बिंबिसार : (इ. स. पू. ५८२-५५४). शिशुनाग वंशातील एक पराक्रमी राजा. पुराणांच्या मते, शिशुनागानंतर काकवर्ण, क्षेमधर्मन्, क्षत्रौजस, बिंबिसार, अजातशत्रु, दर्शक, उदायिन, नंदिवर्धन व महानंदिन हे राजे गादीवर आले. अश्वघोषाने आपल्या बुद्धचरितात बिंबिसार हर्यंक कुळातील होता, असे नमूद केले आहे. हर्यंक कुळाच्या उगमासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि बिंबिसार हा त्या घराण्याचा संस्थापक नव्हे. बिंबिसारला राजा भट्टिय नावाच्या त्याच्या वडिलांनी, तो केवळ पंधरा वर्षांचा असताना राजपद दिले, असे महावंस सांगतो.

तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता आणि त्याने वैवाहिक संबंध व परराज्यप्रहार या द्विविध मार्गांनी मगध राज्याच्या प्रतिष्ठेत व सामर्थ्यात भर घातली. अंग राज्याचा राजा बह्मदत्त याचा पराभव करून त्याने आपले राज्य वाढविले.

बिंबिसारची एक राणी कोसल राजा प्रसेनजितची बहीण होती. या विवाहामुळे काशीचा समावेश त्याच्या राज्यात झाला. त्याच्या दुसऱ्या एका राणीचे नाव चेल्लना असून ती वैशालीच्या राजाची मुलगी होती. बिंबिसारला अजातशत्रूने कैद करून ठेवले त्या वेळी तिने त्यास अन्न देऊन वाचवले होते. मद्र या पंजाबातील राजाची राजकन्या खेमा, ही बिंबिसारची आणखी एक पत्नी. या संबंधांमुळे पूर्व आणि पश्चिम दिशांच्या प्रांतांत आपले वर्चस्व वाढविण्यास बिंबिसारला मदत झाली. त्याच्या राज्यात एकूण ८०,००० खेडी होती. त्याने नवीन राजगृह नगर वसविले.

बिंबिसारला अनेक पुत्र होते : कूणिक किंवा अजातशत्रु, हल्ल, वेहल्ल, अभय, नंदिसेन, मेघकुमार इत्यादी. पहिले तीन मुलगे चेल्लना राणीपासून झाले होते व चौथा मुलगा आम्बपाली या लिच्छवींच्या कलावंतीणीपासून झाला होता. बौद्ध लेखकांच्या मते अजातशत्रु, विमल कोण्डन्न, वेहल्ल व शीलवत अशी बिंबिसारच्या पुत्रांची नावे होती.

बिंबिसारची शासनपद्धती कार्यक्षम होती. अधिकाऱ्यांवर त्याचे नियंत्रण असे. बिंबिसारच्या उच्चपदाधिकाऱ्यांना महामात्र म्हणत. ते तीन वर्गांत विभागले होते : सब्बात्थक किंवा सर्वासाधारण कारभाराचा प्रभारी अधिकारी वोहारिक किंवा न्यायाधिकारी व सेनानायक किंवा सेनापती. बिंबिसारच्या मृत्यूबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत : जैनांच्या सूत्रांप्रमाणे त्याने अजातशत्रूला राजा करण्याचे ठरविले तथापि अजातशत्रूने मृत्यूपूर्वीच बिंबिसारला कैद केले पण पुढे पश्चात्ताप होऊन तो त्यास मुक्त करण्यासाठी तुरुंगात गेला. दरम्यान बिंबिसारने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. बिंबिसारच्या कारकिर्दीविषयी भिन्न मतांतरे आहेत. त्याने मगध राज्याची स्थापना केली.

पहा : अजातशत्रु शिशुनाग वंश.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1971.

केनी, लि. भा.