नाणी व नाणकशास्त्र : नाण्याचा आकार, त्याचे नाव व वजन, त्यावरील आकृती, लेख, नक्षी, बिंदू, सावकाराच्या खुणा, विशेष चिन्हे, त्याचा धातू, त्यामध्ये भेसळ असल्यास त्यामधील भेसळीचे प्रमाण, नाण्यांची मूल्ये व त्यांच्या मूल्यांचे परस्परसंबंध, नाण्यांच्या मुबलकतेवरून वा दुर्मिळतेवरून दिसून येणारी देशाची आर्थिक स्थिती, चिन्हांवरून प्रतीत होणारी आवड किंवा भक्ती, लेखांवरून समजणारी राजनामे व त्यांचे काल, तसेच त्यांची श्रेष्ठ-कनिष्ठ स्थाने, नाणी तयार करण्याची पद्धती इत्यादींचा अभ्यास म्हणजे नाणकशास्त्र होय. भारतात या शास्त्राचा अभ्यास एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस जेम्स प्रिन्सेपसारख्या टांकसाळीवरच्या इंग्रज अधिकाऱ्याने चालू केला. पुष्कळ वर्षे तो भारतीय संग्रहालयातील नाणक विभागाच्या प्रमुखांनी चालू ठेवला. १९१० साली नाणकशास्त्राच्या अभ्यासासाठी न्यूमिस्मॅटिक सोयायटी ऑफ इंडिया ही संस्था निघाली. हिच्यामुळे भारतातील नाण्यांच्या अभ्यासास गती मिळाली. आता भारतातील बहुतेक संग्रहालयांत नाण्यांचा संग्रह असून त्यांचा तेथे अभ्यास व त्या अभ्यासाचे प्रकाशन चालते. पाश्चिमात्य देशांत या शास्त्राचे संशोधन व अभ्यास तेथील सामान्य जनजागरणानंतर इतर शास्त्रांप्रमाणेच चालू झाला.

नाण्यांची आवश्यकता : फार पूर्वीपासून आजवर व आजही मनुष्याला आपल्या जीवनातील गरजा भागविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या देवघेवीत उपयोगी पडणारे विविध आकारांचे, पण निश्चित वजनांचे व मूल्यांचे आणि विशिष्ट लेखन किंवा आकृती अगर दोन्ही असलेले सोने, रुपे इ. धातूंचे तुकडे म्हणजे नाणी असे सर्वसाधारणतः म्हणावयास हरकत नाही. आजवर ज्ञात झालेल्या नाण्यांसाठी सोने, रुपे, तांबे, लोह इ. शुद्ध धातू किंवा इलेक्ट्रम (सोने व रुपे यांचे मिश्रण), बिलन (रुपे व तांबे यांचे मिश्रण), पोटिन (सोने व रुपे यांचे मिश्रण), पितळ, पंचरस (ब्राँझ) इ. धातू वापरल्याचे आढळले आहे. वाटोळा, चौकोनी, चौरस, चिमटा, विळा, गोल, लंबगोल, चपटा, मधे भोक असलेले असे विविध आकार नाण्यांत आढळतात. यांवरील आकृतींत खूपच विविधता आढळते. निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले, फांद्या किंवा वृक्ष, त्याभोवतालची कुंपणे, सिंह, वाघ, साप, बैल, मासा, हरिण इ. लहानमोठे पशू गरुड, गंडभेरुंड, घुबड, गिधाड इ. नैसर्गिक व काल्पनिक पक्षी स्वार झालेले, उभे, बैठे वीर ऊर्ध्वांगी स्त्रीपुरुष किंवा त्यांची मस्तके उभ्या, बैठ्या स्वार झालेल्या देवता इ. अनेक प्रकारच्या आकृती यांवर आढळतात. लेखन असल्यास ते विविध भाषा व लिपी यांत असून त्यात राजांची उणीअधिक पूर्णापूर्ण नावे, त्यांची वंशनामे, आडनावे, विविध कालोल्लेख, धर्मग्रंथांतील किंवा स्तुतिपर वाक्ये किंवा शब्दसमूह असतात.

नाणकशास्त्राचे महत्त्व : नाणकशास्त्राचे भारतीय इतिहासाच्या तसेच जागतिक इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील अनेक प्राचीन राजांचे अस्तित्व केवळ त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले आहे. इंडो-ग्रीक, शक, कुशाण, क्षत्रप, सातवाहन इ. राजवंशांतील कित्येक राजे केवळ त्यांच्या नाण्यांमुळे आपल्याला माहीत झाले आणि त्यामुळेच इ. स. पू. २५० ते इ. स. ३०० या साडेपाचशे वर्षांचा इतिहास अधिक सुसंगत लिहिता येणे शक्य झाले. यांशिवाय संघ, नैगम, जनपद, गण इत्यादींचे अस्तित्वही त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले. मालव, शिबी, यौधेय इ. गणराज्यांचे प्रदेश आपल्याला नाण्यांच्या पुराव्यामुळे जवळजवळ निश्चत करता आले. इतिहासाच्या भौगोलिक अंगावर नाण्यांमुळेच महत्त्वाचा प्रकाश पडला. नाण्यांवरील देवतांच्या चित्रणामुळे मूर्तिविज्ञानाचाही काही अभ्यास करणे शक्य झाले. नाणकशास्त्राचा पुरावा हे आता भारतीय इतिहासाचे एक अनन्यसाधारण महत्त्वाचे साधन बनले आहे, यात शंका नाही.

नाणी पाडण्याचे तंत्र : ज्या नाण्यांवरील चिन्हे ठशाने ठोकून उमटवीत, त्यांना आहत नाणी म्हणतात. तीच प्राचीनतम भारतीय नाणी होत. पुढे इ. स. पू. तिसऱ्या शतकात साच्यांतून नाणी पाडण्यास सुरुवात झाली. साच्यांतून नाणी कशी पाडतात याची कल्पना साच्यांच्या सापडलेल्या अवशेषांवरून येते. हरयाणामधील रोहटक (प्राचीन रोहितके) व नौरंगाबाद आणि पंजाबातील सुनेत (जिल्हा लुधियाना) येथे नाण्यांचे मातीचे साचे फार मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. त्यांवरून असे दिसून येते की, मातीच्या प्रत्येक तबकडीत मध्यभागी एक गोल छिद्र असून सभोवती आठ साचे असत. मध्यभागी असलेले छिद्र नाण्यांच्या साच्याची लहान कोरलेल्या पन्हाळीने जोडलेले असे. छिद्रातून ओतलेला धातूचा रस नाण्याच्या साच्यात जाण्यासाठी ही योजना होती. या प्रकारच्या तबकड्या एकावर एक ठेवीत. तसे करताना वरच्या तबकडीच्या खालील बाजूवर असलेला साचा आणि खालच्या तबकडीच्या वरच्या बाजूवरील नाण्याचा साचा अगदी अचूक एकमेकावर ठेवावा लागे. अशा आठ तबकड्या एकावर एक रचल्यानंतर त्यांच्या बाहेरील बाजूवर मातीचा लेप दिला जाई व नंतर वरच्या बाजूस तबकड्यांच्या मध्यभागी असलेल्या छिद्रात नरसाळ्याद्वारे वितळविलेला धातूचा रस ओतीत. हा रस मध्यभागी असलेले छिद्र आणि नाण्याचा साचा यांना जोडणाऱ्या पन्हाळीतून साच्यापर्यंत जात असे. या प्रकारे सर्व साच्यांतून रस भरला जाई. तो थंड झाल्यानंतर नाणी काढून घेण्यासाठी साच्यांच्या तबकड्या फोडाव्या लागत. नाणी काढल्यानंतर ती कानशीने घासून काढावी लागत. सुनेत येथे सापडलेल्या तबकड्या लहान असून त्यांवर प्रत्येकी एकच नाण्याचा साचा आहे. कोंडापूर (आंध्र प्रदेश), तक्षशिला व नालंदा येथेही नाण्यांचे साचे सापडले आहेत पण ह्या पद्धतीने पाडलेली नाणी एकंदरीत कमी असून आहत नाण्यांचे प्रमाण मोठे आहे. मुसलमानी, संस्थानी, यूरो-भारतीय व सध्याची भारतीय नाणी आहतच आहेत. म्हणजे पूर्वी पत्र्यांवर प्रथम ठशांच्या साहाय्याने मजकुरादी उठवून मग त्याचे तुकडे पाडीत. आता यंत्राच्या साहाय्याने प्रथम विविध आकारांचे तुकडे पाडतात आणि मग त्यांवर मजकुरादींचे ठसे उमटवितात.

