बीरबल : (? १५२८ ?–? फेब्रुवारी १५८६) अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व अकबराचा विश्वासू मित्र. त्याचे मूळचे नाव महेशदास. त्याच्या वडिलांचे नाव गंगादास. यमुनेच्या काठचे त्रिविक्रमपूर हे त्याचे जन्मस्थान. विद्यार्थिदशेतच त्याने संस्कृत, हिंदी व फार्सी भाषा आत्मसात केल्या होत्या. १५६१ मध्ये अकबराकडे नोकरीस येण्यापूर्वी भट्टाचा राजा रामचंद्र आणि आंबेरचा राजा भगवानदास यांच्याकडे बीरबल नोकरीस होता. डूंगरपूरच्या राजाच्या मुलीबरोबर झालेल्या अकबराच्या लग्नात बीरबलाने मध्यस्थी केली होती. अकबराने त्याला ’बीखर’ अशी उपाधी दिली होती. तिचाच पुढे अपभ्रंश बीरबल असा झाला असावा, असे म्हणतात. १५७४ च्या पाटण्याच्या स्वारीत बीरबल अकबराबरोबर होता. दिवाणी न्यायालय खात्याचा बीरबल मुख्य असून तो लोकांच्या तक्रारी ऐकून घेत असे. अकबराच्या दीन-ए-इलाहीमध्ये बीरबल हाच एकटा हिंदू सभासद होता. आपल्या योग्यतेमुळे तो हळूहळू मंत्रिपदापर्यंत चढला आणि पुढे अकबराने त्यास पंचहजारी मनसबदारी व सेनापतिपद दिले. त्याची बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा व विनोदबुद्धी यांमुळे अकबर बादशाहची त्याच्यावर विशेष मर्जी होती. तो कवी, प्रशासक व संगीतज्ञ असल्याने त्याने अनेक कविता व दोहे केलेले होते. बीरबलाचा बीरबलनामा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्या काव्य नैपुण्यामुळे त्यास १५७३ मध्ये ’कविराय’ हा किताब देण्यात आला. दरबारातील त्याच्या वर्चस्वामुळे मुसलमान सरदार त्याचा द्वेष करीत. १५८३ साली अकबराने त्यास वायव्य सरहद्दीवरील युसुफझाई लोकांचा बंदोबस्त करण्याकरिता झैनखान कोकाबरोबर पाठविले. पण दुर्दैवाने या युद्धात तो मरण पावला.

संदर्भ : Sinha, P. P. Raja Birbal : Life and Times, Patna, 1980.

खोडवे, अच्युत