाटण, कर्नाटकात सोलोटगी, मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्यांच्या व शास्त्रांच्या अध्ययनांची विद्यापीठे होती. भास्कराचार्यांचा नातू आणि सिंघणाच्या दरबाराचा ज्योतिषी चांगदेव याने चाळीसगावानजीक पाटण येथे चालविलेल्या ज्योतिषशास्त्राच्या पाठशाळेचा कोरीव लेखात निर्देश आहे. त्याकाळी धर्मशास्त्र, पूर्वमीमांसा, न्याय, वेदान्त इत्यादिकांवर बरीच ग्रंथरचना झाली. अपरार्काची याज्ञल्क्य स्मृतीवरील अपरार्का टीका, हेमाद्रीचा चतुर्वर्ग-चिंतामणि, बोपदेवाचे मुक्ताफल हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. बोपदेवाने मुग्धबोध नामक संस्कृत भाषेचे सुबोध व्याकरण लिहिले. त्याचा प्रचार अद्यापि बंगालात आहे. मुक्ताफला वरील हेमाद्रीच्या टीकेत बोपदेवाच्या ग्रंथांची संख्या पुढीलप्रमाणे दिली आहे. व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, तिथिनिर्णयावर एक, अलंकारावर तीन आणि भागवत धर्मावर तीन असे ग्रंथ बोपदेवाने लिहिले होते. त्यांपैकी सध्या आठ उपलब्ध आहेत. बोपदेव हा सध्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठी सार्थ गावाचा रहिवासी होता. पुढे तो हेमाद्रीच्या आश्रयास आला.

महानुभाव पंथाचे प्रमुख संस्थापक श्री चक्रधर यांनी आपला उपदेश मराठीत केल्यामुळे त्यांच्या पंथायांनी मराठीत ग्रंथरचना केली. हे मराठीतले आद्य ग्रंथ होत. मुकुंदराजाचे विवेकसिंधुपरमामृत आणि ज्ञानदेवांची भावार्थदीपिका नामक गीतेवरील टीका हे त्या काळचे वेदान्तविषयक मराठी ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.

 यादवकालीन कला मुख्यत्वे त्यांच्या वास्तुशिल्पशैलीतून दृग्गोचर होते. या काळी एक विशिष्ट स्थापत्य पद्धती (ज्यामधे चुन्याचा वापर अजिबात नाही) प्रचारात आली तिला यादवांचा मंत्री हेमाद्री किंवा हेमाडपंत (तेरावे शतक) याच्या नावावरून हेमाडपंती हे नावरूढ झाले. हेमाडपंत हा महादेव यादव आणि रामदेवराव यादव ह्यांचा श्रीकरणाधिप होता. त्याने चतुर्वर्गचिंतामणि सारखा धर्मशास्त्रकोश आणि इतर अनेक ग्रंथ लिहिल्याचे उल्लेख मिळतात. त्याने अनेक नवी मंदिरे बांधली आणि जुन्याचा जीर्णोद्धार केला. त्याने सु. तीनशे मंदिरे बांधण्यास उत्तेजन दिले होते, अशी वदंता आहे. त्यामुळे या तत्कालीन मदिरांना ‘हेमाडपंती’ ही संज्ञा रूढ झाली असावी तथापि अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांतील काही मंदिरे हेमाद्रीपूर्वी शंभरसव्वाशे वर्षे आधी बांधल्याचे पुरावे मिळतात. त्यामुळे या सर्व मंदिरांना हेमाडपंती म्हणणे कालदृष्ट्या अप्रस्तुत व चुकीचे ठरेल. याकरिता ही अपसंज्ञा बाजूला ठेऊन त्यांना ‘यादव मंदिरे’ म्हणणे संयुक्तिक होईल.


यादवकालीन मंदिरे प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र (नासिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे) व आंध्र प्रदेशाचा काही भाग यांतून आढळतात. त्यांपैकी बहुसंख्य मंदिरांची कालौघात पडझड झाली असून फारच गोडी सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांचीही शिखरे पडलेली असून उर्वरित भाग कसेबसे तग धरुन आहेत. वास्तुशैलीच्या दृष्टीने पाहता यांतील बहुसंख्य मंदिरे नागरशैलीत (इंडो-आर्यन), विशेषतः पश्चिम भारतातील माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत बांधली आहेत. ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तिच्यात स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात. या मंदिराच्या बांधणीसाठी चतुरस्त्र आणि वृत्त संस्थान (नक्षत्राकृती) असे सर्वसाधारण दोन आराखडे (विधाने) वापरली असून मंदिराच्या कोनाकृती भिंती वरपर्यंत चढत चढत गेल्यामुळे त्या ठाशीव दिसतात व छायाप्रकाशांच्या परिणामामुळे त्यांच्या भरीवपणाला अधिक उठाव मिळतो. त्यातच पायापासून कळसापर्यंत गेलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे बांधणीचा उभटपणा प्रकर्षाने जाणवतो. बांधणीत दगड सांधण्यासाठी चुना वा माती अशा प्रकारचा कोणताही तत्सम पदार्थ वापरलेला नाही. दगडांना खाचा पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी अशा प्रकारे केली आहे, की तिला भक्कमपणा प्राप्त झाला आहे.

