गुप्तकाल : तिसऱ्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदुस्थानात, प्राचीन मगध देशात एक वंश उदयास आला. या वंशातील गुप्त नावाच्या पहिल्या राजावरून त्यास गुप्त वंश हे नाव मिळाले. या वंशातील राजांनी सु. ३०० ते ५५० पर्यंत भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर, राज्य केले. या कारकीर्दीस गुप्तकाळ ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात गुप्तांच्या अंमलाखाली भारताचा सर्व उत्तर प्रदेश होता आणि त्यांचे मांडलिकत्व उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक लहानमोठ्या राजांनी, तसेच पूर्वेकडील काही परकीय देशांनी मान्य केले होते. दक्षिणेतील बहुतेक राज्ये त्यांच्या वर्चस्वाखाली होती. यामुळे या काळात अखिल हिंदुस्थानवर गुप्तांचा अंमल होता, असे म्हणावयास हरकत नाही. या काळात राजकीय स्थैर्यामुळे कला, वाङ्‌‌मय वगैरे सर्व बाबतींत सर्वांगीण प्रगती झाली.

गुप्तकाळासंबंधीची माहिती मुख्यत्वे तत्कालीन वाङ्‌मय, कोरीव लेख, नाणी, पुरातत्त्वीय अवशेष आणि परकीय प्रवाशांचे वृत्तांत यांमधून उपलब्ध होते. या ऐतिहासिक साधनांव्यतिरिक्त अवशिष्ट मंदिरे व भित्तिचित्रे यांमुळेही तत्कालीन धार्मिक स्थिती व समाजजीवन यांची कल्पना येते.

ऐतिहासिक साधने : वाङ्‌मय : समुद्रगुप्ताचे म्हणून अलीकडे प्रसिद्ध झालेले कृष्णचरितनामक खंडित काव्य, विशाखदत्ताचे देवीचंद्रगुप्त  हे संस्कृत नाटक आणि कालिदासाचे कुन्तलेश्वरदौत्य  यांतून काही माहिती मिळते. तथापि कृष्णचरित  हे बनावट असल्याचे आता सिद्ध झाले असून उर्वरित ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. इतर ग्रंथांत आलेल्या त्यांतील उताऱ्यांवरून त्यांची हकीकत ज्ञात होते.

कोरीव लेख : उपरिनिर्दिष्ट साधनांत कोरीव लेखांचे महत्त्व विशेष आहे. अनेक गुप्त राजांच्या प्रशस्ती, त्यांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मणांना, देवांना व बौद्ध संघांना दिलेल्या दानांचे लेख, त्यांच्या आज्ञांना केलेल्या मृण्मय मुद्रा, खासगी व्यक्तींनी बांधलेल्या इमारती, मूर्ती, स्तूप इत्यादिकांवर अनेक कोरीव लेख आढळतात. त्यांवरून तत्कालीन परिस्थितीविषयी माहिती मिळते. इतर साधनांपेक्षा ही माहिती जास्त विश्वसनीय आहे.

नाणी : बहुतेक गुप्त राजांनी विविध प्रकारची सुंदर सोन्याची नाणी पाडली होती. त्यांवरून त्यांची सौंदर्यप्रीती, कलासक्ती, दैवते, संस्कृत भाषेवरील प्रेम इत्यादिकांची माहिती होते. काही नाण्यांवरून तत्कालीन घटनांचा (उदा., समुद्रगुप्ताच्या अश्वमेधाचा), तसेच आर्थिक परिस्थितीचा बोध होतो. शिवाय त्यांचे संचय सापडलेल्या ठिकाणांवरून ती पाडणाऱ्या राजांच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.

उत्खनन : प्राचीन काळच्या इमारती, दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या वस्तू, मुलांची खेळणी, स्त्रियांचे अलंकार, शिल्पे इत्यादिकांविषयीची माहिती उत्खननामुळे उपलब्ध झाली आहे. गुप्तकालीन इमारती फार थोड्या अस्तित्वात आहेत. त्यांत स्तूप, विहार, देवळे इ. धार्मिक इमारतीच अधिक आहेत. गुप्तकालीन जीवनाची माहिती अलाहाबाद जिल्ह्यातील भीटा आणि मगधातील वैशाली येथील उत्खननांमधून मिळते.

याशिवाय सारनाथ, नालंदा, सांची येथील अवशेषांवरून गुप्तकालीन सांस्कृतिक जीवन तसेच बौद्ध धर्म, त्यांचे स्तूप, विहार व देवालये, तत्कालीन विद्यापीठे व त्यांतील जीवन इत्यादिकांविषयी बहुमोल माहिती मिळते.

प्रवासवर्णने : भारतात प्राचीन काळी अनेक चिनी यात्रेकरू यात्रा करण्याकरिता येत असत. त्यांपैकी ⇨फाहियान  हा गुप्तकाळात भारतात आला होता. त्याच्या प्रवासवर्णनातून विविध प्रकारची माहिती मिळते. त्याने गुप्त साम्राज्यातील परिस्थितीविषयी काही उल्लेख केले आहेत. त्याने पाटिलपुत्र, मथुरा, माळवा इ. ठिकाणांच्या धार्मिक जीवनाविषयीच मुख्यतः लिहिले आहे.

राजकीय इतिहास :  या वंशातील पहिला राजा गुप्त. याच्यावरून या वंशाला गुप्त, असे नाव पडले. पहिल्या दोन राजांची सत्ता मगधापुरतीच मर्यादित असावी. म्हणून त्यांजविषयीच्या निर्देशात महाराज अशी साधी पदवी त्यांच्या नावामागे लावलेली आढळते. ⇨पहिल्या चंद्रगुप्ताने वैशालीच्या लिच्छवी वंशातील कुमारदेवीशी विवाह करून लिच्छवींच्या साहाय्याने आपले राज्य पश्चिमेस प्रयाग व साकेत (अयोध्या) येथपर्यंत वाढविले. चंद्रगुप्ताने नंतर महाराजाधिराज अशी सम्राटपदनिदर्शक पदवी धारण केली आणि ३२० मध्ये गुप्त संवत् चालू केला. लिच्छवींच्या साहाय्याने आपला राज्यविस्तार झाला, म्हणून त्याने आपल्या व कुमारदेवीच्या नावांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यांच्या मागील बाजूवर लिच्छवींचे नाव घातले आहे.

चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाळी दरबार भरवून त्यात आपला पुत्र ⇨समुद्रगुप्त  याची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. समुद्रगुप्ताने अनेक विजय मिळवून आपले साम्राज्य उत्तर भारताच्या विस्तृत प्रदेशावर पसरविले. त्याने प्रथम आपल्या शेजारच्या अनेक राज्यांचा उच्छेद करून त्यांची राज्ये खालसा केली आणि आपल्या राज्याची पश्चिम सीमा चंबळा नदीपर्यंत पसरविली तेव्हा पंजाब, राजपुताना व मध्य प्रदेश यांतील अनेक गणराज्यांनी त्याचे स्वामित्व कबूल केले. पूर्वेकडील बंगाल, आसाम, नेपाळ इ. प्रदेशांच्या अधिपतींनी, तसेच पंजाब–अफगाणिस्तानच्या कुशाणांनी आणि माळवा-काठेवाडच्या क्षत्रपांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारून त्याची कृपा संपादन केली.

नंतर समुद्रगुप्ताने दक्षिण दिग्विजयास आरंभ केला. त्याने दक्षिण कोसलच्या (छत्तीसगढच्या) राजाचा पराभव करून महाकांतारवर (बस्तर जिल्हा) स्वारी केली. तो प्रदेश जिंकल्यावर तो पूर्वेस वळला व पूर्व किनाऱ्यावरील ओरिसा आणि आंध्र प्रदेश जिंकून त्याने कांची (कांजीवरम्) पर्यंत धडक मारली. तेथील विष्णुगोपनामक पल्लव राजाचा पराजय करून तो परत फिरला. त्याच्या विजयाची वार्ता ऐकताच सिंहलद्वीपासारख्या अनेक द्वीपांच्या अधिपतींनी त्याचे स्वामित्व मान्य केले. दक्षिणेतल्या राजांकडून कारभार घेऊन त्याने त्यांची राज्ये त्यांस परत केली.

स्वराज्यात परतल्यावर त्याने आपल्या हरिषेणनामक परराष्ट्र मंत्र्याकरवी आपल्या विजयाची प्रशस्ती तयार करवून ती कौशाम्बी येथील अशोकाच्या शिलास्तंभावर कोरविली. नंतर त्याने अश्वमेध यज्ञ करून आपल्या साम्राज्यसत्तेची द्वाही सर्वत्र फिरविली. त्या प्रसंगी त्याने आपली अश्वमेध नाणी पाडली.

समुद्रगुप्त जसा शूर तसा विद्वान व कलाप्रिय होता. त्याने अनेक उत्कृष्ट काव्ये रचली होती. ती विद्वानांनाही अनुकरणीय वाटत असत. तो संगीतातही निष्णात होता, हे हरिषेणाच्या प्रशस्तीतील वर्णनावरून, तसेच त्याच्या वीणांकित नाण्यावरून स्पष्ट दिसते. त्याने सहा प्रकारची सुंदर सोन्याची नाणी पाडली होती. त्यांवरील लेख छंदोबद्ध संस्कृतात आहेत. त्यांवरून त्याचे संस्कृत भाषेवरचे प्रेम व्यक्त होते.

समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा रामगुप्त हा ३७५ मध्ये गादीवर आला. त्याचा कुशाणांपुढील अपमानास्पद पराभव पाहून त्याचा भाऊ ⇨ दुसरा चंद्रगुप्त  याने रामगुप्ताचा खून केला व गादी बळकावली, असे काहींचे म्हणणे आहे. तत्संबंधी सबळ पुरावा अद्यापि उपलब्ध झाला नाही. दुसरा चंद्रगुप्त ३८० च्या सुमारास गादीवर आला. गादीवर आल्यावर त्याने पूर्वेकडील बंगाल देश जिंकला. नंतर पंजाबवर स्वारी करून सिंधू नदीला मिळणाऱ्या सातही नद्या पार करून त्याने बॅक्ट्रियापर्यंत आक्रमण केले आणि कुशाणांचा उच्छेद केला. नंतर त्याने माळवा–काठेवाड प्रांतांवर राज्य करणाऱ्या शक-क्षत्रपांचा पराभव करून ते प्रांत आपल्या राज्यास जोडले. या स्वारीत त्याला विदर्भाचा वाकाटक राजा पहिला पृथिवीषेण याचे साहाय्य झाले असावे. हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता त्याने आपली कन्या ⇨प्रभावती -गुप्ता  वाकाटक राजपुत्र दुसरा रुद्रसेन यास दिली. चंद्रगुप्ताच्या तंत्राने तत्कालीन विदर्भाचा राज्यकारभार चालला होता. कुंतल (दक्षिण महाराष्ट्र) येथे राज्य करणाऱ्या पूर्वकालीन राष्ट्रकूट राजांच्या दरबारीही चंद्रगुप्ताचे वर्चस्व होते. त्याने कालिदासाला आपला दूत म्हणून कुंतलेश्वराच्या सभेत पाठविले होते आणि नंतर राजा देवराज हा सदैव ख्यालीखुशालीत मग्न असल्यामुळे त्याच्या राज्यशासनाची जबाबदारी पत्करली होती.


 

माळवा-काठेवाडातील शक-क्षत्रपांचा उच्छेद केल्यावर चंद्रगुप्ताने उज्‍जयिनी येथे राजधानी नेली व विक्रमादित्य ही पदवी धारण केली.

चंद्रगुप्त हा स्वतः मोठा विद्वान, रसिक आणि संस्कृत विद्येचा अभिमानी होता. उज्‍जयिनीच्या विद्वत्‌सभेपुढे त्याने कालिदासादी कवींप्रमाणे स्वतः परीक्षा दिली होती. गुजरात-काठेवाड प्रदेश जिंकल्यावर परदेशाशी व्यापाराचे मार्ग खुले होऊन देशात सुबत्ता वाढली. तिचे प्रतिबिंब चंद्रगुप्ताच्या सोन्याच्या नाण्यांत आढळते. त्याने आठ प्रकारची सोन्याची सुंदर नाणी पाडली. समुद्रगुप्ताच्या नाण्यांप्रमाणे याही नाण्यांवरचे लेख छंदोबद्ध संस्कृतात आहेत. क्षत्रपांचा पाडाव केल्यावर माळवा-गुजरात-काठेवाड या प्रदेशांतील चलनांकरिता त्याने त्यांच्यासारखी चांदीची नाणी पाडली. त्याची तांब्याची नाणीही सापडली आहेत.

चंद्रगुप्ताचे राज्य उत्तर भारताच्या बहुतेक भागावर पसरले होते. दक्षिणेतील विदर्भ आणि कुंतल या प्रदेशांचा कारभार त्याच्या तंत्राने चालला होता. त्याच्या राज्यात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी नांदत होती, हे त्या काळी भारतात आलेल्या फाहियान या चिनी यात्रेकरूने लिहून ठेवले आहे.

दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र पहिला कुमारगुप्त हा ४१३ मध्ये गादीवर आला. त्याने आपले विस्तृत साम्राज्य टिकवून आपल्या प्रजेला शांतता, सुव्यवस्था व समृद्धी यांचा लाभ दीर्घ काळ (सु. ४२ वर्षे) करून दिला. त्याची चौदा प्रकारची सोन्याची नाणी सापडली आहेत. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस पुष्यमित्रनामक गणराज्याच्या लोकांनी बंडाचे निशाण उभारून उपद्रव दिला पण राजकुमार स्कंदगुप्त याने मोठ्या शौर्याने त्यांचा पाडाव करून शांतता प्रस्थापित केली. या सुमारास कुमारगुप्त निधन पावला आणि राजधानीत त्याचा वडील भाऊ पुरुगुप्त याने गादी बळकाविली. त्याने महाराजाधिराज अशी पदवीही धारण केली. त्याच सुमारास रानटी हूणांनी उत्तरेकडून गुप्त साम्राज्यावर स्वारी केली. स्कंदगुप्ताने मोठ्या शौर्याने त्यांचा पाडाव करून भारताला त्यांच्या टोळधाडीपासून वाचविले आणि ती आनंददायक बातमी आपल्या मातेला सांगण्याकरिता तो गेला, त्या वेळी तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले, असे भीटारी लेखात म्हटले आहे.

असा नेत्रदीपक विजय मिळविणाऱ्या स्कंदगुप्ताला अधिकाऱ्यांचा व प्रजाजनांचा पाठिंबा मिळाला असल्यास नवल नाही. त्याने पुरुगुप्ताला पदच्युत करून गादी बळकावली आणि ४६७ पर्यंत सु. बारा वर्षे राज्य केले. त्याची चार प्रकारची सोन्याची नाणी मिळाली आहेत. त्याने दुसऱ्या चंद्रगुप्ताप्रमाणे विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती. त्याच्या कारकीर्दीत गुप्त साम्राज्य टिकून राहिले. दूरच्या काठेवाडातही गुप्तांचा   अंमल चालू होता, हे त्याच्या कारकीर्दीत गिरनार येथील सुदर्शन तलावाच्या दुरुस्तीच्या प्रसंगी खोदलेल्या प्रस्तरलेखावरून स्पष्ट दिसते.

स्कंदगुप्तानंतरची गुप्त वंशावळ अनिश्चित आहे. अनेक विद्वानांनी उपलब्ध प्रमाणांचा भिन्न भिन्न अर्थ लावला आहे. स्कंदगुप्तानंतर दुसरा कुमारगुप्त गादीवर आलेला दिसतो. त्याचा गुप्त संवत् १५७ (४७६) चा लेख सारनाथ येथे सापडला आहे. त्यावरून त्याने स्कंदगुप्तानंतर सु. १० वर्षे राज्य केले असावे तो स्कंदगुप्ताचा पुत्र असावा. त्यानंतर पुरुगुप्ताचा पुत्र बुधगुप्त याने त्याचा पाडाव करून गादी बळकावली. याचे लेख गुप्त संवत् १५७ (४७६) पासून १७५ (४९४) पर्यंतचे उत्तर प्रदेशातील सारनाथ, बंगालमधील पहाडपूर व दामोदरपूर आणि मध्य प्रदेशापैकी सागर जिल्ह्यातील एरण येथे सापडले आहेत. त्यांवरून त्याचे राज्य विस्तृत असून त्याने सु. वीस वर्षे राज्य केले असावे. त्याच्या निधनानंतर गुप्त साम्राज्याची विभागणी झाली असावी. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांवर भानुगुप्त राज्य करू लागला, तर मगध पुरुगुप्ताचा नरसिंहगुप्तनामक दुसरा पुत्र आणि त्याचे वंशज तिसरा कुमारगुप्त आणि विष्णुगुप्त यांच्या अंमलाखाली राहिला. भानुगुप्ताचा गुप्त संवत् १९१ (५१०) चा लेख एरण येथे सापडला आहे. त्यात त्याने शत्रूवर (बहुधा हूणांवर) मिळविलेल्या विजयाचा उल्लेख आहे. नरसिंहगुप्तादिकांची फक्त सोन्याची नाणी (तीही मिश्र धातूची) मिळाली आहेत. विष्णुगुप्ताची मुद्रा मगधामध्ये नालंदात सापडली आहे. तीवरून तो नरसिंहगुप्ताचा नातू आणि तिसऱ्या कुमारगुप्ताचा मुलगा होता, हे माहीत झाले आहे पण त्याचा काल अनिश्चित आहे. तथापि त्याचे राज्य ५२५ पर्यंत टिकले असावे. त्याच्या कारकीर्दीत बंगालमध्ये वैन्यगुप्तनामक राजा राज्य करीत होता. त्याचा ५०७ चा लेख मिळाला आहे. या काळात मध्य भारत, मगध व बंगाल हे प्रदेश विभक्त होऊन भिन्न भिन्न राजांच्या अंमलाखाली गेले होते, असे दिसते.

मध्यंतरी हूणांनी आपली सत्ता बॅक्ट्रियामध्ये दृढ करून इराणवर आक्रमण केले आणि तेथील फीरुझनामक राजाला ठार केले. नंतर त्यांनी गंधार प्रदेशावर आणि पंजाबच्या काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

हूण राजा तोरमाण याने बुधगुप्ताचा पराभव करून मध्य भारतावर आपला अंमल बसविला. एरण येथे बुधगुप्ताचा गुप्त संवत् १६५ (४८४) चा लेख सापडला आहे. त्यानंतर लवकरच तो प्रदेश तोरमाणाच्या अंमलाखाली गेला असावा. एरण येथेच तोरमाणाच्या कारकीर्दीच्या अगदी आरंभीचा लेख सापडला आहे. तोरमाणानंतर त्याचा पुत्र मिहिरकुल याच्या शासनवर्ष १५ चा लेख ग्वाल्हेरच्या किल्ल्यात सापडला आहे. त्यावरून मध्य भारतात हूणांची सत्ता २५–३० वर्षे टिकली, असे दिसते. भानुगुप्ताने ५१० मध्ये एका घनघोर लढाईत हूणांचा पराभव करून एरणजवळचा प्रदेश हूणांच्या मगरमिठीतून मुक्त केला. मध्य भारतात त्यांची सत्ता काही काळ चालू असावी. शेवटी उज्‍जयिनीच्या यशोधर्म्याने मिहिरकुलाचा पाडाव करून त्याला आपल्यापुढे नम्र होण्यास लावले. ही घटना ५३० च्या सुमारास घडली असावी.