नाण्यांचा उगम : सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी मानवी जीवनाला स्थैर्य लाभल्याने ते समृद्ध होऊ लागले. यातून कालक्रमाने स्वयंपूर्ण खेड्यांचे छोट्या राज्यांत रूपांतर होऊन कालांतराने साम्राज्ये अस्तित्वात आली. एकमेकांत देवाणघेवाण वाढू लागली. या प्रकारची देवाणघेवाण अश्मयुगातही अस्तित्वात असावी. तीत एकमेकाला हव्या असलेल्या वस्तूंची अदलाबदल होत असावी. ही पद्धत नवाश्मयुगात आणि ताम्रपाषाणयुगातही चालू राहिली. पुढे खेड्यांची वाढ होऊन नागरी संस्कृतीचा उदय झाला आणि त्यामुळे मानवी गरजा वाढल्या. कालांतराने कुंभार, सुतार, लोहार इ. कारागिरांचे वर्ग अस्तित्वात आले. या कारागिरांचा सारा वेळ इतरांना लागणाऱ्या वस्तू तयार करण्यात जाऊ लागला. त्यामुळे त्यांना स्वतःचे धान्य पिकवणे किंवा वस्त्र विणणे अशक्य झाले परंतु तयार केलेल्या वस्तूंच्या बदल्यात त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी वस्तू मिळू लागल्या. सुरुवातीस अदलाबदलीच्या वस्तूंचे मूल्य ठरविणे अवघड झाले असावे. पूढे अदलाबदलीसाठी पशुधनाचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. ताम्रपाषाणयुगात वस्तूंच्या बदलात तांबे देण्यास सुरुवात झाली. गाईच्या किंवा बैलाच्या चामड्याच्या आकाराचा तुकडा प्राचीन क्रीटमध्ये देत. ईजिप्तमध्ये वस्तूंच्या खरेदीसाठी तांब्याच्या, चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठ्या वापरीत. बॅबिलोनियन लोक अंगठी ऐवजी ठराविक वजनाचे धातूचे गोळे वापरीत. प्राचीन खाल्डियामध्ये याच प्रकारचे चांदीचे लंबगोलाकृती तुकडे वापरीत. धातूंचे हे तुकडे, त्यांचे वजन आणि शुद्धता दर वेळी तपासणे कटकटीचे काम होते. व्यापाऱ्यांना तर ते विशेष जाणवे. त्याऐवजी प्रत्येक तुकड्यावर त्याच्या वजनाची आणि शुद्धतेची हमी देऊन एखादी खूण किंवा चिन्ह केल्यास इतरांना दर वेळी ते तपासून घेण्याची जरूर राहणार नाही, असे त्या काळी व्यापाऱ्यांना साहजिकच वाटले. त्यामुळे अशा तऱ्हेची खूण किंवा चिन्ह कोरण्याचे काम प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी अंगावर घेतले. यातूनच पुढे चलनी नाण्यांचा जन्म झाला. सर्वप्रथम लिडियामध्ये धातूच्या तुकड्याला त्याच्या वजनाची व शुद्धतेची हंमी म्हणून चिन्हे उमटविणे चालू झाले.

भारतेतर नाणी : सर्वांत प्राचीन नाणी आशिया मायनरमध्ये लिडियात इ. स. पू. सातव्या शतकात काढली होती. ती इलेक्ट्रम धातूची असून आकाराने लंबगोल दिसतात. त्यावर हरिण किंवा एखादे चिन्ह असून ज्या व्यापाऱ्याने ते काढले, त्याचे नाव लेखात दिलेले असते. त्यानंतर तेथील क्रीसस राजाने (इ. स. पू. ५६१– ५४६) नाणी पाडण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला. इराणमधील अतिप्राचीन नाण्यांना लिडियामधील नाण्यांमुळे प्रेरणा मिळाली. इराणी सम्राटाने चांदी आणि सोन्याची नाणी पाडली. त्यांच्या दर्शनी बाजूवर धनुष्यबाण किंवा भाला घेतलेल्या राजाचे चित्र असते. ग्रीसमधील प्राचीन नाणी प्रामुख्याने चांदीची आहेत. ती द्राक्मा व ओबोल या दोन प्रकारची होती. अलेक्झांडरने साम्राज्य स्थापन केल्यानंतर ग्रीस अत्यंत कलापूर्ण नाणी घडवू लागले. त्यांवर सर्वसाधारणपणे दर्शनी भागी राजाची आकृती आणि मागील बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असते. ग्रीक भाषेत लेख असतो. अलेक्झांडरच्या काळात नाण्यांचा प्रसार त्याच्या साम्राज्यात सर्वत्र झाला. ईजिप्तमध्येही त्यामुळे नाणी पाडण्यास सुरुवात झाली.

इटलीच्या दक्षिण भागात स्थयिक झालेल्या ग्रीक लोकांनी इ. स. पू. पाचव्या शतकात नाणी पाडली होती परंतु रोममध्ये मात्र नाण्याऐवजी ब्राँझच्या गोळ्याचा उपयोग होई. हे गोळे एक पौंड वजनाचे असून ते साच्यात बनवीत. त्यांवर शंख, चक्र, कुत्रे किंवा एखादी रोमन देवता असे चिन्ह असे. इ. स. पू. तिसऱ्या शतकात रोममध्ये ब्राँझची आणि चांदीची नाणी पाडण्यास सुरुवात झाली. रोमन साम्राज्याची स्थापना झाल्यावर ज्यूलियस सीझरपासून आपले शीर्ष नाण्यावर कोरण्याचा अधिकार सिनेटने सम्राटाला दिला. सीझरला तो त्याच्या जीवनाच्या अखेरीस मिळाला. रोमन सम्राटांनी मोठ्या प्रमाणावर नाणी पाडली. त्यांची सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. त्यांवर दर्शनी भागी राजाचे शीर्ष आणि मागील बाजूवर मंदिर, बंदराचा देखावा, पूल असे एखादे चित्र असते. बायझंटिन सम्राटांची नाणी रोमन नाण्यांसारखी आहेत. मध्ययुगात यूरोपात जी नाणी प्रचलित हाती, त्यांची मूळ प्रेरणा बायझंटिन नाण्यांवरून मिळाल्याचे दिसते.

पश्चिम आशियात मुसलमानी सत्तेचा उदय झाल्यानंतर तेथील नाण्यांचे स्वरूप बदलले. अरबांनी पश्चिम आशिया पादाक्रांत केल्यानंतर काही काळ तेथील नाण्यांसारखी नाणी पाडली असली, तरी ६९० च्या सुमाराला अब्दुल मलिक या पाचव्या खलीफाने नाण्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केली. त्याने व्यवहारातील सर्व नाणी गोळा करून व ती वितळवून नवी नाणी पाडली. त्यांपैकी सोने व तांब्याच्या नाण्यांवर खलीफाची आकृती आणि चांदीच्या नाण्यांवर मेहरप (प्रार्थनेची कमान) किंवा इतर काही चिन्ह असे परंतु खलीफाची आकृती नाण्यावर पाहून हे धर्मविरोधी कृत्य मुसलमान प्रजेला सहन झाले नाही. त्यामुळे नवीन नाणी पाडण्यात आली. त्यांच्या दोन्ही बाजूंवर लेख आहेत. सुरुवातीला दोन्ही बाजूंवर कलिमा असे. पुढे कालांतराने दर्शनी भागावर राजाचे नाव घालण्यात आले. मुसलमानांची नाणी सर्वत्र या प्रकारची आहेत तथापि नाण्यांवरील लेखांच्या लपेटीत विविधता असते. कुफी, नस्ख आणि नस्तअलीक अक्षरवटिकांचा उल्लेख या संदर्भात अगत्याने केला पाहिजे. ऑटोमन सम्राटांच्या नाण्यांवरील रांजांच्या सह्या म्हणजे कोरीव लेखांचे अप्रतिम नमुने आहेत. मानवी आकृती मुसलमानी नाण्यांवर देण्यास धर्माचा विरोध असल्यामुळे काही वेळा सूर्य आणि चंद्र यांची चित्रे काढीत. एका राजाने त्याच्या रूपवंती राणीचे चित्र नाण्यावर देता न आल्याने तिची जन्मपत्रिका त्यावर कोरविली.


चीनमधील नाणी इतर देशांतील नाण्यांच्या तुलनेने अत्यंत निराळ्या प्रकारची होती. त्यांच्यावर फक्त लेख असून इतर कोणतेही चिन्ह नसे. तसेच नाण्यांच्या मध्यभागी एक छिद्र असे. नाण्यांच्या माळा करून ठेवीत. त्यासाठी हे छिद्र आवश्यक असे. चीनमध्ये नाणी म्हणून कवड्यांचा वापर शतकानुशतके मोठ्या प्रमाणावर करीत. त्यामुळे कवड्यांच्या ज्याप्रमाणे माळा करीत, त्याप्रमाणे नाण्यांच्याही माळा करू लागले. तेथे निरनिराळ्या काळातील नाणी दीर्घ काळ चलनात होती. ती सामान्यतः तांब्याची असत. सोन्याची नाणी चीनमध्ये कधीही पाडली गेली नाहीत. चांदीची नाणी मात्र काढली होती. ती काढण्याचा हक्क व्यापाऱ्यांना दिलेला होता. याउलट तांब्याची नाणी मात्र सरकार काढी. लोखंडाची नाणी अनेक आढळतात. चीनमधील प्राचीन नाणी विविध आकारांची होती. त्यांमध्ये चाकू, भांडे किंवा इतर हत्यारांच्या आकाराची होती.

भारतीय नाणी : मोहें-जो-दडो (इ. स. पू. २५०० ते १८००) येथील उत्खननात काही चांदीचे चौकोनी व गोल तुकडे सापडले आहेत. त्यांपैकी एकावर बाणाग्र लिपीतील अक्षरे कोरलेली आहेत. हे चांदीचे तुकडे निरनिराळ्या वजनांचे असून ते कोणत्याही एका ठराविक परिमाणाचे असतील असे वाटत नाही. दा. ध. कोसंबी यांनी या चांदीच्या तुकड्यांचा अभ्यास करून ती नाणीच असावीत, असे मत व्यक्त केले आहे.

काहींच्या मते भारतात वैदिक काळात नाणी प्रचलित होती परंतु उत्खात पुराव्यांच्या आधारे आहत नाणी फार तर इ. स. पू. पाचव्या शतकातील असावीत त्यापूर्वीची नाणी अद्यापि सापडली नाहीत. देवदत्त भांडारकर यांनी कृष्णल, सुवर्ण, शतमान आणि निष्क ही नाण्यांची नावे होती, असे दाखविले आहे. निष्क, शतमान, सुवर्ण व पाद ही नाणी म्हणून प्रचारात नसली, तरी ती ठराविक वजनांचे सोन्याचे तुकडे असावेत. व्यवहारात देव- घेव, दान वा दक्षिणा यांसाठी त्यांचा उपयोग होई, असेही एक मत आहे. मात्र त्यांवर चित्र किंवा लेख नसल्यामुळे त्यांचा काळ निश्चितपणे ठरविणे अवघड जाते.