 मंदिर वास्तूंमध्ये स्तंभ, द्वारशाखा, अर्धमंडप, सभामंडप, वितान (छत) आणि शिखर हे घटक वैशिष्ट्यपूर्ण असून अर्धमंडप व सभामंडप यांतून शिल्पांकन क्वचितच आढळते. स्तंभ व द्वारशाखांवर शिल्पांकन असून स्तंभांचे विविध प्रकार आहेत. स्तंभ एकसंघ कातलेले आणि गुळगुळीत केलेले असून उपलब्ध होणाऱ्या अखंड पाषाणाच्या लांबीनुसार वास्तुशास्त्रज्ञांनी मंदिराचे प्रमाण ठरविले असावे, असे दिसते. स्तंभ चौकोनी, षट्‍कोनी, अष्टकोनी इ. भिन्न प्रकारचे थर (mouldings) एकावर एक रचून केल्यासारखे भासतात. स्तंभपाद चौरस आकाराचा आढळतो. स्तंभशीर्षे किचक, कमळ व क्वचित पर्णाची आहेत. स्तंभातील कर्णिका किंवा कणी ही यादव मंदिरांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे.

सुरसुंदरी, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर. यादव मंदिरांची शिखरे इतर अवशिष्ट मंदिरांपेक्षा वेगळी आणि लक्षणीय आहेत. शिखरांची घडण आणि मंदिराच्या पायाची आखणी यांत फार मोठा समतोल कलाकारांनी साधला आहे. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या या मंदिराच्या पायाची आखणी अनेक कोनांत केलेली आहे. या कोनांच्या रेषा पायाच्या जमिनीपासून कळसापर्यंत उभ्या गेलेल्या दिसतात आणि शिखरांच्या छोट्या प्रतिकृती (उरुशृंगे) खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसविल्यामुळे ही सर्व लहान शिखरे मिळून मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते व कारंज्याची जणू लय त्यात प्रत्ययास येते. या प्रतिकृती स्थिर आणि चिकटून राहाव्यात म्हणून बाजूला साहाय्यक नक्षीकाम केलेल्या शिळा बसविलेल्या आहेत. याशिवाय ही लहान शिखरे (कूट) कूटस्तंभाच्या आधाराने हळूहळू वरच्या बाजूस उभी चढविलेली दिसतात. ती लहान होत जाणारी शिखरे एकरुप होऊन त्यातून एका सर्वांगीण सुरेख एकात्म शिखराचा आभास निर्माण होतो.

 शिखरांखालोखाल यादवशैलीच्या मंदिरांची विताने वैशिष्ट्यपूर्ण व अलंकृत असून ती प्रामुख्याने संवर्ण व फंसाना या दोन प्रकारची आहेत. त्यांतून गुजरात व माळव्यातील मंदिरांचे अनुकरण आढळते पण त्यातही स्थानिक गुणावगुणांचे संमिश्रण आहे.

 सुरुवातीची म्हणजे तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत बांधलेली मंदिरे शिल्पशैलीने नटलेली व अलंकरणयुक्त आहेत. त्यानंतरच्या मंदिरात वास्तुशैलीवर अधिक भर असून क्कचित काही ठिकाणी ओबडधोबड शिल्पांकन आढळते. सुरुवातीच्या मंदिरांतून विपुल शिल्पांकन आढळते आणि वास्तुकला आणि शिल्पकला यांतील परिपूर्ण सुसंगती राखण्याचा प्रयत्न तत्कालीन कलाकारांनी केलेला असून शिल्पाला वास्तुरचनेच्या विशिष्ट बांधणीमुळे एक प्रकारचा उठाव मिळाला आहे. असे असूनही शिल्प आणि वास्तू एकरूप  झालेली आहेत. मूर्तिसंभारात उभट मूर्ती वास्तुशैलीच्या उभटपणाला बाधा येऊ नये म्हणून अधिक प्रमाणात असून प्रतीकात्मक शिल्पांकनांतही हेच तत्त्व प्रामुख्याने दिसते. मूर्तीत शैव प्रभावलीतील प्रतिमा जास्त आहेत व उर्वरित प्रतिमांत सुरसुंदरी, मातृकामूर्ती, गणपती, विष्णूचे अवतार, कृष्णलीला, महाभारत-रामायण कथानक शिल्पे, योद्धे, पशू-पक्षी इ. विविध प्रकार आढळतात. दंपती शिल्पे व व्याल थोडे आहेत. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, फळे, फुले, पाने, वेलबुट्ट्या इ. प्रकार मंदिराच्या सुशोभनात शुभचिन्हे म्हणून वापरलेली दिसतात, पण ती अधिकतर प्रतीकात्मक आहेत. यादव कलाकारांनी जबरेश्वर (फलटण), महादेव (परळी), महादेव (शिखरशिंगणापूर), गोंडेश्वर (सिन्नर), महादेव (झोडगे) आदी काही मंदिरांवर कामशिल्पे खोदलेली आहेत. त्यांतून विविध प्रकारची आसने वा अवस्था व त्यांचे परंपरागत नमुने आढळतात.