यानंतर गुप्त राजांचे नाव फारसे आढळत नाही. कारण हूणांच्या स्वाऱ्यांमुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले, यात संशय नाही. तथापि त्यांच्या अवनतीची इतरही कारणे होती. स्कंदगुप्तानंतरचे गुप्त राजे शूर आणि प्रबळ नव्हते. अंतस्थ कलहामुळे बुधगुप्तानंतर गुप्त साम्राज्याचे अनेक तुकडे झाले. मध्य भारतातील परिव्राजक आणि उच्चकल्प महाराज आणि काठेवाडातील सेनापती भटार्काचे वंशज गुप्त संवताचा उपयोग करून वरकरणी गुप्तांचे स्वामित्व कबूल करीत असले, तरी हळूहळू ते स्वतंत्र होत गेले. मगधात उत्तर कालीन गुप्तांनी आणि कनौज येथे मौखरींनी आपली सत्ता प्रस्थापित केली. तसेच वाकाटकांनी माळव्यावर आपले स्वामित्व लादले. वाकाटक राजा नरेंद्रसेन याच्या मांडलिकांमध्ये माळव्याच्या अधिपतीची गणना होत होती. त्याचा पुत्र दुसरा पृथिवीषेण याने तर नर्मदेच्या उत्तरेचा, पूर्वीच्या नागोद व जसो संस्थानाचा प्रदेश जिंकून तेथे आपल्या मांडलिकाची स्थापना केली होती. नंतरच्या हरिषेणनामक वाकाटक नृपतीने अवंती जिंकल्याचा उल्लेख आहे. शेवटी दशपुरच्या औलिकरवंशी यशोधर्म्याने उज्‍जयिनी काबीज करून तेथे आपली राजधानी केली, हूण राजा मिहिरकुल याचा पाडाव केला आणि गुप्त साम्राज्याचा शेवट केला.

गुप्तांची वंशावळ खालीलप्रमाणे देता येते (कंसातील राजवटीचे इसवी सनातील काल स्थूलमानाने दिले आहेत):


 

राज्यशासन : गुप्तकाळाच्या आरंभी उत्तर भारतात गणराज्यात्मक व राजेशाही अशी दोन प्रकारची शासनपद्धती प्रचलित होती. गणराज्यातील सत्ता सामान्य जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती नसून क्षत्रिय जमीनदार वर्गाच्या व सेनाधिकाऱ्यांच्या आधीन होती तथापि त्यांची नाणी गणांच्या नावानेच पाडली जात. पुढे गुप्तकाळात हे पुढारी राजा, महाराज अशा पदव्या धारण करू लागले होते व कित्येकांचे पुढारीपण वंशपरंपरेने चालत होते, असे दिसते. यौधेयादी काही गण आपले श्रेष्ठ अधिकारी निवडत असत, असे ‘यौधेय गणपुरस्कृत महाराजसेनापतेः’ यांसारख्या कोरीव लेखांतील उल्लेखांवरून दिसते. हळूहळू ही अधिकारपदे वंशपरंपरेने चालू होऊन तथाकथित गणराज्यांत आणि इतर सामान्य पद्धतीच्या राज्यांत फरक राहिला नाही आणि त्यामुळे चौथ्या शतकाच्या अखेरीस ही प्राचीन गणराज्यशासनपद्धती भारतात पूर्णपणे नष्ट झाली.

राजेशाही शासनपद्धतीत सर्व सत्ता राजाच्या हाती असे. हरिषेणाने प्रयागच्या प्रशस्तीत समुद्रगुप्त हा लोकव्यवहारात इतर जनांसारखी कृत्ये करीत असल्यामुळे मानव वाटतो, वास्तविक तो कुबेर, वरुण, इंद्र आणि यम यांसारखा देवच आहे, असे वर्णिले आहे. तेव्हा त्या काळी राजेलोकांची सत्ता अनियंत्रित होती, यात संशय नाही. आपल्या पूर्वीच्या शक राजांनी राजाधिराज अशी सम्राटपदनिदर्शक पदवी धारण केली होती. तिचे अनुकरण करून गुप्त राजांनी महाराजाधिराज अशी आढ्यतेची पदवी धारण केली. राजेलोकांची मंत्रिपरिषद असे. तिचा उल्लेख कालिदासाच्या मालविकाग्निमित्रमध्ये आला आहे. महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवर राजा तिचे मत घेई. तथापि अंतिम निर्णय त्याच्याच स्वाधीन असे. राजा स्वतः प्रांताधिपती व विविध अधिकरणांच्या (खात्यांच्या) मुख्यांची नेमणूक करी. युद्धात तोच अग्रेसर असे. शांततेच्या काळात प्रजाजनांचे रक्षण करणे, त्यांना उपजीविकेची साधने प्राप्त करून देणे आणि त्यांना योग्य शिक्षण देऊन विनय संपन्न करणे, ही प्रमुख राजकर्तव्ये समजत. त्यांचा उल्लेख कालिदासाच्या काव्यात आला आहे. अंतिम न्यायनिर्णयही त्याच्याच हाती असे. याप्रमाणे राजसत्ता तत्त्वतः अनियंत्रित असली, तरी तिच्यावर लोकमताचे थोडेबहुत दडपण असे. राजा हा प्रजेचा सेवक होय, तो प्रजेपासून करभार घेतो. म्हणून तिच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर आहे, अशी समजूत प्रचलित होती. राजाच्या हाती कायदे करण्याची सत्ता नसते. प्राचीन स्मृतींत घालून दिलेल्या विधिनियमांस अनुसरून त्यास न्यायनिर्णय करावा लागे. मंत्र्यांच्या मतांचाही त्याच्यावर प्रभाव पडे. गुप्तकाळातील राज्यशासनाचे वर्णन स्कंदगुप्ताच्या गिरनार प्रशस्तीत आले आहे. तीत म्हटले आहे, की त्याच्या राज्यात कोणीही अधार्मिक, आर्त, दरिद्री, व्यसनी व दीन नव्हता. ह्या वर्णनात अतिशोयक्ती असली, तरी त्यावरून तत्कालीन उत्कृष्ट राज्यशासनाची कल्पना काय होती हे कळते.

सामान्यतः ज्येष्ठ राजकुमारास राजपद मिळत असे तथापि गुप्तवंशात कर्तबगार राजकुमारास राजा नेमण्याची पद्धत होती, असे दिसते. पहिल्या चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाली दरबार भरवून समुद्रगुप्ताची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. दुसरा चंद्रगुप्त आणि स्कंदगुप्त यांस मंत्र्यांच्या व प्रजाजनांच्या पाठिंब्यामुळे राजपद प्राप्त करून घेता आले. धाकट्या राजकुमारास प्रांताधिपती नेमण्याची पद्धत होती. द्वितीय चंद्रगुप्ताचा ज्येष्ठ पुत्र कुमारगुप्त हा युवराज व पुढे राजा झाला पण त्याचा धाकटा मुलगा गोविंदगुप्त याची माळवा प्रांताचा अधिपती म्हणून नेमणूक झाली होती. क्वचित राजकुमार अल्पवयस्क असल्यास त्याची माता त्याच्या नावाने राज्यकारभार पाहत असे. याचे ठळक उदाहरण वाकाटक राज्ञी प्रभावती-गुप्ता हिचे आहे.

राज्यशासनाकरिता राजा अनेक मंत्री व अधिकरणाधिपती नेमत असे. त्यांची नावे कोरीव लेखांत येतात. वरिष्ठ सेनाधिकाऱ्यास महाबलाधिकृत किंवा महादण्डनायक म्हणत. पोलीस अधिकाऱ्यास दण्डपाशिक आणि परराष्ट्रमंत्र्याला महासंधिविग्रहाक अशी संज्ञा असे. राजाची भेट घ्यावयाची असल्यास महाप्रतिद्वारामार्फत जावे लागे. राजाच्या खासगी चिटणीसाला रहस्याधिकृत म्हणत. तो संबंधित अधिकाऱ्यास राजाज्ञा कळवीत असे. धार्मिक अधिकरणाच्या मुख्यास विनयस्थितीस्थापक म्हणत. राज्यात धर्माचे योग्य परिपालन करविणे, देवालये, स्तूप, विहार यांच्यावर देखरेख करणे, श्रमणब्राह्मणांकरिता दानधर्माची व्यवस्था करून विद्येस उत्तेजन देणे इ. कामे त्याच्यावर सोपविलेली असत. प्रांताधिपतींना उपरिक म्हणत. त्यांची नेमणूक राजा करीत असे. शासनाधिकाऱ्यांना कुमारामात्य अशी सामान्य संज्ञा असे.

राज्याच्या विशाल विभागास देश म्हणत. त्यांवरील अधिपतींना गोप्ता अशी संज्ञा असे. त्यांना नेमताना त्यांच्या अंगच्या बुद्धिमत्ता, विनय, सत्यवादित्व, ऋजुत्व, औदार्य, माधुर्य, दाक्षिण्य, राजनिष्ठा, प्रामाणिकपणा, कृतज्ञता, लोकहिततत्परता इ. गुणांची चौकशी प्रथम करीत, असे स्कंदगुप्ताच्या गिरनार लेखात म्हटले आहे. देशाच्या विभागांस ‘भुक्ति’ म्हणत. त्यांच्यावर उपरिक महाराज नेमले जात. भुक्तीमध्ये अनेक विषय–जिल्हे असत. त्यांच्या मुख्यांस विषयपती अशी संज्ञा असे. सामान्यतः उपरिक महाराज त्यांची नेमणूक करी पण क्वचित राजाकडूनही त्याची नियुक्ती होई.

विषयांत शासनकार्याकरिता मंडळे नेमीत. त्यामध्ये जनतेचे अनेक प्रतिनिधी असत. फरीदपूर ताम्रपटात अशा मंडळात वीस सभासद असल्याचा उल्लेख आहे. त्यांमध्ये ब्राह्मण, विविध श्रेणीचे प्रतिनिधी (प्रथम श्रेष्ठी), व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी (प्रथम सार्थवाह), लेखक प्रतिनिधी (प्रथम कायस्थ) इत्यादिकांचा समावेश होत असे. सरकारी जमीन विकावयाची असली, तरीसुद्धा या मंडळाची संमती घ्यावी लागे. त्याच्या सभासदांना महत्तर म्हणत.

