किशनगढ संस्थान : मध्य राजस्थानातील पूर्वीचे एक राजपूत संस्थान. त्याची लोकसंख्या १,०४,१५५ (१९४१) होती. विलीनीकरणापूर्वी क्षेत्रफळ २,२२२ चौ. किमी. संस्थानची राजधानी किशनगढ. हे अजमीरच्या ईशान्येस २९ किमी.  वर अजमीर-जयपूर हमरस्त्यावर वसले आहे. उत्तरेस व वायव्येस जोधपूरचे संस्थान पूर्वेस जयपूर संस्थान, पश्चिमेस व आग्नेयीस ब्रिटिश आयुक्ताचा अजमीर प्रदेश व दक्षिणेस शाहपूर संस्थान आदींनी त्याच्या चतुःसीमा व्यापलेल्या होत्या.

किशनगढचे राजे हे राठोड राजपूत घराण्यातील असून किशनसिंग (१६११—१६१५) ह्या राजाने १६११ मध्ये किशनगढ संस्थानची स्थापना केली, म्हणून त्यास त्याचेच नाव पडले. तो जोधपूरच्या उदयसिंगाचा मुलगा. अकबराच्या वेळी त्यास राजा हा किताब मिळाला पुढे जहांगिराने महाराजा हा किताब त्यास बहाल केला. किशनसिंगाच्या मृत्यूनंतर ह्या घराण्यात सु. १८ राजे होऊन गेले. त्यांपैकी फारच थोड्यांची कारकीर्द किशनगढच्या प्रगतीच्या दृष्टीने हितावह ठरली.  चौथा राजा रूपसिंग (१६४४—५८) हा शाहजहानचा अत्यंत आवडता होता. त्याने शाहजहानच्या वतीने अनेक लढाया लढून त्यास विजय मिळवून दिले होते शिवाय तीन वेळा त्याने अफगाणिस्तानच्या स्वारीत भाग घेतला होता. म्हणून शाहजहानने त्यास ५,००० ची सरदारकी, कित्येक मिळकतीसह मांडलगढचा प्रवेश व किल्ला बहाल केला. नंतरचा सातवा राजा राजसिंग (१७०६—४८) ह्याने बहादुरशाहच्या बाजूने अजमशाहविरूद्ध युद्ध केले त्याबद्‌दल सरवार व मालपुरा हे प्रदेश त्यास देण्यात आले. त्याच्या सावंतसिंग ह्या मुलाने आपले अर्धे राज्य आपल्या धाकट्या भावास दिले व स्वतः रूपनगर येथून उरलेले राज्य करू लागला पण धार्मिक वृत्तीमुळे पुढे त्याने सर्वसंग परित्याग करून वृंदावन येथे उर्वरित आयुष्य व्यतीत केले. त्यामुळे पुन्हा किशनगढचे एक राज्य निर्माण झाले. सरदारसिंग ह्या त्याच्या मुलाने दोन वर्षे गादी चालविली. ह्या घराण्यातील कल्याणसिंग (१७९७—१८३२) ह्या तेराव्या राजाच्या कारकीर्दीत हे संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले.  कल्याणसिंगाचे त्याच्या तत्कालीन जहागीरदारांशी पटेना. त्यामुळे या संस्थानाचा ब्रिटिशांशी तह झाला पण त्याचेही कल्याणसिंगाने उल्लंघन केल्यामुळे ब्रिटिशांनी अखेर हस्तक्षेप केला. कल्याणसिंगानंतर मोहकमसिंग (१८३२—४०), नंतर दत्तक पुत्र पृथ्वीसिंग (१८४०—१८७९) व शार्दूलसिंग (१८७९—१९००) असे राजे गादीवर आले. १८६७ मध्ये ब्रिटिशांनी रेल्वेमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी काही रक्कम संस्थानास दिली. शार्दूलसिंगास जी. सी. आय्‌. ई. हा किताब ब्रिटिशांनी दिला. त्यानंतर मदनसिंग (१९००—१९३९) गादीवर आला. तो पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये लढण्यास गेला होता. त्याने ब्रिटिशांच्या लष्करामध्ये अनेक हुद्यांवर कामे केल्यामुळे त्यास १७ तोफांची सलामी व के. सी. एस्‌. आय्‌. आणि के. सी. आय्‌. ई. हे बहुमान देण्यात आले. मदनसिंगानंतर सुमेरसिंग बहादुर (१९३९ —  ) गादीवर आला त्याने आपल्या संस्थानात अनेक सुधारणा केल्या.

हे संस्थान १९४७ मध्ये राजस्थान संघात सामील करण्यात आले. नंतर ते जयपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. पुढे १९५६ मध्ये अजमीर राजस्थानात गेल्यावर किशनगढ अजमीर जिल्ह्यात अंतर्भूत झाले. किशनगढ हे प्रथमपासून धातुकामासाठी प्रसिद्ध असून तेथे अनेक प्राचीन वास्तू आहेत. तेथील चित्रकलेची शैली ख्यातनाम आहे.

देशपांडे, सु. र.