सूत्रकालात (इ. स. पू. सहाव्या शतकात) बहुधा नाणी मोठ्या प्रमाणात प्रचारात असावीत. कात्यायन श्रौतसूत्रात शतमानाचा उल्लेख आहे. एका ठिकाणी चांदीच्या शतमानाचाही उल्लेख आढळतो. शतमान हे सु. १२ ग्रॅम वजनाचे नाणे असावे. तक्षशिलेच्या उत्खननात सापडलेले चांदीचे वक्रपट्ट, त्यांचे वजन सु. १२ ग्रॅम असल्याने ते शतमान असावेत. चांदीची काही नाणी सु. ५ ते ६ ग्रॅमची आहेत. ते अर्धशतमान असावेत. पैल येथे सापडलेल्या निधीतील सर्व नाणी दीड ग्रॅम किंवा तीन ग्रॅम वजनाची आहेत. ती १/८ किंवा १/४ शतमान असावीत. यावरून इ. स. पू. सहाव्या शतकात शतमान हे चांदीचे नाणे अस्तित्वात आले असे दिसते. पुढे इ. स. पू. पाचव्या शतकामध्ये शतमानाची जागा कार्षापणाने घेतली. प्राचीन संस्कृत साहित्यात कार्षापणाचे अनेक उल्लेख आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायीतही नाण्यांसंबंधीचे अनेक उल्लेख आहेत. त्यांवरून इ. स. पू. सहाव्या- पाचव्या शतकांत नाण्यांचे प्रचलन सुरू झाले हे सिद्ध होते. इ. स. पू. पाचव्या आणि चौथ्या शतकांतील चांदीची आहत नाणी भारतात निरनिराळ्या ठिकाणी सापडली आहेत.

आहत नाणी : ही भारतातील प्राचीनतम नाणी होत. ती प्रामुख्याने चांदीची आहेत. त्यामानाने तांब्याची व सोन्याची आहत नाणी थोडी आहेत. ही नाणी आकाराने चौकोनी, गोल किंवा लंबगोल असतात. धातू ठोकून, पातळ पत्रा तयार करून त्याचे लहान तुकडे कापतात. हे ठराविक वजनाचे म्हणजे सु. साडेतीन ग्रॅम असतात. या तुकड्यांवर ठशाने ठोकून निरनिराळ्या प्रकारची चिन्हे उमटवितात. सर्वसाधारणपणे नाण्याच्या दर्शनी भागी पाच किंवा सहा व मागील बाजूवर एक-दोन चिन्हे आढळतात. त्यांमध्ये सूर्य, षडर-चक्र, पर्वत, हत्ती, बैल, मोर, मासा, बेडूक, कासव, वृक्ष, आयुधे व काही संकीर्ण चिन्हे आहेत. ही चिन्हे कोणी उमटविली हा प्रश्न विवाद्य आहे. काही विद्वानांच्या मते ही नाणी निरनिराळ्या व्यापाऱ्यांनी किंवा श्रेणींनी व निगमांनी काढली होती, तर काहींनी ती शासनानेच काढली असावी असे प्रतिपादन केले आहे. या चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्‍न काही विद्वानांनी केला आहे. परमेश्वरीलाल गुप्त यांच्या मते ही प्राचीन महाजनपदांनी काढली होती. ही सर्व भारतभर सापडली असली, तरी उ. भारतात अधिक प्रमाणात सापडतात. अफगाणिस्तानातही आहत नाणी सापडली आहेत. आहत नाण्यांचा काळ इ. स. पू. पाचवे ते दुसरे शतक असा ग्राह्य मानण्यात येतो.

इंडो-ग्रीक : अलेक्झांडरच्या भारतातील उत्तराधिकाऱ्यांनी इ. स. पू. २५० च्या सुमारास आपल्या स्वातंत्र्याची द्वाही फिरवून नाणी पाडण्यास सुरुवात केली. पहिला डायॉडोटस या प्रथम स्वतंत्र झालेल्या ग्रीक क्षत्रपाने सोने, चांदी व तांब्याची नाणी पाडली. त्याच्या नाण्यांवर सामान्यतः दर्शनी भागी राजाचे शीर्ष व मागील बाजूवर झ्यूस या ग्रीक देवतेची आकृती असते. तसेच मागील बाजूवर Basileos Diodotou असा ग्रीक भाषेतील लेख आहे. त्याच्या तांब्याच्या नाण्यांवर आर्टेमिस देवतेची आकृती आहे. त्याच्यानंतर काही काळाने गादीवर आलेल्या युथिडीमसच्या नाण्यांवर दर्शनी भागी राजाचे शीर्ष आणि मागील बाजूवर हिरॅक्लिअसची आकृती आहे. ही प्रामुख्याने चांदीची असून द्राक्मा या ग्रीक परिमाणाची आहेत. लेख प्रथम मागील बाजूवर असे, परंतु पुढे डीमीट्रिअसच्या कारकीर्दीपासून दर्शनी बाजूवर ग्रीक लेख आणि मागील बाजूवर तोच लेख प्राकृत भाषेत व खरोष्ठी लिपीत देण्यास सुरुवात झाली. डीमीट्रिअसच्या काही चांदीच्या गोल नाण्यांवर दर्शनी भागी राजाचा अर्धपुतळा व मागील बाजूवर झ्यूसची आकृती आहे. दर्शनी भागी ग्रीक भाषेत Basileos Anikitou Demetriou असा लेख असून मागील बाजूवर ‘महरजस अपरजितस दिमेत्रियस’ असे त्याचे प्राकृतातील रूपांतर खरोष्ठी लिपीत आहे. इ. स. पू. १७० च्या सुमारास डीमीट्रिअसचा शत्रू युक्रेटिडीस गादीवर आला. त्याने एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नाणे काढले. त्यावर ‘कपिशिये नगरदेवता’ असा लेख आहे. त्यावरून कपिशेच्या (हल्लीचे अफगाणिस्तानातील बेग्राम) नगरदेवतेचे चित्र आहे हे स्पष्ट होते. युक्रेटिडीसची इतर नाणी सर्वसाधारण ग्रीक नाण्यांसारखी आहेत. मीनांदरनेही (मिलिंद) अनेक प्रकारची नाणी काढली. त्याच्या नाण्यांवर दर्शनी भागी त्याचा अर्धपुतळा व Basileo Soliros Monandrou असा ग्रीकमध्ये लेख आहे. मागील बाजूवर अथीनाची आकृती व ‘महरजस त्रतरस मेनंद्रस’ असा खरोष्ठी लिपीतील लेख आहे. त्याच्या तांब्याच्या काही नाण्यांवर दर्शनी भागी बैलाचे किंवा हत्तीचे शीर्ष किंवा चक्र व मागील बाजूवर तिवई किंवा गदा किंवा पामची (एक प्रकारचा ताड) फांदी आहे. तसेच एका नाण्यावर दर्शनी भागी दोन कुबडांचा बॅक्ट्रियन व मागील बाजूवर बैलाचे शीर्ष आहे. एका नाण्यावर डुकराचेही शीर्ष दिसते. मीनांदरने सोन्याची नाणीही काढली असावीत, असे काही नाणकशास्त्रज्ञांचे मत आहे. मीनांदरनंतरच्या ग्रीकांचा इतिहास सुस्पष्ट नाही परंतु नाणी मात्र अनेक राजांची सापडतात. पैकी हत्ती आणि बैल छापाची नाणी उल्लेखनीय आहेत. या नाण्यांवर प्रथम ब्राह्मी लिपीत लेख देण्यास सुरुवात झाली. ॲपोलोडोटसनंतर थोड्याच काळात, इ. स. पू. ७५ च्या सुमारास, ग्रीकांची सत्ता नामशेष झाली असावी.


शक : शक हे मध्य आशियातील भटक्या टोळ्यांपैकी एक होत. ह्यांनी इ. स. पू. ७५ च्या सुमारास इंडो-ग्रीकांचा संपूर्ण पराभव करून वायव्य भारताच्या काही भागांत आपले राज्य स्थापन केले. त्यांच्या नाण्यांवरून त्यांची दोन घराणी असावीत असे वाटते. त्यांपैकी मॉएसच्या घराण्याने पंजाबात आणि व्होनोन्सच्या घराण्याने बलुचिस्तान व कंदाहार या भागांत राज्य केले. शकांच्या नाण्यांवर सर्वसाधारणपणे दर्शनी भागी अश्वारूढ राजा आणि मागील बाजूवर ग्रीक देवतेचे चित्र आढळते. मॉएसच्या नाण्यांचे ॲपोलोडोटसच्या नाण्यांशी विलक्षण साम्य आहे. व्होनोन्सच्या काही नाण्यांवरील लेखांत स्पलिरीयझिस आणि श्पलगदम यांचीही नावे येतात. त्यामुळे त्यांचा इतिहास गुंतागुंतीचा झाला आहे.

इंडो-पार्थियन : इ. स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीस पार्थियन लोकांची राजवट सुरू झाली. त्यांचा गोंडोफेरस (गोंडोफर्नेस) हा श्रेष्ठ राजा होऊन गेला. शकांचे सर्व राज्य त्याच्या अंमलाखाली होते. त्याची तांब्याची खूप नाणी सापडली आहेत. त्यामानाने चांदीची नाणी फारच थोडी मिळाली ती शकांच्या नाण्यांसारखीच आहेत.