याशिवाय युक्त, आयुक्त, व्यापृत, अधिकृत अशा विविध श्रेण्यांच्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख कोरीव लेखांत येतो. चोरांचा पत्ता लावणाऱ्यास चोरोद्धरणिक म्हणत. पोलिसांना चाट व सैनिकांना भट, अशी संज्ञा असे. ब्राह्मणांना दिलेल्या अग्रहारांत यांना जाण्यास मज्जाव असे पण चोरांचा किंवा राजद्रोह्यांचा तपास करण्याकरिता कोठेही जाण्याची त्यांना मुभा असे.

नगरांत आणि ग्रामांत न्यायदानाचे कार्य पंचायती करीत. ग्रामादिकांचे संरक्षण करणे, तंटेबखेड्यांचा निकाल लावणे, सार्वजनिक उपयोगाची कामे करणे, सरकारी महसूल गोळा करून खजिन्यात भरणे इ. कामेही त्यांच्यावर सोपविलेली असत. त्यांच्या सभासदांस महत्तर म्हणत. त्यावरून सामान्यतः वृद्ध व अनुभवी लोकांची त्याकरिता निवड करीत असावेत. निवडणुकीची पद्धत मात्र माहीत नाही. ग्राममुख्यास ग्रामेयक किंवा ग्रामाध्यक्ष म्हणत. नगराध्यक्षास पुरपाल, अशी संज्ञा असे.


 

आर्थिक स्थिती : राज्याचे मुख्य उत्पन्न जमीन महसूल व प्रत्यक्ष कर यांपासून होत असे. त्यांना वाकाटकांच्या ताम्रपटात क्लृप्त व उपक्लृप्त व इतरत्र भाग व भोग म्हटले आहे. राज्यातील सर्व जमिनीची नोंद दप्तरखान्यात ठेवीत. त्यावरील अधिकाऱ्यास अक्षपटल व त्यावरील श्रेष्ठास महाक्षपटलिक, अशा संज्ञा असत. भागकर म्हणजे जमिनीच्या उत्पन्नावरील कर. हा परंपरेने षष्ठांश धरला जात असे. तो धान्यरूपाने वसूल करीत. त्याच्या साठवणीकरिता राज्यात कोष्ठागारे बांधलेली असत. राज्यात निर्माण होणाऱ्या मालावर भूतप्रत्याय (अबकारी कर) असे, तसेच बाहेरून आणलेल्या मालावर वातकर (ऑक्ट्रॉय कर) द्यावा लागे. खाणींचे उत्पन्न, मीठ, दारू गाळण्याचा अधिकार हे राजाचे हक्क समजले जात. शिवाय देशातील आणि परदेशाशी केलेल्या व्यापारापासूनही राज्याला चांगले उत्पन्न होई. याखेरीज लोकांना वेठीने कामास लावण्याचा अधिकार राजाला असे. राजाचे अधिकारी व शिपाई दौऱ्यावर असत, तेव्हा त्यांच्या सरबराईचा खर्च गावकरी लोकांस करावा लागे आणि त्यांना पुढील मुक्कामास पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असे. यांस नंतरच्या कोरीव लेखांत वसतिदण्ड व प्रयाणदण्ड अशी नावे दिली आहेत. अग्रहार म्हणून दिलेला गाव या करांपासून मुक्त असे.

देशातील आर्थिक समृद्धीचे प्रतिबिंब तत्कालीन नाण्यांत पडते. समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त, कुमारगुप्त वगैरेंची सोन्याची नाणी अनेक प्रकारची व विपुल प्रमाणात सापडतात. त्यांवरून तत्कालीन भरभराटीचे अनुमान करता येते.

उत्तर भारतातील पाटलिपुत्र, वैशाली, वाराणसी, कौशाम्बी, उज्‍जयिनी इ. नगरांचा सुरक्षित मार्गांनी देशातील इतर व्यापारी केंद्रांशी आणि भडोच, ताम्रलिप्ती यांसारख्या बंदरांशी संपर्क जोडला जाऊन आंतरदेशीय आणि परदेशीय व्यापाराला उर्जितावस्था आली होती. गुप्तकालीन लेखांत श्रेष्ठी (पेढीवाले), सार्थवाह (सौदागर) आणि कुलिक (व्यापारी) यांचे उल्लेख येतात. व्यापाऱ्यांचे निगम (संघ) व श्रेणी (पेढ्या) असत. त्यांची आर्थिक स्थिती इतकी खंबीर असे, की लोक सरकारात ठेवी न ठेवता श्रेणींमध्ये त्या ठेवून त्यांच्या व्याजातून चिरकालीन दानधर्मांची व्यवस्था करणे पसंत करीत. बहुतेक प्रत्येक धंद्याची संघटित श्रेणी असे. श्रेणींच्या स्वतःच्या घटना व नियम असत. त्यांना शासनाची मान्यता असे. श्रेणींचे सभासद विविध दर्जांचे व व्यवसायांचे असत. श्रेणींची स्वतःची रक्षक सेना असे, तिला श्रेणिबल म्हणत. आणीबाणीच्या प्रसंगी राजाला तिचा उपयोग होई, म्हणून राज्याच्या षड्‌विध बलामध्ये तिचा अंतर्भाव करीत.

वैशाली येथील उत्खननात १,१०० मातीच्या मुद्रा सापडल्या. त्यांपैकी अनेक श्रेणींच्या आहेत. वैशालीला पाठवावयाची पत्रे भूर्जपत्र किंवा ताडपत्र यावर लिहून ती दोन पातळ पुठ्ठ्यांमध्ये घालून त्यावर दोरा बांधीत आणि सध्या आपण लाखेची मुद्रा करतो, त्याप्रमाणे ओल्या मातीवर मुद्रा करीत. वैशाली येथील उत्खननात एका विख्यात (बहुधा पाटलिपुत्रातील) श्रेणीच्या अनेक मुद्रा सापडल्या. त्या श्रेणीच्या अनेक शाखा होत्या, असे दिसते. म्हणून त्या शाखेकडून आलेल्या पत्रांवर त्या श्रेणीच्या मुद्रेबरोबर तेथील प्रमुखाची किंवा कार्यवाहाचीही मुद्रा मारलेली दिसते. काही श्रेणिमुद्रांबरोबर धार्मिक मुद्रा (जितं भगवता नमः पशुपतये) आढळतात. त्यांवरून काही श्रेणी वैष्णव व शैव देवालयांची व्यवस्था पाहत असाव्यात, असा तर्क आहे. काही मुद्रा दोन-दोन तीन-तीन भागीदारांच्या आढळल्या आहेत. काही श्रेणी अत्यंत समृद्ध असत. अशी एक पट्टवायांची (वस्त्रे विणणाऱ्यांची) श्रेणी लाट (दक्षिण गुजरात) मधून दशपूर (मंदसोर) येथे येऊन तेथे तिने सूर्याचे उत्तुंग देवालय बांधल्याचे एका लेखात वर्णन आहे.

गुप्तकाळात भारताचा पूर्व व पश्चिम देशांशीही व्यापार वाढला होता. हिंदी महासागरातील बेटे व चीन या देशांशी ताम्रलिप्ती बंदरातून आणि पश्चिम आशिया, आफ्रिका व यूरोप या खंडांतील देशांशी भडोच इ. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी दळणवळण चालू झाले होते. त्याचा परिणाम देशाच्या सुबत्तेत झाला.

गुप्त साम्राज्यात समृद्धीबरोबर स्वस्ताई होती, असे तत्कालीन काही लेखांवरून दिसते. सांचीच्या एका लेखात द्वितीय चंद्रगुप्ताच्या आम्रकार्दवनामक अधिकाऱ्याने त्या नगराच्या पंचमण्डली (पंचायती) मध्ये २५ दिनारांची ठेव ठेवून तिच्या व्याजातून चंद्रगुप्ताच्या नावे पाच आणि आपल्या नावे पाच भिक्षूंना यावच्चन्द्रदिवाकर भोजन देण्याची आणि तेथील देवालयात दोघांच्या नावे दोन दीप सदैव तेवत ठेवण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे सु. १२ दिनारांवरचे वार्षिक व्याज पाच भिक्षूंच्या वर्षभर भोजनाकरिता पुरेसे होई.

गुप्तकाळी कुल्य, द्रोण, आढक आणि प्रस्थ अशी मापे प्रचलित होती. त्यांचे कोष्टक असे : १ कुल्य = ८ द्रोण = ३२ आढक = १२८ प्रस्थ (पायली = सु. ५ किग्रॅ.). कुल्यवाप व निवर्तन ही जमीन मोजण्याची मापे होती. कुल्यवाप म्हणजे सु. एकतृतीयांश हेक्टर आणि निवर्तन म्हणजे एक हेक्टर, असे दिसते.

सामाजिक स्थिती : फाहियानने उत्तर भारतात शेकडो किलोमीटर प्रवास केला पण त्याला कोठेही चोरांपासून त्रास झाला नाही. त्यावरून तत्कालीन सुव्यवस्थेची कल्पना करता येते. ‘सर्व लोक सुखी व आनंदी असून गुणोत्कर्षात एकमेंकावर वरचढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसते’, असे त्याने लिहून ठेवले आहे. देशात सर्वत्र धर्मशाळा व धर्मार्थ दवाखाने होते, त्यांत अन्नपाण्याची आणि औषधांची मोफत सोय होत असे. राज्यकारभार मोठ्या दक्षतेने चाले आणि अपराध्यांस शिक्षा सौम्य प्रमाणात होई. कोठेही जाण्यास परवान्याची जरूरी नसे, असे फाहियानने म्हटले आहे. विदिशेजवळ उदयगिरी येथील लेण्यात ४२५ मध्ये कुमारगुप्ताच्या कारकीर्दीत कोरलेल्या लेखात गुप्त राजांचे वर्णन ‘वैभवशाली आणि गुणांचे सागर असे नृपश्रेष्ठ’, अशा शब्दांनी केले आहे. त्यात अतिशोयक्ती वाटत नाही.

