रियासतकार गो. स. सरदेसाई

सरदेसाई, गोविंद सखाराम : (१७ मे १८६५-२९ नोव्हेंबर १९५९). महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी इतिहासकार. त्यांचा जन्म सखाराम व गंगाबाई या दांपत्यापोटी गरीब शेतकरी कुटुंबात गोविल (रत्नागिरी जिल्हा) या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण शिपोशीत झाले. मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगूताई कीर्तने या मुलीशी ते विवाहबद्ध झाले (१८८४). पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविदयालयातून ते बी. ए. झाले (१८८८) आणि बडोदयास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून महिना सत्तर रूपयांवर नोकरीस लागले (१८८९). सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचा, विशेषतः यूरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणूनही काम दिले होते. साठाव्या वर्षी निवृत्तिवेतन घेऊन ते संस्थानी सेवेतून निवृत्त झाले (१९२५). सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्यात कष्टाळूपणा आणि काटेकोरपणा आला. निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले. उर्वरित जीवन त्यांनी इतिहासलेखन-वाचन आणि संकलन यांत व्यतीत केले. त्यांच्या इतिहासलेखनास बडोदयात असतानाच प्रारंभ झाला होता.

सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली (१८९८). याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स व प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.या नंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले आणि इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला.त्याचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालकमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले. मराठी रियासतब्रिटिश रियासत या दोन रियासतींच्या खंडांच्या आवृत्त्या १९३५ पर्यंत निघाल्या. त्यानंतर स. मा. गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली पॉप्युलर प्रकाशनाने आठ खंडांत मराठी रियासतीची नवी आवृत्ती प्रकाशित केली (१९८८-१९९२). यात विविध इतिहासकारांनी नव्याने उजेडात आलेल्या साधनांचाही चपखल उपयोग केला आहे. रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक व बालोपयोगी भारतवर्ष, महाराष्ट्राचा इतिहास, इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्यात मैत्री होती, ती प्रदीर्घकाळ टिकली. जदुनाथांनी ‘सर्वश्रेष्ठ मराठयांचा विदयमान इतिहासकार’ असे सरदेसाईंना गौरवाने म्हटले आहे. छ. शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सूव्हेनिअर (१९२७) या ग्रंथाचे संपादन केले. त्यांमुळे परप्रांतात त्यांची कीर्ती पसरली. गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले. ब्रिटिश शासनाने १९२९ मध्ये त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यांना कृ. पां. कुलकर्णी, य. न. केळकर, वि. गो. दिघे यांसारखे अभ्यासू सहकारी लाभले. त्यामुळे पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे ४५ खंड प्रसिद्ध झाले (१९३०-३४). त्यांनी श्यामकांत या थोरल्या मुलाने शांतिनिकेतन व जर्मनी येथून वेळोवेळी पाठविलेली पत्रे श्यामकांतची पत्रे या शीर्षकाने प्रसिद्ध केली (1934). सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्तार, रत्नाकर, मनोरंजन, चित्रमयजगत, सह्याद्री, लोकशिक्षण इ. नियतकालिकांतून सु. २७५ लेख लिहिले. लोकशिक्षणाच्या डिसेंबर १९३२ च्या अंकात त्यांनी ‘राष्ट्रीय इतिहास : अर्थ, व्याप्ती आणि भूमिका’ या शीर्षकाचा लेख लिहून इतिहासशास्त्राचा अभ्यास, त्याचा उपयोग व दुरूपयोग, धर्म व राजकारण, इतिहास साधने व साध्य, नवीन संशोधन, संशोधक वगैरे मुदयांची मीमांसा केली आहे आणि अखेरीस राजकारणात धर्म आणू नये व हिंदु-मुस्लिमांच्या ऐक्यावर भर दयावा, असा उपदेश केला आहे. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर (१९४३) ते एकाकी झाले तथापि इतिहासलेखनाचे वत अखंडपणे त्यांनी चालू ठेवले आणि इंगजीत न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज ( तीन खंड, १९४९) हा ग्रंथ प्रसिद्घ केला. याशिवाय त्यांनी मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरीपूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स (पाच खंड) हे गंथ डॉ. जदुनाथ सरकार यांच्या संपादन-सहकार्याने इंगजीत प्रसिद्ध केले. त्यांनी काव्येतिहाससंग्रहा तील पत्रे, यादया आणि भारतवर्षइतिहास संग्रह या नियतकालिकांतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे संपादनही केले आहे. शिवाय परमानंदाच्या अनुपुराणा चे संपादन करून ‘गायकवाड ओरिएंटल सेरीज’मध्ये ते प्रसिद्ध केले.

सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब (१९३३) व नंतर रावबहादूर हा किताब दिला (१९३८). ते मराठी साहित्य संमेलनाच्या १९३८ च्या निवडणुकीत स्वा. सावरकरांविरूद्ध अपयशी ठरले पण अहमदनगरचे अध्यक्षपद त्यांनी नाकारले (१९४३). राजवाडे संशोधन मंदिराने (धुळे) ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला (१९४६). पुणे विदयापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली (१९५१). त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले (१९५६). भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला (१९५७). वृद्धापकाळाने त्यांचे कामशेत येथे निधन झाले.

सरदेसाई यांनी उपलब्ध साधनांवरून मराठयांचा इंग्रजी व मराठी भाषांत संपूर्ण सुसंगत समग्र इतिहास लिहिण्याचे काम केले. त्यांनी संशोधन असे फारसे केले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर संकलनकार अशी टीका होते. त्यांच्या रियासतीत काही दोष, उणिवा किंवा तपशिलांच्या चुका चिकित्सक अभ्यासकाला आढळतात. तथापि त्यांनी संकलनाच्या आणि विवेचनाच्या ज्या दिशा दाखविल्या आहेत, त्यामुळे त्यांचे कार्य एक भक्कम पाया म्हणून नेहमीच महत्त्वाचे व चिरस्मरणीय राहील. म्हणूनच समाजाकडून रियासतकार ही सार्थ उपाधी त्यांना लाभली.

संदर्भ : १. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड १, मुंबई, १९८८.

           २. टिकेकर, श्री. रा. जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई, मुंबई, १९६१.

           ३. ताटके, अरविंद, संशोधक सप्तर्षि, पुणे, १९६२.

           ४. देशपांडे, सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, पुणे, १९९४.

देशपांडे, सु. र.