कुशाण : कुशाण हे परकीय असले, तरी भारतात त्यांनी राज्य करण्यास सुरुवात केल्यानंतर हे संपूर्णपणे भारतीय झाले. त्यांचा पहिला राजा कुजूल कडफीसस याची तांब्याची आणि चांदीची नाणी आहेत. ती इंडो-ग्रीक नाण्यांसारखी आहेत. दुसरा कडफीसस (इ. स. ६४ ते ७८) याने सोन्याची नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्याच्या नाण्यांच्या दर्शनी भागी राजा सिंहासनाधिष्ठित किंवा ढगात बसलेला किंवा घोड्याच्या रथात आरूढ झालेला दाखविलेला असून मागील बाजूवर नंदीसह उभा असलेला शिव आहे. नाण्याच्या दर्शनी भागी ग्रीक भाषेत ‘बॅसिलिओस उइमो कडफीसस’ आणि मागील बाजूवर खरोष्ठीमध्ये ‘महरजस रजदिरजस सर्वलोम ईश्वरस महिश्वरस हिम कटफिशस ऋतु’ असा लेख आहे. त्यावरून तो शिवभक्त होता हे सिद्ध होते. त्यानंतर गादीवर आलेल्या सम्राट कनिष्काने (इ. स. ७८ ते १०२) फार मोठ्या प्रमाणावर सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली. त्याच्या नाण्यांचे दोन प्रकार आहेत : एका प्रकारात दर्शनी बाजूवर राजाचा अर्धपुतळा आणि दुसऱ्यात राजा वेदीत अर्ध्य देताना दाखविला आहे. नाण्याच्या मागील बावजूर ग्रीक, इराणी, हिंदू आणि बौद्ध देवतांच्या आकृत्या आहेत. तसेच ग्रीक भाषेत ‘बॅसिलिओस बॅसिलिऑन कनेष्कु’ किंवा ‘शावनानो शाओ केनष्की कोशानो’ असा लेख आहे. शावनानो शाओ हे नंतरच्या शाहंशाह या बिरुदाचे मूळ रूप आहे. कनिष्काच्या नाण्यांवर ज्या देवतांची चित्रे आहेत, त्यांची नावे देणारे ग्रीक भाषेतील लेखही मागील बाजूवर दिलेले असतात. कनिष्काचे साम्राज्य संपूर्ण उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान व मध्य आशिया एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशावर असल्याने राज्यातील निरनिराळ्या धर्मांच्या लोकांना संतुष्ट करण्यासाठी त्याने त्या त्या धर्मातील देवतांना आपल्या नाण्यांवर स्थान दिले. त्याने सोन्याची नाणी पाडली, त्यावरून त्या काळी किती सुबत्ता होती याची कल्पना येते. त्या काळी उत्तर भारताचा रोमन साम्राज्याशी फार मोठ्या प्रमाणावर व्यापार असल्यामुळे रोमहून सुवर्णाचा ओघ भारतात चालू राहिला. त्याच्या नाण्यांचे परिमाणही रोमन (सु. ८ ग्रॅम) होते. त्यामुळे त्यांना दीनार ही संज्ञा प्राप्त झाली. कनिष्काचा वंशज हुविष्क आणि वासुदेव यांची नाणीही याच प्रकारची होती.

मौर्योत्तर काल : मौर्य साम्राज्य लयास गेल्यानंतर उत्तर भारतात सर्वत्र छोटीछोटी राज्ये उदयास आली. त्यांपैकी काही गणराज्ये व जनपदे होती. त्यांपैकी अनेकांचे अस्तित्व केवळ त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झाले आहे. ही नाणी इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक या चारशे वर्षांच्या काळातील आहेत. ती प्रमुख्याने तांब्याची असून साच्यांनी पाडलेली आहेत. कित्येक स्थानिक नाण्यांवर लेख नाहीत. गण-जनपदांच्या नाण्यांवर लेख आढळतात. कौशांबी ही प्राचीन वत्स देशाची राजधानी. तेथील नाण्यांच्या एका बाजूवर बैल किंवा क्वचित गजलक्ष्मीची आकृती असते. दुसऱ्या बाजूस टेकडी, झाड इ. चिन्हे आहेत. अधिकांश नाण्यांवरील लेखांत राजाच्या नावात मित्र हे उपपद आढळते. उज्‍जयिनीच्या नाण्यांवर उज्‍जयिनी चिन्ह आहे. अधिक चिन्हाच्या चारही टोकांवर वर्तुळ असलेल्या आकृतीला उज्‍जयिनी चिन्ह म्हणतात. तसेच स्वस्तिक, वृषभ इ. चिन्हेही आढळतात. तक्षशिला येथील नाण्यांवर नेगम, तालिमत, दोजक इ. शब्द आहेत. काही नाण्यांवर एक तागडीचा तराजू दिसतो. तेव्हा तागडीचे चित्र आणि नेगम (निगम) हा लेख यांवरून ती व्यापाऱ्यांच्या संघटनांची नाणी असण्याची शक्यता वाटते.

गण-जनपदांच्या नाण्यांपैकी यौधेयांची नाणी उल्लेखनीय आहेत. यौधेय ही प्राचीन भारतातील एक लढाऊ जमात होती. त्यांची नाणी हरयाणात सतलज नदीच्या किनारपट्टीत सापडतात. त्यांच्या नाण्यांवर ‘यौधेय गणस्य जयः’ हा लेख असून काही नाण्यांवर त्यांच्या दैवताची–कार्तिकेयाची–आकृती असते. शिबी ही एक अतिप्राचीन जमात होती. ऋग्वेदातील शिव हे बहुधा शिबी असावेत. त्यांची नाणी चितोड व नगरी (राजस्थान) येथे सापडतात. त्यांच्या नाण्यांवर स्वस्तिक, झाड, नंदिपद इ. चिन्हे असून त्यावर ‘मझमिकाथ शिबी जनपदस’ असा लेख असतो. मझमिका (माध्यमिका) म्हणजे हल्लीचे नगरी हे गाव होय. औदुंबरांच्या नाण्यांवर विश्वामित्राची आकृती आढळते. मालवांचे बलाढ्य राज्य प्राचीन भारतात होते. इ. स. दुसऱ्या ते चौथ्या शतकांत ते पूर्व राजस्थानात होते असे त्यांच्या नाण्यांवरून म्हणता येईल. त्यांच्या नाण्यांवर ‘मालवानां जयः’ किंवा ‘मालगणस्य’ असा लेख आढळतो. अनेक गण-जनपदांचे इ. स. चौथ्या शतकात समुद्रगुप्ताने समूळ उच्चाटन केले.

सातवाहन : मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर महाराष्ट्रात सातवाहन वंश उदयास आला. त्यांचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या भागांवर दीर्घकाळ राज्य होते. त्यांची नाणी प्रामुख्याने तांब्याची असून पोटिन आणि शिशाची नाणीही त्यांनी पाडली होती. सातवाहन हे नाव लेखात असलेली काही नाणी उपलब्ध आहेत. ती या वंशाच्या मूळ पुरुषाची असावीत, असे काही विद्वानांचे मत आहे. त्यांच्या दर्शनी भागी हत्ती किंवा बैल व चैत्यचिन्ह असून मागील बाजूंवर उज्‍जयिनी चिन्ह किंवा वेदिकेतील वृक्ष दाखविला आहे. या प्रकारची चिन्हे सातवाहन राजांच्या नाण्यांवर सर्रास आढळतात. याशिवाय त्रिकोणी शीर्ष असलेला राजदंड, तीन किंवा सहा किंवा दहा कमानींचा चैत्य आणि घोड़ा अनेक नाण्यांवर आढळतो. सर्वसाधारणपणे दर्शनी भागी ब्राह्मी लिपीतील लेख असून त्यात फक्त रञो, झिरी ही बिरुदे आढळतात. बहुसंख्य नाण्यांवर ‘रञो सिरी सातकणिस’ असा लेख असतो. सातकर्णी नावाचे अनेक राजे होऊन गेले. त्यांची ही नाणी आहेत सर्वसाधारपणे घोडा छापाची नाणी पहिल्या सातकर्णीची असावी, असे विद्वानांचे मत आहे. गौतमीपुत्र किंवा वासिष्ठीपुत्र सातकर्णी आणि यज्ञश्री यांनी निराळ्या छापाची नाणीही पाडली. गौतमीपुत्राने इ. स. १०० च्या सुमारास क्षत्रपांनी जिंकलेला प्रदेश पुन्हा जिंकून नहपानाच्या चांदीच्या नाण्यांवर आपल्या नावाचे पुनर्मुद्रांकन केले आणि ती नाणी व्यवहारात आणली. या प्रकारची तेरा हजार नाणी नासिक जिल्ह्यातील जोगळटेंबी येथे सापडली. वासिष्ठीपुत्र सातकर्णीने दर्शनी भागी स्वतःचे शीर्ष असलेले चांदीचे नाणे प्रचारात आणले. या नाण्यांवरील लेख वैशिष्ट्यपूर्ण चांदीचे नाणे प्रचारात आणले. या नाण्यांवरील लेख वैशिष्ट्यपूर्ण असून ते प्राचीन तमिळ भाषेत आहे. याच प्रकारची नाणी यज्ञश्री सातकर्णीनेही पाडली होती परंतु त्यांवरील लेख प्राकृतात आहे. पुळुमाई आणि यशश्री यांच्या एक प्रकारच्या तांब्याच्या नाण्यावर दर्शनी भागी दोन शिडांचे जहाज आहे. ते सागरी जहाज असून तत्कालीन रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापाराचे निदर्शक आहे.


क्षत्रप : इ. स. दुसऱ्या ते चौथ्या शतकापर्यंत मध्य आणि पश्चिम भारतात क्षत्रपांचे राज्य होते. त्यांच्यापैकी सुरुवातीचे राजे भूमक आणि नहपान हे क्षहरात कुळातील होते. त्यांच्यानंतर कार्दमक वंशातील चष्टन व इतर क्षत्रप यांनी राज्य केले. क्षत्रपांची नाणी चांदीची असून ती ग्रीक द्राक्मा परिमाणाची आहेत. सुरुवातीच्या काही राजांची नाणी सोडल्यास रुद्रदामनपासून (इ. स. १३०–५१) राजा छापाची नाणी पाडण्यास सुरुवात झाली. नाण्यांच्या दर्शनी भागी राजाचे शीर्ष असीन काही ग्रीक अक्षरे असतात व मागील बाजूवर चैत्य, त्यावर चंद्रकोर व खाली नागमोडी रेषा, डावीकडे चंद्रकोर आणि उजवीकडे तारा असतो शिवाय ब्राह्मी लिपीत लेख असतो. पुढे जीवदामनच्या कारकीर्दीपासून (इ. स. १७८) दर्शनी बाजूवर कालदर्शक आकडा देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रत्येक क्षत्रप राजा केव्हा झाला ? महाक्षत्रप केव्हा झाला ? त्याचा पिता कोण ? ही सर्व माहिती तपशीलवार मिळू शकली. क्षत्रपांचा इतिहास केवळ त्यांच्या नाण्यांमुळे लिहिणे शक्य झाले.