चातुर्वर्ण्य हे हिंदू धर्माचे पुरातन काळापासून चालत आलेले वैशिष्ट्य आहे. गुप्तकाळातही ते प्रचलित होते, यात संशय नाही पण ते नंतरच्या काळाइतके कडक झाले नव्हते. या काळात आंतरजातीय विवाह होत. हिंदू धर्मात पूर्वीपासून अनुलोम विवाहास मान्यता मिळाली आहे. घटोत्कच लेण्यांतील लेखात वल्लूरच्या विद्वान ब्राह्मण कुलातील सोम याने ब्राह्मण व क्षत्रिय जातीय स्त्रियांशी आंतरजातीय विवाह केल्याचे उल्लेख आहेत. प्रतिलोम विवाह निषिद्ध मानले जात ते झाल्यास त्यांची संतती हलक्या दर्जास प्राप्त होत असे. कदंब राजे ब्राह्मण होते, तरी कदंब नृपती काकुस्थवर्मा याने आपल्या कन्या वैश्यजातीय गुप्तादिकांना देऊन त्यांना समृद्ध केले, असे एका कोरीव लेखात म्हटले आहे. याज्ञवल्क्यस्मृति  गुप्तकाळात रचली गेली, असे डॉ. यॉली याचे मत होते. त्या स्मृतीत शूद्र स्त्रीशी विवाह निषिद्ध मानला आहे. तथापि असे विवाहही काही काळ चालू राहिले असावेत.


 

जातीनुसार धंदे या तत्त्वाची अद्यापि कडक अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ब्राह्मणांनी रणांगणावर मर्दुमकी गाजवून राज्ये स्थापिली होती. वाकाटक व कदंब हे ब्राह्मण वंश ही याची ऐतिहासिक उदाहरणे होत. सरकारी नोकरीत अनेक ब्राह्मण मोठ्या पदांवर होते. माळव्यांत गुप्तांचे व नंतर हूणांचे मांडलिक म्हणून राज्य करणारे, अनुक्रमे मातृविष्णु व धन्यविष्णु, हे एका ऋतुयाजी वेदविद्यासंपन्न मैत्रायणीय शाखेच्या इन्द्रविष्णुनामक ब्राह्मणाचे पणतू होते. क्षत्रियांचा पेशा लष्करी असे, तरी स्कंदगुप्तकालीन इंद्रपुरक (इंदूर) येथील लेखात अचलवर्मा आणि भ्रुकुण्डसिंह या क्षत्रियांचा व्यापारी म्हणून उल्लेख आला आहे. त्यावरून काही क्षत्रिय व्यापारादी अन्य व्यवसाय करीत असावेत. वैश्य अर्थातच शेती, व्यापार, पशुपालन, सुतार-लोहार काम इ. अनेक धंदे करीत. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शूद्रांना सेवाकर्म विहित आहे पण याज्ञवल्क्यस्मृतीत त्यांकरिता अनेक व्यवसाय सांगितले होते आणि त्याप्रमाणे ते करीतही असावेत.

प्रतिलोम विवाहापासून झालेल्या अंत्यजांना गुप्तकाळातही निकृष्ट दर्जाची कामे करावी लागत. समाजात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा दर्जा अत्युच्च होता. अनेक ब्राह्मण वेदाध्ययन, यज्ञयाग आणि अध्यापन यांमुळे समाजात सन्मानीय असत. त्यांच्या योगक्षेमाकरिता राजेलोक ग्रामदान व भूमिदान करीत. क्षत्रिय व वैश्य वर्णांनाही वेदाध्ययनाचा अधिकार होता. तथापि फारच थोडे त्याचा फायदा घेत असत, असे दिसते. वैश्य व्यापारामुळे संपन्न असत. त्यांच्या विविध धंद्यांच्या श्रेणी असत. देवालये व विहार बांधणे, धर्मशाळा, दवाखाने व अन्नसत्रे स्थापणे यांसारख्या धार्मिक व लोकोपयोगी कृत्यांत अनेक वैश्य आपल्या संपत्तीचा विनियोग करीत.

स्मृतींमध्ये दासांचा उल्लेख आहे. युद्ध, द्यूत, दुर्भिक्ष इत्यादिकांमुळे दासत्व उत्पन्न होई पण ते यावज्जीव नसे. पैसे भरून दासांना स्वतंत्रता मिळविता येई. याचे उदाहरण मृच्छकटिक  नाटकात आढळते. तसेच धन्याचा प्राण वाचविल्यास दासाला स्वातंत्र्य मिळे. एकंदरीत इतर देशांतील गुलामांपेक्षा भारतात दासांना चांगली वागणूक मिळत असल्यामुळे अनेक परदेशी लेखकांनी भारतात दासपद्धती प्रचलित नव्हती, असे म्हटले आहे.

गुप्तकाळी एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. काही कोरीव लेखांत एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना दान दिल्याचा तसेच इतर काहींत ते दान एकाच कुटुंबातील भाऊ, मुलगे, मुली, पुतणे, पुतण्या इत्यादिकांच्या पुण्योपार्जनार्थ केले असल्याचा उल्लेख आहे. त्यांवरून तत्कालीन विशाल कुटुंबांचा प्रत्यय येतो. वडिलोपार्जित मिळकतीत मुलाला जन्माने हक्क प्राप्त होई. निपुत्रिकाच्या विधवेला आपल्या पतीच्या संपत्तीवर हक्क आहे किंवा नाही याविषयी भिन्न मते आढळतात. याज्ञवल्क्याने अशा विधवेला दायाद मानले आहे.

बालविवाहपद्धत प्रचलित होऊ लागली होती , असे दिसते. ऋतुप्राप्त कन्येचा विवाह न केल्यास तिच्या पालकास भ्रूणहत्येचे पाप लागते, असे याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे. पालकाच्या अभावी अशा कन्येने स्वयंवर करावे, असेही याज्ञवल्क्याने सांगितलेले आहे. यामुळे मुलीचे वेदाध्ययन तर बंद झालेच पण तिचे सामान्य शिक्षणही संपुष्टात आले असावे. गुप्तकाळाच्या अखेरीस वलभी व नालंदा ही विद्यापीठे अस्तित्वात आली. पण या सुमारास स्त्रियांचे उपनयन बंद पडल्यामुळे त्या घरीच थोडेबहुत शिक्षण घेत. समाजातील मुख्यत्वे ब्राह्मण व क्षत्रिय हे सर्व प्रकारचे शिक्षण घेत. काही संपन्न कुटुंबात मात्र स्त्रियांचे शिक्षण घरी चालू होते, असे संस्कृत वाङ्‌‌मयातील वर्णनांवरून दिसते. म्हणून तत्कालीन काही कवयित्रींचे ग्रंथ व काव्ये अद्यापि उपलब्ध आहेत. याज्ञवल्क्याने निपुत्रिक स्त्रीला गुरुजनांच्या संमतीने नियोगाची अनुज्ञा दिली आहे. अशा रीतीने झालेल्या पुत्रास क्षेत्रज म्हणत. विधवा विवाह निषिद्ध झाला होता पण सतीची चाल फारशी प्रचारात आली नव्हती. कुटुंबात स्त्रियांना सर्व नातलगांनी मान द्यावा आणि अलंकार-वस्त्रादिकांनी खूष ठेवावे, असे याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे. अद्यापि पडद्याची चाल प्रचारात आली नव्हती. तरीही घरंदाज स्त्रिया प्रवासात अवगुंठन वापरीत, असे अभिज्ञान शाकुंतलावरून दिसते.

फाहियानने मांसाची दुकाने नाहीत असे म्हटले, तरी सामान्य जनता मद्य, मांसापासून अलिप्त नव्हती. स्मृतीत तर श्राद्ध प्रसंगी मांसाशन विहित आहे, असे सांगितले आहे. तथापि अहिंसेचे तत्त्व हळूहळू मान्यता पावत होते, यात संशय नाही.

भारतीयांची या काळातील वेशभूषा साधी असे. नेसण्यास धोतर व पांघरण्यास उत्तरीय या दोन वस्त्रांवर पुरुषांचे काम भागे. शककुशाणांच्या आक्रमणानंतर पायजमा, कोट आणि ओव्हरकोट प्रचारात आले. गुप्त राजांच्या नाण्यांवर हा पोषाख दिसतो पण समुद्रगुप्ताच्या वीणांकित नाण्यांवर तो धोतर नेसून आणि पर्यकावर बसून वीणा वाजवीत असलेला दाखविला आहे. अजिंठ्यातील चित्रांवरून गुप्तकालीन दक्षिण भारतीय वेशभूषेचे चांगले ज्ञान होते. त्यात बहुतेक स्त्री-पुरुष आखूड अंतरीयक (अधोवस्त्र) नेसलेले दाखविले आहेत. या वस्त्राचा एक शेवट डाव्या मांडीवरून जाऊन त्याचा मागे कच्छ (कासोटा) होत असे. दुसरा शेवट दोन्ही मांड्यांना मागून पुढून वेष्टून नंतर मागे खोवून खाली शेपटासारखा लोंबत असे. स्त्रियांची अधोवस्त्र नेसण्याची पद्धत याच तऱ्हेची होती. काही स्त्रिया आपल्या स्तनांवर रुंद पट्टी (पयोधर पट्ट) बांधीत, तर काही कूर्पासक (चोळी) घालत. परदेशी शक आणि कुशाण जातीच्या स्त्रिया चोळीऐवजी अर्धबाह्यांचे जाकीट घालत असत.