 यादवकालीन अनेक वीरगळ उपलब्ध झाले असून त्यांवर शिल्पांकन आहे, मात्र नंतरच्या वीरगळांचे शैलीकरण झाल्याचे दिसते. याशिवाय देवगिरी, अंकाई, टंकाई अशा काही मोठ्या व अवघड किल्ल्यांचे बांधकाम या काळात वा तत्पूर्वी झालेले दिसते. यादव कालीन काही जैन गुहांतूनही शिल्पांकन आढळते.

 यादव मंदिरात महादेव, देवी, शिव आदी नऊ मंदिरांचा समूह (बलसाणे), महादेव (झोडगे), गोंडेश्वर (सिन्नर), भुलेश्वर (यवत), लक्ष्मी-नारायण (पेढगाव), जबरेश्वर (फलटण), नागनाथ (औंढा नागनाथ), शिव (निलंगा), दैत्यसूदन (लोणार), विष्णू (सातगाव), विठ्ठल (देगाव), भवानी (तहकारी) वगैरे काही मंदिरे वास्तुशिल्प शैलीच्या दृष्टीने उल्लेखनीय असून गोंडेश्वराचे मंदिर सर्वांत मोठे आहे. इथे यादवकालीन वास्तुशैलीची परिणत अवस्था पहावयास मिळते. मात्र शिल्पांकनात ओबडधोबडपणा जाणवतो. भुलेश्वर, जबरेश्वर, लक्ष्मी-नारायण, विष्णू, दैत्यसूदन, भवानी, नागनाथ वगैरे मंदिरांतील अलंकरण कलापूर्ण असून यांतील कल्याणसुंदरमूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, उच्छिष्ट गणेश, चतुर्भुज विष्णू, तांडवनृत्यातील शिव, विश्वरुप विष्णू, ब्रह्मदेव, सरस्वती आदी देवदेवता आणि काही सुरसुंदरींच्या मूर्ती, शालभंजिका, कृष्णलीला आणि महाभारतरामायणातील कथानकाची दृश्ये वास्तववादी व लक्षवेधक आहेत परंतु एकूण यादव मूर्तिसंभारात तत्कालीन होयसळ, पूर्व गंग, काकतीय, चंदेल्ल आदी वंशांच्या आधिपत्याखाली बांधलेल्या हळेबीड, कोनारक, पालमपेठ, खजुराहो येथील मंदिरांतील वैविध्य, प्रतिमानांचे विविध प्रकार, अलंकारांचे नमुने आणि मूर्तीचे सौष्ठव यांचा अभाव जाणवतो. काही निवडक प्रतिमाच फक्त याला अपवाद ठरतील.

 ही वास्तुशैली राजाश्रय संपल्यानंतरही यादव साम्राज्याच्या अवनतीनंतर चौदाव्या शतकात अस्तित्वात होती परंतु मुसलमानांच्या दक्षिणेकडील स्वाऱ्यांमुळे मूर्तिकाम जवळजवळ संपुष्टात आले आणि वास्तूच्या बांधणीत ज्वाला प्रामुख्याने हेमाडपंती म्हणता येईल असे ठोकळेवजा बांधकाम दिसू लागले.

पहा: दौलताबाद महाराष्ट्र सिंघण.

संदर्भ: 1. Deglurkar, G. B.Temple Architecture &amp Sculpture of Maharashtra, Nagpur. 1974.

           2. Deshpande, S.R.Yadava Sculpture, New Delhi, 1985.

           3. Majumdar, R. C. Ed.The Struggle for Empire, Bombay. 1970.

           4. Ritti, Shrinivas,The Seunas, Dharwar, 1973.

           5. Varma, O. P.The Yadavas and Their Times, Nagpur, 1970.

           ६. पानसे, मु. ग. यावकालीन महाराष्ट्र मुंबई, १९६३.

मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.

 “