अलेक्झांडर द ग्रेट

अलेक्झांडर द ग्रेट :(? ऑक्टोबर ३५६— १३ जून ३२३ इ. स. पू.). मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट. मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा पुत्र. पेला येथे जन्म. लहानपणी फिलिपने त्यास युवराजास योग्य असे सर्व लष्करी व राजकीय शिक्षण दिले होते. ह्याशिवाय त्याचा गुरू ॲरिस्टॉटल ह्याने त्याच्यामध्ये काव्य, कला, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आदी शास्त्रांविषयी गोडी उत्पन्न केली होती. पण ॲरिस्टॉटलचा ‘नगर-राज्ये हीच संस्कृतीची उत्कृष्ट केंद्रे होऊ शकतात’, हा विचार अलेक्झांडरला पटत नव्हता. होमरचा आकिलीझ हा त्याच्यापुढे आदर्श होता. म्हणून त्याने जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि त्यानुसार नेहमी चढाईचे धोरण स्वीकारले.

इ.स.पू. ३३६ मध्ये फिलिपचा खून झाला आणि अलेक्झांडर वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मॅसिडॉनच्या गादीवर आला. तत्पूर्वी इ.स.पू. ३४० मध्ये फिलिपने ज्या वेळी बायझंटियमवर स्वारी केली होती, त्या वेळी अलेक्झांडरने मॅसिडोनिया सांभाळला आणि मीडी लोकांचा पराभव केला आणि पुढे दोन वर्षांनी फिलिपला ग्रीक नगरराज्यसंघाचा पराभव करण्यास मदत केली.

गादीवर आल्यावर एक वर्षाच्या आतच अलेक्झांडरने उत्तरेस डॅन्यूब नदी आणि पश्चिमेस एड्रिॲटिक येथपर्यंत आपली सत्ता पसरविली. नंतर थीब्झ आणि अथेन्स ही राज्ये फुटून निघणार होती, त्यांना जरब बसविण्याचे त्याने ठरविले. प्रथम त्याने थीब्झवर स्वारी करून अनेक नागरिकांना ठार केले काहींना गुलाम म्हणून विकले. तेथील देवळे व आपल्या आवडत्या पिंडर कवीचे घर यांखेरीज सर्व इमारतींचा विध्वंस केला. हे पाहताच अथेन्स आपणहून शरण आले मात्र स्पार्टा सामील झाले नाही.

नंतर त्याने इराणी साम्राज्यावर स्वारी करण्याचा निश्चय केला. ते साम्राज्य अत्यंत समृद्ध व बलशाली होते. पण त्याचा राजा तिसरा डरायस ह्यात कोणतेच नेतृत्वाचे गुण नव्हते. शिवाय इराणी लोकांत आपल्या शासकांविषयी स्वामिनिष्ठा नव्हती. त्यामुळे असाध्य गोष्टही त्यास साध्य झाली.

इ.स.पू. ३३४ मध्ये ग्रीसमधील प्रमुख ठिकाणी संरक्षणार्थ सैन्यपथके ठेवून अलेक्झांडरने दार्दानेल्स नदी ओलांडली. त्याच्या सैन्यात पार्मेनियो, टॉलेमी, अँटिगोनस, सेल्युकस, नीआर्कस यांसारखे शूर व अनुभवी सेनापती होते. शिवाय त्याचे स्वतःचे शौर्य, धाडस, चिकाटी आदी गुणांमुळे तो आपल्या सैनिकांचे दैवत बनला होता त्यामुळे अलेक्झांडरला कोणत्याही आपत्तीवर मात करता आली. सु. ४०,००० सैन्यासह अलेक्झांडरने इराणवर स्वारी केली. डरायसने पाठविलेल्या सेनापतींचा ग्रॅनिकसच्या तीरावर पराभव करून तो सिरियाकडे वळला.तेथे इससच्या आखाताजवळ त्याची डरायसच्या विशाल सैन्याशी गाठ पडली. अलेक्झांडरने डरायसचा पराभव करून त्याला पळवून लावले. नंतर त्याने फिनिशियन आरमार काबीज केले. ईजिप्तवर आपला अंमल बसवून त्याने

ॲलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली. नंतर त्याने डरायसचा गॉगामीला येथे पुन्हा पराभव केला. डरायस रणांगणातून पळून गेला. अलेक्झांडर इराणी साम्राज्याचा अधिपती झाला. त्याने इ. स. पू. ३३१ च्या हिवाळ्यात इराणची त्या ऋतूतील राजधानी बॅबिलन येथे मोठ्या समारंभाने प्रवेश केला. पुढे त्याने स्यूसा व पर्सेपलिस या इतर राजधान्याही काबीज करून खजिने लुटले पर्सेपलिस येथील राजवाडा जाळून ग्रीसवर पूर्वी इराणने केलेल्या स्वारीचा सूड घेतला. तथापि अद्याप डरायस त्याच्या तावडीत सापडला नव्हता. म्हणून त्याने त्याचा पाठलाग केला. दरम्यान डरायसच्या नाखूष अनुयायांनीच त्याला इ. स. पू. ३३० मध्ये ठार मारून त्याचे शव अलेक्झांडरच्या स्वाधीन केले. त्याने ते पर्सेपलिस येथे यथायोग्य दफनासाठी पाठवून दिले.

आरंभी अलेक्झांडरचा उद्देश केवळ इराणी सैन्याचा विध्वंस करणे हाच होता. परंतु लागोपाठ मिळालेल्या विजयांमुळे साम्राज्य स्थापण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात उद्भवली शिवाय ते चिरकाल टिकावे म्हणून जिंकलेल्या प्रदेशांना आपापला धर्म व सामाजिक रीतिरिवाज, तसेच काही राष्ट्रीय संस्थाही त्याने राखू दिल्या. ग्रीक नगरराज्यांसारखी नगरे स्थापण्यास उत्तेजन दिले. आपल्या नावाची सोळा ‘ॲलेक्झांड्रिया’ नगरे त्याने स्थापिली. इराणी व ग्रीक लोकांचे संघटन करण्याकरिता स्वतः डरायसच्या कन्येशी विवाह केला आणि आपल्या इतर सेनाधिकाऱ्यांना इराणी स्त्रियांशी विवाह करण्यास उत्तेजन दिले. इराणी युवकांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची सैन्यात भरती केली आणि इराणी घोडेस्वारांची पथके तयार केली. स्वतः इराणी पोषाख घालणे सुरू करून, इराणी लोक राजाला देव मानत, तसे सर्वांनी आपणास मानावे, आपणापुढे साष्टांग प्रणिपात करावा, असा प्रचार त्याने सुरू केला. त्यामुळे मॅसिडोनियन सैनिकांत असंतोष होऊन त्यांनी अलेक्झांडरविरुद्ध कट केला. तो उघडकीस आला व त्याने कटवाल्यांस देहान्त शासन केले.

इ.स.पू. ३२८ मध्ये त्याने बॅक्ट्रिया व त्याच्या उत्तरेचा सॉग्डिआना हे प्रदेश जिंकले. त्याने तेथील राजकन्येशी विवाह केला आणि नंतर हिंदुकुश ओलांडून इ.स.पू. ३२७ च्या मे महिन्यात भारतावर स्वारी केली.

भारतातील थोड्या राजांनी अलेक्झांडरला साहाय्य केले. पंजाबात त्या काळी काही छोटी राजसत्ताक राज्ये आणि काही गणराज्ये होती. त्या सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ मोठ्या शौर्याने लढा दिला आणि मगच अलेक्झांडरला पुढे जाऊ दिले. त्यांच्या शौर्याची गुणगाथा तत्कालीन ग्रीक लेखकांनी गाइली आहे.