उत्तर भारतात स्त्रिया भालप्रदेशावर तिलक लावीत. स्त्री-पुरुषांना अलंकारांची मोठी आवड होती. धनिक लोक कानांत रत्नजडित कुंडले, गळ्यात रत्नांचे व मोत्यांचे हार आणि बाहूंवर रत्नयुक्त अंगद वापरीत. स्त्रिया आपल्या केसात बिंदीसारखा चटुला तिलकनामक अलंकार घालीत. कानांत मोठाली वाटोळी कुंडले, हातात वलये आणि कमरेत नाना प्रकारच्या रत्नांनी बनविलेल्या अनेक पदरी रशना घालत. उत्तर भारतात हातात व पायात अनेक बोजड वलये घालण्याचा प्रघात होता. स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करून शिरोभूषणे धारण करीत. पुरुषही केस वाढवून ते मानेवर, पाठीवर किंवा छातीवर सोडीत. काही लोक केसांवर कापडाची किंवा रेशमाची पट्टी बांधीत, असे अजिंठ्याच्या चित्रांवरून दिसते.

द्यूत, मृगया, हस्तियुद्ध, कुक्‍कुटयुद्ध, कन्टुक क्रीडा ही मनोरंजनाची साधने होती. विविध प्रकारचे उत्सव होते त्यांतील चैत्र शुक्ल त्रयोदशीस होणारा मदनोत्सव विशेष उल्लेखनीय आहे. या प्रसंगी नगराबाहेरील उद्यानांत मदनाच्या मूर्तींची पूजा होऊन मोठी यात्रा भरे. या उत्सवाची सर्व व्यवस्था त्या त्या नगरातील स्त्रियांच्या हाती असे.


 

धार्मिक स्थिती : गुप्त साम्राज्यात हिंदू, बौद्ध व जैन हे तिन्ही धर्म प्रचलित होते. गुप्तांच्या उदयापूर्वी हिंदू धर्माला विशेष राजाश्रय नव्हता तरी त्यातील विचारी लोक काळास अनुसरून त्याची पुनर्घटना करण्यात गुंतले होते, असे दिसते. वैदिक धर्माची तत्त्वे सर्वसाधारण लोकांस समजावीत, म्हणून पूर्वीच्या संक्षिप्त आणि दुर्बोध सूत्रग्रंथाबद्दल मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति  यांसारख्या स्मृती सुबोध अनुष्टुप् छंदांत रचल्या गेल्या. महाभारत  व रामायण  या ग्रंथांसही सध्याचे स्वरूप याच काळात प्राप्त झाले असावे. बौद्ध व जैन धर्माचा अहिंसेवर कटाक्ष आहे व ते तत्त्व सर्वमान्य होत आहे, हे पाहून या स्मृतीतही ते मान्य केले व पूर्वीच्या हिंसाविधानात्मक वचनांस पुष्कळ अपवाद घातले. या गुप्तपूर्व काळात शिव, कुबेर, अश्विनीकुमार, धर्म, इंद्र, संकर्षण (बलराम), वासुदेव इ. देवतांची पूजा होई. त्यांतून पुढे ब्रह्मा, विष्णू व शिव या देवतांना प्राधान्य आले. याशिवाय, स्कंद, सूर्य इ. देवतांची पूजाही प्रचारात आली. अवतार कल्पनेनुसार वराह, वामन, नरसिंह, राम इ. भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा प्रचारात आली. धर्माबरोबर तत्त्वज्ञानाचीही पूनर्रचना करण्यात आली. उपनिषदांत ईश्वर, जीव, जगत् यांविषयी अनेक ठिकाणी खोल व उद्‌‌बोधक विचार विखुरलेले होते. त्यांचा समन्वय करून वेदान्तसूत्रे  लिहिली गेली. तसेच सांख्य, योग, न्याय, मीमांसा इ. शास्त्रांची मूलभूत सूत्रे याच काळात निर्माण झाली. हे सर्व वाङ्‌‌मय पाहिले असता, बौद्ध धर्माशी टक्कर देण्याकरिता वैदिक धर्माने कशी तयारी केली होती, हे ध्यानात येईल.

गुप्तकाळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला. नवीन युगात वैदिक यज्ञयाग मागे पडले. क्वचित राजे लोक सोमयाग, अश्वमेध यांसारखे यज्ञ करीत. त्यांपैकी काहींचा उद्देश राजकीय असे. पण सामान्य जनता पौराणिक धर्माचे अनुकरण करू लागली. शंकराची आणि विष्णूच्या अनेक अवतारांची देवळे गुप्त साम्राज्यात बांधण्यात आली. भगवान शंकराचे देवालय बांधून त्याला आपले नाव देण्याची पद्धत (उदा., पृथिवीषेणाने बांधलेली पृथिवीश्वर) प्रचलित झाली. भगवान शिवाचा मुखवटा असलेली गुप्तकालातील सुंदर एकमुख लिंग व चतुर्मुख लिंग ही प्रसिद्ध आहेत. गुजरातेत कारवाण (कायावरोहण) येथे स्थापिलेला लकुलीशाचा पाशुपत पंथ मथुरेसारख्या काही ठिकाणी प्रसार पावला होता. भगवान विष्णूची व त्याच्या अवतारांची देवालये विदिशा, एरण, देवगढ, रामगिरी, पवनार वगैरे ठिकाणी बांधली होती. सूर्य देवतेचीही देवालये दशपुर, ग्वाल्हेर, इंदूर, आश्रमक वगैरे ठिकाणी असल्याचा उल्लेख कोरीव लेखांत येतो. गजानन देवतेची पूजा गुप्तकाळाच्या अखेरीस प्रचारात येऊ लागली. चण्डिकेची मूर्ती विदिशेजवळच्या उदयगिरी टेकडीतील लेण्यात कोरली आहे. नाग व यक्ष यांची पूजा सामान्य जनात प्रचलित होती. त्यांच्या देवळांचे अवशेष पद्मावती (मध्य प्रदेशातील पदम पवाया) सारख्या ठिकाणी सापडले आहेत.

हिंदू धर्मात अद्यापि व्रतवैकल्यांना महत्त्व आले नव्हते. काही कोरीव लेखांत एकादशी व्रताच्या पारण्याप्रसंगी दान दिल्याचा उल्लेख आहे पण संक्रांती, सूर्य व चंद्र ग्रहणे इ. प्रसंगी दान दिल्याचा निर्देश नाही.

त्या काळात हिंदू धर्म उदार वृत्तीचा होता. त्याने अनेक शक, कुशाण, हूण इ. परदेशीयांना आपल्यात सामावून घेतले होते. समुद्रगमन निषिद्ध नव्हते एवढेच नव्हे, तर अनेक ब्राह्मण व क्षत्रियांनी हिंदी महासागरातील जावा, कंबोडिया इ. बेटांत हिंदू धर्माचा व संस्कृतीचा प्रसार करून राज्ये स्थापिली होती.

गुप्त राजे स्वतः हिंदू धर्मातील भागवत पंथाचे अनुयायी होते, तरी त्यांचा बौद्ध आणि जैन धर्मांना विरोध नव्हता. त्यांच्या अनेक मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी बौद्ध संघास देणग्या दिल्या होत्या. सुप्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ वसुबन्धु याला समुद्रगुप्ताचा आश्रय होता. गुप्तकाळात महायान पंथाची भरभराट झाली. हिंदू धर्माप्रमाणे बुद्धाच्या मूर्तीची पूजा प्रचलित होती. भागवत पंथातील काही तत्त्वे महायान पंथातील तत्त्वांसारखी असल्यामुळे त्या पंथाकडे सामान्य जन आकृष्ट झाले.

गुप्तकाळी उत्तर भारतात काश्मीर, पंजाब वगैरे ठिकाणी हीनयान आणि मथुरा, कौशाम्बी, सारनाथ, बुद्धगया, कसिया (कुशिनगर), वलभी, मृगशिखावन या ठिकाणी महायान पंथ प्रचलित होता. महायान पंथाच्या योगाचाराचा किंवा विज्ञानवादाचा उदय याच काळात झाला. त्याची काही तत्त्वे शंकराचार्यांच्या अद्वैत वेदान्तासारखी आहेत, म्हणून काहींनी त्यांना प्रच्छन्नबौद्ध म्हटले आहे. या काळात बौद्ध आणि नैय्यामिक वैशेषिकांमध्ये वादविवाद होऊन परस्परांच्या तत्त्वज्ञानाची समीक्षा होत असे.

गुप्तकाळात जैन धर्माचाही प्रसार उत्तर भारतात होता. गोरखपूर जिल्ह्यातील कहौम आणि विदिशाजवळ उदयगिरी येथे या काळातील जैन लेख सापडले आहेत.

गुप्तकाळाच्या आरंभी श्वेतांबरांनी ३१३ मध्ये मथुरा आणि वलभी येथे आपल्या पंथाच्या परिषदा भरवून आपल्या धर्मग्रंथांचे पाठ निश्चित केले आणि नंतर वलभी येथे ४५३ मध्ये ते लेखनिविष्ट केले. त्या ग्रंथावर नियुक्ती  आणि चूर्णी  पद्धतीच्या टीका लिहिल्या. दिगंबर पंथाचे धर्मग्रंथ त्यापूर्वीच निश्चित झाले होते. जैन धर्मातही मूर्तिपूजा हिंदू व बौद्ध धर्मांप्रमाणे मोठ्या थाटाने करण्यात येत असे.

या काळात तर्कशास्त्राची उत्पत्ती होऊन दिङ्नाग, वात्स्यायन, सिद्धसेन दिवाकर या तिन्ही पंथांच्या आचार्यांनी त्यावर ग्रंथरचना केली.