गुप्त : भारतीय नाण्यांमध्ये गुप्त राजांची नाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इ. स. पू. २५० – इ. स. २५० या पाचशे वर्षांत उत्तर भारतात विदेशी राजांनी राज्य केले. त्यांची नाणी परकीय बनावटीची होती परंतु खऱ्याखुऱ्या अर्थाने ज्यांना भारतीय म्हणता येईल, अशी नाणी प्रथम सातवाहन व नंतर गुप्त राजांनी पाडली. गुप्तांनी सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर पाडली. त्यामुळे गुप्तकालाचे सुवर्णयुग हे नाव सार्थ ठरते. पहिला चंद्रगुप्त (३२०–३५) याचे राजाराणी छापाचे नाणे हे गुप्तांचे आद्य नाणे होय. त्याचा पुत्र समुद्रगुप्त (३३५–७६) याने राजदंड, धुनर्धर, परशू, अश्वमेध, व्याघ्रपराक्रम व वीणावादक छापांची नाणी काढली. त्याच्या नाण्यांवर साधारणपणे दर्शनी भागी राजाची आकृती असून मागील बाजूवर देवतेचे चित्र असते. ही देवता कुशाणांच्या अर्दोक्षोसारखी दिसते. तसेत सुरुवातीच्या गुप्त नाण्यांवर कुशाण नाण्यांचा असलेला प्रभाव लक्षणीय आहे परंतु कालांतराने भारतीयकरणास सुरुवात होऊन संपूर्ण भारतीय चिन्हें असलेली नाणी ते पाडू लागले. समुद्रगुप्ताच्या नाण्यांवरील लेख संस्कृतमध्ये असून वृत्तबद्ध आहेत. त्याच्या अश्वमेध छापाच्या नाण्यांवर मात्र दर्शनी भागी घोड्याचे चित्र आहे. दुसऱ्या चंद्रगुप्तानेही फार मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी पाडली. त्यावर दर्शनी भागी राजाची आकृती असून मागील बाजूवर सिंहवाहिनी दुर्गा किंवा सिंहासनाधिष्ठित लक्ष्मी असते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने चांदीची आणि तांब्याची नाणीही पाडण्यास सुरुवात केली. त्याने माळव्यातील क्षत्रपांचा निःपात करून तेथील जनतेच्या सोयीसाठी चांदीची नाणी पाडली. तो स्वतः विष्णुभक्त असल्याने त्याच्या नाण्यावर ‘परमभागवत’ हे बिरुद आढळते. तसेच त्याच्या चांदीच्या नाण्यांवर विष्णूचे वाहन गरुडाचे चित्र असते आणि तसेच अनेक नाण्यांवर गरुडध्वजही स्पष्ट दिसतो. त्याच्या चक्रविक्रम छापाच्या नाण्यावर चक्रपुरुष असून साक्षात विष्णू त्याला काही वस्तू प्रदान करीत असल्याचे दाखविले आहे. त्याच्यानंतर गादीवर आलेला पहिला कुमारगुप्त (४१३–५५) हा कार्तिकेयाचा उपासक होता. त्यामुळे त्याचा नाण्यांवर मोराचे किंवा मोरावर बसलेल्या कार्तिकेयाचे चित्र आढळते. परंतु त्याच्या काळात सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण कमी होऊ लागल्याचे दिसून येते. त्याचा पुत्र पहिला स्कंदगुप्त (४५५–६७) याने सोन्याची फार थोडी नाणी पाडली. त्यानंतर गुप्त साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. नंतरच्या गुप्त राजांची नाणी फारशी उपलब्ध नाहीत.

गुप्तोत्तर काल : या काळात (६००–१२००) कोणताही बलाढ्य राजा झाला नाही. साहजिकच गुप्तांसारखी नाणीही कोणी काढली नाहीत. सोन्याची नाणी तर फारच दुर्मिळ. चांदीची नाणी थोडी सापडतात परंतु तांब्याचीही नाणी फारशी नाहीत. कित्येक राजांनी तर नाणीच काढली नव्हती असे दिसून येते. गुप्त नाण्यांचा प्रभाव सहाव्या शतकातील बंगालमधील नाण्यांवर दिसून येतो. ज्या हूणांच्या स्वारींमुळे गुप्तांचे साम्राज्य खिळखिळे झाले, त्यांची नाणी इराणमधील सॅसॅनियन नाण्यांसारखी आहेत. मौखरी राजे गुप्तांचे समकालीन होते. त्यांनी कुमारगुप्त व स्कंदगुप्त यांच्या मोर छापासारखी नाणी काढली. गुर्जर-प्रतीहारांच्या चांदीच्या नाण्यांवर अग्‍निकुंडाचे चित्र आढळते. त्यांच्या भोज राजाची नाणी वराह छापाची असून त्याच्या मागील मजकूर ‘श्रीमदादिवराह’ असा लेख आहे. या प्रकारची नाणी दहाव्या शतकात काही भागांत प्रचलित होती. गुप्तांनंतर सोन्याची नाणी पाडणारे राजे म्हणून कलचुरींचा उल्लेख करावा लागेल. त्यातील गांगेयदेवाच्या (१०१५–४०) नाण्यांवर दर्शनी भागी ‘श्रीमद्‌गांङ्‍गेयदेवः’ असा लेख असून मागील बाजूवर चतुर्भुज लक्ष्मीची आकृती आहे. या राजांनी याच प्रकारची चांदीची नाणी व तांब्याची नाणीही काढली होती. चंदेल्लांची काही नाणी गांगेयदेवाच्या नाण्यांसारखी आहेत. ती मिश्रित सोन्याची असून त्यांच्या दर्शनी भागी लेख व मागे लक्ष्मीची आकृती आहे. नवव्या शतकात काबूल व ओहिंद प्रदेशांतील राजांनी चांदी आणि तांब्याची पाडलेली नाणी सापडतात. ती प्रामुख्याने घोडेस्वार आणि नंदी छापांची आहेत. मध्य आणि पश्चिम भारतात सापडणारी गधैया नाण्यांची मूळ प्रेरणा सॅसॅनियन नाण्यांपासून मिळाली असे दिसते. त्यांच्या दोन्ही बाजूंवरील चित्रे स्पष्ट दिसत नाहीत. बहुधा त्यांच्या दर्शनी भागी राजाचे शीर्ष आणि मागील बाजूवर अग्‍निकुंड अस्पष्ट दिसते. ही नाणी महाराष्ट्रात दीर्घकाळ व्यवहारात होती. सॅसॅनियन राजा पाचवा वराहरान्‌ (४१९–३८) याला जंगली गाढवाची शिकार करण्याचा नाद होता. म्हणून त्याच्या या प्रकारच्या नाण्यांना गधैया गर्दभीय असे नाव पडले असावे, असे काही विद्वानांचे मत आहे.

दक्षिण भारत : सातवाहनांनंतर दक्षिण भारतात इक्ष्वाकू, कंदब, चालुक्य, पल्लव, पांड्य, चोल, चेर, राष्ट्रकूट, यादव, होयसळ, विजयानगर इ. राजवंशांची राज्ये होती. त्यांपैकी काहींची नाणी अद्यापि सापडली नाहीत. इतकेच नव्हे, तर सातव्या शतकापासून दहाव्या शतकांपर्यंत कोणत्या प्रकारची नाणी व्यवहारात होती, हेसुद्धा निश्चित सांगता येत नाही. जी काही थोडी नाणी उपलब्ध आहेत, ती नेमकी कोणत्या राजांची असावीत, याचा अंदाज बांधता येत नाही. दक्षिणेतील प्रत्येक राजकुलाचे एक वैशिष्ट्यपूर्ण लांछन होते. ते अनेक नाण्यांवर आढळते परंतु केवळ लांछनांच्या पुराव्यावर विसंबून एखादे नाणे एका विशिष्ट राजघराण्याचे होते असे म्हणणे अनेकदा चूक ठरते, याचे मुख्य कारण असे की, एकच लांछन एकाहून अधिक राजकुलांचे असल्याने नाण्यांचा अभ्यास गुंतागुंतीचा झाला आहे. इक्ष्वाकू (इ. स. तिसरे शतक) राजांची नाणी सातवाहनांच्या नाण्यांसारखी आहेत. प्राचीन कदंबांची नाणी सोन्याची असून ती ठसा जोरात उमटविल्याने खोलगट झालेली दिसतात. त्यांवर दर्शनी भागी एक माठे कमळ असते आणि मागील बाजूवर फुले असतात. हनुमान हे कदंबांचे लांछन काही नाण्यांवर आढळते. विष्णुकुंडिन्‌ (इ. स. २२० ते ६६४) राजांची काही तांब्याची नाणी आंध्र प्रदेशात सापडली आहेत. त्यांवर दर्शनी भागी सिंह आणी मागील बाजूवर कलश असतो. काही नाणकशास्त्रज्ञांच्या मते ही नाणी पल्लवांची असावीत. गोव्याच्या कदंबांची सोन्याची नाणी पुष्कळच सापडली आहेत. त्यांच्या एका बाजूवर बिरुदांसह राजाचे नाव व दुसऱ्या बाजूवर राज्यकालातील संवत्सराचे नाव असते. देवगिरीच्या यादवांनी सोन्याची नाणी पाडली होती. त्यांचा पाचवा राजा भिल्लम (११८५–९३) याच्या नाण्यावर सिंह व शंख ही चिन्हे आहेत. सिंघणाच्या (१२१०–४६) नाण्यांवर नृत्य करणाऱ्या कृष्णाचे चित्र आहे. शिवाय सर्व नाण्यांवर त्या त्या वेळच्या राजांची नावेही आहेत.