अलेक्झांडरने काबूल नदीच्या काठाने दोघा सेनापतींना बरेच सैन्य देऊन पुष्कलावतीच्या (चारसद्दाच्या) राजावर पाठविले आणि स्वतः वुनार, पंजखोर व स्वात नद्यांच्या खोऱ्यांतून त्यांच्या साहाय्यार्थ चाल केली. तेथे त्याला अस्पेसिऑय आणि असरकेनॉय (अश्वक) या गिरिवासी टोळ्यांनी सामना दिला. असरकेनॉयांचा राजा रणांगणावर पडला असता त्याच्या राणीने युद्ध चालू ठेवले. तिच्या उदाहरणाने स्फूर्ती मिळून तिथल्या सर्व स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी लढा चालू ठेवला. या लढाईत अलेक्झांडर जखमी झाला. तेव्हा रागाच्या भरात त्याने तिथल्या सर्व लोकांची कत्तल करण्याचा हुकूम दिला. ग्रीक लेखकांनी ह्याचे सविस्तर वर्णन दिले आहे.

अलेक्झांडरने अटकच्या उत्तरेस सु. २५ कि.मी. वर ओहिंद येथे नावांचा पूल करून सिंधू नदी पार केली आणि तो तक्षशिलेस पोहोचला. तेथे तक्षशिलेचा राजा आंभी शरण आला. पण झेलम व चिनाब यांच्यामधील प्रदेशावर राज्य करणाच्या पोरस राजाने त्यास प्रतिकार केला. दोघांत झेलमच्या काठी घनघोर युद्ध झाले. पोरसचा पराभव झाला. अलेक्झांडरच्या सैन्याला भारतीयांच्या शौर्याची कल्पना आली. पोरससारखा शूर योद्धा आपला साहाय्यक असावा या हेतूने अलेक्झांडरने त्याचे राज्य त्यास परत केले आणि शिवाय आणखी पंधरा गणराज्यांचा मुलूख त्याच्या स्वाधीन केला. नंतर त्याने पुढे बिआस नदीपर्यंत चाल केली. मध्ये त्याला ग्‍लौकनिकॉय आणि कथईऑय (कठ) या गणराज्यांशी युद्ध करावे लागले. कठांबरोबरच्या युद्धात अलेक्झांडरच्या सैन्याची बरीच प्राणहानी झाली.

बिआस नदीला पोहोचल्यावर अलेक्झांडरच्या सैनिकांनी पुढे जाण्याचे नाकारले. बिआस पार केल्यावर अलेक्झांडरच्या सैनिकांना नंद राजाशी टक्कर द्यावी लागली असती. त्यांनी नंदाच्या विशाल सेनेविषयी आपल्या हेरांकडून माहिती ऐकली होती. शिवाय आठ-दहा वर्षांच्या सतत युद्धांमुळे ते थकून गेले होते. अलेक्झांडरने पोरसला झेलम आणि बिआस नद्यांमधील प्रदेशाचा अधिपती नेमून इ.स.पू. ३२६ च्या फेब्रुवारीत परत जाण्याचा निर्णय घेतला.

अलेक्झांडर आलेल्या मार्गाने झेलम नदीपर्यंत परत गेला. नंतर त्याने त्या नदीतून एक हजार नावांतून आपले काही सैन्य पुढे नेले. राहिलेले सैन्य नदीच्या दोन्ही तीरांवरून कूच करीत चालले. झेलम आणि चिनाब नद्यांच्या संगमाजवळ त्याला मालव (मल्‍लॉय) आणि क्षुद्रक (ऑक्सिड्रकॉय) या आयुधजीवी संघांशी सामना द्यावा लागला. मालवांच्या प्रत्येक नगरात त्याला निकराचा प्रतिकार झाला. एका नगरात ५,००० ब्राह्मणांनी शस्त्रे धारण करून त्याच्याशी प्राणपणाने युद्ध केले आणि त्यांपैकी बहुतेक धारातीर्थी पडले. दुसरे एक नगर घेताना अलेक्झांडर जखमी झाला. त्या वेळी त्याच्या क्रुद्ध सैनिकांनी तेथील स्त्रिया व मुले यांचीही क्रूर कत्तल केली. आर्जुनायक (अगलस्सॉय) नामक गणराज्याचे एक नगर घेताना तेथील सर्व पुरुषांनी शौर्याने लढून शेवटी निराश झाल्यावर आपल्या स्त्रिया व मुले ह्यांसह अग्निकाष्ठे भक्षण केली.