शास्त्रे, वाङ्‌‌मय इत्यादी :  गुप्तकाळात संस्कृत साहित्याची मोठी उन्नती झाली. गुप्त राजे संस्कृतप्रेमी असल्यामुळे त्यांनी प्रशासनातील पारिभाषिक संज्ञांना संस्कृत रूपे दिली. नाण्यांवरचे लेख संस्कृत श्लोकांत घातले. शिलालेख, ताम्रपट, शासनाचे आदेश यांकरिता संस्कृत भाषेचाच उपयोग करावा, असा नियम केला. साहजिकच त्या भाषेला अखिल भारतातील संपर्कभाषेचा दर्जा प्राप्त झाला. समुद्रगुप्ताने सुंदर काव्ये रचली, तर चंद्रगुप्ताने कालिदास, अमर, हरिश्चंद्र इत्यादिकांप्रमाणे उज्जयिनीत काव्यपरीक्षा दिली होती. संस्कृत श्लोकसंग्रहांत अनेक श्लोक विक्रमादित्याच्या नावावर दिलेले आढळतात ते दुसऱ्या चंद्रगुप्ताचे असावेत. गुप्तांचे हरिषेण, कौत्सगोत्री, शाव इ. अधिकारी काव्यरचना, शास्त्रे इत्यादिकांत निष्णात होते. हरिषेणाची प्रयागप्रशस्ति  संस्कृत चम्पूकाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे.

फारच थोडे गुप्तकालीन ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. तथापि रघुवंशादी  अप्रतिम काव्ये आणि अभिज्ञान शाकुंतलादी  उत्कृष्ट नाटके रचणारा कालिदास दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या आश्रयास होता, हे मत आता बहुतेक विद्वानांस मान्य झाले आहे. याशिवाय मृच्छकटिकाचा कर्ता शूद्रक, नीतिसाराचा रचनाकार कमंदक आणि पंचतंत्राचा निर्माता विष्णुशर्मा हेही गुप्तकाळात होऊन गेले, असे अनेक विद्वानांचे मत आहे. वात्सायनाचे कामसूत्रही याच काळात रचले गेले असावे. वाकाटकनृपती सर्वसेन याचे हरिविजय  आणि प्रवरसेन याचे रावणवध  ही प्राकृत काव्येही याच काळात पण विदर्भात रचली गेली.

ललित वाङ्‌‌मयाप्रमाणे शास्त्रीय वाङ्‌‌मयामध्येही या काळात चांगली भर पडली. चन्द्रगोमिन् याचे चांद्रव्याकरण  आणि अमरसिंहाचा अमरकोश  याच काळात रचले गेले, असे विद्वानांचे मत आहे. पुराणाचे काही भाग उदा., अग्निपुराणातील वृत्तविषयक आणि विष्णुधर्मोत्तर  पुराणातील चित्रविषयक भाग, याच कालातील असावेत असे म्हणतात.

याज्ञवल्क्य, नारद व बृहस्पती यांच्या स्मृती गुप्ताकाळातच रचल्या गेल्या. संख्यावाचक दशमान पद्धतीचा शोध भारतात गुप्तकाळामध्ये लागला, हे आता सर्वमान्य झाले आहे. या पद्धतीमुळे गणित फार सुलभ झाले आहे. ज्योतिषशास्त्रातील वसिष्ठ, पौलिश, रोमक व मूळ सूर्यसिद्धान्त हे गुप्तकाळातील होत, असे मानतात पण या काळातील सर्वश्रेष्ठ ज्योतिषशास्त्रीय ग्रंथ आर्यभटीय  हा होय. तो पहिल्या आर्यभटाने ४९९ मध्ये पाटलिपुत्रात रचला. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा महत्त्वाचा शोध आर्यभटाने लावला. तसेच सूर्य आणि चंद्र ग्रहणांची कारणेही त्याने बरोबर सांगितली. वैद्यकशास्त्रातील पहिल्या वाग्भटाचा अष्टांगहृदय  हा ग्रंथ आणि पूर्व तुर्कस्तानात दैववशात् हाती लागलेला नावनीतक  हा ग्रंथ, हे गुप्तकाळातीलच मानतात. या काळात धातुकामात किती आश्चर्यकारक प्रगती झाली, हे कुतुबमीनारजवळच्या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या लोहस्तंभावरून दिसून येते. हा स्तंभ सु. ७·३१ मी. उंच आणि साडेसहा टन वजनाचा असून आज दीड हजार वर्षे सदैव उन्हापावसात असूनही तो यत्किचिंतही गंजला नाही, हे मोठे आश्चर्य होय. वराहमिहिराची बृहत्संहिता  हा ज्ञानकोशरूपी बृहत् ग्रंथ गुप्तकाळातच रचला होता. त्यात ज्योतिषशास्त्र, गणित, रत्नशास्त्र, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, स्थापत्य, शिल्प, शकुन इ. विविध विषयांचा विचार केला आहे.


   स्थापत्य, शिल्प व चित्रकला :  गुप्तकाळापूर्वी बहुतेक कलापूर्ण व धार्मिक स्वरूपाच्या इमारती बौद्धांच्या होत्या. गुप्तकाळात हिंदू धर्मातील देवतांच्या पूजेचा सार्वत्रिक प्रसार झाला आणि हिंदू देवालये अनेक ठिकाणी बांधण्यात आली. त्यांपैकी जबलपूर जिल्ह्यातील तिगव्याचे विष्णूमंदिर, पूर्वीच्या नागोद संस्थानातील भुमारा येथील शिवालय आणि अजयगढ संस्थानातील नाचना कुठारा येथील पार्वतीचे देवालय ही अद्यापि सुस्थितीत विद्यमान आहेत. मध्य प्रदेशात झांशीच्या नैऋत्येस ९६ किमी.वर देवगढ येथे विष्णूचे सुंदर दशावतार देवालय होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहेत. ही देवालये दगडांनी किंवा विटांनी बांधली होती. तिगव्याचे देवालय गुप्तकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. देवळाच्या समोर सोपा असून त्याला चार खांब आहेत. ते पद्मपत्रादिकांनी शोभिवंत केले आहेत. मंदिराचे गर्भगृह २·५० मी. लांब व २·४० मी. रुंद असून त्याच्या दरवाजाची गणेशपट्टी दोन्ही बाजूंस वाढवून तिच्या खाली डाव्या बाजूस गंगा आणि उजव्या बाजूस यमुना या नदीदेवतांची सुंदर शिल्पे बसविली आहेत. सपाट छत आणि दरवाजाच्या बाजूच्या गंगा-यमुनांच्या मूर्ती ही गुप्तकालीन मंदिरांची वैशिष्ट्ये होत. या मंदिराला आच्छादित प्रदक्षिणापथ नाही. यानंतर काही काळाने बांधलेल्या नाचना कुठारा येथील पार्वती मंदिराच्या गर्भगृहावर एक खोली बांधली होती. तिचा उद्देश गर्भगृहाचे स्थान उपासकांस दुरून दिसावे असा दिसतो. पुढे तिच्या ठिकाणी शिखरे बांधण्यात येऊ लागली. या मंदिराला आच्छादित प्रदक्षिणापथ आहे. देवगढ येथील दशावतार मंदिर गुप्तकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हे उंच आणि विस्तृत अशा पीठावर बांधले होते. त्या पीठाला सुंदर शिल्पपट्टांनी व त्याच्या गर्भगृहाच्या दरवाजाला ललाट बिंब, द्वारपाल मूर्ती, श्रीवृक्ष, स्वस्तिक, पूर्ण घट, स्त्रीपुरुषाकृती इत्यादिकांनी विभूषित केले होते. या मंदिराला सु. १२·३५ मी. उंचीचे शिखर होते. गुप्तकाळात अनेक बौद्ध स्तूप, विहार आणि मंदिरेही बांधण्यात आली. त्यांमध्ये सारनाथ येथील धामेख स्तूप आणि नालंदा येथील बुद्ध मंदिर विशेष उल्लेखनीय आहेत. धामेख स्तूप सु. ३४ मी. उंच असून त्यात चार दिशांना बुद्ध मूर्तीकरिता चार कोनाडे आहेत. नालंदाचे बुद्ध मंदिर ९३ मी. उंच होते, असे ह्युएनत्संग सांगतो. उत्खननाने त्याचे सात भिन्न काळातील अवशेष उघडकीस आले आहेत. हे मंदिर बौद्ध गयेच्या मंदिरासारखे होते, असे दिसते. सांची मंदिर सपाट छताचे होते.

गुप्तकाळात काही लेणीही खोदण्यात आली. ⇨अजिंठ्याची क्रमांक १६, १७ व १९ ही लेणी, त्यांतील शिल्पे आणि भित्तिचित्रे यांबद्दल सुप्रसिद्ध आहेत पण ती गुप्तसाम्राज्याबाहेरची आहेत. विदिशाजवळच्या उदयगिरी टेकडीत दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत ४०१ च्या सुमारास खोदलेले शिव मंदिर हे ज्ञात हिंदू मंदिरांत सर्वात प्राचीन आहे. याच सुमारास मध्य भारतात बाघ येथेही काही लेणी खोदली असावीत. त्यांत सुंदर चित्रे रंगविली आहेत. त्यांतील स्तूप, बोधिसत्व इत्यादिकांच्या आकृतींवरून ती गुप्तकाळात आरंभी खोदलेली दिसतात.

गुप्तकाळात शिल्पकलाही परिणतावस्थेस पोहोचली होती. त्यापूर्वीच्या कुशाणकालीन गांधार कलेत शिल्पीचा कल देवमूर्तींना पूर्णपणे विकास पावलेल्या निरोगी पिळदार मानवी शरीराचा आकार देण्याकडे असे. मथुरेतील कलाकारही स्तूपांच्या कठड्यावरील स्त्रीप्रतिमा आणि शालभंजिका निर्माण करताना त्या आपल्या शरीरसौष्ठवाने आणि मोहक कटाक्षांनी प्रेक्षकांचे चित्त आकृष्ट करीत आहेत, असे दाखवीत. गुप्तकलाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष बाह्य सौंदर्याकडून आध्यात्मिक शुचितेकडे वळविण्यात यश संपादन केले. गुप्तकालीन शिल्पकार आपले कसब चैत्यांच्या किंवा मंदिरांच्या बाह्य भागांवर खर्च न करता, आतील मूर्तीचे शांत, गंभीर आणि ज्ञानमय पण करुणायुक्त शिल्प निर्माण करण्याकडे त्याचा उपयोग करीत. कालिदासाने कुमारसंभवात वर्णिले आहे, की ‘भगवान शंकर, पार्वतीच्या अलौकिक मोहक सौंदर्याने आकृष्ट झाले नाहीत, तर तिने आपल्या घोर तपश्चर्येने आणि आत्मिक उन्नतीने त्यांना जिंकले’. हीच वृत्ती गुप्तकालीन शिल्पकारांची होती.