पल्लव : पल्लव हे दक्षिण भारतातील एक बलाढ्य राजकुल होते. त्यांची नाणी कोरोमंडलच्या किनारपट्टीत सापडतात. ही तांब्याची नाणी आकाराने लहान असून त्यांच्या दर्शनी भागी बैलाची आकृती असते. वरच्या बाजूस सूर्य, चंद्रकोर, तारा इ. चित्रे असतात व क्वचित प्रसंगी अक्षरेही दिसतात. मागील बाजूवर साधारणपणे एक वर्तुळ किंवा कमळ असते. काही नाण्यांवर जहाज, कासव, मासा, खेकडा इ. जलचर प्राणी आणि छत्र, चामर व धनुष्य इ. राजचिन्हे असतात. बैल छापाची काही नाणी चांदीची अथवा बिलन आहेत. पल्लवांची सिंह छापाची धातूची नाणीही उपलब्ध आहेत. ती चांदी, तांबे आणि सोने यांची असून आकाराने लहानमोठी आहेत. त्यांच्या दर्शनी भागी सिंह आणि मागील बाजूवर दोन दांड्यांमध्ये कलश असतो. ही नाणी विष्णुकंडिन् राजांची असावी, असे काही विद्वानांचे मत आहे.

चोल : चोल साम्राटांची नाणी दक्षिणेत मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. त्यांचा इतिहास इ. स. पहिल्या शतकापर्यंत मागे नेता येत असला, तरी त्यांची दहाव्या शतकातील आणि नंतरची नाणी सापडतात. उत्तम चोल (९६९–८५) या राजापासून ते तिसरा कुलोत्तुंग (११७८–१२१६) या सु. सव्वादोनशे वर्षांच्या काळातील नाणी उपलब्ध आहेत. चोल राजांनी सोने, चांदी आणि पितळ यांची नाणी काढली. त्यांपैकी माडै ही नाणी सोन्याची असून इतर नाण्यांवर सर्वसाधारणपणे वाघाचे चित्र आढळते. त्यांच्या सुरुवातीच्या नाण्यांवर बसलेल्या वाघाचे चित्र असून त्याबरोबर मासाही दिसतो. मासा हे पांड्यराजकुलाचे लांछन होते. ही दोन्ही चित्रे बहुधा उभय राजकुलांत विवाहामुळे घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याने एकत्र आली असावीत. काही नाण्यांवर या दोन्ही चिन्हांबरोबर धनुष्यही दिसते, ते चेरांचे लांछन होते. नंतरच्या काळातील चोल नाण्यांवर उभी मानव आकृती दिसते. याखेरीज सिंहाचेही चित्र अढाळते. ही सर्व चिन्हे नाण्यांच्या दर्शनी बाजूवर आहेत. मागील बाजूवर बैल, वराह, हत्ती, घोडा, मानवी आकृती, विष्णुपद, त्रिशूल, वेणुवादक कृष्णाची मूर्ती इ. चिन्हे आहेत. नाण्यांवरील लेख प्राकृत, तमिळ, संस्कृत आणि क्वचित कन्नड व तेलुगू भाषांत आहेत. केरळमधील चेर राजांची सर्व नाणी नवव्या शतकानंतरची आहेत. त्यांवर त्यांचे लांछन धनुष्य हे आहे. चेरांनी सोन्याची व तांब्याची नाणी काढली. त्यांच्या सोन्याच्या नाण्यांच्या दर्शनी भागी सजविलेला हत्ती आणि मागील बाजूवर वेलपत्ती आहे. परंतु ही नाणी चेरांची नसावीत, असे काही विद्वानांचे मत आहे. चेरांची तांब्याची नाणी आकाराने गोल असून त्यांचे वनज साधारणतः तीन ते साडेतीन ग्रॅम भरते. या नाण्यांवरील दर्शनी भागी असलेली चिन्हे स्पष्ट दिसत नाहीत.

विजयानगर : विजयानगरचे राजे हिंदू असल्याने त्यांच्या नाण्यांच्या दर्शनी बाजूवर साधारणतः देवतांची चित्रे व मागील बाजूवर कन्नड अथवा नागरी लिपीत लेख असतो. संगम वंशी पहिल्या राजाच्या म्हणजे हरिहराच्या (१३३६–५६) नाण्यांवर हनुमान किंवा गरुड याची आकृती आहे. परंतु पुढे दुसऱ्या हरिहराच्या (१३७७–१४९४) नाण्यांवर मात्र उमा-महेश्वर, लक्ष्मी-नारायण, लक्ष्मी-नृसिंह या देवतांची चित्रे आढळतात. देवरायाने (१४२२–६६) आपल्या नाण्यांवर उमा-महेश्वराची आकृती कोरविली. कृष्णदेवरायाच्या नाण्यांवर उडत्या मनुष्याकृती गरुडाचे, तर अच्युतरायाच्या नाण्यांवर काल्पनिक गंड भेरुंड पक्ष्याची आकृती आहे. या नाण्यांवरील काही चिन्हे बहुधा टांकसाळीची असावीत. ही नाणी द. भारतात सर्वत्र सापडतात.

मुसलमानी नाणी : मध्ययुगात गझनी वा यमीनी, गुलाम, घोरी, खल्‌जी, तुघलक, सैय्यद, सूरी, शर्की, काश्मीर, बंगाल व माळवा, फारूकी, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही, बरीदशाही, इमादशाही, मदुराई सुलतान, हैदर, टिपू इ. सुलतान व ओडेयर, विजयानगरचे व संगम, साळुव, तुळुव आणि आरवीडु, नेपाळ हे हिंदू राजवंश, अशा स्वतंत्र राजवंशांनी पाडलेली नाणी भारतात प्रचारात होती.

मुसलमान राजे बव्हंशी मूर्तिभंजक असल्याने नाण्यांवरील मानवी आकृत्या नाहीशा झाल्या. त्यांवरील कालोल्लेख हिजरीमध्ये देण्यास सुरुवात झाली. तसेल ला इलाह इल्लिलाह, मुहम्मद रसूलिल्लाह हा कलिमः नाण्यावर कोरू लागले. भारतातील प्राचीनतम मुसलमानी राज्य इमादुद्दीन इब्‌न-कासिम याने सिंधमध्ये इ. स. ७१२ मध्ये स्थापन केले. त्याच्या आधिकाऱ्याने छोटी चांदीची नाणी काढली होती परंतु १००१–२१ मध्ये गझनीच्या महंमुदाच्या स्वाऱ्यांबरोबर भारतात मुसलमान मोठ्या संख्येने आले. त्यांनी पुढे दिल्ली येथे इस्लामी सल्तनतीची स्थापना केली. या सुलतानांनी सोने, चांदी, तांबे आणि बिलन यांची नाणी पाडली. ती जाड असून त्यांचे आकार वाटोळे, चौरस इ. आहेत. त्यांवर काळ व टंकसाळीच्या गावांची नावे दिलेली असल्याने नाणकशास्त्राच्या अभ्यासात मौलिक भर पडली. यांपैकी यमीनी ते सूरी अशा सात घराण्यांनी आपल्या नाण्यांवर अरबी, फार्सी मजकुराबरोबर नागरी लिपीतही आपले नाव अपभ्रष्ट रूपात खोदलेले आढळते. गझनीच्या महंमुदाने हिंदुस्थानावर अनेक स्वाऱ्या करून येथील अमाप संपत्ती लुटून नेली आणि शेकडो देवळे व त्यांतील मूर्ती यांचा विध्वंस केला पण त्यानेही आपल्या काही नाण्यांवर अरबी कालिमः याचा संस्कृत अनुवाद नगरी लिपीत कोरविला होता. ही प्रथा दक्षिणेतील व उत्तरेतील इतर कोणाही मुसलमान घराण्याने आचरणात आणलेली दिसत नाही.

बहमनी नाणी सोने, रुपे, तांबे या तिन्ही धातूंची होती. त्यांना टंक असे सामान्य नाव होते. त्या नाण्यांवर कधी एकट्या सुलतानाचे, तर कधी त्याचा बाप व आजा यांची नावे असत. शिवाय त्यांची बिरुदे व नाणे पाडल्याचे हिजरी वर्ष हेही असे. आदिलशाही नाण्यांवर सुलतानाचे नाव, त्याची बिरुदे वा एखादी कविता असे. त्यांची सोन्याची, रुप्याची व तांब्याची नाणी होती. त्यांची नवरस (नऊ होनांचा), वराह, होन, प्रताप, धरण, चवल, दुवल बे-ब्याल अशी सोन्याची नाणी होती. रुप्याचे होन कागदपत्रांत उल्लेखिलेले आहेत. तांब्याच्या नाण्यांत रुका, तिरुका, सापिका, सज्‌गाणी, जितल या नाण्यांचा समावेश होता. टक्का हे हिशेबाचे व धातूचेही नाणे होते. निजामशाही नाणी फक्त तांब्याचीच सापडली आहेत. त्यांवर अहमदनगरच्या निजामशाही सुलतानाचे नाव व टांकसाळीचे नाव आणि कधीकधी हिजरी किंवा सुहूर सन नोंदलेला आहे. इमादशाही नाण्यांवर पारंपरिक सिंह व एलिचपूर हे टांकसाळीचे नाव एवढेच सापडले आहे. कुत्बशाही नाण्यांवर टांकसाळीचे नाव, सुलतानाचे नाव आणि हिजरी वर्ष यांची नोंद आहे. बरीदशाही नाण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.

