सावनूर संस्थान : कर्नाटकातील एक संस्थान. त्याचे क्षेत्रफळ १८६·८८चौ. किमी. व वार्षिक उत्पन्न सु. २,५०,००० रूपये होते. संस्थानची लोकसंख्या सु. २५,००० होती (१९४१). अब्दुल करीमखान हा या घराण्याचा मूळ पुरुष अफगाणिस्तानातील होता. त्याच्यापासून पंधराव्या पिढीतला मलिक अवतारखान हा तैमूरलंगाबरोबर हिंदुस्थानात आला. अठराव्या पिढीतला दोदाखान याने ‘नवाब’ हा किताब धारण केला आणि मोगल दरबारात महत्त्वाचा हुद्दा मिळविला. विसाव्या पिढीतला नवाब अब्दुल करीम बहलोलखान हा प्रथम दक्षिणेत आला. बहलोलखान विजापूर दरबारात वजीर होता (इ. स.१६७५– ७७). त्याच्यानंतर त्याचा मुलगा अब्दुल रहीमखान याने कोप्पळ जहागीर घेतली. विजापूरचा शेवटचा आदिलशहा शिकंदर याने अब्दुल करीम बहलोलखानाला बंकापूर जहागीरमधील २२ महल रीतसर बहाल केले आणि इथूनच सावनूर संस्थानचा उदय झाला.

विजापूरच्या पाडावानंतर (१६८६) अब्दुल करीमखानाचा मुलगा अब्दुल रौफखान हा औरंगजेबाच्या तैनातीत गेला. त्याला औरंगजेबाने ७,००० जात आणि ६,००० स्वारांचा मनसबदार करून ‘दिलेरखान बहादूर दिलेरजंग’ असा किताब दिला. शिवाय त्याला २ कोटी ४० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे २२ महल तसेच किल्ले सरकार बंकापूर, सरकार आजमनगर (बेळगाव) आणि सरकार तोरगल यांची वडिलोपार्जित जहागीर मिळाली.

अब्दुल गफारखानाचा मुलगा अब्दुल मजीदखान (कार. १७२०–५१) हा सावनूर नवाबांमध्ये सर्वांत श्रेष्ठ होता. त्याच्या संस्थानात कृष्णा-तुंगभद्रा नद्यांमधील जवळजवळ सर्व प्रदेश समाविष्ट होता. त्याचा प्रसिद्घ दिवाण अलीखान याने महसूलाची घडी नीट बसविली. त्याने सर्व कर व पट्ट्यांना एकत्रित करून त्यात कमी-जास्त करून एकच अशी सुधारित प्रमाणबद्घ जमीनधारापद्घत निश्चित केली. याला ‘ऐनाति’ असे म्हणत. पडिक जमीन लागवडीखाली आणण्यास प्रोत्साहन देण्यात आले. अलीखानाच्या जमीनधारापद्घतीमुळे शेतकरी लोक शक्य तितकी जास्त जमीन घेऊन तिची लागवड करीत आणि त्यावर जमीन महसूल देत. त्यामुळे सरकारी उत्पन्न वाढले.

अब्दुल मजीदखान याने ‘मजीदपुर’ म्हणजे नवी हुबळी हे शहर वसविले. मोठमोठी घरे बांधून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने निर्माण केली. शहराचा एक नकाशा तयार करण्यात आला आणि त्याप्रमाणे पद्घतशीरपणे गावाची वसाहत झाली.

सावनूर शहराच्या पूर्वेस ६४,००० रूपये खर्च करून एक मोठा मोती तलाव बांधला. तलावाच्या दक्षिणेस एक नवीन बाग केली. पेशव्यांनी सावनूरवर चढाई केली, तेव्हा पेशवे आणि मजीदखान यांमध्ये तह होऊन मजीदखानाने पेशव्यांना ३६ महल दिले. मजीदखानाजवळ फक्त २२ महल आणि तीन सरकार राहिले. पुढे थोरल्या माधवरावांनी हैदर अलीला सावनूर घेऊ दिले नाही (१७६५), तेव्हा हैदरने नवाबाशी लग्नसंबंध जोडून संस्थान आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न केला (१७७९). या महलांचे उत्पन्न ८,२३,९२६ रूपये होते. याशिवाय नवाबाने पेशव्यांना अकरा लाख रूपये देणगी देण्याचा करार केला होता.

हैदर अलीच्या मृत्यूनंतर १७८२ मध्ये टिपू सुलतान आणि अब्दुल हकीमखान यांत वितुष्ट आले. हकीमखान याने मराठ्यांचे साहाय्य मागितल्यामुळे टिपूने रुष्ट होऊन सावनूर हस्तगत केले आणि नवाबाची मालमत्ता लुटली. १७८७ च्या गजेंद्रगडच्या तहानंतर टिपूने हकीमखानाला सावनूर परत केले पण हकीमखान हा सावनूर सोडून पुण्याला गेला व पेशव्यांकडून दरमहा १०,००० रूपये निवृत्तिवेतन घेत तिथेच राहिला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) हे संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक झाले. त्यानंतर अब्दुल फयाजखान, भुनवरखान, दिलेरखान वगैरे नाममात्र नवाब झाले. दिलेरखानाने १८५७ च्या उठावात मदत केली म्हणून त्यास मुलकी व फौजदारी अधिकार ब्रिटिशांनी दिले. नंतर दुसरा अब्दुल खैरनार, दुसरा अब्दुल दिलेरखान आणि अब्दुल तब्रेजखान हे सावनूरचे नवाब होऊन १९१२ मध्ये दुसरा अब्दुल मजीदखान हा नवाब झाला. तोपर्यंत इंग्रजांचेच शासन होते. त्यानंतर संस्थानला पूर्ण न्यायाधिकार मिळाले (१९१२). मजीदखान विद्यावंत व क्रीडापटू होता. पहिल्या महायुद्घात ब्रिटिशांच्या वतीने तो लढला. त्याने संस्थानात डाकघर, शिक्षण इ. विविध सुधारणा केल्या. शेतकऱ्यांना विविध सवलती दिल्या. संस्थानाच्या उत्पन्नात वाढ केली. त्याच्या कारकीर्दीतच १९४८ मध्ये संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

चिटणीस, कृ. ना.