गुप्तकालीन शिल्पकलेचे काही उत्कृष्ट नमुने सापडले आहेत. त्यांमध्ये सारनाथ येथील वज्रासनावर बसलेली धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धमूर्ती, मथुरा संग्रहालयातील उभ्या बुद्धाची मूर्ती आणि उत्तर प्रदेशात सुलतानगंज येथे सापडलेली, पण सध्या बर्मिंगहॅम येथील संग्रहालयात असलेली सु. सव्वादोन मी. उंचीची तांब्याची विशाल बुद्धमूर्ती या प्रमुख आहेत. या सर्वांच्या मुखांवर उच्चतम ज्ञानाचे तेज, गांभीर्य आणि प्राणिमात्रांविषयी कारुण्य ही प्रामुख्याने दिसतात. बुद्धमूर्ती बनविताना गुप्तकालीन शिल्पकारांनी पूर्वीच्या काही कल्पनांत बदल केला. पूर्वीच्या बुद्धमूर्तीचे शिर मुंडन केलेले दाखवीत. गुप्तकालीन शिल्पकारांनी त्याऐवजी कुरळे केस दाखविण्याची पद्धत पाडली. या सर्व बुद्धमूर्तींचे वस्त्र अत्यंत तलम दाखविले असून त्यांतून बुद्धाचे अंगसौष्ठव उत्तम रीतीने व्यक्त होते. दुसरा फरक हा, की पूर्वी बुद्धमूर्तीची प्रभावळ साधी, केवळ हस्तिनखांनी युक्त अशी दाखवीत. गुप्तकाळात तिला विविध प्रकारच्या नक्षीने सुशोभित केले आहे.

बुद्धमूर्तींप्रमाणे अनेक हिंदू देवतांच्या सुंदर मूर्तीही गुप्तकाळात घडविल्या गेल्या. मथुरेतील उभ्या विष्णुमूर्तीच्या मुखावर बुद्धमूर्तीप्रमाणेच आध्यात्मिक तेज, गांभीर्य आणि ध्यानमग्नता आढळतात. भगवान विष्णूच्या नरसिंह आणि वराह अवतारांच्या मूर्तीही अशाच उल्लेखनीय आहेत. उदयगिरी लेण्यातील विशाल वराहमूर्ती प्रलयप्रसंगी पृथ्वीला लीलेने वर काढत असलेली दाखविली आहे. जवळच गंगायमुनांचे उगम, त्यांचा प्रयागजवळ संगम आणि शेवटी सागराशी मीलन यांचे सुंदर दृश्य कोरले आहे. देवगढ येथील दशावतार मंदिराला अनेक सुंदर शिल्पपट्टांनी विभूषित केले होते. त्यांमध्ये शेषशायी विष्णू, तपश्चर्या करीत असलेले नर-नारायण, गजेंद्रमोक्ष, कृष्ण चरित्रातील तसेच रामायणातील विविध प्रसंग यांचे शिल्पपट्ट विशेष उल्लेखनीय आहेत. गुप्तकालीन शिल्पकलेत कलाकाराच्या कौशल्याबरोबर त्याच्या संयमाचीही प्रतीती येते. उत्तरकालीन शिल्पकारांप्रमाणे तो अलंकारांची भरमार करून आपले इष्ट साधीत नाही. त्याच्या शिल्पाकृतीत मोजकेच अलंकार आढळतील पण तिच्या आध्यात्मिक सौंदर्याने ती प्रेक्षकांचे लक्ष आकृष्ट करते, असे दिसते.

गुप्तकाळात उत्कृष्ट सूर्यमूर्तीही घडविण्यात आल्या. त्यांत सूर्याला उत्तर भारतीय पोषाख, पायजमा व उंच बूट घातलेला दाखविले आहे. त्याच्या दोन बाजूंस दंड व पिंगल उभे असतात. या तऱ्हेच्या सूर्यमूर्ती अफगाणिस्तानपासून ओरिसापर्यंतच्या सर्व प्रदेशांत लोकप्रिय झाल्या आहेत.

या काळात काही उत्कृष्ट लौकिक शिल्पेही तयार झाली. मध्य भारतातील पवाया येथील नृत्याचे शिल्प या दृष्टीने लक्षणीय आहे.

गुप्तकाळात पक्वमृदाच्या विविध आकाराच्या सुंदर मूर्ती सामान्य जनतेत प्रचलित झाल्या होत्या. त्या देवदेवता, स्त्री-पुरुष, विविध प्राणी व अन्य सृष्ट पदार्थ यांच्या असत. अशा मूर्तींनी आपापल्या गृहांस सुशोभित करण्याची प्रथा पडली होती. त्यामुळे या मूर्ती उत्खननात अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर सापडल्या आहेत.

गुप्तकाळात चित्रकला उच्च शिखरास पोहोचली होती. त्या काळी उत्तर भारतातील अनेक मंदिरांत व चैतन्यविहारांत चित्रे काढली असावीत, पण ती आता नष्ट झाली आहेत. तत्कालीन चित्रकलेचे नमुने अजिंठ्याच्या १६ आणि १७ क्रमांकांच्या लेण्यांत आणि बाघ येथील लेण्यांत अद्यापि अवशिष्ट आहेत. अंजिठ्याची ही लेणी वाकाटक नृपती हरिषेण याच्या काळी (४७५–५००) अनुक्रमे त्याच्या एका मंत्र्याने व मांडलिकाने खोदविली आणि सुंदर चित्रांनी सुशोभित केली होती. ही लेणी गुप्त साम्राज्याबाहेर असली, तरी ती गुप्तकालीन कलेने प्रभावित झालेल्या कलाकारांनी खोदली व चितारली होती तेव्हा त्यांतील चित्रे गुप्तकालीन कलेची उदाहरणे मानण्यास हरकत नाही. बाघ येथील लेणी, तर मध्य भारतातीलच आहेत. या लेण्यांतील भिंतींना दगडाची भुकटी, शेण, माती आणि भुस्सा यांच्या मिश्रणाचा गिलावा करून तो पूर्ण सुकल्यावर त्यावर आधी पांढरा रंग देऊन मग काढली आहेत. ती काढताना पिवळा, तांबडा, निळा, हिरवा, पांढरा आणि काळा असे सहाच रंग व त्यांच्या मिश्रणाने झालेले इतर रंग वापरले आहेत. विशेष आश्चर्याची गोष्ट ही, की आज दीड हजार वर्षांनंतरही त्यांचा तजेला कमी झालेला नाही.

अजिंठ्याची चित्रे धार्मिक प्रकारची आहेत, तर बाघ लेण्यांतील चित्रे सामाजिक पद्धतीची आहेत. त्यांतील हल्लीसकनामक लोकनृत्याच्या संगीत जलशाचे चित्र सुप्रसिद्ध आहे. त्यामध्ये एका पुरुषाच्या नेतृत्वाखाली अनेक स्त्रिया गायन-वादनांत दंग झालेल्या दाखविल्या आहेत. कल्पकता, प्रभावपूर्ण आविष्कार व सुंदर चित्रण या गुणांत ही चित्रे अजिंठ्याच्या चित्रांच्या बरोबरीची समजतात.

गुप्तांच्या दीर्घकालीन राजवटीत देशात शांतता व सुव्यवस्था चिरकाल टिकली आणि साहित्य, कला व संस्कृती यांची अभूतपूर्व उन्नती झाली म्हणून गुप्तकाळाला प्राचीन भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग मानतात. 

संदर्भ : 1. Agrawala, V. S. Gupta Art, Lucknow, 1947.

            2. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.

            3. Majumdar, R. C. Altekar, A. S. The Vakataka–Gupta Age, Lahore, 1946.

            4. Sinha, B. P. The Decline of the Kingdom of Magadha, Patna, 1954.

मिराशी, वा. वि.


मथुरा शैलीतील बुद्धमूर्तीगजेंद्रमोक्षासाठी धावून आलेला विष्णू, देवगढ येथील शिल्प.(अ) कल्पवृक्षाच्या नारिदा शाखा : स्तंभशिल्पपट्ट, गढवा मंदिर.(आ) पत्रलता : देवगढ येथील मंदिराची द्वारस्तंभशाखा.बलराम-कृष्ण यांसह नंद-यशोदा : देवगढ मंदिरातील शिल्पचौकट.अंतःपुरातील नृत्य-संगीत : पवाया (मध्य भारत) येथील गणेशपट्टीवरील शिल्पाकृती.गुप्त मूर्तिकलेचा नमुना : एकमुखी शिवलिंग, खोह, मध्य भारत.

पृथ्वीचे उद्धरण करणारा महावराह, उदयगिरी येथील शैलशिल्प.भीम-जरासंध द्वंद्वयुद्ध : गढवा येथील गणेशपट्टीवरील शिल्पांकन.शेषशायी विष्णू. देवगढ येथील शिल्पपट्ट.विविध केशभूषानिदर्शक पक्वमृदेतील शिल्पाकृती, राजघाट : (अ) अलकनामक पुरुष केशभूषा, (आ) स्त्रीची मयूरपिच्छाकार, (बर्हभार) केषभूषा, (इ) स्त्रीची अलकावली केशरचना, (ई) स्त्रीची मयूरपिच्छाकार सारखीच केषभूषा.