इ.स.पू. ३२५ च्या सप्टेंबरमध्ये अलेक्झांडर सिंधुतीरावरच्या पाटल गावी पोहोचला. तेथून त्याने नीआर्कसच्या हाताखाली काही सैन्य देऊन त्याला जलमार्गाने पाठविले व स्वतः स्थलमार्गाने बलुचिस्तानातून इराणातील स्यूसा येथे इ.स.पू. ३२४ मध्ये पोहोचला. जाताना त्याच्या सैन्याची फार हानी झाली. स्यूसा येथे तो मरण पावला.

अलेक्झांडर हा जगातील अद्वितीय योद्धा आणि सेनानायक होता. त्याचे साहस अचाट होते आणि कल्पनाशक्ती विलक्षण होती. स्वदेशापासून हजारो मैल अंतरावरच्या अज्ञात प्रदेशांत त्याने अचाट पराक्रम करून विजय मिळविले. सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती पण ती त्याच्या अकाली मृत्यूमुळे पूर्ण झाली नाही एवढेच नव्हे, तर जिंकलेल्या प्रदेशांत त्याला कार्यक्षम प्रशासनपद्धती अंमलात आणता आली नाही.त्याने नेमलेल्या क्षत्रपांनी आणि सेनापतींनी त्याच्या निधनानंतर साम्राज्याचे तुकडे करून ते बळकाविले तर काही क्षत्रपांना तेथील लोकांनी हाकून लावून आपले स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले. खासगी जीवनात अलेक्झांडर प्रथमपासूनच फारसा सुखी नव्हता. त्याची आई ऑलिंपियस हिला त्याच्या पित्याने घटस्फोट दिल्यामुळे ऐन तारुण्यात तो नाराज झाला होता. त्याला तत्कालीन इराणी सुंदरी रॉक्सॅनास व डरायसची कन्या बार्झिन अशा दोन राण्या होत्या. त्यांपैकी रॉक्सॅनास त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी झालेल्या त्याच्या मुलाचे नाव अलेक्झांडरच ठेवण्यात आले.

अलेक्झांडरच्या स्वारीने भारताचा पश्चिमेकडील देशांशी निकटचा संबंध येऊन व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली. बॅक्ट्रिया येथे ग्रीकांची (यवनांची) वसाहत स्थापिली होती. अफगाणिस्तानात यवनांची बरीच वसती होती आणि तेथे ग्रीक भाषा प्रचलित होती हे अलीकडे प्रकाशात आलेल्या कंदाहाराजवळच्या ग्रीक आणि ॲरेमाईक भाषांतील अशोकाच्या लघु-प्रस्तर लेखांवरून स्पष्ट दिसते. अलेक्झांडरच्या स्वारीमुळे वायव्य प्रांत, पंजाब आणि सिंध यांतील अनेक गणराज्यांचा विनाश झाला. त्यामुळे पुढे मौर्यांचे साम्राज्य या प्रदेशांत पसरणे सुलभ झाले. चंद्रगुप्त मौर्य पंजाबात अलेक्झांडरला भेटला होता, असे ग्रीक इतिहासकार सांगतात. त्याने त्याच्या उदाहरणावरून साम्राज्यस्थापनेची स्फूर्ती घेतली असणे संभवनीय आहे. अलेक्झांडरच्या बरोबर आलेल्या सेनापतींनी व ग्रीक लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून भारताविषयी बरीच माहिती पाश्चात्त्य देशांत पसरली आणि पुढील काळात भारताचे सिरिया, मॅसिडोनिया, ईजिप्त आदी देशांशी राजनैतिक संबंध सुरू झाले.

पहा : ग्रीक संस्कृति.

संदर्भ : 1. Benoist, Mechin Trans. Ilford, Mary, Alexander the Great, New York, 1963.

         2. Bury, J. B. History of Greece, New York, 1929.

         3. Mercer, Charles, Alexander the Great, New York, 1964.

मिराशी. वा. वि.