मोगलांची कारकीर्द १५२६ पासून सुरू झाली. बाबर आणि हुमायून यांच्या नाण्यांवर तैमूर वंशी नाण्यांच्या प्रभावाचा अभाव जाणवतो. शेरशाहाने १५४२ मध्ये चांदीचा रुपया आणि तांब्याचा दाम व्यवहारात आणला. त्याच्या राज्यात विसांहून अधिक टांकसाळी होत्या. अकबराने सोन्याच्या मोहरा पाडण्यास सुरुवात केली. त्याच्या काही नाण्यांवर अकबराची आकृतीही आहे व काहींवर बदक वा ससाण्याचे चित्र आहे. तसेच राम व सीता या हिंदू देवतांची चित्रे असलेल्या मोहरा त्याने पाडल्या होत्या पण ही नाणी दुर्मिळ आहेत. त्याच्या आणि जहांगीराच्या नाण्यांत लक्षणीय विविधता आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर नाणी पाडली. जहांगीराने पाडलेल्या राशीची चिन्हे असलेल्या मोहरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शाहजहानच्या दोनशे मोहरांचे राक्षसी नाणे पाडण्याचा साचा ब्रिटिश म्यूझियममध्ये असून तशी राक्षसी मोहोर फ्रान्समध्ये आहे. औरंगजेबाच्या नाण्यांवर मात्र अशी चित्रे आढळत नाहीत. इतकेच नव्हे, तर नाण्यावर कलिमः कोरण्याससुद्धा त्याने बंदी घातली. काफरांच्या (हिंदूंच्या) हातात नाणी गेल्यामुळे कलिमःचे पावित्र्य डागळते, अशी त्याची समजूत होती. त्याच्या नाण्यांच्या दर्शनी बाजूवर त्याची बिरुदे व नाव आणि मागील बाजूवर कालोल्लेख आणि टांकसाळीचे नाव दिलेले असते. औरंगजेबानंतर मोगल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला आणि अठराव्या व एकोणिसाव्या शतकात सर्वत्र छोटी राज्ये अस्तित्वात आली तथापि मोगलांच्या स्वतःच्या व त्यांच्या अधिसत्तेखालच्या संस्थानिकांच्या व त्यांची नाममात्र सत्ता मानणाऱ्यांच्या सु. तीनशे टांकसाळी होत्या.


मुसलमानी नाण्यांमध्ये हैदर व टिपू यांच्या नाण्यांना एक विशिष्ट स्थान आहे. हैदरने सोने व तांबे या दोनच धातूंची नाणी काढली, तर टिपूने सोने, रुपे व तांबे या तीनही धातूंची नाणी काढली. या दोघांच्याही नाण्यांवर सामान्यतः आढळणारे एक चिन्ह म्हणजे सव्यावर्ती किंवा वामावर्ती हत्ती हे होय. शिवाय हैदरच्या नाण्यांवर एका बाजूस ‘है’ हे फार्सी अक्षर व दुसऱ्या बाजूवर शिव-पावर्ती किंवा विष्णु-लक्ष्मी किंवा विष्णू यांच्या आकृती आहेत. याखेरीज काहींवर फार्सी मजकूरही आहे. थोड्याशा नाण्यांवर एका बाजूस वामावर्ती सिंह व दुसऱ्या बाजूस परशू अशा आकृती आहेत. टिपूच्या नाण्यांवर फक्त देवतांच्या आकृती आढळत नाहीत. बाकी हत्ती सामान्यतः आढळतो. विशेषतः रुप्याच्या नाण्यांवर टांकसाळीचे नाव, नाणे पाडल्याचे हिजरी किंवा मव्‍लूदी कालगणनेचे वर्ष, मास यांची अब्जद किंवा अब्तस पद्धतीने दाखविलेली संख्या तसेच डावीकडून वा उजवीकडून मांडलेल्या आकड्यांनी केलेली कालाची नोंद इ. लेखन असते. टिपूच्या बारा टांकसाळी असून त्यांत सोळा प्रकारची नाणी पाडीत.

अर्वाचीन नाणी : इंग्रज भारताचे राज्य सोडून गेले, त्यावेळी सु. सहाशे संस्थाने होती आणि ती इंग्रजांचे राज्य येथे होण्यापूर्वीच उत्पन्न झाली होती. मोगल किंवा मुसलमानी काळात बादशाह वा सुलतान हे आपल्या राज्यात इतर कोणाचीही नाणी अधिकृत रीत्या चालू देत नसत. स्वतःची नाणी पाडणे, मशिदीत स्वतःच्या नावाने खुत्बा पढणे आणि स्वतःच्या हाताच्या मापाचा गज (लांबी मोजण्यासाठी) करणे हे राजाचे अगर मुख्य सत्ताधाऱ्याचे खास अधिकार होते, अशी मुसलमान सत्ताधाऱ्यांची पक्की समजूत होती. हिंदू सत्ताधाऱ्यांची तशी समजूत नव्हती. यामुळे साम्राज्यवादी मुसलमान सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या ऊर्जितावस्थेत आपल्या मांडलिकांना स्वतःची स्वतंत्र नाणी पाडू दिली नाहीत पण त्या सत्ताधाऱ्यांच्या अधिकाराचा ऱ्हास होऊ लागल्यानंतर त्यांच्या हाताखालच्या संस्थानिकांनी बादशाहाचे नाव घालून, पण स्वतःचे आंशिक स्वातंत्र्य दाखाविण्यासाठी स्वतःच्या विशेष चिन्हांची किंवा नावांची नाणी पाडली. संस्थानिकांपैकी प्रत्येकाने आपले स्वतःचे नाणे पाडले नसले, तरी त्यांपैकी सु. शंभर संस्थानिकांनी स्वतःची नाणी पाडली आणि ती सध्याच्या स्वातंत्र्योत्तर काळातही संस्थाने भारतीय संघराज्यात पूर्णतया विलीन होईतो चालू होती. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य हे की, ती इंग्रजी नाण्यांहून कमी किंमतीची असत. पुढे दिलेल्या संस्थानिकांची व वंशांची नाणी मिळाली आहेत: अजमीर, अयोध्या (अवध), अलवार, इंदूर, कच्छ, कणूर, करौली, काश्मीर, किशनगढ, कुचावन, कुचबिहार, कोचीन, कोटा, कोल्हापूर, खंबायत, ग्वाल्हेर, छतरपूर, छोटा उदेपूर, जंजिरा, जयपूर, जामनगर, जालवण, जावरा, जुनागढ, जैसलमीर, जोधपूर, झालवाड, झांशी, टोंक, त्रावणकोर, त्रिपुरा, दतिया, देवास, धार, घोलपूर, नरवर, नवानगर, पुदुकोट्टई, पोरबंदर, परताबगढ, बजरंगगढ, बडोदा, बिकानेर, बिजावर, बुंदी, भरतपूर, भावनगर, भावलपूर, भोपाल, नागपूर, मणिपूर, मंडाले, मिरज, मेवाड, रतलाम, राधनपूर, रेवा, लुणावाड, वाई (रास्ते), वोडसे, शाहपूर, सागर, सितामाऊ, सुरत, सेवंधे, सैलाना, हैदराबाद.

ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होऊन ती हिंदुस्थानात व्यापार करू लागली, त्याच्या आसपास फ्रेंच व डच अशा दोन कंपन्याही भारतात येऊन व्यापार करू लागल्या. पोर्तुगीजांनी तर यापूर्वीच शंभर-सव्वाशे वर्षे येथे येऊन आपले लहानसे राज्यही स्थापन केले होते पण इंग्रजांनी हळूहळू या सर्वांना मागे सारून व पराभूत करून येथे मोठे साम्राज्य स्थापिले. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने चालू केलेल्या नाण्यांमध्ये खूपच विविधता आढळते. तिच्या मुंबई, मद्रास, कलकत्ता, सूरत, बनारस, फरुखाबाद, मुर्शिदाबाद इ. ठिकाणी टांकसाळी होत्या. तिने सोने, रुपे, तांबे व शिसे ह्या चार धातूंची नाणी पाडली. तिच्या नाण्यांपैकी काहींवर मोगल बादशाहाचे, तर काहींवर फक्त ईस्ट इंडिया कंपनी किंवा युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी अगर इंग्‍लिश ईस्ट इंडिया कंपनी यांचे पूर्ण अथवा संक्षिप्त नाव घातलेले दिसते. अगदी थोडी दुसरा चार्ल्‌स, दुसरा जेम्स, पहिला जॉर्ज यांची क्राऊन, अर्धा क्राऊन, शिलिंग, सहा पेनी अशीही नाणी येथे होती.

ईस्ट इंडिया कंपनीची १८३५ पर्यंतची, विशेषतः सोन्याची व रुप्याची नाणी, तत्कालीन मोगल नाण्यांप्रमाणे बव्हंशी फार्सी असत. तांब्याच्या नाण्यांमध्ये कालक्रमाने विविधता आढळते. त्याच्या दोन बाजूंवर मिळून सामान्यतः बादशाहाचे किंवा राजाचे नाव असते किंवा नसते. त्यावर रोमन लिपीत इंग्‍लंड, बाँबे इ. शब्द व नाणे पाडल्याचे अर्धवट वर्ष असते. पुढे पत्त्यातील बदाम उलटा व पोकळ काढून, त्यात फुली मारून झालेल्या चार भागांत युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी हे नाव दाखविणारी UEIC ही आद्याक्षरे व बदामाखाली कधीकधी नाणे पाडल्याचे वर्ष घालू लागले. नंतर एका बाजूस तराजू व त्याच्या दोन पारड्यांमधील जागेत अद्ल हा अरबी शब्द त्याच लिपीत खोदीत. नंतर हिंदी, इंग्रजी, बंगाली, कन्नड, तेलुगू, तमिळ व फार्सी यांपैकी एक किंवा अधिक भाषांत व लिपीत नाण्याचे नाव, बादशाहाचे नाव, नाणे पाडल्याचे वर्ष इ. लेखन असे. यांशिवाय कंपनीचे चिन्ह, राजमुकुट, देवता, देवालय इ. आकृती असत.

