वाघेल वंश : गुजरातमधील एक प्रसिद्ध मध्ययुगीन राजपुत वंश. या वंशाची माहिती तत्कालीन कोरीव लेख, प्रबंधचिंतामणि (मेरुतुंग), तीर्थकल्पतरू (जिनप्रभा सुरी) यांसारखे ग्रंथ व तत्कालीन प्रवाशांचे वृत्तांत यांतून मिळते. राजपुतांच्या छत्तीस कुळांत वाघेल वंशाची गणना होते. या वंशाचा मूळ पुरुष अर्णोराज हा चालुक्य (चौलुक्य) नृपती कुमारपाल याचा मावसभाऊ होता. त्याने कुमारपालाला गादी मिळविण्यात मदत केली आणि मेदपाट व चंद्रावती येथील सत्ताधीशांविरुद्ध युद्धात सहाय्य केले. त्यामुळे कुमारपालने त्याला अनहिलवाडजवळ नैर्ऋत्येस सु. १६ किमी.वर असलेले व्याघ्रपल्ली  हे गाव दिले. या गावावरून अर्णोराजाच्या घराण्याला वाघेल हे नाव मिळाले. 

अर्णोराजाचा पुत्र लवणप्रसाद (कार. १२०९–३१) हा शूर योद्धा होता. त्याने व त्याचा पुत्र वीरधवल यांनी गादीवर आलेल्या चालुक्य दुसरा भीम (कार. ११७८–१२४२) या राजाला त्याच्या अनेक युद्धांत मदत केली. लवणप्रसादाने शासनव्यवस्थेची नीट घडी बसवून अराजकता नष्ट केली. त्याने खेटक (विद्यमान खेडा) प्रदेशातील धोलका हे प्रमुख स्थान केले आणि प्रागवाट कुटुंबातील तेजपाल व वस्तुपाल या बंधूंना मंत्री नेमले. याच वेळी चालुक्यांच्या राजकीय कमकुवतपणाचा फायदा घेऊन यादव राजा पाचवा भिल्लम व त्याचा पुत्र जैतुगी तसेच परमार नृपती सुभटवर्मन यांनी गुजरातवर स्वारी केली. तेव्हा लवणप्रसादाने या सर्वांशी धूर्तपणे मुकाबला केला. या कार्यात वीरधवलने अतिशय पराक्रम दाखवून चालुक्यांची कीर्ती वाढविली. त्यानंतर लवणप्रसादाने निवृत्ती स्वीकारून वीरधवलकडे सर्व सूत्रे दिली. या सुमारास वीरधवलच प्रत्यक्षात गुजरातचा सत्ताधीश होता. वीरधवल (कार. १२३१–३८) याने वामनस्थळीच्या संगन आणि चामुण्ड या दोन बंडखोर बंधूंना कंठस्नान घातले, भद्रेश्वराच्या भीमसिंहाला नमविले आणि गोध्र्याच्या घुघुल राजाला बंदिवान केले. यादव सिंधणाबरोबर शांततेचा तह करून चालुक्य व यादवांमध्ये सलोखा निर्माण केला (१२३२). वीरधवलला प्रतापमल्ल, वीरम आणि विश्वमल्ल (वीसल) हे तीन पुत्र होते. त्यांपैकी प्रतापमल्ल अगोदरच मरण पावला. त्याला अर्जुन नावाचा मुलगा होता. त्यामुळे वीरधवलच्या मृत्यूनंतर वीरम वाघेलांच्या गादीवर आला (१२३८). दुसऱ्या भीमाच्या मृत्यूनंतर (१२४२) चालुक्यांच्या गादीवर त्रिभुवनपाल हा दुबळा राजा आला. त्याला पदच्युत करून वीरमने चालुक्यांची गादी बळकाविली. त्याच्यानंतर अनहिलवाड येथे वाघेलांच्या चार पिढ्यांनी राज्य केले.  