फ्रेंच व डच कंपन्यांची नाणी उण्याअधिक फरकाने अशीच पण विविधतेत उणी होती. इंग्‍लिश ईस्ट इंडिया कंपनीची नाणी अशी : सोने : दुंडी मोहोर, मोहोर, अर्धी मोहोर, पाव मोहोर, तीन स्वामी पॅगोडा (होन), पोर्टोनोवो पॅगोडा (होन), जुना तारा पॅगोडा (होन), नवा तारा पॅगोडा (होन), नीम, अश्रफी, दुंडा (होन). पाच रुपये नाणे, रुपया नाणे. रुपे : पाच रुपये, दुंडा रुपया, रुपया, अर्धा रुपया, पाव रुपया, दुणेली, आणेली, अर्धा होन, पाव होन, पाच फलम्, दुंडा फलम्‌, फलम्, पहिला जॉर्ज तीन फलम्‌, पहिला जॉर्ज दोन फलम्‌. तांबे : आणा, अर्धा आणा, पाव आणा, १/१२ आणा, चाळीस कास, तीस कास, पंधरा कास, दहा कास, पाच कास, अडीच कास, एक कास, दुंडा ढब्बू, तीन ढब्बू, अर्धा ढब्बू, चार पै (= ४ पैसे), दोन पै, एक पै, अर्धा पै, चार पैसे, दोन पैसे, पैसा, अर्धा पैसा, पाव पैसा, अर्धी पै, एक अठ्ठेचाळीसांश रुपया, एकशहाण्णवांश रुपया, दुंडा पैसा (शिशाचा), त्रिशुळी पैसा, दुसरा चार्ल्‌स पैसा.

पोर्तुगीजांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीस गोवा, दमण आणि दीव या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. पैकी दीव व दमण येथील त्यांच्या सत्तेचा फार विस्तार झाला नाही पण गोव्यातील सत्तेचा त्यांच्या उत्तरेस वसई-तारापूरपर्यंत फुटकळ विस्तार झाला. त्यातही नवीन सत्ता आरंभी तरी जुन्या सत्तेतील नाण्यांचा उपयोगी करी. त्याप्रमाणे पोर्तुगीजांनी येथे सत्तेवर आल्यावर पॅगोडा (प्रथम देवळाचे चित्र असलेला होन, नंतर कोणताही होन), पार्डो (होनाचा १/१२ भाग प्रताप), झेरॅफिन (अश्रफी शब्दाचा अशुद्ध उच्चार), तांगा (टंक शब्दाचा अशुद्ध उच्चार), बुझ्‍रूक (ढब्बू शब्दाचा अशुद्ध उच्चार), लारी इ. नाणी आपल्या राज्यात चालू ठेवली आणि रेस व पावला ही दोन नाणी नव्याने प्रचारात आणली. पैकी पॅगोडा व पार्डो ही दोन सोन्याची, अश्रफी रुप्याची, तांगा रुपे व तांबे यांचे मिश्रणाचा, तर बुझ्‍रूक तांब्याचा होता. रेस आणि पावला केवळ हिशेब दाखविण्यासाठी उपयोगात आणत होते.


मराठा अंमल : शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर स्वतःचे राज्य स्थापन केल्यावर स्वतःच्या नावाची सोन्याची व तांब्याची नाणी पाडली. त्यांना अनुक्रमे शिवराई होन व शिवराई म्हणत. तोच क्रम संभाजी व राजाराम यांच्या काळांत चालू राहिला. शाहू मोगलांचे अंकितत्व पतकरून मोगलांचे कैदेतून सुटून आला. पुढे पुढे मोगलांचे अंकितत्व नावाचेच राहिले, तरीही पेशवाईत मोगल बादशाहांच्या नावानेच पेशवे व त्यांचे सरदार यांनी नाणी  पाडली. ही नाणी सोन्याची व रुप्याची होती. तांब्याच्या शिवराया मात्र पूर्वीच्याच म्हणजे शिवकालीन शिवरायांप्रमाणे पाडीत. पेशव्यांच्या काही सोन्याच्या नाण्यांवर आणि मिरजेच्या पटवर्धनांनी पाडलेल्या काही नाण्यांवर फार्सी मजकुराच्या जोडीने एका बाजूवर श्री गणपती आणि दुसऱ्या बाजूवर पंतप्रधान असे शब्द नागरी लिपीत कोरलेले आढळतात. पेशवे किंवा त्यांचे सरदार यांच्या स्वतःच्या नाण्यांवर नागफण्यावर दिसणारा दहाचा आकडा, एक किंवा दोन पाकळ्यांचे निशाण, शिवलिंग, नंदी इ. विविध चिन्हे असत आणि त्यावरून त्यांना दोचश्मी, जरीपटका, जी शिक्का इ. नावे पडली होती. पण एकंदरीत मराठी नाण्यांचा अभ्यास फार जटिल झाला आहे.

नाणेसंग्रहछंद : मध्ययुगात यूरोपमध्ये प्रबोधनानंतरच्या काळात लोकांमध्ये प्राचीन कलावस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात झाली. शिल्प, जडजवाहीर आणि नाणी यांचे संग्रह सतराव्या-अठराव्या शतकांत यूरोपमध्ये निरनिराळ्या देशांतील शहरांत निर्माण होऊ लागले. अलीकडे नाणकसंग्रहाच्या छंदाचे जे प्रचंड आकर्षण उत्पन्न झाले आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे प्राचीन नाण्यांची बाजारात बेसुमार वाढलेली किंमत हे होय. यूरोपमध्ये काही खाजगी संग्रहही फार मोठे आहेत. लंडनमधील लॉर्ड ग्रँट लीच्या संग्रहात ५० हजारांवर नाणी होती, तर व्हिएन्ना येथे विक्रीस काढलेल्या कार्ल कोल्शेकच्या संग्रहामध्ये दोन लाखांवर नाणी होती. अर्थात्‌ एवढे प्रचंड संग्रह केवळ श्रीमंत व्यक्तीच करू शकतात तथापि यूरोपमध्ये सामान्य माणसांचेही अनेक संग्रह आहेत. भारतातही अनेक लोकांना हा छंद आहे. यूरोपमध्ये नाणेसंग्रहाचा छंद असलेल्या लोकांनी १८३६ मध्ये न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ लंडन स्थापन केली. पुढे १९०४ मध्ये तिचे रॉयल न्यूमिस्मॅटिक सोसायटीमध्ये रूपांतर झाले. भारतातही १९१० मध्ये न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना झाली. या संस्थेचे एक मुखपत्र आहे. त्यात संशोधनपर लेख येतात. एवढेच नव्हे, तर प्राचीन नाणी विकणाऱ्यांचा जाहिरातीही असतात. दर वर्षी या संस्थेचे अधिवेशन भरते. त्यावेळी दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शनही भरवितात. नाणेसंग्रहाचा छंद असणाऱ्या व्यक्तीला या संस्थेचा सभासद होऊन आपला संग्रह व ज्ञान वाढविण्यास मदत मिळू शकते.

नाणी व नाणकशास्त्राचा अभ्यास अनेक विद्वानांनी केला असून जगातील विविध प्राचीन व अर्वाचीन नाण्यांचे संग्रह मोठमोठ्या वस्तुसंग्रहालयांत करण्यात आले आहेत. या वस्तुसंग्रहालयांतील नाण्यांची माहिती अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, म्हणून त्या वस्तुसंग्रहालयांनी आपापल्या वस्तुसंग्रहालयात असणाऱ्या नाण्यांची सविस्तर आणि सचित्र सूची तयार केली असून तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने ह्या सूच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा सूच्यांमध्ये ब्रिटिश म्यूझियम (लंडन), द इंडियन म्यूझियम (कलकत्ता), पंजाब म्यूझियम (लाहोर), प्रॉव्हिंशिअल म्यूझियम (लखनौ), सेंट्रल म्यूझियम (नागपूर), दिल्ली म्यूझियम ऑफ आर्किओलॉजी (दिल्ली), प्रिंस ऑफ वेल्स म्यूझियम (मुंबई), कॉइन्स इन द कस्टडी ऑफ द डायरेक्टर ऑफ अर्काईव्हज अँड आर्किओलॉजी, महाराष्ट्र अँड आंध्र प्रदेश वगैरेंनी केलेल्या सूच्या अभ्यासपूर्ण असून संशोधकांना अत्यंत उपयुक्त झाल्या आहेत.

संदर्भ : 1. Altekar, A. S. Coinage of the Gupta Empire, Banaras, 1957.   

            2. Bhandarkar, D. R. Lectures on Ancient Indian Numismatics, Calcutta, 1921.   

            3. Carson, R. A. G. Coins, Ancient, Mediaeval and Modern, London, 1970.   

            4. Chakraborty, S. K. A Study of Ancient Indian Numismatics, Mymensingh, 1931.   

            5. Codrington, O. A. Manual of Musalman Numismatics, London, 1904.   

            6. Cunnigham, Alexander, Coins of Ancient India, Varanasi, 1963.   

            7. Henderson, J. R. The Coins of Haider Ali and Tipu Sultan, Madras, 1921.   

            8. Hodiwala, S. H. Historical Studies in Mughal  Numismatics, Calcutta, 1923.   

            9. Laing, L. R. Coins and Archaeology, London, 1969. 

          10. Mehta, V. M. The Indo-Greek Coins, Ludhiana, 1967. 

          11. Rapson, E. J. Indian Coins, Strassburg, 1897.   

          12. Thurston, E. History of the Coinage… of the East India Company, 1890.   

          १३. ढवळीकर, म. के. प्राचीन नाणकशास्त्र, पुणे, १९७५.

 

ढवळीकर, म.के. खरे, ग.ह.