वीरमला बाजूला सारून अनहिलवाडची गादी वीसलदेवाने इ. स. १२५१ पूर्वी केव्हातरी हस्तगत केली. वीसलदेव (कार. १२५१–६२) पित्याप्रमाणेच शूर होता. त्याने महाराणक हे बिरुद धारण केले.  त्याने राज्यात

  


स्थैर्य आणून कलेबरोबर वाङ्‌मयाला उदार आश्रय दिला. त्याच्या पदरी महानागरिय कनक, कृष्णनागरिय कमलादित्य, वीसलनागरिय वनक हे विद्वान कवी आणि सुकृतसंकीर्तन या ग्रंथाचा लेखक अरिसिंह व त्याचा शिष्य अमरचंद्र हे होते. वीसलदेवाने राज्यत्याग करून आपला पुतण्या अर्जुनदेव (कार. १२६२–७४) यास अनहिलवाडच्या गादीवर बसविले. त्यानंतर काही महिन्यांतच वीसलदेव मरण पावला असावा. अर्जुनदेवानंतर रामदेव ह्या ज्येष्ठ मुलाने काही महिने राज्य केले व पुढे त्याचा भाऊ सारंगदेव (कार. १२७४–९४) अनहिलवाडच्या गादीवर आला. त्याने पूर्वापार चालत आलेली महामंडलेश्वर, महारणक, सर्वेश्वर वगैरे बिरुदे धारण केली. त्याच्या मृत्यूनंतर करणदेव वा कर्ण (कार. १२९४–१३०६) गादीवर आला. त्याच्या काळी वाघेलांच्या आधिपत्याखाली काठेवाड, कच्छ, अबूपर्यंतचा भाग होता. पुढे गुजरात मुसलमानांनी जिंकून घेतला, तेव्हा कर्ण वाघेला प्रथम बागलाणात (महाराष्ट्र) काही वर्षे राज्य करीत होता. त्याही प्रदेशावर स्वारी झाल्यानंतर तो देवगिरीस यादवांच्या आश्रयास गेला आणि अज्ञातवासात मरण पावला. त्यानंतर वाघेल वंश संपुष्टात आला.

वाघेलांनी गुजरात–राजस्थानच्या वास्तुशिल्पादी कलेत मोलाची भर घातली. तेजपाल व वस्तुपाल या त्यांच्या जैन मंत्र्यांनी अबूगिरनारच्या परिसरात सु. पन्नास  लहानमोठी जिनालये बांधली आणि ती शिल्पादिकांनी विभूषित केली. त्यांपैकी वस्तुपाल–विहार, पार्श्वनाथ (गिरनार), इंद्र मंडप व अन्य सहा मंदिरे (शत्रूंजय), आदिनाथ, (धोलका), अष्टपात–प्रासाद (प्रभास), ही वस्तुपालने बांधली आणि आसराज-विहार (पाटण), नेमीनाथ (मौंट अबू व धोलका), आदिनाथ (प्रभास) इ. तेजपालने बांधली. मौंट अबूवरील दिलवाडा येथील नेमिनाथ मंदिर लूण–वसही या नावाने तर आदिनाथाचे मंदिर विमलवसही म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर संगमरवरी पाषाणात बांधले असून त्यातील अलंकृत छत, द्वारशाखा आणि स्तंभ सुंदर कोरीव कामाने विभूषित आहेत, यांतील विद्यादेवीच्या मूर्ती आणि बारीक सारिक कलाकुसर त्यायोगे त्यांची कीर्ती चिरंतन झाली आहे.

पहा : करण वाघेला गुजरात–१ (इतिहास) चालुक्य घराणे दिलवाडा.

संदर्भ : 1. Ghosh, A. Ed. Jain Art and Architecture, Vol. II, New Delhi, 1975.

           2. Majumdar, R. C. Ed. Struggle for Empire, Bombay, 1970.  

           3. Munshi, K. M. Glory that was Gurjara Desh. Part II, Bombay, 1955.  

मिराशी, वा. वि.